बाय बाय, सपना




      मी लेखिका असले तरी पहिली माझ्या मुलाची आई आहे. त्यामुळे कित्येक दिवस मला लिहायला असा वेळ मिळाला नव्हता. एकतर फुलटाईम नोकरी परत मुलाला संभाळतांना माझा बराच वेळ जात असे. मुलाचे आपले एक नाहीतर एक चालू असायचे. शाळा पहायची तसेच जेवणाखाण्याकडेही लक्ष द्यायचे. परत त्याच्याबरोबर खेळायला,फिरायलाही हवे. तर त्याला रोज संध्याकाळी इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी मी समोरच्या काँम्पलेक्समध्ये  घेवून जायचे. तिथेच त्याचे आवडीचे मित्र होते, ज्यांच्यात तो रमायचा. तिथे पांढऱ्या फुलांची झाडे होती. रातराणी असेल का ? फुलांची फारशी नावे मला ठाऊक नाही. पण त्या छोट्या छोट्या फुलांचा सुंगध फार वेडावून टाकणारा होता. कधी कधी रस्त्यात खेळणारी मुले माती पायानी उडवायची किंवा ते जोरात धावतांना त्यांच्या पायातील माती हवेत मिसळायची. त्यामुळे उनाडक्या करणाऱ्या मातीचा घमघमाटही  त्या पांढऱ्या अनामिक फुलांच्या वासात मिसळून जायचा.
................................
    मी नेहमीसारखी आपल्या मोबाईलवर व्हाँटसअप पहात असतांना, मला तिचा क्षीण आवाज ऐकू आला. आधी मी दुर्लक्ष केले. नवरा सांगतच असतो की तुला हे सगळे भास होत असतात. मनाला जे काही वाटतंय त्याच्याकडे फार बारकाईने पहात जावू नकोस. मी परत व्हाँटसअप वाचू लागले. मग तिची स्पष्ट हाक मला ऐकायला आली--- शिल्पा शिल्पा. मी वर पाहिले. माझे अतंर्मन मला जे सांगत होते तेच खरे होते—वरून सपना मला हाक मारत होती. सहाव्या माळ्यावरून. मी मुलाला म्हणालेतू इथे नीट खेळ, मी जरा वर जावून येते. माझी मैत्रीण वर आहे. तो खेळण्यात दंग असल्याने त्याने माझे बोलणे किती ऐकले ते माहीत नाही. पण मी झपाझप त्या इमारतीत शिरले. मजल्यावर जिना चढतांना मी विचार करत होते की सपना इथे कशी रहायला आली ? तसे तर मला इथे रहायला येवून एक वर्ष झालंय. माझ्या आधी ती इथे आली असेन का ? तिचा नवरा, तिची मुलगीही इथे असेल. पण मी तर केद्र सरकारची नोकरी करते म्हणून मला हे क्वाटर्स मिळालेत, ती इथे कशी रहायला आलीय? इतके सगळे प्रश्न माझ्या मनात एकदम चक्रीवादळासारखे फिरू लागले. मग मी दम लागल्याने जिन्यावरच बसले. मला सहाव्या माळ्यावर चढायचा अगदी कंटाळा आला होता. परत जावे आणि सपनाला खाली बोलवावे असा विचार मनात आला. पण तिला इतक्या वर्षाँनी भेटण्याची ओढ होती की मी मनाचा हिय्या करून परत जिने चढू लागले.
           सपना पूर्वी दिसायची तशीच दिसत होती. तिने दरवाजा उघडताच हा विचार माझ्या डोक्यात आला. मी तिला कडकडून मिठी मारली. तिचे कुरळे केस अजून लांब झाले होते. तिने अंगाला पॉन्डसचा पावडर लावला होता. घरात पंजाबी ड्रेस घातलेला, तो ही इस्त्रीचा. मग तिने मला सोफ्यावर बसायला सांगितले. मला थंड पानी घेवून आली, आणि चटकन चहाही दिला.
मी तुझी खूप आठवण काढत होते, मला वाटलेच तू येशील. ती मला म्हणाली. असे सगळे बोलतांना ती गोड ओळखीचे हसली. मी तिला खूप प्रश्न विचारू लागले, इथे कधी आलीस, नोकरीचे काय चालले आहे, नवरा आणि मुली कुठे गेल्या ?”
   सपना एकदम हसू लागली. तुझी सवयच आहे, तुला जितके प्रश्न पडतात तितक्या प्रश्नांची उत्तरे मला एकदम नाही देता येणार. असे म्हणून सपना आत गेली. बाहेर आली तेव्हा तिच्या हातात पिशवी होती. चेहऱ्यावर मिष्कील हास्य.
ती मला म्हणाली खाली ये ना.इथे बस.
मग मी बसले. पिशवीत नवा व्यापारी हा खेळ होता. सपना व मी हा खेळ तिच्या माहेरी खेळायचो, अभ्यास करून झाल्यावर.
मला एकदम मजा वाटली. जुन्या आठवणी म्हणजे हरवलेल्या झुमक्यासारख्या. सापडल्या तरी ठीक नाही सापडल्या तरी नटणे काही थांबत नाही. सपनाच्या हातात गुडगुडी होती, ती मला म्हणाली पहिल्यासारखी चिटींग नाही करायची हा. हरली तर मानून घ्यायचे हरलो ते.
आम्ही खेळ खेळू लागलो. मला सगळा खेळ जसाच्या तसा आठवू लागला. मी एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखी गुडगुडी फेकत होते. किती वेळ खेळ खेळत होतो, देव जाणे. मी भराभर पैसे जिकंले. सपना भिकारी झाली. तिने माझ्याकडून लोन घेतले. तिला मी चक्रवाढ व्याज लावले. जिंकल्यामुळे मला खूप मजा येत  होती. सपनाला काय वाटतंय ते पाहण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता.
मुलाने खालून आवाज दिला---   
    मम्मी लवकर खाली ये. मला तहान लागली आहे. कोल्डड्रिंक प्यायचे आहे.
………………………………………
    रात्री नवरा येवून फ्रिज खोलत होता. त्याला फ्रिजमधल्या थंड पाण्याच्या बाटल्या सापडत नव्हत्या. त्याने त्या ठेवल्याच नव्हत्या, या  मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून तो चिडचिड करत होता. मग आमची नेहमीसारखी वादावादी झाली. मुलगा समोर येताच, आम्ही  सुजाण पालकासारखे गप्प बसलो. मुलाने थंड पाण्याची बाटली फ्रिजमधून बाहेर काढली. नवरा पाय आपटत गॅलरीत गेला व त्याने सिगरेट शिलगावली. सिगरेटचा भुरभुरणारा वास मलाही आवडतो. मी नवऱ्याच्या मागे गॅलरीत गेले, मघाचे भांडणाचे मागे टाकून. आता माझा सूर आता जरा मवाळ झाला होता. मी त्याला म्हटले, सपना आपल्या बाजूच्या काँम्पेल्कसमध्ये रहायला आली आहे.आजच मला भेटली.
   त्याने लगेच चटका बसल्यासारखी सिगरेट बाजूला टाकली. माझ्याकडे एकदम मेंटल व्यक्तीकडे पाहतात तसे पहात म्हणाला, शिल्पा—सपना मेलीय. आपण तिच्या प्रेतयात्रेला गेलो होतो ना. त्याचा आवाज दगड झाला होता. मी मनात ठरवले, नवरा म्हणून हा माणूस फेल आहे. आपल्याला जे दिसते, वाटते ते सगळे समजण्यास हा पूर्णपणे असमर्थ आहे.
..........................
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाला खेळण्यास मी लवकर खाली सोडले.त्याला खरंतर खाली जायचे नव्हते, घरातच चित्रे काढत रेंगाळत होता. पण मी जबरदस्ती केली. घरात राहून मुले एकलकोंडी होतात. मग त्याला मैदानात सोडून मी लगेच सपनाच्या घरी ओढ लागल्यासारखी गेले. सपनाने आज तिच्या घराबाहेरच्या मोकळ्या जागेत फिनेल ओतले होते. फिनेलचा हा ब्रँन्ड माझा फेवरेट आहे. अनहेल्दी असला तरी त्याचा वास मला आवडतो. मी तो डेडली वास नाकाने एकदम पिवून टाकला. तर मी गेले तेव्हां सपना एकदम लिपस्टीक वगैरे लावून तयारी करत होती. तिला बाहेर जायचे आहे हे माझ्या लक्षात आले. मी म्हणाले, तुझा कुठे जायचा प्लाँन असेल तर मी नंतर येते. किंवा तू मला फोन कर. अय्या पण मी तिला नंबर द्यायचेच विसरले होते. सपना म्हणाली, नंबर देवू नकोस. सोनूला आवडत नाही मी तुझ्याशी बोललेले. मादरचोद मी मनात तिच्या नवऱ्याला शिवी दिली. सपनाशी लग्न ठरल्यानंतर मी त्याला एका दुसऱ्या मुलीबरोबर गार्डनमध्ये अंधारात पाहिले होते व सपनाला हे सांगितले होते हे त्याचे रागाचे कारण होते. पण आता या गोष्टीला किती वर्ष झाली. असो, सपना घराचा दरवाजा लावत म्हणाली, आज आपण बाहेर फिरायला जावू.
           खाली उतरताच मी मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याचा पापा घेतला, तो बाहेर असे प्रेमप्रदर्शन केले की कावराबावरा होतो. मग मी त्याला बाय करून तिच्या बरोबर बाहेर पडले. आम्ही मैदानात दोन फेऱ्या मारल्या. आमच्या मागेपुढे एक बाई तिच्या बुलडाँगला घेवून फिरत होती. तिने तो कुत्रा शी-शू करायला मैदानात आणला होता. आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि बाहेरचे जग घाण करायचे, हे मी सपनाला तावातावाने सांगत होते. तर ती हे ऐकूनही नुसती हुं हुं करत होती. तर या दोन लहान फेऱ्यातच सपना दमून गेली.. मी आता तिला नीट निरखून पाहिले तर तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. मेकअप करूनही चेहरा सुकलेला वाटत होता. फ्रिजमध्ये ठेवलेल्या गजऱ्यासारखा. मग मायेने मी तिचा हात हातात घेतला. तो जरा कोमट वाटला. इतक्यावेळ सपना गप्प बसली होती. मग खोल आवाजात बोलू लागली, म्हणाली औषधं चालू आहेत. तब्येत ठीक नसते आता. मला माहीत आहे की सपना ही घाबरट मुलगी आहे, तिच्या वडिलांसारखी. आम्ही काँलेजमध्ये असताना एका प्राचार्यांचा श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला होता. हे कळताच सपना फार अपसेट होवून त्या दिवशी कॉलेज अर्धवट टाकून तडकाफडकी घरी निघून गेली होती. कारण तिलाही दमा होता. मी व सपना नंतर गार्डनमधील झोपाळ्यावर बसलो. ती उंचीने कमी असल्याने तिला झोक्याला ढकलता येत नव्हते. मग मीच झोका चालवत होते. सपनाला मी माझ्या लिखाणाबद्दल सांगितले. माझ्या कांदबरीबद्दल तिला ऐकून माहीत होते. ती मला एकदम भावुक होत म्हणाली मी जर मेले तर माझ्यावर काही लिहशील का ?”...मी तिला ओरडले. तुला काय धाड भरलीय, एवढ्यात मरायला? चांगली एक मुलगी आहे, चांगला का वाईट एक नवरा आहे. इतकी महाराष्ट्र शासनाची मोठ्या पदाची नोकरी आहे..तू काही मरणार वगैरे नाहीस. मी तिला समजावत होते. सपनाचे काजळ भरलेले डोळे पावसाळी ढगासारखे दिसू लागले. विषय बदलण्यासाठी मी तिला एक वल्गर जोक सांगितला. सपना तुटपुंजी हसली. आणि थोड्यावेळाने आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो.
............................
           त्यानंतर रविवार असल्याने मी घर साफ करण्यास घेतले. खूप जळमट झाली होती. पिसवा झाल्या होत्या. अडचणीच्या जागेतील पसारा बाहेर काढून कचरा फेकून दिला. जुने पातेले, तुटलेली लाकडी सूपं, न वापरलेल्या शाली, उसवलेल्या पर्स, मुलाच्या वह्या, नवऱ्याचे जुने कपडे आणि अशा बऱ्याच गोष्टी उपसून बाहेर काढल्या. हा कचरा बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटू लागले. पण त्यानंतर जमिनीवर पाय पसरून बसल्यावर मला एकदम भकास वाटू लागले, असे फिंलीग आले की या जगात आपले कुणी नाही.  साथ देणारे हे सामानही आज भंगारात गेले. मोकळे टापटीप घर मला एकदम खायला अंगावर आले. मग मी फटाफट उरलेले काम आटपून थेट सपनाच्या घरी निघाले. बेल वाजवताच, तिने दरवाजा उघडला.पण अर्धवट. ती खुणेने मला म्हणाली की नवरा घरात आहे. तिने मला गुपचूप गच्चीवरच्या जिन्यावर जावून बसण्यास सांगितले. मी वर जावून बसले. गच्ची खरंच खूप घाण होती. कुजलेल्या वस्तू एकमेकांवर ठेवलेल्या होत्या. लाकडाचे जुने फर्निचर टाकून दिलेले होते. एक डिसगस्टींग वास गच्चीच कोंबून भरला होता. तो वास मला ओळखता येत नव्हता. हा वास कसला...कसला असावा, मी खूप वेळ विचार करत होते. मग मला क्लिक झाले हा वास पेस्ट कंट्रोलच्या औषधाचा आहे. जर या वासात फार वेळ राहिले तर गुदमरून मरूनही जावू शकते, मला वाटू लागले. मी समोर पाहिले तर माझ्या शेजारी एक काळे, मोठे झुरळ उलटे पाय करून मरून पडले होते.त्याच्या सभोवती भुकल्या लाल मुंग्याची रांग लागली होती. मला कळेना मी काय करावे ,तर मग ती त्या मुंग्याना एका कागदाच्या तुकड्याने लांब करू  लागले. पण मुंग्या, तो झुरळ त्यांचा प्रियकर असल्यासारखा ओढीने त्याच्याकडेच जात होत्या....  मी अस्वस्थ होवून सपनाची वाट पाहू लागले, तिचा नवरा व मुलगी बहुतेक थोड्या वेळात निघणार होते. पण अजून गेले नव्हते. तेवढ्यात दरवाज्याचा आवाज झाला आणि खरोखर ते निघाले. मी सपना त्यांना बाय करतांनाचा आवाज ऐकला.तिची मुलगी तिच्यासारखीच बडबडी होती. चेहराही तसाच. भोळसर. मी गच्चीतून पहात होते. मग सपनाने वर  येवून मला हाक मारली.
बघ झाली माझी सुटी. आता काही नवरा आठवडाभर येणार नाही.       त्याच्या आईला बरे नाही म्हणून आठवडाभर तरी सासरीच राहणार आहे. चल मज्जा.
     असे बोलून तिने माझ्या हातावर टाळी दिली. बापरे सपनाचा हात खूप गरम होता. मी म्हटले ताप आहे तुला... ती म्हणाली विशेष काही नाही. मेलेल्या माणसाचे शरीराचे तापमान असेच असते. तिचे हे विचित्र बोलणे ऐकून मी तिच्या पायाकडे पाहू लागले, भूताचे पाय उलटे असतात ना ? तिने उंच टाचाच्या सुलट सँन्डलस घातल्या होत्या. मला हायसे वाटले. सपना मला म्हणाली, चूकच झाली, थांब रनिंगचे बूट घालून येते  आता आपण दोघी खूप खूप लांब चालत जावू. पूर्वी सपनाकडे दहाबारा जोड्या तरी हिलसच्या चपला असायच्या. आज मी तिला पहिल्यांदा स्पोर्टंस शूजवर पाहिले होते.
           मग त्या दिवशी आम्ही दोघी त्या दिवशी खूप खूप चाललो. निळसर आकाश स्वच्छ सफेद होते. ऊन उतरू लागले होते. सपना मला म्हणाली की ही माझी शेवटची इच्छा आहे, आपण सीफेसवर चालूया का ? मी तिच्या डोक्यावर टपली मारली. तेव्हा सपनाने माझ्याकडे एकदम रागाने पाहिले. सपना सहजासहजी कधी रागवत नाही. ती रेग्यूलर विपश्यना करते. तिचे लग्न व्हायच्या आधी एकदा मी तिला चिडवत म्हणाले होते की तू कधी रागवतच नाही. तुझा कुणी कितीही अपमान केला तरी. त्यावेळी ती एकदाच माझ्यावर रागावली होती. त्यातही मला तिचे हसायला आले होते. तर आता तिची समजूत काढत मी म्हणाले की तू शेवटची इच्छा असे का बोललीस ? ती म्हणाली माझी जीभ घसरली पण तू डोक्यावर मारत जावू नकोस. मजेतच मारायचे असेल तर पाठीवर मार. लहानपणी कसे आपण ढब्बा ढब्बा खेळायचो तसे. मी तिचे हे उग्र बोलणे ऐकून जरा नर्वस झाले, हे लक्षात आल्याने सपना म्हणाली की माझे मेनिनजायटीसचे (Meningitis)आँपरेशन झालेय, हे तुला माहीत नाही ना. मी एकदम शॉक्ड झाले. हे कधी झाले ? मग सपनाच्या डोळ्यात पाणीच आले. ती म्हणाली एक वर्ष होवून गेले की, मला   मेनिनजायटीस झाला होता. माझी दोन दोन आँपरेशन्स झाली. खूप खर्चही आला, सोनूचा व्यवसाय तर नीट चालत नव्हता तेव्हा आईने तिच्या आँफिसचा फंड तोडून पैसे दिले.
           आम्ही खूप वेळ मरिनलाईन्स ते गिरगाव असे चालत राहिलो. एक फेरी झाली की दुसरी फेरी मारायचो. सपना थोडी लवकर थकायची. मग आम्ही कट्ट्यावर बसायचो. दोघी सुर्याकडे पहात. सुर्यही आमच्याकडे पहात आहे असे वाटायचे.नजर संपेपर्यंत पाणी दिसत रहायचे. मध्येच भेळवाला आला. भेळ सपनाचा वीकपाँईट. मी तिच्यासाठी भेळ घेवू लागले. पण सपना नको म्हणाली. तिच्या डाँक्टरांनी तिला पथ्य सांगितले होते. सपना तिच्या गोष्टी सांगत होती. आजारपणाच्या. डॉक्टरांनी कसे चुकीचे डायग्नॉसिस केले, आधी चांगल्या दवाखान्यात न जाण्याची कारणे, सोनूने केलेली चालढकल, मग आँपरेशन झाल्यावर पोटावर अडकवलेली लघवीची पिशवी. औषधे किती स्ट्राँन्ग होती. इंजेक्शन देतांना दोनदा नसच सापडली नाही. सपना माझ्याकडे एकदम भिजलेल्या मांजरीसारखी पहात म्हणाली- तू मला भेटायला का नाही आलीस ?” मी यावर काहीही उत्तर दिले असते, तरी तिला वाईटच वाटले असते. मला गप्प बसलेले पाहून तिच बोलू लागली. शिल्पा तुला माहित आहे, डेड बाँडीला कशात बुडवून ठेवतात? तर एक पिवळसर पातळ द्रावण असते. बाँडीला त्यात आठ मिनिटे बुडवून ठेवतात. मग आपले शरीर पिवळसर होते. चेहरा एकदम आत ओढला जातो. डोळ्यांसमोर इतका अंधार पसरतो, की सांगता येणार नाही. पण तेव्हांच पहिल्यांदा शरीराच्या आत काय चाललय ते स्पष्ट दिसू लागते. मेल्यानंतर आपले आतले अवयव काम करायचे लगेच थांबवत नाहीत. तुला माहित आहे, हाडांच्या मध्ये जे द्रावण असते ना त्याचा स्पर्श तुपासारखा असतो. आणि शरीर हलके झाल्यावर आपल्याला वाटते उगाच येवढ जगण्याचे ओझे घेतो आपण. सपना अशी बोलत सुटली होती. मी तिला म्हणाले तू विपश्यनेच्या अनुभवाबद्दल बोलत आहेस ना ?” ती समुद्राच्या पोटातील फुटणाऱ्या लाटेकडे टक लावून पहात मला म्हणाली मग तसेच समज.
  पण तिचे हे सगळं ऐकतांना ,सपनाचे दुःख माझ्याआत झिरपत चालले होते. मी सपनाला म्हणाले, “तू आता या स्मृती समुद्रात टाकून दे बरं. आणि मोकळी हो. सपना बळेबळे हसली.
      ती म्हणाली, “तू लेखिका आहेस, म्हणून तुला असे सुचते. पण हा कचरा पाहिलास किनाऱ्यावरचा ? हा देखील कितीही आत समुद्रात टाकला तरी असा परत उघड्यावरच येतो बघ. मी तिच्या हातावर टाळी दिली, म्हणाले तू देखील पुस्तक लिहू शकतेस. मग थोड्यावेळात समुद्राच्या पाण्याचा खारट वास आमच्या अंगाला चिकटू येवू लागला. माझ्या बूटात बारीक बारीक रेती गेली. अंधारही पडू लागला. तेव्हा आम्ही दोघी घरी टॅक्सीने निघून आलो.
    तर आता हे रोजचेच झाले होते. आम्ही दोघी नेहमी भेटायचो, फिरायला जायचो, गप्पा मारायचो, एखादा बैठा खेळ खेळायचो. कधी मी सपनाच्या घरी जावून केबलवर टीवी पहात बसायचो. ती माझ्यासाठी झटपट होणारी तांदळाची खिचडी करायची. एकदा तर मी तिच्यासाठी चणेवाल्याच्याकडून माती विकत घेवून गेले होते. त्या गरम मातीवर सपनाने गार पाणी ओतले तर त्यातून वाफा निघाल्या. जणू माती खूप दिवसांनी श्वास सोडत होती. मागाहून त्या करड्या मातीचा खरपूस वास घरभर पसरला. सपनाने तलत मेहमूदची गाणे टेपरेकॉर्डरवर लावली. गाणी ऐकत ऐकत आम्ही मातीचा तो ढीग फस्त करून टाकला.
   माझ्या घरात मी सपनाला भेटते हे सांगणे मी बंद केले होते. सपनाच्या घरी तर प्रश्नच येत नव्हता. कित्येक दिवस ती एकटीच रहात होती. तिचा नवरा व मुलगी आठवडा उलटून गेले तरी तिच्या घरी आले नव्हते.
......................
माझ्या मुलाच्या दहाव्या बर्थडेला तिला बोलवावे, असे मी ठरविले . मुलाला हे सांगितले तर तो म्हणाला, तुझी गेस्ट लिस्ट एकदम कन्फर्म  कर. ऐनवेळी तुझे गेस्ट येत नाहीत व सगळा खाऊ फुकट जातो.त्यानंतर काही दिवस घरी बर्थडेची खूप लगबग चालू होती. एकदा आम्ही मुलाच्या ड्रेससाठी मॉलमध्ये खरेदी करत असतांना मला सपनाचा नवरा व मुलगी दिसली. खरतर मी त्यांचा डोळा चुकवूनच चालले होते. पण त्यांनीच मला पाहिले नि आवाज दिला. मग माझ्या नवऱ्याने पुढे होवून, सपनाच्या नवऱ्याला सोनावणेला शेकहँन्ड केला. इथे कसे, काय वगैरे बोलणे सुरू असतांनाच, सपनाच्या मुलीने दुकानबाहेर खरेदीच्या पिशव्या घेवून बाहेर पडणाऱ्या बाईला –मम्मी अशी हाक मारली. ती बाई सपना नव्हती. तर गार्डनमध्ये सोनूला ज्या मुलीबरोबर मी कित्येक वर्षापूर्वी पाहिले होते ती होती असे मला वाटते.
     सोनू माझ्याशी खाली मान घालून बोलत होता. मुलीला संभाळायला कोणी नव्हतं, मग लग्न करणे भाग पडले. मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला खूप अनइझी वाटत होते. सोनू अजून पुढचे सांगू लागला, की आजारपणात सपना तुझी खूप आठवण काढत होती.तुला भेटायची तिची इच्छा अपुरी राहिली. त्याचे बोलणे एकदम बचावाला उभे राहिलेल्या आरोपीसारखे होते. या सगळ्यात त्याची बायको संसारोपयोगी सामानाचे ओझे घेवून अवघडल्यासारखी एका बाजूला उभी होती. मी एक तीव्र कटाक्ष तिच्याकडे टाकला. अनोळखी व्यक्तीला इतक्या तिरस्काराने पाहण्याची माझी आयुष्यातील ही पहिलीच वेळ असावी.
   मग मुलाचा हात पकडून, त्याला खेचत, पुढे निघत मॉलमध्ये खेरदी एन्जाँय करणाऱ्या त्या सुखी कुंटुबाला मी कोरड्या आवाजात 'बाय बाय' केले........ एक्सीलेटरने खाली उतरताना — माझ्यासमोर चकचकीत भिंतीवर कोरलेला बुद्धाचा चेहरा होता. त्या चेहऱ्यावरचे अर्धवट मिटलेले  डोळे माझ्याकडे करूणेने पहात होते.
             
        
              शिल्पा कांबळे

स्त्रीवादी व आंबेडकरवादी लेखिका आहेत. त्यांनी अनेक कथा
आणि ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ - ही कादंबरी लिहिलेली आहे.तसेच त्यांनी भारतात गोमांसावर झालेल्या बंदीनंतर ‘बिर्याणी’ नावाचे नाटक लिहले आहे. 


1 Comments

Previous Post Next Post

Contact Form