अलीकडेच ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ नावाच्या मराठी वेब मालिकेतील स्त्री कलाकारांवर त्या ज्या भूमिका साकार करीत होत्या त्यात शिव्या देतांना, दारू पितांना, सिगारेट ओढतांना दाखवल्यामुळे त्यांना ट्रोलिंग होत असल्याची बातमी पाहिली. त्याच मालिकेतल्या पुरूष व्यक्तिरेखाही तशाच वागत असतील. पण पुरूष कलाकारांना कुणी ट्रोलिंग केल्याचं ऐकिवात नाही. बरं दारू पिणं, सिगरेट ओढणं आरोग्याला घातक आहे म्हणून हे ट्रोलिंग होत नाही तर ते मुली करताहेत म्हणून होतंय. याचं कारण स्त्रीने कसं वागावं याचे पितृसत्ताक पद्धतीने घालून दिलेले दंडक प्रत्यक्षातल्याच नव्हे तर कल्पितकथांमधल्या बायकांनाही समाजाने लागू केलेले दिसतात.
मुलींनी शिव्या देणं हे तर लोकांना फारच खटकतंय. एक गंमत म्हणून मला आलेले अनुभव सांगते. आमच्या एका मैत्रिणीला सुरूवातीला ब्लँक कॉल्स यायचे. तिला काही कळत नव्हतं कोण बोलतंय. पण चौथ्या पाचव्या वेळी समोरून पुरूषी आवाजात “हाय डार्लिंग” आलं आणि तिने जो अस्सल ‘भ’कारी शिव्यांचा तडाखा लावला की नंतर पुन्हा तिला असा फोन आला नाही. मग मलाही एकदा घरच्या फोनवर रात्री विचित्र बरळणारे फोन आल्यावर मीही (मला ‘भ’कारी शिव्या येत नसल्या तरी ज्या काही येत होत्या त्या) शिव्यांचा तडाखा लावल्यावर आश्चर्यकारक रित्या ते फोन बंद झाले. असा बायकांना शिव्यांचा उपयोग होतो. आणि कुठल्याच बायका शिव्या देत नाहीत असं नाही. कित्येक बायका देतात. पण ‘संस्कारी’बायका शिव्या देत नाहीत असा लोकांचा समज आहे. आधुनिक मराठी मालिकांमध्येही तथाकथित संस्कारी बायका आणि आधुनिक मुली (ज्या अर्थातच त्यांच्या मते संस्कारी नसतात) यांचं विरोधाभासात्मक चित्रण आढळतं.
उदारहणार्थ झी वाहिनीवरच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ‘तुला पाहते रे’ ‘खुलता कळी खुलेना’ इत्यादी मालिकांमधील राधिका आणि शनाया, ईशा आणि मायरा (किंवा दुसरी खलनायिका सोनियाही), मानसी आणि मोनिका किंवा कलर्स मराठी वरच्या ‘घाडगे अँड सून’ मधल्या अमृता आणि कियारा अशा नायिका-खलनायिकांच्या जोड्या पाहिल्यावर हे ध्यानात येईल.
यातल्या नायिका साडी किंवा सलवार -कमीझ-ओढणी अशा सोज्वळ पोशाखात तर खलनायिका अर्ध्यामुर्ध्या, तोकड्या कपड्यात दिसतात. नायिकांना स्वयंपाकपाणी चांगलंच जमत असतं, किंबहुना त्या सुगरणीच दाखवल्या गेल्यात, तर खलनायिकांना साधा चहाही करायला जमत नाही किंवा त्यांचा स्वयंपाकासाठी स्वयंपाकीण बाई ठेवण्यावर भर असतो. नायिका या स्वयंपाकातच नव्हे तर इतरही गृहकृत्यात अगदी निष्णात असतात तर खलनायिकांना साधा केरही काढता येत नाही. नायिका सगळ्या नात्यांना जपतात तर खलनायिका फार स्वार्थी असल्याने त्यांना नात्याची पर्वा तर नसतेच शिवाय त्या लोकांच्या चांगल्या नातेसंबंधामध्ये बिघाड कसा येईल ते पहात असतात. नायिकांना नाती महत्त्वाची वाटतात तर खलनायिका फक्त पैसा, दागदागिने, चैनीच्या वस्तू यांच्या मागे लागलेल्या असतात, इतकंच नव्हे तर हे सगळं मिळवण्यासाठी त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे त्या इतर पुरूषांना त्यासाठी भुरळ घालतात, प्रसंगी चोरी करतात, लबाडी करतात. नायिकांना तथाकथित भारतीय संस्कृतीतल्या पुराणकथा, सणावारांशी निगडित गोष्टी, म्हणी, वाक्प्रचार हे सगळं ठाऊक असतं, तर खलनायिकांना या गोष्टींचा गंधही नसतो. नायिकांना पारंपरिक खाद्यपदार्थ करायला, खायला किंवा लोकांना खाऊ घालायला आवडतात, तर खलनायिका कायम नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर असे भारतीय संस्कृतीत न बसणारे पदार्थ खात असतात. मोदक आणि मोमोजमधला फरकही त्यांना कळत नसतो. या सगळ्या खलनायिकांना डोकं नावाची गोष्ट नसते असं नाही. मायरा किंवा मोनिकासारख्या काहीजणी कॉर्पोरेट जगातले सगळे व्यवहार फार चातुर्याने, कौशल्याने पार पाडतात. बाकीच्यांना डोकं नाही असं दाखवलेलं असलं तरी कुठलंही कारस्थान त्या व्यवस्थित रचतात आणि पार पाडतात. आणि बिचाऱ्या नायिका मात्र त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालतात.हे सगळं इतक्या ठोकळेबाजपणे केलं जातंय की एका मालिकेतल्या नायिकेला किंवा खलनायिकेला झाकावं आणि दुसरीला बाहेर काढावं. पण या ठोकळेबाजपणाच्या आडून खरं तर ध्रुवीकरण केलं जातंय. पारंपरिक, संस्कृतीनिष्ठ यांच्या विरोधात आधुनिक, नीतीहीन असं. आणि हे सगळं गेल्या काही वर्षात बदलत गेलेल्या मानसिकतेचं द्योतक आहे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात पुनरूज्जीवनवादी शक्ती पुन्हा जोर धरू लागल्या. वर वर जरी सगळ्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर सुरू झाल्याने, स्त्रिया बहुशिक्षित झाल्याने, आता स्त्री स्वतंत्र होत चालली आहे असा आभास निर्माण झाला, तरी दुसरीकडे कुटुंबसंस्थेतील स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकेचे उदात्तीकरण सुरू झालं. तिच्या आईपणाचं भांडवल वेगवेगळ्या माध्यमांमधून केलं जाऊ लागलं. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये पारंपरिक पोशाखातल्या (नऊवारी साडी, नथ, पायात पैंजण, जोडवी, दागदागिने) तरूणी ढोल वाजवतांना दिसू लागल्या. ढोल वाजवणं आणि या पारंपरिक पोशाखावर पुरूषी फेटा बांधणं हे त्यांच्या मुक्तीचं प्रतीक मानलं गेलं. आता तर हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. पूर्वीच्या मालिकांमधून न दिसणारा आणि गेल्या काही वर्षांमध्ये हमखास आढळणारा प्रकार म्हणजे वेगवेगळ्या हिंदू सणांना नायिकांनी पारंपरिक पोशाखात नटून थटून कुटुंबाची तथाकथित रीतभात आणि मुख्य म्हणजे आपली महान हिंदू संस्कृती पाळणं.
मातृत्वाचं तर इतकं उदात्तीकरण की आधुनिक दाखवल्या गेलेल्या खलनायिकेला गरोदरपणाचं नाटक करावं लागावं किंवा नको असतांनाही गरोदरपण निभवावं असं वाटावं. कारण ती गरोदर राहिली तरच तिला कुटुंबात मानाचं स्थान मिळेल, तिचे लाड केले जातील असं तिला वाटतं. आणि ही सगळी तथाकथित मूल्यं ठसवण्यासाठी त्यांना तसाच प्रेक्षकवर्ग सापडला आहे – घरात काम करून थकलेल्या गृहिणी. हे सगळं पाहून त्यांनाही त्यांच्या घरकामाचं महत्त्व पटवून घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण याच गृहिणी नायिकेच्या रूपाने ‘आदर्श’ ‘संस्कारी’ मुलीचं त्यांच्या मनात रूजत चाललेलं चित्र त्यांच्या पुढील पिढीकडे सोपवणार हा धोका नजरेआड करून चालणार नाही.या मालिकांमधल्या खलनायिका जेव्हा नूडल्स, पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ खातांना दिसतात, तेव्हाही ते आरोग्याला घातक म्हणून ते खाऊ नयेत असं त्यांना सांगण्याऐवजी त्यांचं हास्यचित्र उभं करायला त्याचा उपयोग होतो म्हणून ते हास्यास्पद पद्धतीनं दाखवलं जातं. तोकडे किंवा अंगालगत कपडे हे त्या त्या व्यक्तीला- म्हणजे ती पुरूष असो किंवा स्त्री- सोयीचं, आरामदायक वाटत असेल तर त्या व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. पण मालिकांमध्ये फक्त तरूण खलनायिकेच्या तोकड्या कपड्यांचं भांडवल केलं जातं. कारण हेही आजूबाजूला घडतंय. विशिष्ट राजकीय विचारसरणीची नेतेमंडळी तर त्यावर ताशेरे झोडत असतातच, पण हा लेख लिहित असतांना दिल्लीतल्या एका मॉलमध्ये एका मध्यमवयीन महिलेने मिनीस्कर्ट परिधान केलेल्या एका तरूणीला तुमच्यासारख्या मुलींवर बलात्कार व्हायला हवेत असं विधान करून खळबळ माजवल्याचे पाहायला मिळते आहे.
आजच्या धकाधकीच्या कार्यसंस्कृतीत बायकांना स्वयंपाक, गृहकृत्य करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना मोलाने ही कामं करून घ्यावी लागतात. ते साहजिकच आहे. पण ही कामं घरातल्या सगळ्यांची आहेत ती वाटून घेऊन केली पाहिजेत, असं न दाखवता या मालिकांमधून ही कामं नायिकांनी, त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी करायची, पुरूषांना गरम गरम अन्न वाढायचं हेच त्यांचं काम दाखवलेलं आहे. घरात बायकोच्या बरोबरीने काम करणारा पुरूष क्वचितच दाखवला जातो. त्यामुळे या पारंपरिक चित्रात गृहकृत्य, स्वयंपाक न येणारी आधुनिक मुलगी सहज हास्यास्पद ठरवता येते. खरं तर अशा प्रकारे आधुनिक विचारांच्या मुलींचं सर्वसाधारणीकरण करणं हेच हास्यास्पद आहे. हे मालिका सादर करणाऱ्या चमूला समजत नसेल असं नाही. पण ते हे सगळं एका विशिष्ट उद्ददेशाने करीत आहेत की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला स्वावलंबी होण्यासाठी सगळी कामं यायला हवीत हे मान्य. पण स्वतःला इतर सर्जनशील कामात गुंतविण्यासाठी तयार स्वयंपाक किंवा इतर गृहकृत्यांसाठी पैसे मोजून सेवा घेणं हे चुकीचं असल्याचं चित्र उभं करून स्त्रियांना पारंपरिक कामांमध्ये गुंतवून ठेवणं, स्त्रीने स्वतःला आरामदायक वाटेल असा पोशाख न घालता पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालणं कसं चांगलं आहे हे दाखवीत तिला पुन्हा साडी, दागदागिने यांनी मढवून ठेवणं, मूल जन्माला घालणं, वाढवणं हा एक आनंदाचा भाग असला तरी त्याचं महत्त्व ठसवित आईपणाचे सोहळे साजरे करीत बाईने गुंतून रहाणं चांगलं आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक उद्देश या मालिकांमधल्या आधुनिक मुलींच्या चित्रणामागे असावेत असं वाटलं तर ते चुकीचं ठरू नये. खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यातली अनेक अशी वेगवेगळी आव्हानं आहेत ज्यांचा वेध घेता येईल. पण दुर्दैवाने हे प्रभावी दृक्चित्र माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे.