मराठा समाजातील स्त्री प्रश्नांचे समकालीन चर्चाविश्व


मराठा मोर्चा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियाही सामील झाल्या होत्या. 
मराठा मोर्चा मध्ये मराठा स्त्रियांना पुढे ढकलून मराठा समाज काय सांगू पाहत आहे?  
मराठा स्त्रियांना पुढे करताना स्त्रियांसाठी एकही मागणी का केली गेली नाही? मोर्चे बंद झाल्यानंतर मराठा स्त्रिया कुठे गायब झाल्या? या प्रश्नांची चर्चा करायला हवी.



मराठा समाजाने ऑगस्ट2016 पासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मूक मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सामील होऊन मराठा समाजाने आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शक्तीचे प्रदर्शन केले. कोपर्डी प्रकरणाचे निमित्त साधून मराठा समाजाने आपल्या मागण्या पुढे केल्या, त्या अशा -

 अत्याचारप्रतिबंधक (atrocity) कायद्यातसुधारणा
 कोपर्डीअत्याचार प्रकरणातीलआरोपींना फाशीचीशिक्षा
मराठाजातीला शिक्षणआणि नोकऱ्यांमध्येआरक्षण
शेतमालालास्वामिनाथन आयोगाच्याशिफारशीनुसार बाजारभाव


मराठा मोर्चा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियाही सामील झाल्या होत्या. मराठा स्त्रियांचे असे अचानक रस्त्यावर येणे हे आश्चर्यकारक तर होतेच – पण त्यातून जणू काही आता मराठा पितृसत्ताक व्यवस्थेला या मराठा स्त्रियांनी धक्के दिले आहेत की काय असाही भास निर्माण झाला! मराठा पितृसत्ताक व्यवस्थेत आता बदलदिसू लागला आहे की काय - असे उगाचच वाटून गेले! हे चित्र जरी खूप सुखावह आणि आदर्श वाटत असले तरी त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
महाराष्ट्रामध्ये 40% मराठा समाज आहे. तो त्याच्या गौरवशाली इतिहासाचा मुळे प्रसिद्ध आहे, तसाच तो कट्टर जात्याभिमान असलेला, कडक पितृसत्ताक व्यवस्था मानणारा, शेत जमिनीशी घट्ट नाते जोडणारा, अतिशय चिवट नातेसंबंध असणारा असा - प्रभुत्वशाली समाज आहे. क्षत्रियत्वाचे प्रखर आत्मभान असणारा हा मराठा सरंजामदारी समाज राजकीय सत्तेची ही महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. आजच्या हिंदुत्वाच्या प्रभावामुळे मराठा जात अधिक ताठर होण्याचा प्रयत्न करत आहे. जातीची सामाजिक ओळख निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. कपाळावर शिवाजीसारखा गंध लावून, डोळ्यांवर गॉगल घालून - एक मराठा, लाख मराठा’- असे होर्डिंग घेऊन एक प्रकारे मराठा जातीच्या प्रभुत्वाचे प्रदर्शन करून दहशत निर्माण केली जाते! आपली सत्ता, वर्चस्व, प्रभुत्व टिकवण्याची ही मराठा समाजाची धडपड आणि राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष आहे. या सगळ्याचा मराठा स्त्रीयांच्या प्रश्नांशी कसा संबंध आहे?

2004 - 2005 साली मराठा समाजाने शिवधर्म सारख्या वलयांकित छताखाली सर्व मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्येही मराठा स्त्रियांचे गौरवीकरण करून मराठा जात एकसंघ आणि बलवान आहे याचे प्रदर्शन केले होते. तेव्हाही त्यानी मराठा स्त्रिया कशा जातिवंत आणि मराठा संस्कृतीच्या प्रमुख वाहक आहेत ; हेच दाखवून दिले. त्यांच्या खांद्यावर मराठा समाज, मराठा जात तगून आहे - हेच तेव्हा दिसून आले. पण ती हवा जास्त काळ टिकू शकली नाही! अजूनही मराठा समाज सरंजामी मूल्यांना, परंपरेला कवटाळून बसलेला आहे अवतीभोवतीच्या आधुनिक बदलांशी त्याच सांधा जुळला नाही, म्हणून हा त्याचा आधुनिक बदलांशी टकराव आहे असे मानता येईल का?  
आता मराठा मोर्चा मध्ये पुन्हा मराठा स्त्रियांना पुढे ढकलून मराठा समाज काय सांगू पाहत आहे?मराठास्त्रियांनापुढेकरतानास्त्रियांसाठीएकहीमागणीकाकेलीगेलीनाही? (उदा.हुंडाबळी, हुंडाबंदी, मराठास्त्रियांच्यानावावरमालमत्ताकेलीजाणे, मराठापरित्यक्ताइत्यादी) मोर्चे बंद झाल्यानंतरमराठास्त्रियाकुठेगायब झाल्या? या प्रश्नांची चर्चा करायला हवी.
मराठा जातीतील स्त्री प्रश्नांचे आजचे स्वरूप पाहण्यासाठी तपासण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बारामती  महाविद्यालयातील आणि पुणे विद्यापीठातील मराठा मुलींची चर्चा केली. या संशोधनाचा एक भाग म्हणून दहा वर्षांपूर्वी भेट दिलेल्या स्थळांना आता पुन्हा एकदा भेट देऊन बदलाचे वारे कितपत वाहिले आहे, टिकले  आहे ते तपासण्याचा प्रयत्न केला. नवीन प्रश्नांची नव्या स्वरूपात मांडणी करण्याचा हा एक प्रयत्न असतो. हे काम अजून चालू आहे पण आतापर्यंत ज्या 20 मराठा मुलींना आम्ही भेटतो त्यांचे म्हणणे प्रथम जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल. या मराठा मुलींना साधारणतः मराठा मोर्चा व मराठा स्त्रियांचा सहभाग, मराठा आरक्षण, शिक्षणाच्या संधी, नोकरीच्या संधी, शेती व्यवस्था आणि शेतकरी आत्महत्या या सगळ्या मुद्द्यांभोवती प्रश्न विचारले.
मराठा मोर्चा व त्यातील मराठा स्त्रियांच्या सहभागाबद्दल या मुलींना प्रश्न विचारले असता त्यांचे म्हणणे होते की कोपर्डीतील मराठा मुलींना न्याय मिळावा म्हणून मराठा मोर्चे निघाले होते. एका मराठा मुलीवर दलित समाजातील लोक अन्याय करतात, तेव्हा तो जिजाउच्या लेकीचा अपमान असतो! म्हणून हे मोर्चे निघाले. पुन्हा अशी वेळ आपल्या मुलींवर येऊ नये म्हणून मराठा स्त्रिया सामील  झाल्या. जेव्हा त्यांना विचारले की वर्षानुवर्षे मराठा समाज दलित समाजाला नाडतो आहे, दलित स्त्रियांवर अत्याचार करतो आहे -  तर तो त्यांचा अपमान नाही का? यावर त्या मुलींचे म्हणणे होते की हा अपमान नक्कीच आहे. मराठा पुरूषांचे चुकतेच आहे. म्हणूनच त्यांच्या हातात काही राहिलेले नाही, त्याचीच फळे आम्ही भोगतो आहोत!ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे कारण मराठा पुरुष चुकीचे वागतात, हे त्यांना एकीकडे समजते आहे, मात्र मराठा प्रभुत्वापुढे त्या हतबल आहेत - असेही दिसते.
या मुलींपैकी पाचजणी प्रत्यक्ष मराठा मोर्चा मध्ये सामील झाल्या होत्या आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा सामील झाले होते.  मात्र दोन जणींच्या घरातील मराठा स्त्रिया सामील न होता, त्यांच्या शेतात राबणाऱ्या मातंग, दलित मजूर स्त्रिया सामील झाल्या होत्या. म्हणजे मराठा स्त्रियांच्या ऐवजी या मातंग मजूर स्त्रियांना - त्या मराठाच आहेत - म्हणून घरचे पुरुष मोर्चामध्ये घेऊन गेले होते. तर या पाच मुलींच्या सोबत हॉस्टेलमधील त्यांच्या ओबीसी आणि मागासवर्गीय मैत्रिणीही सामील झाल्या होत्या असे त्यांनी सांगितले.  20 पैकी 15 मराठा मुलींचे म्हणणे होते की मराठा मोर्चा मधील आरक्षणाचा मुद्दा योग्य होता. 16 % आरक्षण मिळाले हे बरे झाले पण त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबद्दल त्या साशंक आहेत.   आरक्षणाचा फायदा मराठा जमीनदार आणि श्रीमंत मराठा समाजालाच होईल. तो गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना होणार नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आज आरक्षणाची खरी गरज या गरीब मराठा समाजाला आहे - असे त्या नमूद करतात. आरक्षणामुळे शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, भरमसाठ फी भरावी लागते आहे ती कमी होईल आणि आर्थिक बोजा कमी होईल - असे त्यांना वाटते. मागासवर्गीय समाज आणि ओबीसी समाजाला आरक्षणामुळे शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतात आणि तेवढेच मार्क मिळूनही आम्हाला मात्र नोकरी मिळत नाही! त्या नोकऱ्या आणि शिक्षणाच्या संधी आता मिळतील
असा भाबडा आशावाद त्यांनी व्यक्त केला
जेव्हा आम्ही त्यांना मोर्चात सामील झालेल्या मराठा स्त्रिया आता कुठे गायब झाल्या?- असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्या पुन्हा आपले घर सांभाळत आहेत.
तसेच मराठा मोर्चाने स्त्रियांसाठी काही मागण्या का  नाही केल्या? - उदाहरणार्थ हुंडाबंदी व्हावी, जमिनीची मालकी घरातील स्त्रियांच्या नावावर असावी, मालमत्तेमध्ये मुलींचा वाटा असावा, मराठा परित्यक्ता स्त्रियांच्या समस्या - अशा मागण्या का पुढे केल्या नाही - असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की – जे पुढारी होते त्यांनी लिहून दिलेलेच मराठा मुली बोलत होत्या. मोर्चामध्ये आम्हाला कोणी बोलू देत नव्हते. मोर्चा संपल्यावर आम्ही प्रश्न विचारले तर ते अंगावर धावून येत होते. तुम्ही आमच्या विरुद्धच बोलताय - असे केले तर खबरदार! अशा धमक्याही मिळत होत्या - त्यामुळे कोणी जास्त काही बोलले नाही; असे या मुलींनी  सांगितले. अशा धमक्या मिळाल्यावर आम्ही पुन्हा गेलो नाही असे त्या म्हणाल्या.
पण आरक्षण मिळाले तर शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या संधी मराठा मुलींना उपलब्ध होतील हा त्यांचा दृढ आशावाद होता. आरक्षणामुळे नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील, असे त्यांना वाटते. आजच्या काळात फक्त शेती करून भागत नाही शेतीबरोबर जोड धंदे होते, ते शेतीशी संलग्न असल्याने तेही आता चालेनासे झाले आहेत - असे त्या म्हणतात. त्यामुळे शहरांमध्ये नोकरी मिळाली तर तेवढाच हातभार लागेल व शेती सुधारेल असे त्यांना वाटते. जमिनीचे तुकडे पडले आहेत, शेतात राबण्यासाठी मराठा मजूर मिळत नाही, त्यामुळे ही शेती मातंग बंजारा या लोकांना बटाईसाठी दिली जाते असे त्या सांगतात. तसेच शेतीकडे मराठा तरुण वर्गाने दुर्लक्ष केले आहे, त्याने जर लक्ष घातले तर शेती चांगली होऊ शकते असेही त्यांना वाटते. त्या पुढे म्हणाल्या की कर्जमाफी होत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेही होतात. जर तेंडुलकर आणि विराट शंभर धावा काढून करोडो रुपये सरकारकडून मिळवतात तर आमचा शेतकरी बंधू दर मिनिटाला बांधावरून धावतच असतो, कष्ट करत असतो - तर त्याला सरकार पैसे का देत नाही? असा प्रश्न त्या उद्विग्नतेने विचारतात.
केवळ पाऊस पडत नाही दुष्काळ आहे म्हणून शेती चालत नाही असे नाही. मराठा शेतकऱ्याने पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेदेखील शिकले पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान जोपासले पाहिजे - हेही त्या सांगतात. मात्र यासाठी सरकारने मदत केली पाहिजे, अनुदान दिले पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात. शेतकऱ्याने शहाणपणाने व्यवहारी दृष्टिकोनाने वागावे, शेती सोडून लग्न आणि इतर मराठा रितीरिवाज पाळण्यासाठी फालतू कर्ज देऊ नये - असेही सुज्ञपणाचे उद्गार त्या काढतात.
आत्महत्या केलेल्या मराठा शेतकर्याच्या कुटुंबाला श्रीमंत मराठा शेतकऱ्यांनी मदत करावी अशीही अपेक्षा त्या व्यक्त करतात. तसेच मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न धसास लावले नाही ही त्यांची चूक आहे - असेही त्या सांगतात.
आम्ही त्यांना तुमचा आवडता पक्ष कोणता - असा प्रश्न विचारल्यावर सर्वांनी भाजपचे नाव सांगितले.  मोदींच्या काळात आम्हाला आरक्षण मिळाले, गाव सुधारले, स्वच्छ झाले - त्यामुळे तो पक्ष आवडू लागला आहे; कॉंग्रेसच्या काळात काहीच झाले नाही असेही त्या म्हणाल्या.
या सर्व मराठा मुलींशी बोलताना गावात फिरताना असे लक्षात आले की मराठा जात, मराठा पुरुषसत्ताक व्यवस्था, जमीन मालकी, बाजारपेठा, जागतिकीकरण, हिंदुत्वाचा प्रभाव आणि मराठमोळा संस्कृती या मुद्द्यांवर मराठा स्त्रियांचे समकालीन प्रश्न निगडित आहेत.

अजूनही मराठा जात ताठर आणि कडक आहे, पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे ती अधिकच कठोर झाली आहे आणि हिंदुत्वाच्या प्रभावामुळे ही जातीची द्वारे अधिकच मजबूत झाली आहे. मराठा जात अधिक प्रभावशाली राहण्यासाठी मराठा म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी मराठा स्त्रियांना अधिक बंधनात ठेवण्यात आले आहे.  मराठा जातीची ओळख आणि मराठा जातीचे पावित्र्य” टिकून राहण्यासाठी नव्या संदर्भात नवी ओळख निर्माण करण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रभावामुळेही मराठा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे नवीन आयाम दिसून येतात.  ते मराठा मोर्चाआणि शिवधर्माच्या रूपाने दिसतात! गुढीपाडव्याला ब्राह्मण स्त्रिया जशा स्कूटरवरून फिरतात, मेळावे घेतात, त्याचप्रमाणे मराठा समाजातील स्त्रिया जिजाऊच्या लेकी” आहेत - हे दाखवण्यासाठी काष्टा घालून, चंद्रकोर कपाळावर लेऊन, डोळ्यावर गॉगल घालून मिरवणूक काढताना दिसतात. हा बदल गेल्या दहा वर्षातील मोठा सामाजिक, सांस्कृतिक बदल आहे. पण म्हणून मराठा स्त्रिया मुक्त झाल्या, स्वतंत्र झाल्या - असे होत नाही. त्या मराठा पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मुख्य वाहक झाल्या आहेत. मराठा समाजाची प्रतिष्ठा ही मराठा स्त्रीवर लादलेल्या मराठमोळ्या संस्कृती मार्फत राबविली जाते आहे. हीमराठमोळीसंस्कृती पाळणे मराठा स्त्रियांवर बंधनकारक असते कारण त्यामुळे मराठा पुरुषसत्ताक  व्यवस्थेची प्रतिष्ठा आणि सत्ता टिकून राहते. आता मराठमोळ्या संस्कृतीचे गौरवीकरण करून ही संस्कृती कशी श्रेष्ठ आणि महान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. असे घडताना मराठा समाज स्त्रियांकरवी आपल्या मराठा प्रभुत्वाचे दर्शन घडवत असतो मात्र यातून मराठा नावाची एक दहशत देखील पसरवली जाते आहे. राजकीय सत्तेवर आपला हक्क अधिक बळकट करण्याचा प्रयत्नही त्यातून दिसतो आहे.
आताच्या परिस्थितीत जातीचा अभिमान व्यक्त करणारे आणि आपली जात कशी श्रेष्ठ आहे असा दावा करणारे अनेक जातीसमूह पुढे येताना दिसतात. उदाहरणार्थ वंजारी,धनगर, माळी इत्यादी. या जातींचे ही मेळावे भरू लागले आहेत. हिंदुत्वाच्या प्रखर विषारी वातावरणात हे सर्व जात समूह आपल्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ते अस्तित्व आणि प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. यांना शह देण्यासाठी मराठा समाज आता आपण कसे वेगळे आहोत, कसे श्रेष्ठ आहोत आणि राजकीय सत्तेचे हक्कदार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे
1960 ते 1980 च्या द्विशतकामध्ये मराठा समाजाने स्थानिक स्वराज्य संस्था, पतसंस्था, सहकारी क्षेत्र यांच्या आधारावर आपली सत्ता मजबूत केली होती. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे या क्षेत्रात टिकाव लागला नाही. 1990 मंडल आयोगामुळे छोट्या छोट्या जातींना सामाजिक आणि राजकीय आत्मभान मिळाले. त्यातूनच त्यांची जातीय संघ निर्माण झाले आणि संसदीय लोकशाहीच्या विस्ताराला एक नवीन आयाम मिळाला. या नव्याने आत्मभान मिळालेल्या जातीसमूहांनी हळूहळू मराठा जातीच्या वर्चस्वाखालून  मुक्त होण्याचा प्रयत्न केला. 2000 सालापर्यंत या जाती समूहांनी मराठा वर्चस्वाला पूर्णपणे नाकारले; इतकेच नव्हे तर राजकीय आव्हानही दिले.
आपले तेच जुने मराठा वर्चस्व पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी - मराठा समाज धडपडत आहे मराठा मूक मोर्चा आणि शिवधर्म स्थापन करणे हा त्याचाच भाग आहे. हे करत असताना हिंदुत्वाचा प्रखर दावेदार” म्हणूनही मराठा समाज पुढे येताना दिसतो. हिंदवी स्वराज्य’, ‘हिंदू राष्ट्र व्हावे ही श्रीं ची ईच्छा’, ‘एक मराठा, लाख मराठा’ - या फलकावरून हेच दिसते कि मराठा समाज हिंदुत्वाचा कडव्या प्रभावाखाली आहे. शिवाजी महाराज, जिजाऊ माता – यांच उद्घोष करून आपला इतिहास कसा प्रभावशाली वर्चस्व सारी आणि राज्यकर्ता होता हे दाखवण्याचा आणि ठसवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून राजकीय सत्तेसाठी प्रमुख दावेदारही आपणच आहोत - हे मराठा समाज सिद्ध करू पाहत आहे. मात्र हे करत असताना आता मराठा स्त्रियांना अधिक बंद ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना आधुनिकता आणि पारंपरिकता यांची तारेवरची कसरत करावी लागते आहे. उच्चशिक्षण घेणे, गाडी चालवणे, चारचौघांसमोर बोलता येणे, बँकेची कामे करता येणे - अशा अनेक आधुनिक गोष्टी त्यांना शिकाव्या लागत आहेत. कारण आता लग्नाच्या बाजारात अशा आधुनिक मुली हव्या आहेत. परंतु हे सर्व करत असताना मराठा मुली कधी आपला अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर कधी या मोहाजालात अडकून पितृसत्ताक व्यवस्थेच्या वाहक बनतात. त्यामुळेच त्या म्हणतात की घरच्यांनी शिकू दिले, गाडीचा शिकवली मग  त्यांच्या मर्जीने लग्न केले तर काय झाले?’; ‘ते आपल्या भल्यासाठीच करतात! - असे म्हणताना अनाहूतपणे त्या अंतरजातीय विवाहास नकार देताना दिसतात. एवढंच नाही तर प्रतिष्ठेसाठी खून’(Honour  killing) यालाही संमती देतात. म्हणजेच मराठा स्त्री ही गोंधळलेल्या अवस्थेत आहे असे दिसून येते.
नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली नवीन बाजारपेठ यांचे  आव्हान पारंपरिक व्यवसाय करणारे व छोटे उद्योग धंदे चालवणार्यांना पेलता येऊ शकले नाही. तसेच बदलत्या भांडवली राजकीय व्यवस्थेमुळे सरकारी नोकर्‍यांचीही संख्या मर्यादित होत चालली आहे. पण  शिक्षणाच्या नावाखाली अकुशल पदवीधारकांचे जथ्थे निर्माण झाले आहेत. पारंपरिक संस्कृतिक, सामाजिक व्यवस्थेमध्ये दुरावा निर्माण झाला. ती विस्कळीत झाली. नवीन स्वप्ने आणि गरजे पलीकडील वस्तूंचे वितरण होत गेले. साठवणुकीची नवीन संस्कृती तयार होऊ लागली. पण यात छोटे शेतकरी गरीब मजूर जास्त भरडले गेले. मध्यमवर्गाची क्षमता वाढल्यामुळे समाज अतिश्रीमंत व अतीगरीब या दोन विभागात विभागला गेला. ग्राहक म्हणून आपली क्षमता वाढवण्यासाठी कनिष्ठ मध्यम फळीतील मराठा शेत जमिनी विकून नवीन उद्योग धंदे निर्माण करून लागले. गावे सोडून शहरांकडे रोजगारासाठी धाव घेऊ लागले. शिक्षणामुळे चांगला रोजगार मिळतो हे समीकरण यातून रुजले. अशाप्रकारे जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी आपली क्षमता वाढवलेला हा नवा मध्यमवर्ग” तयार झाला. या सर्व प्रक्रियेमध्ये मराठा समाज आपला अभिमान, सरंजामशाही वृत्ती कुरवाळीत बसला आणि मागेच राहिला.  मराठा जातीच्या सत्ता वर्चस्वाला आणि सहकार क्षेत्राला धक्के बसू लागले. शेत जमिनीचे घराण्याच्या इभ्रतीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी तुकडे पडू लागले. आपली जातीची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी नातेसंबंध चिवट केले गेले आणि या नातेसंबंधांना टिकवण्यासाठी जमिनीचे तुकडे झाले. पतसंस्था ढासळल्या. प्रामुख्याने ओबीसी आणि दलित जातींकडून स्थानिक स्वराज्य संस्थेत मराठा नेतृत्वाला आव्हान दिले गेले. मराठा वर्चस्वाने ब्राम्हण समाजाच्या बरोबर जशी संघर्ष आणि सहमतीची नीती स्वीकारली तशीच ओबीसी आणि दलितांबरोबर त्यांना स्वीकारता आली नाही. कारण मराठा जातीचा प्रखर अभिमान आणि सत्ता घट्टपणे आवळून बसण्याचा हव्यास कारणीभूत ठरला. जागतिकीकरणाचा फायदा शंभर दीडशे एकर जमीन असणाऱ्या शेतकरी बागायतदाराना सगळ्यात जास्त झाला. त्यांना शहरांमध्ये शिक्षण संस्था, बँका, कारखाने उघडून आपली आर्थिक व्यवस्था रुपांतरीत करता आली. मध्यम शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांची शेतजमीन साठ सत्तर एकर आहे त्यांनी शिक्षणाची कास धरून शहरांमध्ये मोठ्या पदावरील प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर आशा नोकऱ्या मिळवल्या, आपला फायदा करून घेतला आणि तेही शहरीकरणात विलीन झाले. पण जे वीस पंचवीस एकर शेतजमिनी बाळगून आहेत किंवा अगदी पाच एकर शेती आहे असे आणि भूमिहीन शेतकरी किंवा मजूर आहेत त्यांना शहराकडे येण्याचा मार्ग बंद होता. ज्यामध्ये हे लोक निपुण आहेत अशी गावामधली शेती संबंधित कामे बंद झाली. त्या पारंपरिक कामांसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नव्हती. पण  पैसे देऊन प्रशिक्षण घेण्याची ज्या लोकांची क्षमता नव्हती असे सर्वजण असंघटित क्षेत्रात घुसले. काहींनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतजमिनी बिल्डरांना विकल्या आणि काही भाग तसाच ठेवून वंजारी, माळी, मातंग, दलित लोकांना कसण्यासाठी दिला. हे सर्व60 /70 एकर जमीन धारकांनी केले तसेच गावांमध्ये आणि गावाबाहेर मोठ्या प्रमाणात आधुनिक वाईन शॉप निर्माण केले. खडी, वाळू, सिमेंट, वीट भट्ट्या चालवण्याचे उद्योग सुरू केले. हे सगळे उद्योग स्थानिक राजकारणाला बळ देणारे आणि त्यातून संघर्ष व गुंडगिरी निर्माण करणारे आहे. अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मराठा तरुण उतरलेला दिसतो. ज्या श्रीमंत शेतकऱ्यांनी बागायतदारांनी जागतिकीकरणाचा फायदा घेत शिक्षणसंस्था, कार्पोरेट सेक्टरमध्ये आपला पैसा गुंतवला त्यांना आणि या वीटभट्ट्या  तत्सम असंघटित व्यवसाय करणारे गावातील भणंग तरुणांनाही  मराठा समाजाच्या हाती राजकीय सत्ता असावी हे तीव्रपणे वाटू लागले. मराठा जातीच्या अभिमानाची चौकट ही मराठा जातीचा इतिहास, पराक्रमी राजे, सफल नेतृत्व करणारे नेते त्यांचे गौरवीकरण आणि आर्थिक सबलीकरण यातून येतो.  त्याचबरोबर माझी जात इतरांपेक्षा कशी वेगळी आणि श्रेष्ठ तेही यावरून सिद्ध होत असते! आपण मुख्य दावेदार असूनही आताच्या बदलत्या नवउदारमतवादी सामाजिक आर्थिक परिस्थितीचा काही लाभ मिळत नाही; उलट ज्यांच्यावर आम्ही राज्य केले, आम्ही पायाखाली चिरडले त्या दलित समाजाला हे फायदे मिळतात असे दिसते तेव्हा त्यांची असुरक्षितता आणि आक्रमकपणा जास्तच वाढतो. हीच कारणे विषारी आक्रमक हिंदुत्वाला पाठिंबा देण्यास, त्याची कास धरण्यास भाग पाडतात.  
अशा सर्व कारणांमुळे आरक्षणाची मागणी अपरिहार्य होत जाते. मागास जातींना आरक्षणाचे फायदे होतात मग आम्हाला का नाही हा विचार मराठा समाजाच्या डोक्यात रुजण्यास मराठा नेतृत्व जबाबदार आहे.  मराठा समाजाची सरंजामी मानसिकता जबाबदार आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात जमिनींचे विभागीकरण होऊन  मराठा भावकीमध्ये त्या विखुरल्या जातात, कारखान्यांसाठी किंवा बिल्डरांना दिल्या जातात तेव्हा रोजगाराची  साधने नसल्याने आरक्षणासारख्या मागण्या पुढे येतात. त्यातून आपली दावेदारी सिद्ध केली जाते आहे.  पण मराठा स्त्रियांच्या बाबतीत रोजगाराच्या संधी तशाही कमीच असतात. मात्र कुटुंब एकत्र टिकावे, आपल्या  मुलाबाळांना सुरक्षितता आणि समृद्धी मिळावी याकरता त्यांना हे आरक्षण वरदानासारखे वाटते आहे. मराठा मोर्चा मध्ये ढकललेल्या” गेलेल्या मराठा स्त्रिया पुन्हा एकदा मराठा पुरुष सत्ताक व्यवस्था सांभाळण्यासाठी, काटेकोर पालन करण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीतील मराठा मुलींपर्यंत वारसाहक्काने सुपूर्द करण्यासाठी मराठमोळ्या संस्कृतीत विलीन झाल्या आहेत!

मीनल जगताप


राज्यशास्त्रात एम.ए आणि एम. फील. आणि विमेन्स स्टडीज मध्ये डिप्लोमा ,मराठा स्त्रीयांचे स्थान ह्या विषयावरील प्रकल्पाला महाराष्ट्र फाउंडेशन कडून अर्थसाहाय्य. विविध नियत कालिकांतून स्त्रीप्रश्न आणि जातवास्तव या विषयावर लेखन.  सुगावा प्रकाशन तर्फे “मराठा स्त्रीयांचे स्थान” हे पुस्तक प्रकाशित, महाराष्ट्रसाहित्यमंडळाकडून पुरस्कार


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form