"ही कोण ओरडतेय
संस्कृतीच्या नावाने
गळे काढून
नि दाखवतेय बोट
गाभाऱ्याकडे
याच गाभाऱ्यातील
तथाकथित स्त्रियांनी
शिकवलंय आम्हाला
गाभाऱ्यात राहून
राज्य करायला
आमच्या सांस्कृतिक पैंजणांचा भार
नाही वाटत आम्हाला असह्य
आम्ही झेलू त्याला पिढ्यानुपिढ्या
नि नाचू त्याच्या तालावर
ताल धरून
हवं तर बदला तुम्ही स्वतःला
नि बसवा
आमच्या साच्यात
मग आपण मिळून
पुन्हा गाभाऱ्यात जाऊ
आपण मिळून
पुन्हा अंधार पाहू
आपण मिळून पुन्हा
गुलाम होऊ "
- असं बेंबीच्या देठापासून
ओरडून सांगणाऱ्या
सुशिक्षित स्त्रियांना
कसं करावं मुक्त
संस्कृतीच्या पैंजणातून?
कविता मोरवणकर
Tags
कविता
