हीच बाजारतळातली हिरवीगार चिंच
इथंच त्यांच्या आईला वडीलांनीच
मूल होत नाही म्हणून
सोडून दिलं होतं
त्यांची आई रडत रडत आपल्या
माहेरी आल्याची गोष्ट
आजही अंगणात पडलेली
म्हातारी माणसं रडत रडत सांगायची
सोंगणीच्या विळ्याला खवलेदार कणसीने
धार काढतांना त्यांच्या आईनं म्हटलेलं गाणं
लालसर ठिणगीसारखं
त्याचं काळीज भाजून टाकायचं
तापाच्या फणफणीत
तो आईच्या पदरांखालीच झोपून होता
आणि त्याचा पाय लागून
त्याच्या आईच्या छातीचं फुटलेलं गळू
आजही त्याच्या डोळ्यांतून
घळाघळा वाहतंय
पाट्यावरच्या लाल मिरचीत
भाकर बुडवून खातांना
त्याने पाहून घेतले
आईच्या जिभेवरचे लालसर फोड
आणि तो पळतच गेला
गावातल्या एका आजीकडे
दूध शेवया खाता खाता रडणाऱ्या
आईचे डोळे पुसून तोही रडायला लागला
कुठेही जाळ पाहिला तरी
तो आजही भाजून निघतोय
शेकोटीत पडलेल्या लहान भावासारखा
आईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा
सोन्याच्या भट्टीत धूर झाल्यावर
त्याच्या लहान भावाच्या हातावर आईला
थंडगार औषध लावता आलं होतं
गोड्या बाभळीच्या काळ्या सालीवरचा
पांढरा घट्ट डिंक खाता खाता
त्याने आईच्या तोंडून ऐकल्या होत्या
पानं आणि मुळ्या खोदून
जगलेल्या माणसांच्या गोष्टी
म्हणूनच तो दगडी देवाच्या मूर्तीपुढे
नारळ आणि फुलं घेऊन
कधीच उभा राहिला नाही
सोंगणीच्या विळ्यावर
कातडी वाहणेच्या खिळ्यांवर
तर कधी कापलेल्या कणसांच्या खळ्यांवर
त्याला आईच्या रक्तांचे डाग दिसत आले
म्हणूनच त्याला गोल गरगरीत भाकर
जगातली सर्वात प्रिय
आणि महागडी गोष्ट वाटत आलीये.
अनिल साबळे
Tags
कविता