बाई ग, तुला दिल्या आहेत ना आम्ही नऊ रात्री हक्काच्या?
उपकार समज... आणि खुडून टाक मुलीचा गर्भ नऊ महिन्यांपूर्वीच...
नवरात्रात आम्ही पुजू तुला... तुझं गुणगान करू...
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती अशा विविध रूपांत...
तुझ्या मातृत्वाचे गोडवे गाऊ... युगानुयुगे...
तुझं आई असणं तुझ्यापेक्षा आम्हीच मिरवू जास्त...
मालिका आणि सिनेमांचा पाऊस पाडू धोधो...
आणि सरोगेट मदरच्या भूमिकेचा जयजयकार करू...
पण कितीही लेख छापून येवोत स्त्री भ्रूणहत्येवर...
किंवा भारताच्या जनगणनेचे आलेख कितीही ओरडून सांगू देत...
आमच्या दगडी काळजात कसलेच तरंग उठणार नाहीत...
आम्ही झापडं लावून घेतलीयत डोळ्यांना... आणि मनालाही... वर्षानुवर्षं...
तू इंद्रा नूयी हो किंवा सायना नेहवाल...
तुझं बाई असणंच आम्ही कायम मनावर ठसवत राहू तुझ्या...
तू बहीण, मैत्रीण, पत्नी, वहिनी, आजी कुणीही अस...
रक्ताच्या नात्याची नसलीस की तू मादीच आमच्यासाठी...
कारण लांडग्यांचेच संस्कार घेऊन चालतोय आम्ही पिढ्यानपिढ्या...
मग तू नखशिखांत झाकलेली अस सलवार कुडत्यामध्ये...
किंवा जगाची पर्वा न करता तुला आवडेल तो पोशाख कर...
आम्ही जिभल्या चाटतच पाहणार तुझ्याकडे...
आणि लहान मुलीपासून वृद्धेपर्यंत सगळ्यांवर होणारे बलात्कार
वर्तमानपत्रांची रद्दी विकली की भूतकाळात जमा करणार सोयीस्करपणे...
तू बायको म्हणून माप ओलांडलंस की विसरून जा स्वातंत्र्य...
नवऱ्याच्या शरीराचे, जिभेचे, मनाचे सगळे चोचले पुरव मुकाट्यानं...
आणि मग मातृत्वाची चाहूल लागली की आधी पहा...
मुलगा आहे की मुलगी?
मुलगा असला की तू ग्रेट झालीसच आपोआप...
पण मुलगी असली तर तिचा गळाच घोटून टाक...
आणि ऐकत राहा उलट लोकांचे उद्गार...
"आई आहेस की कैदाशीण?
पोटच्या पोरीला ठार केलंस?"
त्यांना कुठे माहीत असते कहाणी...
विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलेली...
मुलीला जन्म दिल्यावर बायकोच्या तोंडावर वरवंटा मारणाऱ्या नवऱ्याची...
त्या मुक्या जिवाला काय कळतंय ग?
तोडून टाक, फेकून दे... सुकलेल्या गजऱ्यासारखं...
एरव्हीही तिच्या नशिबात तुझेच भोग लिहीलेयत त्याने...
म्हणूनच आम्ही सोय करून ठेवलीय तिच्या मुक्तीची...
सुटेल बिचारी बाहुली... तिचं खेळणं होण्याआधीच...
वर्षानुवर्षं आम्ही याच कारणास्तव स्त्रीचा गर्भ नाकारतोय...
कळ्यांना खुडून फेकून देणारं उद्याचं जग साकारतोय...
संदेश कुडतरकर.
Tags
कविता
खूप छान लिहिलयेस
ReplyDeleteम्हणूनच आम्ही सोय करून ठेवलीय तिच्या मुक्तीची..."
ReplyDeleteसंदीपसर मला काही ही मुक्ती वाटत नाही उघडउघड हत्या आहे ती.
True...
DeleteThanks
ReplyDelete