स्त्रीवादाचे अंकुर


गडचिरोलीतील काम सुरु केलं आणि साधारण त्याच वेळी स्त्रीवादाची ओळख होऊ लागली! छात्र युवा  संघर्ष वाहिनीतील सदस्य म्हणून मिटिंगमध्ये चाललेल्या चर्चा समजतील अस वाटायचं आणि तरीही परत हे नेमकं काय असा प्रश्न पडायचा. सुरूवातीला बांधकाम - लाकूड कामगार संघटनेचं काम सुरु केल्यावर महिलांशी बोलायचं; जे त्यांच्याकडून येईल ते समजून घ्यायचं आणि जे काही करायची गरज असेल व जे जमेल ते करायचं असं ठरवलेलं होतं. ते करताना जे प्रश्न त्यांच्याकडून यायचे ते समजून घेताना अनेक गोष्टी नव्याने कळल्या. त्यातलं महत्वाचं म्हणजे शिकल्या नसल्या तरी बायांना जगण्यानं खूप काही शिकवलेलं असत. अगदी सुरवातीच्या शिबिरात ‘बाईचं जगणं’ या विषयावर बोलताना तिच्या लहानपणापासून सुरूवात केली तर रोजगार हमीच्या कामावर मजुरी करणाऱ्या या बायांनी प्रश्न  टाकला ‘ आम्ही मुलांना आमच रक्त मांस देऊन नऊ महिने पोटात वाढवतो, जन्मल्यानंतर उभा होईस्तो दुध पाजून वाढवतो पण नाव लावताना मात्र बापाचं?’ त्यांनी कधीही कुणाला अस नाव लावताना पाहिलेले नव्हतं किंवा असा विचारही कुणी  त्यांच्या समोर मांडला नव्हता.  तरीही जगणं सोसतानाच्या दुखाःने बोलणं ओठावर आणलं. जो विचार बोलायला आणि पचायला शिक्षित समाजालाही जड जातो तो या अशिक्षित म्हणवणाऱ्या बायांना सहज मांडता येतो कारण जगण्यानं ते रुजवलेलं असतं.  
यामुळेच या सगळ्या मैत्रिणींची पहिली ओळख झाल्यावर मनात आलं यांना आपण काय शिकवणार? शिकवणारच असं जरी नसलं तरी त्यांची मदतनीस म्हणून काम करता येईल हा विचार करून पुढची आखणी केली. त्यांना माहिती हवी होती कायद्याची. महिलांच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे त्यांच्या पर्यंत पोहचणं – तेही त्यांना समजेल अशा भाषेत, ही त्यांची गरज होती. त्यासाठी कधी वकील मैत्रिणींना शिबिरात बोलावून माहिती दिली. काही पुस्तकं संस्थेत आणली. याच परिसरातल्या ज्या महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्ते कामात सोबतीला आले त्यांनी या काही विषयात जास्त माहिती घेऊन तयारी केली. अशाप्रकारे त्यांना आवश्यक मदतीची फळी उभारता आली. जेव्हा असे कार्यकर्ते सोबतीला नव्हते तेव्हा महिलांना जी माहिती होती, त्याचा उपयोग त्यांनी केला. मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न केलेल्या एका पुढाऱ्याची पहिली बायको उशिराने गरोदर राहिली. दुसऱ्या बायकोला मुलं झालेली, त्यामुळे त्यांचा संपत्ती अधिकारात अडसर येईल म्हणून दुसरी बायको व नवरा दोघांनी मिळून तिला विष दिले. तिचा शासकीय दवाखान्यात मृत्यू झाला. तेथील डॉक्टरांच्या व पोलिसांच्या मदतीने विषप्रयोग लपवण्याचा प्रयत्न या पुढाऱ्याने केला तेव्हा गावातील तिन्ही महिला मंडळांनी मिळून हा डाव हाणून पाडला. परस्पर प्रेताची विल्हेवाट न लावू देता पोलीस स्टेशन समोर बसून आग्रह धरून व आपल्या बाजूचे डॉक्टर सोबत देवून पोस्टमार्टेम करवले. गुन्हा नोंदवून घेतला. या प्रसंगामुळे त्यांना आपली ताकद समजली.

वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी अर्ज कसे द्यायचे, बँकाचे व्यवहार इ. अनेक कामातून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला. बचत गट केवळ बचतीपुरते न ठेवता इतर मुद्देही हाताळले जावेत या धोरणामुळे स्त्रियांचे क्षेत्र मर्यादित न राहता वेगवेगळ्या कामात त्या भाग घेवू लागल्या.
संस्थेची पत्रे महिलांच्या नावाने पाठवताना कुमारी – सौ. असे न लिहिता श्रीमती असे लिहिले जायचे. काही वर्षांनी लक्षात आले बचत गट किंवा महिला मंडळांची निमंत्रणेही श्रीमती नावाने लिहिली जावू लागली. बचत गटाच्या कामाचा आढावा घेताना कमी शालेय शिक्षण असणारी गावातली बाई “बच्चा भी अपने नामसे नही होता पर दस रुपया (त्यावेळी असणारी बचत रक्कम) अपना होता है” अस सांगायची.  आदिवासी महिला अधिकाराविषयी अभ्यास गटाने आपला मुद्दा निवडताना स्वतःहून संपत्ती अधिकाराचा मुद्दा निवडला. कारण महिलांच्या नावे कुठलीच संपत्ती नाही हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. यासाठी केवळ स्त्रियांचा विचार नाही तर  पुरुषांना यासाठी सजग करणे आवश्यक आहे हा विचार करून त्यांनी ग्रामसभा घेवून मुद्दा मांडायला सुरवात केली. काही गावातून कायद्याने हे होणार आहेच, मग आपण स्वतःच असा निर्णय घ्यावा हा विचार केला. मात्र इथे अडचण आली ती शिक्षित, पदाधिकारी व पुढारी आदिवासी पुरुषांची. कदाचित इतर समाजातील अधिक जवळीकीमुळे त्यांच्यातील पुरुषी मानसिकता अधिक तीव्र झाली असावी. सर्वसामान्य पुरुष मात्र काही वेळा स्त्रियांच्या बाजूने भूमिका घेतानाही दिसले. जातपंचायतीत स्त्रियांचा सहभाग मुद्द्यावर धानोरा तालुक्यातील वयस्कर जातपंचायत प्रमुखाने “आम्ही स्त्रियांना बोलाविले नाही ही आमची चूक आहे. पण त्यांना सामील करायचे असेल तर त्यांना वेगळे प्रशिक्षण द्या.” अशी मागणी करून आम्हाला योग्य मार्ग दाखविला.   
मळलेली वाट सोडून आदिवासी ग्रामीण स्त्रियांनी वेगळा विचार स्वीकारणे व त्यासाठी त्यांची तयारी करणे यात केवळ स्त्रियांसोबत काम करून भागणार नाही तर पुरुषांनाही त्यात सहभागी करावे लागेल हा विचार अगदी सुरूवातीपासून या स्त्रियांनी मांडला. “आमच्यावरचा अन्याय आम्हाला समजणारच. पुरुषांनाही समजावून  द्या.” हे त्यांनी सांगितले. विशेषतः आदिवासी समाजात हा बदल स्वीकारण्याची तयारी अधिक दिसली.
१९८८-८९ मध्ये दारूमुक्ती आंदोलनात महिला हिरिरीने पुढे आल्या. कोरची ते सिरोंचा –म्हणजे  गडचिरोलीच्या उत्तर – दक्षिण टोकावरून प्रत्येक तालुक्यातून महिलांचे प्रतिनिधित्व जिल्ह्यातील प्रत्येक बैठकीत रहात आलं. यासाठी कुणीही त्यांना प्रवास खर्च देत नव्हतं. प्रश्न महिला मंडळं व युवक संघटना यांच्याकडूनच पुढे आलेला होता.  सामाजिक  संस्थांनी पुढाकार घेतला असला तरी यात राजकीय पक्षांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते, काही व्यक्ती, ग्रामसभा सहभागी होत्या. आम्ही सर्वच संस्था आपले आपले प्रकल्प सांभाळून साधारण १९८८९-९३ या काळात नवनवीन संपर्क जोडत होतो. लोक स्वतःही संपर्क करत होते. जिथे जिथे जशी गरज भासेल तशा प्रकारे लोकांना माहिती देणे, आपल्या प्रशिक्षणाना जोडून दारूमुक्तीचा विषय घेणे अशा अनेक प्रकारे संस्था कार्यरत होत्या. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे काम महिला बचत गटांसोबत असल्यामुळे महिलांना घेऊन मुद्दे पुढे आणणे व प्रशिक्षण देणे अधिक सोपे झाले.
२००० ते २००८ मध्ये सहभागी वनव्यवस्थापन व २००९ पासून वनहक्क कायदा अंतर्गत काम महिलांच्या सहभागातून करताना इतर ठिकाणांपेक्षा अधिक वेगळा ठसा उमटलेला दिसतो. सहभागी वनव्यवस्थापन अंतर्गत काम करताना समान संख्येने व सर्व प्रक्रियेत स्त्रिया कशा सहभागी होऊ शकतील हा अधिकाधिक प्रयत्न केला गेला. वास्तविक दारूबंदी साठी महिलांच्या बैठकांतून मागणी आली व आम्ही आमच्या आरोग्यासाठी सहभागी झाले.
त्याप्रमाणे सहभागी वनव्यवस्थापनाच्या कामातही बचत गटासाठी सल्ला घ्यायला आलेल्या रानवाही गावातील उमाकांताबाईच्या ‘जंगल राखायचे काम करायचे आहे’ या मागणीमुळे जास्त प्रकर्षाने सहभागी वनव्यवस्थापन मुद्द्याकडे व विशेषतः त्यातील स्त्रियांच्या सहभागाकडे वळण्याचे संस्थेने ठरविले. यासाठी स्त्रियांची वेगळी प्रशिक्षणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागात स्वतंत्र बैठका इ. प्रयत्न केले.
सन २००८ मध्ये वनहक्क कायद्याचे नियम बनल्यानंतर २००९ मध्ये कायद्याची माहिती ग्रामसभांना देण्यासाठी जी जाणीव जागृती शिबिरे घेतली गेली, त्यात संस्थेच्या स्त्रियांच्या सहभागाची भूमिका म्हणून सुरूवातीला त्यांना बोलाविण्यात आले. परंतु पुढे त्यातील जंगलरक्षण शिवाय अन्नसुरक्षा हा प्रश्न व जंगलाशी स्त्रियांचे नाते याचाही विचार केला गेला. वनहक्क कायद्याचे काम करताना वैयक्तिक वनहक्क व सामूहिक वनहक्क या दोन प्रकारे विचार केला गेला. गडचिरोलीत काम करणारया संस्थांनी मिळून सामूहिक हक्काच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याचे ठरविले. यासोबतच आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या क्षेत्रात हे काम अधिक ग्रामसभा संघटन या अंगाने गेले. ग्रामसभा संघटन होताना बचत गट परिसर संघाने व या क्षेत्रातील महिला कार्यकर्ती म्हणून कुमारीबाई जमकातन हिने या तालुका स्तरीय संघटनेत महिला प्रतिनिधित्व राहावे यासाठी आग्रही भूमिका घेतली. महिलांचे स्वतंत्र शिबीर व महिला पुरुषांचे एकत्रित पण महिलांच्या सहभागाला महत्व देणारे चर्चासत्र महिला बचत गट परिसर संघांच्या माध्यमाने आयोजित करवले. महिला बचत गट परिसर संघांच्या नियमित बैठकीत वनहक्क कायदा अमलबजावणी व ग्रामसभा पातळीवर महिलांचा सहभाग यावर सातत्याने चर्चा चालल्या. जंगलात स्त्रियांचा वावर तर होताच पण त्याच्या निर्णयासंबंधातही स्त्रिया असतील यासाठी प्रयत्न केले गेले.  हे सगळ झाल कारण संस्था साधन म्हणून आहे ही भूमिका आणि छात्रयुवा संघर्षवाहिनी या संघटनेने दिलेली स्त्रीवादाची शिकवण!


शुभदा देशमुख 

1984 पासून गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या सोबत काम. महिलांसाठी रोजगार, बचतगट आणि आरोग्य ह्या मुद्यांना जोडून संघटना बांधणी. महाराष्ट्र महिला आरोग्य परिषद आणि महिला किसान अधिकार मंच ह्या संघटनाच्या कामात सहभाग.

arogyasathi@gmail.com

1 Comments

  1. "आम्ही मुलांना आमच रक्त मांस देऊन नऊ महिने पोटात वाढवतो, जन्मल्यानंतर उभा होईस्तो दुध पाजून वाढवतो पण नाव लावताना मात्र बापाचं?" खरंच हा विचारही कधी डोक्यात आला नव्हता. खाडकन डोळे उघडल्यासारखं वाटलं.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form