फेसबुकवर स्त्रियांचं लिहिण्याचं प्रमाण जसजसं वाढत चाललंय तसतशी सोशल मिडियाचा स्त्रियांवर काय परिणाम होतो याची चर्चा अचानक सुरु झाली आहे. आपल्या समाजरचनेची गंमत अशी की पुरुषांनी एखादा नवीन बदल स्वीकारला तर त्या बदलाचे पुरुषांवर कसे परिणाम होतात याची विशेष चर्चा आपला समाज करत नाही. पण तेच स्त्रियांनी कुठलेही बदल केले, स्वीकारले तर त्याची चर्चा लगेच सुरु होते. सोशल मिडियावर लिहिणाऱ्या स्त्रियांना फॉलो करणारा एक मोठा समुदाय आहे, त्यांच्यावर कठोर टीका करणारा एक गट आहे आणि सोशल मिडियामुळे स्त्रिया कशा बिघडत चाललेल्या आहेत याची चर्चा करत बायकांनी कसं समाजाने नेमून दिलेल्या कक्षेत राहिलं पाहिजे हे पुन्हा पुन्हा ओरडून सांगणारा एक जत्था आहे. ऑफिसहून घरी आल्यानंतर सारा वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या नवऱ्याच्या बदललेल्या वर्तन सवयींबद्दल बोलण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण तेच स्वयंपाक करताना किंवा घरकाम करताना व्हॉट्स अँप बघणाऱ्या बायकांवर मात्र आपण कठोर टीका करायला, त्यांच्यावर जोक्स मारायला मागेपुढे बघत नाही. या प्रकारचे जोक्स पाठवण्यात आपल्यापैकी अनेकांना काहीही गैर वाटत नाही.
![]() |
या सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाईच्या वर्तनावर सतत नजर ठेवण्याची समाजाची सवय आणि कुटुंबरचनेपासून समाजरचनेपर्यंत कुठल्याही व्यवस्थेत बदल होत असतील तर ते स्वीकारताना बायकांच्या निर्णयावर संशय घेणं. स्त्रिया कुटुंब आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेत बदल करू शकतात हा विश्वास आपल्या समाजाला कधीच वाटला नाही. त्याने बायकांच्या हेतूवर कायम संशय घेतला आहे. अविश्वास दाखवला आहे. बायकांच्या हातात निर्णयांची सूत्र द्यायला समाज नेहमीच कचरला आहे. मग सोशल मीडिया आल्यानंतर आणि त्यावर स्त्रिया व्यक्त व्हायला लागल्यानंतरही समाजाने अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. त्यातून मग टीका, अवहेलना, चेष्टा आणि आभासी जगातला छळ अशा निरनिराळ्या गोष्टींना सुरुवात होते.
सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक चक्कर मारली की सोशल मिडिया वापरणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण चिक्कार आहे असं वाटायला लागतं. निरनिराळ्या विषयांवर व्यक्त होणाऱ्या, फोटो टाकणाऱ्या स्त्रियांची प्रोफाईल्स दिसायला लागतात. ती बघून स्त्रियांमध्ये सोशल मीडिया वापराचं प्रमाण पुष्कळ असेल असा आपण निष्कर्ष काढतो. पण प्रत्यक्षात भारतातल्या सोशल मिडिया युजर्सपैकी फक्त २९ टक्के स्त्रिया सोशल मिडियावर कार्यरत आहेत आणि त्यांचाही प्रवास सुकर नाही. माणसांना माणसांशी जोडणाऱ्या आणि व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ असलेल्या मिडिया वापराचा सर्वाधिक ताण बायकांवर येत असतो.
पण जे प्रत्यक्षात घडतं तेच इथेही... कुणी काही उघडपणे बोलण्याचा प्रयत्न केला तर तिची मुस्कटदाबी होते. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. ती शक्यतो व्यक्तच होणार नाही याची सगळी तजवीज केली जाते. इतकंच कशाला पण सोशल मिडियावर वावरणाऱ्या स्त्रियांनी मर्यादा ओळखून वावरलं आणि व्यक्त झालं पाहिजे असं मानणारा एक मोठा गट आहे, ज्यात पुरुषांबरोबर स्त्रियांची संख्याही आहेच! त्यामुळे सोशल मिडिया हे स्त्रियांना मिळालेलं मुक्त व्यासपीठ आहे आणि त्यावरून स्त्रिया त्यांना हव्या त्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात असं आपण समजणार असू, तर तीही आपण स्वतःची दिशाभूल करून घेणं आहे.
युनिसेफच्या वतीने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी म्हटलंय, भारतात सोशल मीडियात आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. ग्रामीण भागातल्या तरुणींना माहिती तंत्रज्ञानाच्या वापरापासून रोखलं जातं, कारण त्या स्त्रिया आहेत. युनिसेफच्या भारतीय प्रतिनिधी जस्मिन अली हक यांनी हे सर्वेक्षण जाहीर करताना म्हटलं होतं, माहिती तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत आणि ते स्त्री-पुरुष सगळ्यांना मिळायला हवेत.
एकीकडे युनिसेफच्या रिपोर्टनुसार भारतात स्त्रियांचे सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण पुष्कळ कमी आहे आणि त्या निव्वळ स्त्रिया आहेत म्हणून त्यांना माहिती तंत्रज्ञानापर्यंत पोचू दिलं जात नाहीये, तर दुसरीकडे फक्त फेसबुकचा विचार करायचा झाला तर भारत ही फेसबुकची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे असं जगभर मानलं जातं. ‘वी आर सोशल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की भारतात फेसबुक वापरणाऱ्या पुरुषांची संख्या ७६ टक्के आहे आणि स्त्रियांची संख्या २४ टक्के आहे. युनिसेफ आणि ‘वि आर सोशल’ या दोघांची टक्केवारी साधारण समान आहे. मग मुद्दा येतो लोकसंख्येचा निम्मा हिस्सा व्यापणाऱ्या स्त्रिया माहिती तंत्रज्ञान वापराबाबत इतक्या मागे का आहेत?
सगळ्यात पहिलं कारण जे युनिसेफनेही नमूद केलं होतं ते म्हणजे उपलब्धता नसणे. स्त्री आहे म्हणून तिला आधुनिक प्रसारमाध्यमांची आवश्यकता नाही, तिला ही माध्यमं देण्याची गरज नाही. या माध्यमांमुळे स्त्रिया बिघडतात, संस्कृती रसातळाला जाते हे गृहीत धरून तिला वंचित ठेवण्याकडे आपल्या समाजाचा मोठा कल आहे. इंटरनेट, स्मार्ट फोन आणि सोशल मिडिया ह्या तीन आधुनिक जगाच्या क्रांती मानल्या जातात. यातली स्मार्ट फोनची क्रांती येण्याआधी साधे मोबाईल आपल्या हातात होते. तेव्हाही अनेक मध्यमवर्गीय घरातून नवऱ्याला फोन आधी घेतले जायचे मग बायकोला. बायकोने फोन आधी घेतला तर नवऱ्याचा आणि इतर कुटुंबीयांचा इगो हर्ट व्हायचा. या परिस्थितीपासून आता आपण पुष्कळ पुढे आलो आहोत पण हे सांगण्याचं कारण म्हणजे युनिसेफ जे म्हणतंय ते महत्वाचं आहे. निव्वळ स्त्री आहेस म्हणून तंत्रज्ञानापासून लांब ठेवण्याची आपल्या समाजाची वृत्ती आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्त्रियांना सोशल मिडियावर मिळणारी वागणूक. एरवी समाजात जे चित्र असतं तेच सोशल मीडियातही दिसतं. कमीत कमी बोलणारी, स्वतःचं मत स्पष्टपणे न मांडणारी स्त्री म्हणजे सुसंस्कारित स्त्री हा जो काही सर्वसाधारण समज आपल्या समाजाने पिढ्यानुपिढ्या जपलेला आहे तोच घेऊन लोक सोशल मीडियावर येतात आणि तिथे व्यक्त होणाऱ्या स्त्रियांशी त्यानुसार वर्तन करतात. एखादीने स्पष्टपणे एखादं मत मांडलं, एखादी घटना सांगितली तर तिच्या चारित्र्यावर शंका घेण्यापासून तिची यथेच्छ छिःथू करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. रेप थ्रेट्सपासून तिच्या कुटुंबियांना धमकावण्यापर्यंत अनेक गोष्टी आभासी जगात सर्सास होतात. हे विकतचं दुखणं कशाला म्हणूनही सोशल मिडियावर न येणाऱ्या स्त्रियांची संख्या भारतात प्रचंड आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया हातात आल्यानंतर स्त्रियांचे आयुष्य कसं बदलत जात आहे याचा विचार करावा लागेल.
एक लक्षात घेतलं पाहिजे सोशल मिडियाचं व्यसन हा विषय लिंग भेदाच्या पलीकडे आहे. हे व्यसन कुणालाही लागू शकतं.. मुद्दा आहे तो स्त्रियांच्या वर्तनात काही मूलभूत बदल झालेले दिसतात का? जर झाले असतील, होत असतील तर ते कशाप्रकारचे आहेत. वर्तनातील बदल मांडत असताना हेही लक्षात घेतलं पाहिजे कि कुठल्याही मुद्द्याचं आपण सामान्यीकरण करू शकत नाही.
समाज माध्यमांचं स्त्रियांच्या आयुष्यातलं योगदान काय असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वसामान्य, कुठल्याही विशिष्ट प्रोफाइल नसलेल्या, विविध आर्थिक, सामाजिक स्तरातल्या स्त्रियांना लिहितं करण्यात फेसबुकचं मोठं योगदान आहे, जे आपण मानलंच पाहिजे. जिला तिला तिचे अनुभव तिच्या शब्दात लिहिण्याची मुभा फेसबुकमुळे मिळाली आहे. इतर कुणीतरी माझ्या जगण्याविषयी स्वतःच्या नजरेतून लिहिणं आणि मीच माझ्या जगण्याविषयी माझ्या शब्दात लिहिणं यातला फरक फार महत्त्वाचा असतो. फेसबुकमुळे कालपर्यंत घरात अडकून पडलेल्या अशा अनेक स्त्रिया लिहित्या झाल्या आहेत. त्यांना मोठा वाचक वर्ग आहे. हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल आहे. अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्या एरवी, कशाही विषयी काहीही लिहायला गेल्या नसत्या, त्यांनी लिहिलेल्या चार ओळी वृत्तपत्रांनी, मासिकांनी छापल्या नसत्या, किंवा छापल्या असत्या तरी त्यांना हवं तेव्हा, हवं तसं, हवं त्या शब्दात व्यक्त होण्याची मुभा त्यांना मिळाली नसती, किंवा त्या लिखाणाची तोडफोड झाली असती आणि त्या लेखनाला अनावश्यक ‘सुसंस्कारित’ चौकटीत कोंबण्याचे प्रयत्न झाले असते, अशा सर्व स्त्रियांना लिहिण्याची, व्यक्त होण्याची संधी फेसबुकने दिली आहे. काही विशिष्ट शहरांमधल्या, विशिष्ट वर्तुळात वावरणाऱ्या स्त्रियांना ‘स्त्रीपणा’ विषयी व्यक्त होण्याची संधी असणं आणि कुठल्याही स्त्रीला व्यक्त होण्याची संधी असणं यात, दुसरा पर्याय जास्त महत्वाचा, गरजेचा आणि मोठा बदल घडवणारा वाटतो. कालपर्यंत कुठलाही चेहरा नसलेल्या कितीतरी स्त्रिया आज विविध विषयांवर लिहिताना दिसतात. राजकारणापासून सामाजिक बदलांपर्यंत आणि स्त्रियांच्या प्रश्नांपासून विनोदी लेखनापर्यंत सगळ्या आघाड्यांवर प्रस्थापित चेहऱ्यांपेक्षा खूप नवे चेहरे सोशल मिडियामुळे पुढे आले आहेत. या स्त्रियांची भाषा त्यांची आहे. ती अनेकदा पांढरपेशी असेलच असं नाही. भाषा आणि विषय प्रचंड मोकळे आहेत. ते लिहितांना आजवर समाजाने बायकांच्या व्यक्त होण्याला घातलेल्या चौकटी, कुंपणं ओलांडून अनेक जणी पुढे जाताना दिसतात. अमुक एका पद्धतीने लिहिलं म्हणजे ते सभ्य आणि सुसंस्कृत, बाकी सगळं गचाळ असं मानणाऱ्या अभिरुचिसंपन्नतेच्या भ्रामक कल्पनांच्या पुढेही जाता येणं पुष्कळसं सोशल मिडियामुळे शक्य झालंय हे नाकारून चालणारच नाहीये. (रेणुका खोत, गौरी ब्रह्मे, मेघना जोग-चाफेकर, गीताश्री मगर, जोत्स्ना जगताप, रेश्मा रामचंद्र ही काही प्रातिनिधिक नावं, यापलीकडे अजूनही पुष्कळ स्त्रिया आहेत.) आणि या सगळ्याचा सोशल मिडीयावर वावरणाऱ्या स्त्रिया पुरेपूर वापर करून घेताना दिसतात.
पण त्याच बरोबर या माध्यमाने दिली आहे एक घुसमट!
आपला समाज प्रत्यक्षात जसा आहे त्याचंच प्रतिबिंब आहे सोशल मिडिया. त्यामुळे खऱ्या आयुष्यात ज्याप्रमाणे मोकळं व्यक्त होणाऱ्या, बिनधास्त स्वतःच मत मांडणाऱ्या, वाद घालणाऱ्या स्त्रीला गप्प करण्याकडे समाजातल्या एका गटाचं लक्ष लागून असतं तसंच काहीसं सोशल मिडियावर होतं. कसलेही फिल्टर्स न लावता, लिहीणाऱ्या स्त्रियांना लक्ष्य करून त्या लिहित्या राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करणारा एक मोठा गट सोशल मिडियावर आहे. सोशल मीडियावर वावरणाऱ्या स्त्रियांना वेळोवेळी अशा टोळधाडीचा सामना करावाच लागतो. ‘सोबतीची खात्री’ ही चळवळ कविता महाजन यांच्या पुढाकाराने अशाच टोळधाडीला विरोध करण्यासाठी उभी केली गेली होती. त्यांनी स्वतःही या टोळधाडीचा अनुभव घेतलेला होता.
सोशल मिडियावर वावरणाऱ्या अनेक स्त्रिया ट्रोलिंगचा वेळोवेळी अनुभव घेत असतात.
एक स्त्रीवादी मैत्रीण सांगत होती. मोकळेपणाने लिहिलं, विचार मांडले, विशेषतः लैंगिकता आणि स्त्रीशोषण या विषयावर की तिच्या फ्रेंड लिस्ट मधले अनेक पुरुष अत्यंत असभ्य भाषेत त्यावर मेसेजेस लिहितात. “ये तो रंडी है...चल आज रात मौज मनाते है...आती है क्या....” इथपर्यंत अश्लील मेसेजेस तिला पर्सनलवर करतात. वरवर सभ्यतेचे मुखवटे चढवून वावरणारे पुरुष, आतून असले घाणेरडे मेसेजेस करतात आणि वर निर्लज्जासारखं, थोडी गम्मत केली तर इतकी काय चिडते म्हणत फिदीफिदी हसतात. तिचे मोकळे विचार न झेपल्याने तिला जवळपास बाजारात उभं करण्यापर्यंत मर्यादा सोडून लिहिणारे पुरुष, प्रत्यक्षात मात्र तिच्या नजरेला नजर भिडवून त्यांनी जे लिहिलंय त्याचा एकही शब्द बोलत नाहीत. आणि अत्यंत सभ्यपणे वर्तन करतात. ती म्हणते, माणसाचं अंतर्मन आणि त्यातली घाण सोशल नेट्वर्किंगमुळे बघायला मिळते आहे. हाच प्रकार मधू चौगावकर या जेंडर अक्टिव्हिस्ट च्या वॉलवरही बघायला मिळतो. तिच्या पोस्टवर, फोटोंवर अतिशय असभ्य भाषेत लिहिणारे कितीतरी चेहरे बघायला मिळतात.
#सेल्फीविथडोटर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इनिशिएटीव्ह. त्यावर झालेली टीका आठवा. सरकारच्या इनिशिएटीव्ह वर टीका केल्याबद्दल दोन बायकांना सोशल मिडीयावर लैंगिक छळाला, अपमानाला, अश्लील आणि अर्वाच्च वर्तणुकीला सामोरे जावे लागले. त्या दोघी होत्या, अभिनेत्री श्रुती सेठ आणि ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वूमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन. योजनेवर टीका केल्याबद्दल ट्विटरवरून त्यांच्यावर जवळपास आभासी बलात्कार झाला. लोक इतके पातळी सोडून बोलत होते की वाचणाऱ्यालाही लाज वाटावी. महिलांना सोशल मिडीयावर लक्ष करणे हा आधुनिक भारताचा विद्रूप चेहरा आहे. हा प्रकार फक्त भारतात आहे असं नाही, जगभर सगळीकडे आहे. काही सर्वेक्षणानुसार जगभरात सोशल नेट्वर्किंग वापरणाऱ्या स्त्रियांपैकी ५० टक्के हून अधिक स्त्रियांना सोशल मीडियातल्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. भारतातही हे प्रमाण कमी नाहीये. इंटरनेट डेमोक्रसी प्रोजेक्टच्या वतीने एक सर्वेक्षण भारतात करण्यात आलं होतं. त्यात असं दिसून आलं की सोशल नेट्वर्किंगच्या माध्यमातून स्त्रियांवर लैंगिक ताशेरे मारणं, त्यांना त्रास देणं, धमकावणं, त्यांचा शाब्दिक छळ करणं असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. एखाद्या नाक्यावरून किंवा चौकातून एखादी स्त्री जाताना काही टवाळ लोक ज्या पद्धतीने तिच्याविषयी अश्लील बोलतात, गर्दीच्या रस्त्यातून जाताना जवळ येऊन काहीतरी घाणेरडं पुटपुटतात तसलाच प्रकार सोशल नेट्वर्किंग साईटवरून सर्रास चालू असतो आणि यात नाक्यावरच्या टवाळ पुरुषांबरोबरच वरकरणी सभ्य दिसणारे चेहेरेही असतात. इंटरनेट डेमोक्रसी प्रोजेक्टच्या डायरेक्टर अन्जा कोव्हक्स म्हणतात, ‘बायकांना गप्प करण्यासाठी या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पुरुषांकडून दिल्या जातात. भारतात ऑनलाइन अब्युजचा प्रकार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातही लैंगिक पातळीवरील कमेंट्स आणि त्याद्वारे स्त्रियांचा अपमान करणे या प्रकाराला तर ऊत आला आहे. बहुतेकदा अशा शोषणाला बळी पडणाऱ्या महिला, अब्युज करणाऱ्या व्यक्तीला अनफ्रेंड करणे सारख्या गोष्टी करतात, पण पोलिसांकडे जात नाहीत. कारण पुन्हा पोलिसांच्या तपासात त्याची जाहीर चर्चा होईल आणि त्यात त्यांचेच नाव बदनाम होईल अशी त्यांना धास्ती वाटते.’
अन्जा कोव्हक्सचा रिपोर्ट वाचता वाचता मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली. तिला तिच्या एका परिचित व्यक्तीने एका व्हॉट्स अँप ग्रुपमध्ये सामील केलं होतं. ग्रुपचं नाव होत, ‘सेक्सिएस्ट गर्ल्स इन टाऊन’ ! ती तीनचार दिवस ऑफ लाईन होती, त्यामुळे तिला या सगळ्याची कल्पनाच नव्हती. जेव्हा व्हॉट्स अँप उघडलं तेव्हा या ग्रुपच्या माध्यमातून आलेले मेसेज आणि पोस्ट पाहून ती हादरून गेली. तिने ताबडतोप ग्रुप सोडला, त्या मित्राला जाब विचारून ब्लॉक केलं. गोळा झालेला सगळा अश्लील कचरा साफ केला. पण या सगळ्याचा झालेला मानसिक त्रास, तो पुढे कितीतरी दिवस तिला मनातून साफ करता आला नाही. एकदा बोलता बोलता ती म्हणाली, ‘या सगळ्या मित्र म्हणवणाऱ्यानी मला पार बाजारात उभं केलं.’
श्रुती सेठ आणि कविता कृष्णन या सेलिब्रिटी असल्याने त्यांच्याविषयी चर्चा झाली, त्यावर लोक चिडून बोलले, पण घराघरातून असला सोशल अब्युज सहन करणाऱ्या स्त्रिया असतातच. ज्या गोष्टी प्रत्यक्षात करता येत नाही त्या करण्याची मुभा सोशल नेट्वर्किंग वर असते असा समज करून काही लोक वागत असतात. मग आपण एखाद्याचा अपमान करतोय का, एखाद्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचे बोलतोय का याचंही भान सुटतं.
बायकांवर केल्या जाणाऱ्या अश्लील टिप्पणीबद्दल कधीही चर्चा सुरु झाली की तरुणी उत्तान कापडे घालतात, बिनधास्त वावरतात म्हणून मग त्या टार्गेट होतात असा वाद घातला जातो. सोशल नेट्वर्किंगवरही याच धर्तीवर वाद घातला जातो, बायका त्यांचे आकर्षक फोटो टाकतात का? बिनधास्त लैंगिकतेबद्दल बोलतात मग त्यांना अशा ताशेऱ्यांना सामोरं जावं लागतं. बाईने बाईसारखं वागावं, मग कुणी त्यांना त्रास देणार नाही....
मला या आणि अशा कॉमेंट्सची भारी गंमत वाटते. म्हणजे एखाद्या बाईने आकर्षक फोटो टाकले किंवा छोटे कपडे घातले म्हणून तिच्या चारित्र्यावर घसरून, तिच्यावर लैंगिक तशारे मारणाऱ्यांना स्वतःचा दर्जाच नसतो का? की असं वागायचं लायसन्स मिळत लोकांना? कुणालाही बघून पाघळण्याइतके ते स्वतः चरित्रहीन असतात? की स्वतःच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्याचे हे एक माध्यम बनतं आहे. प्रत्यक्ष एखाद्या बाईची छेड काढली आणि तिने पोलिसात तक्रार केली तर त्या व्यक्तीचे वाभाडे निघाल्याशिवाय राहत नाहीत. त्यामानाने हे माध्यम अशा रीतीने वागणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित वाटत असावं. कारण, कसंही आणि काहीही बोललं तरी बायका उठून त्याची पोलिसात तक्रार करताना फारच कमी वेळा दिसतात. त्यामुळे पोलिसांनी पकडून नेण्याची, वाभाडे निघण्याची, घरी आई, बायको किंवा नात्यातल्या इतर स्त्रियांना समजण्याची शक्यता खूपच कमी असते. शिवाय सामाजिक प्रतिष्ठा आहे तशी राहते. छळ सहन करणाऱ्या स्त्रिया गप्प राहून अनफ्रेंड करत असल्याने त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागत नाही. आणि त्यांना मैदान मोकळं मिळतं. आज ही, तर उद्या ती...अशा रीतीने स्त्रीकडे उपभोग म्हणून बघणाऱ्या व्यक्तीला आपण कुणाशी आणि काय बोलतो आहोत याचं भान असण्याचं कारणच नसतं.
याउपर झालेले अनेक बदल स्त्री-पुरुषांसाठी तसे बघायला गेले तर समान आहेत. इतरांच्या मतांचा आदर करता न येणं, आपण म्हणू तेच सत्य मानण्याकडे आग्रह असणं, इंटलेक्चुअल टॉलरन्स अस्तित्वात नसणं, येता जाता कुणावरही चिखलफेक करणं, कसलाही विचार न करता व्यक्त होणं, आपण ज्याला कुणाला शिव्या घालतो आहोत त्या का घालतोय याचा सारासार विचार करायला स्वतःला संधी आणि वेळ न देणं, स्वतःला सोशल मिडिया वापरत असताना अजिबातच फुरसत न देणं अशा अनेक गोष्टी नियमित सोशल मिडिया वापरणाऱ्यांबाबत दिसतात. त्या पुरुषांमध्ये असतात तशाच त्या स्त्रियांमध्येही आहेत.
दुसरा एक मोठा आरोप स्त्रियांवर होतो तो म्हणजे, सोशल मिडियामुळे बायका कशा वाहवत चालल्या आहेत, त्यांचं घराकडे, नवऱ्याकडे, मुलांकडे, घरातल्या वयस्क लोकांकडे दुर्लक्ष होतंय, त्यांचं कुटुंबाच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, त्यांचा सारा वेळ सोशल मिडियावरुन मिळणाऱ्या मान्यतेवर लागलेलं असतं, त्यांच्या अशा वागण्याने कुटुंबं विस्कळीत होतात, घटस्फोट होतात, घराचं घरपण हरवून जातं…. एक ना अनेक! या विषयावर मार्गदर्शनपर व्हिडीओज रोज आपल्या मोबाईलमध्ये येऊन धडकत असतात. अपर्णा रामतीर्थकर यांच्यासारख्या स्त्रियांची भाषणं ऐकली की काय ते लक्षात येतंच. आपला समाज स्त्रीवर्तनाकडे सतत भिंगाच्या चष्म्यातून बघत असल्याने आणि समाजरचना टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी स्त्रियांवर आहे अशा अविर्भावात वावरत असल्याने होणाऱ्या प्रत्येक नवीन बदलात स्त्रियांकडे समाजाचं विशेष लक्ष असतं. समाजाने मान्यता दिलेल्या चौकटी सोडून त्यांनी काही केलं की टोळधाड जागी होते आणि कामाला लागते. स्त्रियांना वठणीवर आणणं किंवा त्या घालून दिलेल्या सीमारेषेत कशा वावरतील हे बघणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे अशा पद्धतीने ही टोळी सोशल मिडियावर वावरत असते. सोशल मीडियाचं व्यसन हा विषय लिंगभेदाच्या पलीकडला आहे. पण नियमितपणे सोशल मीडिया वापरणाऱ्या फक्त स्त्रियांना ते लागतं आणि पुरुषांना ते लागूच शकत नाही असा आविर्भाव आणण्याची खरंच गरज नसते.

सोशल मिडियामुळे बायकांचं जगणं बदललं आहे का?
तर हो, नक्कीच बदललं आहे.
सोशल मिडिया जसा तुम्हाला विलक्षण कॉन्फिडन्स देतो तसाच तो तुमचा असला नसलेला कॉफिडन्स काढून घेतो.
तो तुमची ओळख तयार करतो तशीच ती पुसून टाकतो.
तो तुम्हाला मित्र देतो तसेच शत्रू ही. तो तुम्हाला वाचक देतो तसेच ट्रोल्सही..
तो तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायला मदत करतो तसंच, नव्या इच्छा निर्माण करतो..
तो अपेक्षा तयार करतो, संधी तयार करतो आणि बघता बघता काढून घेतो..
तो तुम्हाला स्वत्व शोधायला मदत करतो आणि स्वत्व हिरावून घेतो.
तो मित्र आहे तसाच ‘डेव्हील’ ही आहे.
त्याला तुम्ही तुमचा आत्मा विकता का यावर तो तुमच्यावर स्वार होऊन तुम्हाला गिळणार की त्याचे लगाम तुमच्या हातात राहणार हे ठरतं..यातली पुसटशी सीमारेषाच या माध्यमांचा आपल्यावर काय आणि कसा परिणाम होणार हे ठरवत असतं..
ते शहाणपण आलं तर ह्या माध्यमाइतकी ताकद कशात नाही..स्त्रियांसाठी खऱ्या अर्थाने मुक्त श्वास देणारं माध्यम ठरू शकतं.
अन्यथा, हेच ते कृष्णविवर आहे ज्यात कितीही खोल गेलं तरी काहीच सापडत नाही!
मुक्ता चैतन्य