“स्त्रीवाद” हा तसा थोडा बदनामच झालेला शब्द आहे! चारचौघांमध्ये गप्पा मारताना जर ‘स्त्रीवाद’हा शब्द बोलण्यात आला तर बहुतेकांच्या भुवया उंचावल्या जातात! त्यातल्या ‘वाद’ह्या दोन अक्षरांमुळे बर्याचजणांना ‘स्त्रीवाद’म्हणजे बायकांनी पुरुषांशी केलेलं भांडण असा अर्थ घ्यावासा वाटतो. आजवर प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे महिलांच्या हक्कांसाठी लढणार्या बायकांचं चित्रण केलंय त्यामुळे - ‘स्त्रीवादी’म्हणजे आक्रस्ताळी आणि भांडखोर – असाही अनेकांचा समज होतो. किंवा काहीजण ‘स्त्रीवाद’ह्या शब्दाचा अर्थ माहीत नसताना देखील उगाचच हसायला लागतात! ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एका स्त्रीवादी डिजिटल नियतकालिकाची सुरूवात करत असताना ‘स्त्रीवाद’ह्या संकल्पनेविषयी कायकाय मतं असतात – हे जाणून घेणं आम्हाला गरजेचं वाटलं.
सध्याच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांमध्ये स्त्रीवादाची समज काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं, त्या सर्वेक्षणातून आलेल्या स्त्रीवादाच्या समाज – गैरसमजांचा हा लेखाजोखा.
आमच्या ह्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये एकूण चार प्रश्न होते.
· तुम्ही स्वतःला स्त्रीवादी मानता का?
· तुमच्या दृष्टीने स्त्रीवाद म्हणजे काय?
· तुमच्या मते पुरुष स्त्रीवादी असतात का?
· तुमच्या मते स्त्री हीच स्त्रीची शत्रू असू शकते काय?
हेच प्रश्न या सर्वेक्षणासाठी निवडण्यामागे विशिष्ट असा हेतू होता. एक म्हणजे आज स्त्रीवादाबद्दल जो काही नकारात्मक प्रचार प्रसार होतो आणि त्यातून स्त्रीवादाबद्दल जो एक भयगंड समाजात पोसला जातो आहे त्यात खरच किती तथ्य आहे व त्यामागील कारणे काय आहेत हे जाणून घेणं हा देखील या प्रश्नांमागील हेतू होता. त्याचबरोबर जे लोक स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेतात त्यांच्या स्त्री-पुरुषांबद्दल काही मूलभूत मुद्द्यांबद्दल काय वाटतं तेही जाणून घ्यायचं होतं. स्त्रीयांच्या हक्कांच्या बाजूने बोलायला लागलं की -‘बाई हीच बाईची शत्रू असते’- हे वाक्य हमखास तोंडावर फेकलं जातं! म्हणून त्या समजुतीची ह्या सर्वेक्षणातून तपासणी करायची आम्ही संधी घेतली.
सर्वेक्षणाची पद्धती ही ऑनलाईन फॉर्ममध्ये असणारी प्रश्नावली भरुन घेणे अशी होती आणि प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यापेक्षा ह्या पद्धतीमध्ये वेगळे अनुभव येऊ शकतात – ह्याची आम्हाला कल्पना होती. पण वेळेची आणि इतर संसाधंनांची मर्यादा लक्षात घेता हीच पद्धत सोयीची ठरणार होती. आम्ही दोनशेपेक्षा जास्त लोकांना हे फॉर्म पाठवले होते. आम्ही दिलेल्या वेळेच्या मर्यादेत म्हणजे फॉर्म पाठवल्या पासून साधारण एक आठवड्याच्या काळात आलेल्या फॉर्म्सचाच आम्ही विचार केला आहे. आमच्याकडे भरून परत आलेल्या फॉर्म्सपैकी काही फॉर्म अर्धवट भरलेले होते,त्यामुळे ते उपयोगात आणता आले नाहीत.
तरी पूर्ण भरलेले फॉर्म्स विचारात घेतले तर या सर्वेक्षणात एकूण ३५ लोकांनी सहभाग घेतला, असं म्हणता येईल. त्यात ६७% स्त्रिया तर ३३ टक्के पुरुष होते. हे सर्व स्त्री पुरुष साधारणपणे २४ ते 56 या वयोगटातील होते. विभागाचा विचार केला तर सहभागी हे प्रामुख्याने शहरी भागातील म्हणजे साधारणपणे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग अशी शहरे व किंवा त्याला लागून असलेल्या उपनगरांमधून आलेले होते, त्यामुळे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व या सर्वेक्षणामध्ये जवजवळ नाही असंच म्हणावं लागेल ही या सर्वेची मोठी मर्यादा आहे असे म्हणता येईल. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले सर्वच लोक हे आर्थिकदृष्ट्या मध्यम वर्गातले आहेत हे त्यांच्या उत्तरावरून दिसते. शिक्षित की अशिक्षित अशी विभागणी या सर्वेक्षणात केली नसली तरी सामान्यपणे सर्व सहभागी हे फॉर्म भरू शकण्या इतके शिक्षित आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.
या सर्वेच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना ७२.२ टक्के लोकांनी आम्ही स्वत:ला स्त्रीवादी मानतो असे म्हटले आहे. त्यातही स्वत:ला स्त्रीवादी मानणाऱ्या पुरुषांची संख्या ६७ टक्के व स्त्रियांची संख्या ७१ टक्के इतकी आहे. म्हणजे स्वत:ला स्त्रीवादी समजण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये थोडंसं अधिक आहे हे अधोरेखित करायला हवं. आपण स्त्री वादी नाही असे मानणारे लोक १९.४ टक्के आहेत, तर माहित नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या ८.४ टक्के एवढी आहे. पण तरीही स्वत:ला स्त्रीवादी समजणारे स्त्री पुरुष ७२ टक्के आहेत, हा आकडा आश्चर्यकारक आहे!
पुढचा प्रश्न होता - ‘तुमच्या दृष्टीने स्त्रीवाद म्हणजे काय?’
ह्या प्रश्नाच्या उत्तरांतून त्यांचं स्त्रीवादाचं आकलन स्पष्ट होत जातं. आपण स्वत:ला स्त्रीवादी मानतो किंवा नाही मानत, हे लोकांनी स्वत:ची स्त्रीवादाबद्दलची समज काय आहे यावरुन ठरवलेलं दिसतं. स्त्रीवादी असण्या-नसण्याविषयीची जी कारणं त्यांनी दिलेली आहेत त्यातून यात स्वत:ला स्त्रीवादी मानतो असे म्हणणाऱ्या लोकांच एकूणच स्त्रीवादाबद्दलचं आकलन बऱ्यापैकी चांगलं आहे असं दिसतं.
या सर्वेक्षणामध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे ७२ टक्के लोकांनी आम्ही स्त्रीवादी आहोत असं मत मांडलं आहे. ते मांडतांना एका सहभागीने लिहिलं की ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने जग समजून घेणे, स्त्रियांच्या गरजेनुसार त्यांना समाजात सहभागी होण्यासाठी सोयी , सवलती मिळणे, अभिव्यक्तीसाठी वाव मिळणे इ. उदा. बाळंतपणाची राजा, स्वच्छतागृहे उपलब्ध असणे.’ दुसऱ्या सहभागीच म्हणणं अस होत की ‘स्त्रीवाद म्हणजे जी चौकट पितृसत्तेने घालून दिली आहे ज्यात सत्ता पुरुषांकडे आहे अशी चौकट स्त्री व पुरुषांनी मोडणे म्हणजे स्त्रीवादी असणे होय. उदा. जर एखाद्या मुलीला बाहेरच्या शहरात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करायची आहे तर ती शहरात एकटी राहून ते करते...हे पितृसत्तेची चौकट मोडणं आहे. कारण तिने तिच्या इच्छेने हा पर्याय निवडला व त्यासाठी संघर्ष केला व मुलींच्या फिरण्यावर बंधनं असतात ते ही बंधन मोडलं. तसेच स्वतःचा जोडीदार एखाद्या मुलीने निवडला तर ती ही स्त्रीवादी असू शकते जर ती स्वतःच अस्तित्व ही त्या नात्यासोबत जोपासत असेल तर. कारण पितृसत्ताक व्यवस्थेत कुटुंबीयच मुलींसाठी जोडीदार निवडतात.
या दोन्हीही भूमिका मला फारच महत्त्वाच्या वाटतात. कारण स्त्रीवाद म्हणजे काहीतरी पुरुषांच्या विरोधी वगैरे आहे, असा जो समज आपल्या समाजात जाणीवपूर्वक पसरविला गेलेला आहे त्या समजाला वरील दोन्ही भूमिका जोरदार छेद देतात. स्त्रीवादाचं वास्तव व व्यावहारिक चित्र या भूमिकांमधून आपल्या नजरेस येतं. स्त्रीवादाबद्द्ल लोकांनी मांडलेल्या ह्या भूमिकांमधून स्त्रीवादाची तात्विक, वैचारिक व व्यावहारिक बैठक समजून घ्यायला नक्कीच मदत होईल.

गेल्या दशकभरात स्त्री चळवळीने आणि अर्थात व्यक्तिगत स्तरावर अनेक स्त्रियांनीसुद्धा सामाजिक जीवनात मारलेली मुसंडी, त्यांच्यात त्यांच्या हक्कांबद्दल आलेली जागृतता व त्यासाठीचा आग्रही संघर्ष, वेगवेगळ्या कायद्यांच्या वापरातून प्रस्थापित केलेले हक्क व अस्तित्व ह्या सर्वांच्या परिणामी बिथरलेल्या पुरुष वर्गाने पद्धतशीरपणे स्त्रीविरोधी, स्त्रीवाद विरोधी जी विखारी प्रचार मोहीम राबविली त्या मोहिमेच्या प्रभावातून हे येतंय हे लक्षात घेतलं पाहिजे. ‘स्त्रिया कशा कायद्याचा गैरवापर करतात’ ह्या प्रचारात पुरुषांचं ‘तथाकथित बिचारेपण’ अधोरखित केलं जातं व पुढल्या टप्प्यावर त्या बिचारेपणाला व ‘पुरुष स्त्रियांचा छळ करत नाहीत’ या धारणेलाच पुरुषांचा स्त्रीवाद म्हणून ठसवलं जातं अशी ही प्रक्रिया आहे.
आणखी एक गमतीशीर पण तेवढीच गंभीर बाब स्वत:ला स्त्रीवादी न समजणाऱ्यांच्या पुढील प्रश्नाच्या उत्तरातून समोर येते. स्त्री ही स्त्रीची शत्रू असते का ह्या प्रश्नाचं उत्तरही स्वत:ला स्त्रीवादी न समजणाऱ्यांनी “होय, स्त्रीच स्त्रीची शत्रू असते’’ असं दिलं आहे. अर्थात त्यासाठी त्यांना उदाहरण म्हणून ‘सासू-सून’ यापलीकडे जाता आलेलं नाही, तो भाग वेगळा!पण आपण स्वत:ला स्त्रीवादी मानत नाही, किंवा मानतो की नाही हे माहीत नाही अशी भूमिका जे लोक घेताहेत त्यापैकी ७० टक्के लोकांना पुरुष स्त्रीवादी असतात व स्त्री हीच स्त्री ची शत्रू असते हे मात्र ठामपणे वाटते, असं हे सर्वेक्षण सांगतं. म्हणजे एका बाजूला पुरुष स्त्रीवादी असतात असं म्हणत पुरुषांप्रती सहानुभूती दाखवायची, तर दुसऱ्या बाजूला मात्र स्त्रियांना झोडपण्याची कुठलीही संधी सोडायची नाही असा हा प्रकार आहे.
स्वत:ला स्त्रीवादी न समजण्याचे कारण देतांना लोकांनी म्हटलं आहे की, भारतीय संदर्भात स्त्रीवाद अस्तित्वात नाही, किंवा सगळ्यांना माणूस म्हणून पहावं अर्थात स्त्रीवादी असण्यापेक्षा मानवतावादी असावं वगैरे वगैरे. खरं तर स्त्रीवादी असणं मानवतावादी असणं आहे, किंवा स्त्रीवादी असल्याशिवाय मानवतावादी असताच येणार नाही, अस असलं तरीही स्त्रीवाद असा मानवतावादी असण्यातून बायपास केला जात असेल तर त्याच एक प्रमुख कारण स्त्रीवादाबद्दल असलेला द्वेष आहे. आणि हा द्वेष‘केवळ स्त्री आहे म्हणून त्यांना उगाचच झुकते माप देऊ नये, त्या पात्र असतील तरच त्यांचा विचार करण्यात यावा’ अशा पद्धतीच्या ‘विशेष सवलत’ विरोधी भूमिकांतूनही तो दिसून येतो. त्यामुळे स्वत:ला स्त्रीवादी न मानण्यामध्ये, पुरुष स्त्रीवादी असतात असं म्हणण्यामध्ये, आणि स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते असा अपप्रचार करण्यामध्ये स्त्रीवादाबद्दल अजिबात आकलन नसणं, स्त्रिया कायद्याचा गैरवापर करुन पुरुषांनाच छळतात ह्या अपप्रचाराचे बळी असणे अशी कारणं आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय याबद्दल इथे अधिक सविस्तर मांडलं जाणं आवश्यक आहे.

अॅड. एकनाथ ढोकळे
अॅड.ढोकळे हे मानवी हक्क कार्यकर्ते असून ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात.
स्त्रीवादाचे अभ्यासक आहेत आणि अनेक प्रशिक्षण शिबिरांमधून लिंगभाव ह्या विषयावर मार्गदर्शन. समाजमाध्यमांत नियमित लिखाण. 'पितृसत्ता विरोधी पुरुष' या अभ्यासगटाच्या स्थापनेत आणि कामात महत्वाचं योगदान.