आपल्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ कसे चित्र असावे – हयाबद्दल आम्ही अनेक दिवस चर्चा करीत होतो. स्त्रियांशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आधारीत अनेक फोटो आणि चित्रे पाहून अखेर प्रतिभा वाघ या चित्रकर्तीचे हे प्रसन्न चित्र आम्ही निवडले.
या चित्राचे शीर्षक आहे “निवांत”!
चित्राची रचना भारतीय लघुचित्र शैली आणि मधुबनी चित्रशैलीच्या जवळ जाणारी असल्यामुळे हे चित्र काहीसे पारंपरिक वाटते. पण चित्राचा आशय मात्र आम्हाला पारंपरिकतेला छेद देणारा वाटला. कारण पारंपरिक चित्रांमधल्या साचेबंद चित्रणापेक्षा हे चित्र काही वेगळा आशय मांडते आहे. भारतीय चित्रशैलीमध्ये बहुसंख्य वेळा स्त्रीयांचे चित्रण एकतर प्रेमिका म्हणून केले जाते किंवा पाणी भरण्यासारख्या कामात गुंतलेल्या स्त्रीया जेव्हा दिसतात, तेव्हादेखील त्यांच्या शरीराच्या अवयवांचे कामुकतेकडे झुकणारे चित्रण केलेले असते.
पण प्रतिभा वाघ यांच्या ह्या चित्रातल्या बायका मात्र –‘निवांत’ आहेत! प्रत्यक्ष आयुष्यात बायकांच्या वाट्याला असे निवांत क्षण क्वचितच येतात. म्हणूनच घरच्या अंगणात शांतपणे सारिपाट खेळत रमलेल्या ह्या बायका जास्त आवडल्या. त्यांच्या रंगीत ओढण्या, त्यातून तयार होणारे वक्राकार आणि ओढण्यांच्या वरची बारीक, नाजुक नक्षी यामुळे चित्राला प्रसन्नता आली आहे. जगातल्या सगळ्या स्त्रियांना असा हक्काचा निवांतपणा मिळायला हवा !
चित्रकर्ती विषयी
चित्रकार प्रतिभा वाघ मुंबईतील रहेजा कला महाविद्यालयातून प्राध्यापकपदावरून निवृत्त झाल्यापासून सध्या निवांत आयुष्याचा आनंद घेत आहेत. त्यांना अखिल भारतीय पातळीवरच्या कालिदास पुरस्काराशिवाय राज्य सरकारचे आणि बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया सारख्या अनेक संस्थाचेही कला पुरस्कार मिळालेले आहेत. देशात आणि परदेशात त्यांनी अनेक चित्रप्रदर्शने झालेली आहेत. विविध पारंपरिक चित्रशैलींचा अभ्यास आणि उपयोग करण्यात त्यांना विशेष रस आहे. ‘चित्रकथी’ह्या लोककलेच्या अभ्यासासाठी त्यांना सांस्कृतिक खात्याची शिष्यवृत्ती मिळाली होती.
Tags
चित्र
आशयघन चित्र!!👍
ReplyDelete