“पुन्हा स्त्री उवाच” चा पहिला अंक वाचकांच्या समोर ठेवताना अतिशय आनंद होत आहे!
गेल्या वर्षभरापासून ह्या अंकाच्या स्वरूपाविषयी मी अनेक मित्रमैत्रिणींशी चर्चा करत होते. पण मुळात ह्या अंकाची कल्पना मनात आली त्याला निमित्त ठरला माझाच एक लेख! ‘दिव्य मराठी’ दैनिकाच्या एका विशेषांकासाठी सत्तरी पार केलेल्या आणि अजूनही कार्यरत असलेल्या माझ्या काही ज्येष्ठ स्त्रीवादी मैत्रिणींच्या विषयी मी हा लेख लिहिला होता. त्या निमित्ताने विद्या बाळ, छाया दातार, मीना देवल, उर्मिला पवार अशा सगळ्यांच्या सोबत बोलताना त्यांनी ऐंशी – नव्वदच्या दशकात ‘स्त्री उवाच’प्रकाशनाच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणी निघत गेल्या. खरंतर त्या दिवसांमध्ये मीदेखील त्यांच्यासोबत काम केलेले आहे आणि त्यातूनच मला अनेक स्त्रीवादी संकल्पना शिकायला मिळालेल्या होत्या. पण पुन्हा एकदा त्या काळातल्या घडामोडींकडे मागे वळून पाहताना मला ह्या सगळ्याजणींच्या कामाचं महत्त्व जास्तच जाणवत गेलं. अगदी तसंच त्या लेखाच्या वाचकांना देखील जाणवलं असणार! त्यामुळेच त्या लेखाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांनी दाखवली. आजच्या पिढीतल्या अनेक अभ्यासकांना ‘स्त्री उवाच’ प्रकाशन गटाविषयी काहीच माहिती नव्हती – असंही त्यातून लक्षात आलं!
‘स्त्रीउवाच’ गटाने निर्माण केलेली पुस्तकं आणि दरवर्षी 8 मार्चला प्रकाशित होणारे वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक अंक हा महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी चळवळीचा एक महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे. या गटाने ‘स्वतःला शोधतांना’,‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, ‘पुरुषकेंद्री’ ‘कायदा- स्त्रियांसाठी नुसता वायदा’ इ. सहा पुस्तकं प्रकाशित केली होती. ‘स्वतःला शोधतांना’ या पुस्तकाचा समावेश एसएनडीटी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही झाला होता. याशिवाय दर आठ मार्चला एक वार्षिक अंक प्रकाशित करण्यात येत असे. त्यात स्त्रियांच्या विविध प्रश्नांच्या ऊहापोह करणारे लेख, कथा, कविता असत. एखाद्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद हादेखील अंकाचं महत्त्वाचा भाग असायचा. राजकारण, विज्ञान, साहित्य आणि विविध सामाजिक चळवळी असे वेगवेगळे विषय या अंकातून हाताळले गेले. ह्या पुस्तकांच्या आणि वार्षिकाच्या माध्यमातून मांडले गेलेले विचार आजही समर्पक आहेत. पण ह्या सगळ्या कामांच्या आणि त्यामागच्या वैचारिक प्रक्रियेच्या तपशीलवार नोंदी मात्र झालेल्या नाहीत. म्हणून ह्या विचारधनाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी - ‘स्त्री उवाच’ गटाची एक सदस्य म्हणून माझ्या परीने प्रयत्न करायचे असं मी ठरवलं आणि ‘पुन्हा स्त्रीउवाच’ ही कल्पना आकाराला येत गेली.
‘स्त्री उवाच’वार्षिकाचा शेवटचा अंक 8 मार्च 1994 या दिवशी प्रकाशित झाला होता; त्या घटनेला 8 मार्च 2019 रोजी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत – त्यानिमित्ताने ‘स्त्रीउवाच’ गटाच्या कामाविषयीचे डॉक्युमेंटेशन डिजिटल रूपात समोर आणायची कल्पना मी काही मैत्रिणींना बोलून दाखवली. स्त्रीउवाच गटाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वार्षिक स्त्री उवाच’च्या धर्तीवर ‘पुन्हा स्त्री उवाच’ ह्या नावाने सारखा एक डिजिटल अंक तयार करावा अशी सुरुवातीची कल्पना होती. अनेक दिवस मी त्याविषयी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी बोलत होते, त्यांच्या सूचना आणि अपेक्षा समजून घेत होते. स्त्रीवादी चळवळीशी जोडलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर अभ्यास करणार्या आणि लिहू शकणार्या लोकांचा शोध घेत होते. माझी ही कल्पना सर्वांनाच आवडत होती आणि अनेक लोक अंकात लिहायला तयार होते, अनेक नवनव्या विषयांची भर पडत होती. अंकाच्या एका भागात ‘स्त्री उवाच’ गटातल्या मैत्रिणींच्या मुलाखती, दुसर्या भागात ‘वार्षिक स्त्री उवाच’ मधील पुनर्मुद्रीत लेख आणि तिसर्या भागात सध्या स्त्रीवादी विचारांनी काम करणार्या व्यक्ति आणि संस्थांचे अनुभव - असा एक ढोबळ साचा मनात होता.
गेल्या दोन-तीन महिन्यात अंकाच्या प्रत्यक्ष कामांना वेग येत गेला आणि खर्या अर्थाने त्याचा आवाका जाणवायला लागला. एखाद्या ब्लॉगच्या रूपात एकदाच हा अंक प्रकाशित करण्यापेक्षा वार्षिकांच्या माध्यमातून प्रकाशित झालेले साहित्य, अंकांच्या संपादिकांच्या मुलाखती आणि सध्याच्या काळात स्त्रीवादी विचार करणार्यांचे लेख – असा सगळा ऐवज टप्प्याटप्प्याने मांडावा लागेल – असे लक्षात आले. म्हणून ह्या कामासाठी वेबसाइटच्या माध्यमाची निवड केली. ह्या वेबसाइटचे तीन मुख्य विभाग आहेत. वेबसाईटच्या ‘पुनर्भेट’ ह्या विभागात ‘वार्षिक स्त्री उवाच’ च्या अंकातले पूर्वप्रकाशित लेख आपल्याला वाचता येतील. ह्या विभागात देखील विविध विषयांवरच्या लेखांची सतत भर पडत राहणार आहे. एका भागात व्हिडिओ आहेत आणि सध्या ‘स्त्री उवाच’गटातल्या संस्थापक संपादक मैत्रिणींच्या मुलाखती तिथे बघता येतील. ह्या विभागातही कथा, कविता, लेख यांच्या सादरीकरणाची वेळोवेळी भर पडत राहणार आहे. वेबसाईटचा तिसरा भाग आहे - ‘पुन्हा स्त्री उवाच’ हा ब्लॉग ! ह्या विभागात सध्या स्त्रीवादी विचारांनी काम करणार्या व्यक्ति आणि संस्थांचे अनुभव तर असतीलच पण त्याखेरीज स्त्रीवादी मुद्द्यांशी जोडलेले - कथा, कविता, कार्टून्स, चित्रे – अशा विविध प्रकारचे साहित्यदेखील असणार आहे. दर तीन महिन्यांनी हा ब्लॉग एका डिजिटल अंकाच्या रूपात अपडेट केला जाईल. पहिल्या अंकात सध्याच्या काळात स्त्रीयांसमोर असलेल्या वेगवेगळ्या आव्हानांचा वेध घेणारे ताज्या दमाच्या स्त्रीवादी लेखकांचे लेख आहेत. स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मराठीतून मांडण्यासाठी ह्या वेबसाइटची निर्मिती केलेली असली तरी देशभरात होणारे प्रयत्न आणि त्यामागचा विचार वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी हिन्दी आणि इंग्लिशमधून लिहिणार्या मंडळींच्या लेखनाचाही समावेश अंकात केलेला आहे. अहिल्या अंकात दोन लेख हिंदीत आणि तीन लेख इंग्लिशमध्ये आहेत. ह्या ब्लॉगमध्ये प्रकाशित होणारे नवे लेख आणि ‘पुनर्भेट’ विभागातले काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले लेख यांच्या विषयांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य ठेवायचा प्रयत्न जाणीवपूरवका केलेला आहे.
‘पुन्हा स्त्री उवाच’च्या पहिल्या अंकांमधून स्त्रीवादी विचारांची मांडणी करताना - ‘स्त्रीवाद’ ह्या संकल्पनेविषयी सध्या जनमानसात असलेल्या मतांचा शोध घेण्याची आम्हाला गरज वाटली. म्हणून आम्ही एक लहानसा सर्व्हे केला होता. त्याचे विश्लेषण ‘तुमच्या आमच्या मनातला स्त्रीवाद’ ह्या लेखात वाचायला मिळेल. ह्या लेखासोबत ‘पुनर्भेट’ विभागातला छाया दातार यांनी 1987 साली लिहिलेला ‘आम्ही स्त्रीमुक्ती वाल्या’ हा लेख जरूर पडताळून बघा.
‘पुन्हा स्त्री उवाच’च्या पहिल्या अंकात प्रसारमाध्यमांचा निरनिराळ्या अंगाने वेध घेणारे दोन लेख आहेत. मुक्ता चैतन्य यांनी सामाजिक माध्यमांवर वावरणाऱ्या स्त्रियांना वास्तवात मुस्कटदाबीचा जो अनुभव येतो तोच अनुभव या आभासी जगातही कसा येतो हे उदाहरणं देऊन दाखवलं आहे. सिनेमाच्या माध्यमात निराळ्या लैंगिकतेच्या व्यक्तींचे चित्रण कसे केले जाते त्याविषयी संदेश कुडतरकरने लिहिलेला लेख वाचताना आपोआप स्त्रियांच्या चित्रणाविषयीची तुलना मनात तयार होत जाईल.
अजूनही पुरूषांचे वर्चस्व असलेल्या वास्तुकला या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या समोरची आव्हानं शीतल पाटील यांनी समोर मांडली आहेत तर कुमारीबाई जमकातन यांच्या लेखात जातपंचायतीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, कायदा-अभ्यास प्रक्रिया सातत्याने चालू असल्याने आदीवासी महिलांचे संपत्तीचे अधिकार मिळवून देणं, शिक्षणविषयक विचारप्रणालीमध्ये बदल घडवून मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढवणं असे बदल कसे घडत आहेत याची मांडणी केली आहे. शुभदा देशमुख यांनी गडचिरोलीतील रोजंदारीवर काम करणाऱ्या लाकूड कामगार महिलांची मानसिकता कशी हळूहळू बदलत आहे याचा वेध घेतला आहे. आशालता कांबळे यांनी आंबेडकरी स्त्रीचळवळ आणि स्त्रीमुक्ती चळवळ यांचं आपसातलं नातं उलगडून दाखवतांना भगिनीभाव असला तरी दोन्ही चळवळीतले जे अंतर आहे त्याची कारणं विशद केली आहेत.
स्त्रियांच्या संदर्भातल्या कायद्यांविषयी अनुभव मांडणारे तीन लेख ह्या अंकात आहेत. रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांनी गर्भलिंगनिदान विरोधी चळवळ आणि आनुषंगिक कायदा ह्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. सुमेधा रायकर-म्हात्रे यांनी मुस्लीम पर्सनललॉ ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या पहिल्या मुस्लीम महिला शहनाझ शेख यांची मुलाखत घेतली आहे. अर्चना मोरे यांनी लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि बलात्कार याविरोधातील कायद्यासाठीची लढाई विविध घटना, खटले यांचा संदर्भ देत चित्रित केली आहे.
डॉ. सुचित्रा काळे-दळवी यांनी सुरक्षित गर्भपाताकडे स्त्रियांच्या एका हक्काच्या दृष्टीकोणातून बघण्याची गरज विषद केली आहे. दीप्रा दांडेकर यांच्या लेखात पितृसत्ता आणि तिच्यामधून येणारा हिंसाचार यामुळे बायकांच्या मानसिक आरोग्यावर होणारे याचे विश्लेषण केलं आहे.
अंकात दोन हिन्दी लेक आहेत. मध्य प्रदेशात ग्रामपंचायतींमध्ये स्त्रीयांना आरक्षण मिळाल्यानंतर झालेल्या बर्या -वाईट बदलांचा आढावा नीती दिवाण यांनी घेतलाय आणि दिल्लीत काम करणार्या सतीश कुमार सिंग यांनी लिंगभाव समानतेसाठी पुरूषांचा सामील करून घेण्याच्या कामटले अनुभव मांडले आहेत.
ह्या सगळ्या लेखकांनी अंकासाठी विनमोबदला लेखन केलेले आहे. त्यासोबत वेबसाईटचा लोगो डिझाईन करणारे सिद्धेश शिरसेकर आणि मुखपृष्ठावरील चित्रासाठी प्रतिभा वाघ ह्यांनीही मोबदला घेतलेला नाही. लेखांसाठी वापरलेल्या फोटोंचे स्वामित्व हक्क त्या त्या वेबसाईट कडे आहेत. ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आज हा अंक वेळेवर तयार होऊ शकला आहे. तरी अंकात राहिलेल्या काही त्रुटींविषयी मनात थोडी रुखरुख आहे.
ह्या अंकासाठी अनेक लेखकांचे लिखाण उशिराने पोचल्यामुळे त्यावर संपादकीय प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांचा अंकात समावेश होऊ शकलेला नाही. शिवाय व्यावसायिक ग्राफिक डिझायनरच्या मदतीवाचून अंक तयार केल्याने तो फारसा नेत्रसुखद झालेला नाही. ह्या अंकात वैचारिक लेखांवरच मोठ्या प्रमाणात भर दिला गेल्याने ललित साहित्याच्या विभागात फक्त एकच कथा देता आली आहे. पण ही कमतरता पुढच्या अंकांमध्ये नक्की भरून निघेल याची मला खात्री आहे. इतर अनेक नव्या मुद्द्यांवरचे वैविध्यपूर्ण साहित्य पुढच्या अंकातून आम्ही घेऊन येत राहू. सध्या हा पहिला अंक वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा आम्हाला कळवा!
प्रत्येक लेखाच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्सच्या भागात लिहता येतील किंवा संपर्क ह्या विभागातल्या फॉर्मचादेखील त्यासाठी उपयोग करता येईल. हा अंक आणि ही वेबसाइटदेखील समाजशास्त्राच्या आणि स्त्रीवादाच्या अभ्यासकांना उपयोगी ठरावी अशी मनापासून इच्छा आहे! म्हणून अंकाची आणि वेबसाईटची लिंक जास्तीजास्त लोकांशी शेअर करा.
यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या साथीने साजरा करू या!