'उंबरठा' चित्रपटातलं 'चांद मातला मातला' ऐकलं की मन एका वेगळ्याच विश्वात जातं. १९९६ साली दीपा मेहतांच्या 'फायर' चित्रपटातल्या समलिंगी संबंधांच्या संदर्भांवरून गदारोळ होण्याच्या पूर्वीच १९८२ साली आलेल्या 'उंबरठा'मधल्या या गाण्याला लेस्बियन नातेसंबंधांचा सूचक स्पर्श आहे. फेसबुकवरच्या एका पोस्टवर अलीकडेच एका मित्राने 'बधाई हो' चित्रपटात एक गे मुलगा स्त्रैण हावभाव करत नाचत असतो, हे दृश्य विनोदनिर्मितीसाठी वापरल्याने त्याच्या भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना माझा मित्र अभय साळवी म्हणाला होता की, चित्रपट म्हणजे शेवटी काय? समाजमनाचा आरसाच ना? प्रत्यक्षात ते दृश्य विनोदनिर्मितीसाठी नव्हतंच, तर आजच्या समाजाचं वास्तव दाखवण्यासाठी तो प्रसंग वापरला होता. त्यावरही लोक हसत असतील, तर ही गोष्ट आपल्या निर्ढावलेल्या समाजमनाचीच निदर्शक आहे. म्हणजे चित्रपट विचारांनी समृद्ध होतोय, पण समाज अजूनही पूर्वी होता तिथेच अडकून आहे.
तरीही समाजातल्या बदलांचा चित्रपटांवर पडणारा प्रभाव पाहायचा झाला तर भारतातील क्वीअर चळवळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एलजीबीटी समुदायावर अन्याय करणाऱ्या कायद्यात बदल करण्यासाठी भारतात जसजशी क्वीअर चळवळ जोर धरू लागली तसतसा चित्रपटांतील अशा व्यक्तिरेखांना आणि चित्रणाला होणारा विरोधही मावळत गेलेला दिसतो. 'फायर'च्या वेळी झालेल्या गदारोळाची पुनरावृत्ती झालेली दिसत नाही, हेच या चळवळींचं यश म्हणावं लागेल. जयंत चेरियन दिग्दर्शित 'Ka Bodyscapes' या २०१६ सालच्या मल्याळम चित्रपटाने वादंग निर्माण केला होता. सगळ्यांत मोठा विरोधाभास म्हणजे या चित्रपटातील व्यक्तींच्या कथांपैकी एक कथा हॅरिस नावाच्या एका गे चित्रकाराची होती जो विष्णू या आपल्याच मित्राची - एका गावातल्या कबड्डीपटूची - न्यूड पेंटिंग्ज काढतो आणि त्यांचं प्रदर्शन भरवतो. सनातनी लोक त्या प्रदर्शनाची होळी करतात. या चित्रपटांतल्या काही दृश्यांवरून वाद झाल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र विरोध चित्रपटातील नग्नतेला नव्हता, तर काही तथाकथित धर्मरक्षकांना या चित्रपटातील हिंदू देवतांचं चित्रण रुचलं नाही, याबद्दल होता.
सांगायचा मुद्दा हा की, १९८२ साली गाण्यांच्या ओळींतून जे सूचकपणे मांडलं जात होतं, ते आता निदान चित्रपटांतून तरी उघडपणे बोललं जात आहे. या एवढ्या मोठ्या कालखंडात एलजीबीटी समुदायाने कित्येक बदल पाहिले. कायदे बदलले, ते पुन्हा उलट्या दिशेनेही वाटचाल करू लागले, त्यानंतर पुन्हा समतेवर आधारित समाजाची निर्मिती इच्छिणाऱ्या अनेक घटकांनी विरोध केला आणि अलीकडेच ६ सप्टेंबर, २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. कलम ३७७ या अन्यायकारक कायद्यातून एलजीबीटी समूहाला वगळत यापुढे परस्पर संमतीने झालेले समलैंगिक संबंध गुन्हा म्हणून गणले जाणार नाहीत, असा तो निर्णय होता. या मधल्या काळात आणि अजूनही विविध कलाकृतींतून, विविध माध्यमांतून एलजीबीटी समुदायाचं चित्रण होण्याचे बरेच प्रयत्न झाले, होत आहेत. चित्रपटांचे विषयही या कालखंडात केवळ समाजाकडून होणारा विरोध अशा वरवर उघडपणे दिसणाऱ्या समस्यांपासून व्यक्तिरेखांच्या स्वतःच्या स्वीकाराच्या आणि अंतर्विरोधाच्या प्रवासावर भाष्य करण्यापर्यंत बदलत गेले आहेत.
१९९६ साली आलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित 'दायरा' या चित्रपटात एक क्रॉसड्रेसर नर्तक आणि पुरुषांच्या वेषात वावरणारी एक बलात्कारित स्त्री यांच्या नाजूक नातेसंबंधांची कथा होती. रूढार्थाने एलजीबीटी समुदायाविषयी भाष्य नसलं, तरी प्रस्थापित लिंगभावाच्या चौकटी मोडण्याचा या चित्रपटाने नक्कीच प्रयत्न केला होता. निर्मल पांडे आणि सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या व्यक्तिरेखांना न्याय दिला होता. त्यानंतर १९९७ साली आलेल्या कल्पना लाजमी दिग्दर्शित 'दर्मियाँ' या चित्रपटात तृतीयपंथीयांच्या अस्तित्त्वाचे प्रश्न फार पुसटपणे हाताळले गेले होते. चाळीसच्या दशकातील एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या पोटी जन्माला येणारं मूल हिजडा म्हणून जन्माला येतं, तेव्हा तिची कशी फरफट होते, अशी साधारण कथा. आरिफ झकेरियाने केलेली तृतीयपंथीयाची भूमिका वगळता या चित्रपटाने केवळ तृतीयपंथीयांच्या जगण्याच्या प्रश्नांवर भाष्य करण्यापलीकडे फारशी मजल मारली नाही.
ट्रान्सजेण्डर किंवा तृतीयपंथी समुदायाचे चित्रण अजूनही भारतीय चित्रपटांत गांभीर्याने होत असलेले दिसत नाही. गल्लाभरू विनोदनिर्मितीसाठी मात्र त्यांचं चित्रण करण्यात चित्रपटसृष्टी कुठेच मागे राहिलेली दिसत नाही. 'बॉम्बे'सारख्या एखाद्या चित्रपटातल्या एखाद्या लहानशा दृश्याचा अपवाद वगळता तृतीयपंथीयांचा माणूस म्हणून विचार करण्यात जसा समाज अजून पिछाडीवर आहे, त्याचप्रमाणे माध्यमंही. आपल्याला 'मोरूची मावशी' चालते, 'अशी ही बनवाबनवी' चालतो, ज्यात पुरुषांनी गरज किंवा नाईलाज म्हणून साड्या नेसलेल्या चालतात, पण क्रॉसड्रेसर्स चालत नाहीत. तृतीयपंथीयांचा विचार तर दूरच. 'बॉम्बे टॉकीज'सारख्या एखाद्या चित्रपटात झोया अख्तरसारखी धाडसी दिग्दर्शिका मुलींसारखे कपडे घालून नाचण्याची आवड असलेल्या एका लहान मुलाची कथा सांगून स्टीरिओटाईप्स मोडू पाहते. निशांत रॉय बोम्बार्डेसारखा तरुण दिग्दर्शक 'दारवठा'सारख्या लघुपटातून एका टीनेजरच्या मनातील गोंधळ, त्याची नाचगाण्याची आवड, मुलांबद्दलचं सुप्त लैंगिक आकर्षण अशा सगळ्या केऑसचा वेध घेऊ पाहतो. पण हे एवढंच.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २०११ साली भारतात प्रदर्शित झालेल्या 'बोल' या पाकिस्तानी चित्रपटाने मात्र तृतीयपंथीयांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर नेमकं आणि जळजळीत भाष्य केलं होतं. मूळ कथा होती एका सात मुलींच्या बापाची, ज्याला त्या मुलींनंतर मुलगा होतो, पण तो 'इंटरसेक्स' म्हणून जन्माला आलेला. त्याची लाज वाटून तो बाप त्या मुलाची तो झोपला असताना प्लॅस्टिकच्या पिशवीने त्याचा श्वास कोंडून ज्या थंडपणे हत्या करतो, ते दृश्य फार बोलकं होतं. तृतीयपंथीयांचं अस्तित्त्वच कसं नाकारलं जातं, ते भेदकपणे मांडणारं होतं. आपले चित्रपट मात्र अजूनही बॉबी डार्लिंगवर एखादा चीप सीन लिहून गल्ला भरण्यात मग्न आहेत.
तरीही एलजीबीटी समुदायातील इतर घटकांचं चित्रण मात्र चित्रपटांतून वेळोवेळी होत आलं आहे आणि काळानुसार त्यात बदलही होत गेले आहेत. गे आणि लेस्बियन थीम्सवरील चित्रपटांच्या संख्येचा तुलनात्मक विचार केला की एक गोष्ट अगदी सहज जाणवते की गे थीम्सवर आधारित चित्रपटांची संख्या जास्त आहे.
लेस्बियन थीम्सवर आधारित चित्रपट त्यामानाने फार कमी. हे चित्रही समाजाचंच प्रतिबिंब म्हणावं लागेल. जिथे आज बरेचसे गे पुरुष आऊट होताना दिसतात, तिथे लेस्बियन स्त्रियांची संख्या मात्र नगण्यच असल्याचे आढळून येते. म्हणजे एका अर्थी पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त बंधने इथेही असल्याचाच हा पुरावा आहे.२०१४ साली आलेल्या अभिषेक चौबे दिग्दर्शित 'देढ इश्किया' या चित्रपटात लेस्बियन नातेसंबंधांचा एक अंडरकरंट होता. बेगम पारा आणि मुनिया या दोघी शेवटी एकत्र राहू लागतात, या दृश्यातून सूचकपणे आणि अतिशय शांतपणे दोन स्त्रियांचं नातं अधोरेखित करण्यात आलं होतं. अपंग व्यक्तींच्या लैंगिकतेचा. लैंगिक भावनांचा एक अत्यंत नाजूक प्रश्न कसलेही उपदेशाचे डोस न पाजता 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या २०१४च्याच चित्रपटातून मांडण्यात आला होता. लेस्बियन संबंधांतलं दुःख, उत्कटता आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न हे सगळं या चित्रपटाने अतिशय संयतपणे आणि कलात्मकरीत्या दाखवलं. कल्की कोएचलीन आणि सयानी गुप्ता या दोघींनी अनुक्रमे बायसेक्शुअल आणि लेस्बियन व्यक्तींचं चित्रण करताना आपल्या अभिनयाने आपापल्या भूमिकांत रंग भरले होते. कुठलंही नातं यशस्वी करायचं असेल तर आधी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, हे हा चित्रपट अगदी सहजपणे सांगून जातो. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'अँग्री इंडियन गॉडेसेस' या चित्रपटातही एक लेस्बियन कपल दाखवण्यात आलं होतं.२०१५ सालच्या 'बायोस्कोप' या मराठी चित्रपटातील एका कथेत तर लेस्बियन नातेसंबंधांचा अतिशय वास्तववादी धांडोळा घेण्यात आला होता. 'मित्रा' हा तो लघुपट. या अशा काही मोजक्याच लेस्बियन चित्रपटांची यादी डोळ्यासमोर तरळते. २०१९ साली येऊ घातलेल्या 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट नव्या बदलांची नांदी ठरेल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.
क्वीअर चळवळींशी जोडलेले लोक किंवा स्वतःला एलजीबीटी समुदायातील मानणारे लेखक, दिग्दर्शक जेव्हा माध्यमांतून एलजीबीटी समुदायाचे प्रश्न मांडतात, तेव्हा ते अधिक वास्तववादी झाल्याचं दिसतं. इतर दिग्दर्शकांच्या प्रयत्नांना कमी लेखण्याचा मुद्दा नाही, पण 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे', असं जे म्हणतात, ते या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून, कलाकृतींतून ठळकपणे जाणवतं. उदाहरणादाखल ओनीर, श्रीधर रंगायन आणि करण जोहर यांच्या चित्रपटांकडे पाहता येईल.
२००५ साली आलेल्या 'माय ब्रदर निखिल' या चित्रपटातून ओनीर या संवेदनशील दिग्दर्शकाने एका एचआयव्हीग्रस्त समलैंगिक जलतरणपटूची कथा सांगितली होती. त्याला त्याची बहीण आणि प्रियकर कसे समजून घेतात, याचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात होतं. संजय सुरी, जूही चावला आणि पूरब कोहली यांच्या उत्तम अभिनयामुळे चित्रपट भिडला. त्यानंतर २०११ साली पुन्हा 'I Am' चित्रपटातील एका कथेतून ओनीरने गे विश्वाची काळी बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. राहुल बोसने या कथेत समलिंगी पुरुषाची भूमिका साकारली होती. पैशासाठी गे पुरुषांच्या लैंगिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना कसं ब्लॅकमेल केलं जातं, याचं अंगावर येणारं चित्रण या कथेत होतं.
श्रीधर रंगायन यांच्या 'युअर्स इमोशनली' आणि '68 पेजेस' या चित्रपटांतूनही एलजीबीटी समुदायाच्या नेमक्या समस्यांवर भाष्य केलं गेलं आहे. 'युअर्स इमोशनली' या चित्रपटात समाजाच्या दबावामुळे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाने मुलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुसऱ्याची कशी वाताहत होते, याची कथा होती. तर '68 पेजेस' या चित्रपटात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या चार व्यक्तींच्या चार विभिन्न कथा होत्या. त्यात एका ट्रान्ससेक्शुअल बार डान्सरचीही कथा होती आणि दुसऱ्या एका कथेत आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहूनही तो मात्र एकनिष्ठ नसल्याने त्याला होणारा एचआयव्ही संसर्ग आणि त्यामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या एका गे तरुणाचं चित्रण होतं. वरवर सुखी वाटणाऱ्या समलिंगी जोडप्यांच्या जीवघेण्या समस्या त्या कथेतून मांडण्यात आल्या होत्या.

नायकाची प्रतिमा अल्ट्रा मस्क्युलाइन दाखवण्याकडे पूर्वीच्या चित्रपटांचा कल होता. हिरो एकाच वेळी चारपाच जणांना एकट्याने लोळवतोय वगैरे दृश्य त्याच्या हिरोगिरीचं प्रतीक मानलं जात असे. त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटीचं चित्रण करताना भडक मेकअप, बायकी हावभाव यातून ते अधिकाधिक स्त्रैण, हास्यास्पद आणि वैचित्र्यपूर्ण दाखवण्यात येई. काळ बदलला त्याप्रमाणे पौरुषाच्या, स्त्रीत्वाच्या आणि एकूणच लैंगिकतेच्या संकल्पनाही बदलत गेल्या आणि व्यक्तिरेखांचं अधिकाधिक संयमित आणि वास्तववादी चित्रण करण्याकडे दिग्दर्शक लक्ष देऊ लागले.
शकुन बात्रा दिग्दर्शित 'कपूर अँड सन्स'मधल्या समलिंगी व्यक्तिरेखेने बरेच स्टिरिओटाईप्स यशस्वीपणे मोडले. फवाद खानने या चित्रपटात समलिंगी तरुणाची भूमिका साकारली होती. तो उंदराला घाबरतो. त्याला कार चालवता येत नाही वगैरे. समलिंगी व्यक्तींचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी त्याला बायकी हावभाव आणि भडक मेकअपचं साहाय्य घ्यावं लागलेलं नाही.
२०१६ सालच्या 'अलीगढ'मध्ये मनोज वाजपेयीने साकारलेला प्राध्यापक सिराज ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक ठरावी. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट हंसल मेहतासारख्या हुशार दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिल्यानेच त्यातले गांभीर्य टिकून राहिले. समलिंगी प्राध्यापकाची ही भूमिका मनोज अक्षरशः जगलाय. समलिंगी व्यक्ती इतर माणसांसारख्याच असतात, हेच त्याने आपल्या अभिनयातून ठसवले आहे. 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे गाणे एका प्रसंगात चपखल बसले आहे. मनोजने गायलेले 'मी मज हरपून बसले गं' तर अप्रतिम. समलिंगी आकर्षणाची नेमकी नस या गाण्याने पकडली आहे.
मेनस्ट्रीम चित्रपटांमधील एलजीबीटी समुदायाचं चित्रण आणि इतर माध्यमांतील चित्रण यात काही फरक मुख्यत्वाने आढळतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 'Diversity and Inclusion' या ध्येयांतर्गत स्त्रियांना गरोदरपणात मिळणारी सुट्टी, एलजीबीटी समुदायाचे हक्क, अपंगांचे प्रश्न आणि या सर्व घटकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान वागणूक मिळण्याची हमी, या गोष्टींवर काम केले जाते. मुख्य धारेतील चित्रपटांचा विचार करता बऱ्याचदा एलजीबीटी समुदायाचं चित्रण हे केवळ अशाच पद्धतीने 'आम्ही तुमचाही विचार करत आहोत' हे दाखवण्यासाठी केलं जातं की काय, असं दिसतं. त्यामुळे अशा व्यक्तिरेखा पूर्वी फक्त सहाय्यक भूमिकांमध्ये दिसायच्या. अलीकडे हे चित्र फार मोठ्या प्रमाणावर बदलत चाललं आहे. चित्रपटाच्या कथेचा विषय हाच एखाद्या गे किंवा लेस्बियन व्यक्तिरेखेच्या आयुष्यातला स्ट्रगल, त्याचे इतरांशी असलेले नातेसंबंध, अल्पसंख्य असल्यामुळे त्या नातेसंबंधांवर होणारा परिणाम, असा आहे, हे चित्र अलीकडे मेनस्ट्रीम चित्रपटात थोड्याफार प्रमाणात का होईना दिसू लागले आहे. पण इतर माध्यमांतून हा विषय मध्यवर्ती कथावस्तू म्हणून अधिक प्रभावीपणे मांडला जातोय. इतर माध्यमांत मिळणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा प्रयोगशीलतेसाठी ती माध्यमं जास्त सोयीस्कर वाटणं, हे त्यामागचं एक कारण असू शकेल.
लघुपटासारख्या सशक्त माध्यमांतून गेल्या काही वर्षांत एलजीबीटी समुदायाचे प्रश्न मांडणारे अनेक विषय नवे दिग्दर्शक हाताळत आहेत. 'दारवठा'प्रमाणेच गाजलेली फराज अरिफ अन्सारी या तरुण दिग्दर्शकाची 'सिसक' ही पहिली गे थीमड सायलेंट फिल्म. ट्रेनच्या एकाच डब्यातून रोज एकाच वेळी प्रवास करणारे दोन तरुण, त्यांच्यात फुलणाऱ्या हळुवार भावना, समाजाच्या भीतीने त्यांनी एकमेकांकडे त्या व्यक्त न करणं, हे सगळं केवळ अभिनयाच्या आणि पार्श्वसंगीताच्या जोरावर हा लघुपट नेमकेपणाने मांडतो. गणेश मतकरी यांच्या 'शॉट' या लघुपटातही एक अतिशय नाजूक विषय खूप संवेदनशीलतेने मांडण्यात आला होता. दोन अभिनेत्रींचं चुंबनदृश्य आणि त्यातल्या एकीला दुसऱ्या अभिनेत्रीविषयी प्रत्यक्षात वाटणारं आकर्षण आणि त्यामुळे तिच्या मनाची होणारी घालमेल फार तरलपणे या लघुपटाने पडद्यावर साकारली होती.

या सर्व चित्रपटांचा, कलाकृतींचा गोषवारा पाहिला की सहज लक्षात येतं की फार पूर्वीपासून एलजीबीटी समुदायाचं चित्रण माध्यमांतून होत आहे. पण त्याचं स्वरूप फार सकारात्मक पद्धतीने एवढ्या वर्षांत बदलत गेलं आहे. पूर्वी केवळ गल्ला भरण्यासाठी आणि उथळ विनोदनिर्मितीसाठी ज्या पात्रांचा शब्दशः 'वापर' माध्यमांत व्हायचा, त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहण्याची, त्यांचे गुणदोष आहेत तशा खऱ्या स्वरूपात मांडण्याची संवेदनशीलता आजच्या पिढीचे अनेक हुशार दिग्दर्शक आणि कलाकार बाळगून आहेत, हे चित्र निश्चितच आशादायी आहे. एलजीबीटी विषयाकडे अजूनही फिल्ममधला एक वेगळा जॉनर म्हणून पाहिले जाते. पण अलीकडे होणारी अभिरुचीसंपन्न निर्मिती पाहता जेव्हा असा वेगळा जॉनर नसेल आणि एलजीबीटी समुदायाचे प्रश्नही केवळ नातेसंबंधांचे प्रश्न किंवा माणसांचे प्रश्न म्हणून पाहिले जातील, तो दिवस फार दूर नाही.
संदेश कुडतरकर
एका आय.टी. कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत असून लेखन, चित्रपट, नाटके पाहणे हे त्याचे छंद आहेत. त्याचे लेख अक्षरनामा, पाहावे मनाचे या वेब पोर्टल्सवर आणि लोकसत्ता, लोकमत या दैनिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
msgsandesa@gmail.com