सुपरवुमन


“ती स्वतःला काय सुपरवुमन समजतेय की काय? नोबडी इज अ सुपरवुमन.” हेमा तणतणत नलिनीला सांगत होती, नलिनीही मान डोलवत होती. ती जवळून जात असलेली पाहिल्यावर दोघीही गप्प झाल्या. नवी जबाबदारी अंगावर पडल्यापासून जवळपास बारा बारा तास ती काम करत होती. शिवाय घरची जबाबदारीही टाळता येत नव्हती. सकाळी साडेचारला उठून स्वैंपाकपाणी करून पळत पळत ऑफिस गाठावं लागत होतं. वर भाजी नीट करून, चिरणं, कापणं, पीठ मळणं अशी कामं करून द्यायला बाई कामावर ठेवल्याने नवऱ्याचीही कुरकुर चालूच होती उगाचच पैसे जाताहेत म्हणून. पदोन्नती झाल्यापासून पगार वाढला असला तरी इतका वेळ काम केल्याने मिळणारा प्रवासभत्ता, जेवणाचा भत्ता ती घेत नव्हती, म्हणून तिकडे तिच्या सहकाऱ्यांचीही नाराजी ओढवली होती ती वेगळीच. ते स्वतः जरी भत्ते घेत असले तरी तिचं उदाहरण दिलं जात होतं ना. शिवाय घराकडे दुर्लक्ष करते असंही म्हणता येत नव्हतं कारण ती घरी पोचल्यावर मुलांचा अभ्यास घेत होती. तरीही ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबण्यावरून टोमणे मिळतच होते. परवा अरूणा मुद्दाम मोठ्यामोठ्याने अनूला सांगत होती, “आम्हाला बाबा पाच वाजले की घर दिसायला लागतं. इथे थांबून उगाच बॉसला आपण सिन्सियर आहोत असं दाखवण्यात आपल्याला काडीचाही रस नाही.” “हो ना, संध्याकाळचा स्वैंपाक, मुलांचा अभ्यास काय काय करायचं असतं गं आपल्याला.” अनू हे कुणाला ऐकवलं जातंय हे न उमगताच प्रामाणिकपणे मान डोलवत म्हणत होती. “नाही गं, मला कुठं मूलबाळ झालंय अजून, शिवाय नवऱ्याला सांगून ठेवलंय, तिथे जे शिजवशील ते घरी आणायचं, मी करत बसणार नाही. केटरिंगचा व्यवसाय असलेला नवरा केला कशाला मग? पण इथं थांबून काय दिवे लावायचेत. बाईने वेळेवर घरी जावं ते बरं.” 

रात्री नऊ सोळाची लोकल पकडून विभा चालली होती. गाडी भराभर स्थानकं मागे टाकत पळत होती. विभाचं मात्र हातातल्या पुस्तकात लक्ष लागत नव्हतं. का करतोय आपण ही ऊरस्फोड धडपड. लहानपणी काम चांगलं केलं की आई म्हणायची, “शाणी माजी बाय ती, घोवाघरी जाय ती.” मग शाणी म्हणून घेण्यासाठी ती अधिकच काम करत रहायची. आपण नेहमीच ती शाणी मुलगी बनण्याची धडपड करत रहातोय का काय? किती दिवसात आपल्या मनाजोगं काही केलं नाही. कुठे फिरायला गेलो नाही, चित्र काढली नाहीत, कविता लिहिली नाही. घाण्याला जुंपलेल्या बैलासारख्या घोवाघरी नांदत राह्यलोय.

त्या दिवशी क्लोजिंगचं काम आटोपता आटोपता साडेनऊ वाजले. खरं तर तिला रोजच तेवढे वाजत. पण बाकीच्यांनाही थांबायला लागलं होतं ना त्या दिवशी. काम नीट आटोपलं का बघायला जीएमसाहेबही आले होते. मग त्यांच्या कारने ते सर्वांना सोडायला चर्चगेटपर्यंत आले. साहेबांनी तिच्यासाठी बाजूचा दरवाजा उघडून आपल्या शेजारची जागा दिली. तेव्हा इतरांमध्ये झालेली नेत्रपल्लवी तिच्या नजरेतून काही सुटली नाही. आपण ही गाडी कधी घेतली. तो कसा आपला आवडता मेक आहे असं सगळं सर तिला सांगत होते. मध्येच कारेकर खाकरला, “सर, गाडी चांगलीय. पण मेन्टेन करायला जरा कटकट आहे. त्यापेक्षा आपल्या जुन्या मेकच्या गाड्या चांगल्या होत्या….” त्याची टकळी चालूच होती. तेवढ्यात चर्चगेट आलं. दिवटे म्हणालाच उतरल्यावर मुद्दाम मोठ्याने “चला बुवा, कुणामुळे का होईना साहेबाच्या गाडीने सुखात आलो.पण आपली अडचण नाही ना झाली कुणाला. असेल तर सॉरी बरं का.”

तिला आता सवय झाली होती या प्रकाराची. या विभागात ती नवी होती तेव्हा तिला काम समजवायला, मदत करायला सगळे धडपडत. तशी ती चेहऱ्याने फार जन्मजात बावळट आणि बिचारी वाटत असे. पण लवकरच त्यांना उमगलं की ती फार लवकर सगळं आत्मसात करतेय. मग तिला खाली खेचण्याची धडपड सुरू झाली. तिच्या चमूतल्या लोकांचे तिच्या विरोधात कान भरणं सुरू झालं. लहाने तर लगेच बळी पडला त्याला. पण रागिणी तशी स्वतः विचार करणारी, निरीक्षण करणारी होती. सुरूवातीला ती थोडी बिथरल्यासारखी वागत होती खरी, पण तिच्या हा डाव लवकर लक्षात आला. त्यामुळे त्या दोघी एकत्र छान काम करायला लागल्या. रागिणीच्या बारीकसारीक तपशील ध्यानात घेऊन चोख काम करायच्या पद्धतीमुळे तिला आदर वाटत असे रागिणीबद्दल. आणि ती ज्या प्रकारे या सगळ्याला फक्त आपल्या कामाने, प्रामाणिकपणाने उत्तर देत होती त्यामुळे रागिणीलाही तिच्याविषयी आदर होता. एकदा एका कंपनीच्या लेखापालाला तिने भेटीची वेळ दिली होती. तो जरा आधीच येऊन बसला. त्याने कृष्णनला विचारलं मॅडम कुठेयत, तर कृष्णन म्हणाला “अरे मालूम नही, खाना खाने गया है शायद, पता नही कब आयेगा, आप क्यूँ टाइम बरबाद करते हो, कल आओ.” नशिबाने ती रागिणीला सांगून गेली होती. तिने त्या लेखापालाला सांगितलं, “मॅडमनी दीड वाजता बोलवलंय ना तुम्हाला. मग बरोबर दीडला येतील. आमच्या मॅडम एकदम वेळ पाळणाऱ्या आहेत बरं का. थांबा तुम्ही.”

तिच्या या वेळ पाळण्याच्या गुणामुळेच तर ती वाचली त्या दिवशी. नवे जीएम आल्यावर कृष्णनला बोलावून त्यांनी प्रत्येकाने त्यांना येऊन भेटायची वेळ सांगितली. तिला कृष्णन म्हणाला, “साबने तीन बजे बुलाया है आप को. मगर जरा लेट जाना, उन को पता होना चाहिए हम लोग कितना काम करते है.” ती मात्र सवयीनुसार बरोबर तीनच्या ठोक्याला गेली. सोबत आपल्या कामाची सगळी आकडेवारी, नोंदणीबुकं घेऊन. बोलता बोलता ध्यानात आलं की कुणीतरी त्यांचा आपल्याबद्दल गैरसमज करून दिलाय आपण मनमानी करतो, अहंमन्य आहोत, काम धड करत नाही असा. पण तिच्या वेळेवर जाण्याने अर्धी बाजी जिंकली होती आणि उरलेली अर्धी लढाई तिने दिलेल्या माहितीने. पण तरीही बरेच दिवस तिच्या नकळत साहेब तिच्या कामावर बारीक नजर ठेवून होते. नंतर तिला कळलं की कृष्णन आणि त्याचे मित्र मात्र वेळेवर साहेबांकडे गेले होते. तिच्या बाबतीत खेळला गेलेला डाव कांबळेच्या बाबतीतही खेळला गेला होता. पण तोही या लोकांना ओळखून असल्याने वाचला. हे सगळं घडत असलं तरी ती हे सगळं मागे टाकून आपलं काम निष्ठेने करत राहिली.

पण तिला हे सगळं सलत राहिलं कुठेतरी. आपण चांगलं काम करतो, तर यांचं काय जातं. स्वतः करा ना मग काम. चकाट्या पिटायला हव्यात न काय. सगळेच तसे नसले तरी काम करणाऱ्या माणसाच्या मार्गात खोडा घालणारेच अधिक. तिची सारखी चीडचीड होत राही घरी. मग मुलंही वैतागत. हल्ली घरात कार्यालयातल्या राजकारणावर बोलणंही सोडून दिलं होतं तिनं. नवरा ऐकल्याचं नाटक करीत हं हं करीत असे. पण त्यालाही त्यात काही रस नव्हता. मुलांचा तर प्रश्नच नाही.

ती सरस्वती मॅमना रिपोर्ट करीत असे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या विभागातली ती एकटीच बाई. त्यांच्याशी तिचंही चांगलं जमत असे. पण गुडघेदुखीमुळे त्यांच्या हल्ली वरचेवर रजा वाढायला लागल्या होत्या. त्यामुळेच या मंडळींचं फावलं होतं.

तिच्या कामाचं संगणकीकरण करून घ्यायची संधि मिळाल्यावर तिला फार बरं वाटलं होतं. काहीतरी करायला मिळेल यासाठी ती आनंदली होती. याच्या आधीही तिने अशा प्रकारचं काम केलं होतं. पण त्याचं श्रेय मात्र तिच्या तेव्हाच्या बॉसला मिळालं होतं. आताही असंच घडेल कदाचित, पण त्याहीपेक्षा संगणीकीकरणामुळे तिचं काम वेगाने होणार होतं. ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार होता शिवाय त्यामुळे तिला घरी वेळेवर जाता आलं असतं. म्हणून कंबर कसून ती कामाला लागली. आपलं रोजचं काम सांभाळून आयटी अधिकाऱ्याच्या सोबत ती बराच वेळ घालवू लागली. तिच्या कामाशी संबंधित वेगवेगळे तपशील, बारकावे त्याला पुरवत सॉफ्टवेअर निर्दोष व्हावं यासाठी ती दिवसरात्र एक करायला लागली. रात्री झोपतांनाही तिला मध्येच काहीतरी आठवे. दुसऱ्या दिवशी आयटी अधिकाऱ्याला सांगण्यासाठी तो मुद्दा ती नोंदवून ठेवीत असे. या सगळ्या काळात ती हे सगळं राजकारण, दुखणीखुपणी विसरून गेली होती. शेवटी तो दिवस उजाडला. सॉफ्टवेअर कसं काम करतंय ते पाहिलं गेलं. ते अगदी निर्दोष झालं होतं. आयटी अधिकाऱ्याबरोबर तिचीही स्तुती झाली. विषय संपला, असं तिला वाटलं. पण मग ते सॉफ्टवेअर कसं वापरायचं याचं प्रशिक्षण तिने सर्वांना द्यायचं ठरलं आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झालं. मधल्या काळात सरस्वती मॅमची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्या कामावर रूजू झाल्या होत्या. तिच्यामुळेच जीएम साहेबांनी त्यांना मेमो दिला असं त्यांच्या मनात भरवून देण्यात मंडळी यशस्वी झाली होती. त्यामुळे पूर्वी फार प्रेमाने तिला शिकवणाऱ्या, तिला आधार देणाऱ्या मॅम आता तुटक वागायला लागल्या. ही कोण मोठी प्रशिक्षण देणारी असं त्यांनाही वाटू लागलं. दिवसा सर्वांनी आपलं काम पुरं करून मग संध्याकाळी थांबून प्रशिक्षण घ्यायचं ठरल्यावर तर कहरच झाला. लहानेने नुकतीच अधिकारीपदासाठी लेखी परीक्षा दिली होती. तेव्हा त्याचं काम स्वतःवर घेऊन तिने त्याला अभ्यासासाठी वेळ दिला होता. आपल्याकडे असलेलं आणि अधिकचं साहित्य अभ्यासासाठी पुरवलं होतं. आता लहाने अधिकारी होऊन त्यांच्याच विभागात होता. उशिरा थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी द्यायची होती. पहिल्याच दिवशी लहानेने तिची नोंदवही फेकून दिली. काय प्रकार घडला ते साहेबांना न सांगता तिने या कामातून मोकळं करायची विनंती केली. ती मान्य करण्याऐवजी त्यांनी इतरांनाच धारेवर धरलं. घडला प्रकार कुणीतरी त्यांना सांगितला होता. त्यांनी लहानेला माफी मागायला सांगितली. मग तिच्या टेबलाजवळ येऊन उद्धट स्वरात तो म्हणाला, “साहेबाने सांगितलंय म्हणून सॉरी बोलतो.” मग सगळेजण मॅमना पटवून काहीतरी कामं काढून निघून गेले. बैस तू रिकाम्या टेबलांना प्रशिक्षण देत असा विनोद आपसात टाळ्या देऊन करीत एकेक करून सगळे गेले. तिला कधी नाही ते रडू कोसळलं. तेवढ्यात टेबलावरचा इंटरकॉम वाजला. समोरून पटेल बोलत होता. पटेल तिच्याच विभागात होता. त्यालाही या लोकांच्या राजकारणाला, गटबाजीला तोंड द्यावं लागत होतं. पटेल म्हणत होता, “अरे तू रो क्यूँ रही है? उन को तो वही चाहिए ना. तू रडणार ते लोग खूष होणार. पयला रोनाधोना बंद कर. अबी रोने का नय रूलानेका” कुणाला रडवायचा स्वभाव नसला तरी रडायचं नाही एवढं मात्र तिला पटलं.

सरस्वती मॅमनाही हे परवडणारं नव्हतं. शिवाय विभागातले दोघे तिघे आणि रागिणी तिच्या बाजूचे होते. त्यामुळे हळूहळू प्रशिक्षण झालं. आणि मग मात्र ती एका कोपऱ्यात बसून आपलं काम शांतपणे करायला मोकळी झाली. घरीही वेळेवर जाता यायला लागलं. आणि मग जरा वातावरण निवळलं.

अचानक जीएमची बदली झाली. दुसऱ्या दिवशी मॅमनी तिला बोलावलं. एक प्लास्टिक फोल्डर समोर आपटला. तिने काय आहे ते पाहिलं. जायच्या आधी जीएमनी एका नोटमध्ये दोन तीन ओळीत तिने चांगलं काम केल्याबद्दल कौतुक केलं होतं. त्यावर सीजीएमने शेरा मारला होता – आय अग्री, शी हॅज डन अ कमेंडेबल जॉब. तिला भरून आलं. बरं वाटलं. तितक्यात मॅमचा आवाज कानावर पडला, “ये ले, इस का जोबी पिकल डालना है, डाल दे.” त्या तिच्या अप्रेजल रिपोर्टमध्ये हे स्वतःहून लिहिणार नव्हत्या हे उघडच होतं. ठीक आहे, पण किमान कुणीतरी तिचं कौतुक केलं होतं हेही नसे थोडके.

पण तरीही तिला रडू आलं. यशस्वीपणे दाबून ठेवलं तिने ते. कधीही आपल्याला आपलं श्रेय का मिळत नाही. यावेळी जीएम सरांनी कौतुक केलं पण मॅमनी ते ठेवलंच गुंडाळून. आपलं काय चुकतंय? कुठं चुकतंय? मागे प्रशिक्षणाच्या वेळी जोशी सरांनी तिला सांगितलं होतं ते आठवलं. आपल्याकडे फक्त टॅलंट असून भागत नाही. स्वतःचं मार्केटिंग करता यायला हवं. कसं करायचं स्वतःचं मार्केटिंग?

तिच्या पाठीवर जोरदार थाप आणि त्यापाठोपाठ “काय म्हणतेयस? अगं मी बदली होऊन तुझ्या सेक्शनला आलेय. काही स्वागतबिगत करशील की नाही?” असा तिच्या जिवलग मैत्रीणीचा रूपालीचा गडगडाट कानावर पडला. तिला इतका आनंद झाला की इतक्या महिन्यांनंतर का होईना तिच्यासोबत जीवाभावाचं कुणीतरी होतं. भरीला भर म्हणून सरस्वती मॅमच्या जागी आलेल्या फर्नांडिस मॅमही त्यांच्यात मिसळून गेल्या आणि तिघींचा एक गट झाला. सेक्शनमधल्या कारवायाही त्यामुळे थंडावल्या. दिवस चांगले जाऊ लागले. तिघी एकत्र जेवायला जात. जमलं तर एकत्र निघत. घरी वेळेवर जाता येई त्यामुळे घरातलं वातावरणही छान होतं. मुलांना वेळ देता येत होता. सगळं कसं छान चाललं होतं.

“अगं विभा, रोज ना कुणीतरी माझ्या टेबलावरची पाण्याची बाटली भरून ठेवतंय. कळत नाही कोण करतंय?” रूपाली सांगत होती. “काहीही हं. तुला ना उगाच शंका येतात. आपला कँटीनवाला तंबी करत असेल न् काय. हा बघ आलाच. ए तंबी, मॅडमची बाटली भरून नको ठेवत जाऊस बाबा.” “मेरेकू इतना टैम किदर है म्याडम, नही तो मै आप का बोटलबी बरके रखता ना.” मग कामाची गडबड सुरू झाली आणि ते तेवढ्यावरच राहिलं.

दोन दिवसांनी रूपाली सांगायला लागली, “अगं, मला ना ब्लँक कॉल्स येताहेत. समोरून कुणीच बोलत नाही.” “अगं आपल्या टेलिफोन लाईन्स खराब आहेत. परवाच विजू सांगत होती. त्यातलाच काही प्रकार असेल. घाबरू नको.” “नाही गं. रोज मी पोचले सेक्शनला की दहा मिनिटांनी फोन येतो. रोज. न चुकता. आणि ना गेले काही दिवस यादव माझ्या मागे मागे असतो मी घरी निघाले की.” मग मात्र विभाच्या मनात पाल चुकचुकायला लागली. दोघी मिळून फर्नांडीस मॅमला सांगायला गेल्या. त्यांचं म्हणणं पडलं की रोज तिघी बरोबर बाहेर पडू आणि बघू काही दिवस. मग जरा दोघींना धीर आला.

ठरल्याप्रमाणे तिघी एकत्र निघायला लागल्यावर रूपालीची शंका खरी असल्याचं त्यांनाही वाटायला लागलं. त्या कधीही निघाल्या तरी यादव आपला मागोमाग. एक दिवस तर फोनवर बोललाही. “तुम्ही आवडता मॅडम आपल्याला.” त्याचा आवाज ओळखला रूपालीने. आता मात्र सेक्शुअल हरॅसमेंटची केस करायचं ठरलं. पण नुसतंच कुणी पाठलाग करतं, पाण्याची बाटली भरतं, ब्लँक कॉल करतं म्हणून केस करता येईल का असाही प्रश्न पडला. पण इकडे रूपालीचा धीर सुटत चालला होता. तिला एकटीने बाहेर पडायलाही भीती वाटत होती. काहीतरी करणं भाग होतं. एका कार्यकर्त्या मैत्रीणीला विभाने विचारलं. ती म्हणाली नक्कीच केस करता येईल. हे सगळं त्यात मोडतं. मग केस दाखल केली.

काही दिवसांनी विभाला लिगल विभागात अधिकारी असलेल्या मित्राने भेटायला बोलावलं. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर त्यांनी जरा चाचरतच केसचा विषय काढला, “नाही म्हणजे काय आहे ना मॅम की तुम्ही यात पडलात म्हणजे काही शंका घ्यायला वाव नाही. पण खात्री आहे ना? कसंय की एका माणसाच्या आयुष्याचा प्रश्नंय. त्याच्या कुटुंबाचा प्रश्नंय. तो रस्त्यावर येईल मॅम. विचार करा.”

“अहो, हा काय फक्त रूपालीच्या मागे लागलाय असं वाटतं का तुम्हाला? त्या वंदनाच्या मागोमाग भाईंदरपर्यंत जात होता रोज. ती तर त्याच्या मुलीच्या वयाची. तिच्या काकाने बदडून काढला त्याला. पण जित्याची खोड जाते थोडीच. आता रूपालीच्या मागे लागलाय. अहो आपल्या ऑफिसातल्या बायकाच नाही, हे शेजारच्या इमारतीतलं ऑफिस आहे ना तिथल्याही एका बाईच्या मागे लागला होता. इथे नोकरी मिळवून देतो म्हणत होता तिला. तिच्या घरच्यांना कळलं, मग त्यांनीही झोडलं त्याला. पण साहेब धडा घेतील तर ना!”

“असंय होय! तरी मी म्हटलंच मॅम उगाच असं काही करणार नाहीत. बघतो मी काय करायचं ते.”

तरी यादवचा बचाव करण्यासाठी इतरांचे प्रयत्न चालू होतेच. आधी एका मुलीला त्रास दिला होता ती कशी स्वतःच यादवला जेवण आणायला पाठवत असे, मग मुली अशा वागतात म्हणून असं होतं वगैरे. एक दिवस दिवटे तिला आणि रूपालीला ऐकायला जाईल अशा प्रकारे कांबळेला सांगत होता, “अरे त्या यादवची बायको म्हणे केसमध्ये साक्ष द्यायला जाणाऱ्या बायांना मारणार आहे असं ऐकलंय.” वेगवेगळ्या ठिकाणाहून दडपणं येऊनही केस मांडली गेली. विभाने आणि फर्नांडीस मॅमने साक्ष दिली. पण यादवचं आयुष्य वगैरे उध्वस्त न होता तो मामुली वेतनकपातीची शिक्षा होऊन सुटला.

तिला वाटलंच होतं असं होणार म्हणून. कशासाठी लढत रहायचं मग? हे असे पुरूष करूनसवरून मोकळे रहाणार. रूपालीला केवढा मानसिक त्रास झाला होता या सगळ्यात. शिवाय सुरूवातीला साथ देणाऱ्या नवऱ्याने नंतर तिलाच दोष दिला होता की तुझ्यातच काहीतरी खोड आहे, नाहीतर कशाला तुझ्या मागे लागतात पुरूष म्हणून. काय अर्थ आहे या सगळ्याला. नकोसं झालंय अगदी. दूर कुठेतरी पळून जावं या सगळ्यापासून असं वाटायला लागलंय.

अलीकडे तिला फार दमल्यासारखं होत होतं. काहीच करावसं वाटत नव्हतं. सारखं झोपून रहावं वाटे. ती फार जाड होत चालली होती. चेहराही सुजला होता. रात्री आडवं झालं की श्वासही घेता येईना. कधी नव्हे ते तिने दांड्या मारायला सुरूवात केली. रोज उठलं की तिला वाटे आज जाऊच नये. पूर्वीसारखं पहाटे उठून स्वैंपाकपाणी न करता ती उशिरापर्यंत झोपून राहू लागली. एक दिवस धाडकन आवाज झाल्यावर ती झोपेतून जागी झाली. बाहेर येऊन पाहिलं तर मुलं तर सकाळीच गेली होती शाळेत. नाश्ता, डबा न मिळाल्याने दरवाजा आपटून रागारागाने लिफ्टमध्ये शिरणारा नवरा दिसला. घरात वळली तर स्वैंपाकघरात सगळा पसारा, सांडलवंड झालेली, कपडे अस्ताव्यस्त पडलेले.

त्या दिवशी ती आपल्या सगळ्या तपासण्या करून आली. हायपोथॉयरॉईडचं निदान झालं होतं. डॉक्टरांनी दिलासा दिला की गोळ्या सुरू केल्यावर फरक पडेल. पण तेवढ्यात तिची गुडघेदुखी सुरू झाली. एक पाऊलही टाकता येईना. कशीबशी पेनकिलर घेऊन ती रोजची कामं उरकून ऑफिसला गेली.

“अरे बाबा सोप्पं नसतं सुपरवुमन होणं. काही लोकांना वाटतं तसं. पण फार उड्या मारायला गेलं की पडायला होणारच.” कोण म्हणतंय तेही तिने वळून पाहिलं नाही. तिला काहीच ऐकू येत नव्हतं. तिला फक्त बंद काचांआडचा काळोख जाणवत होता.


शुभांगी थोरात


कवी, अनुवादक ( हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश), निवृत्त बँक अधिकारी. विविध नियतकालिकांमधून लेख, कविता, अनुवादित लेख प्रसिद्ध.

thorat.shubha@gmail.com

                  

1 Comments

  1. It has become allpervasive and rampant..good story indeed !!!

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form