स्त्रीवादी चळवळीशी आंबेडकरी चळवळीचं असलेलं नातं

इ.स.१९७५ हे वर्ष संपूर्ण जगभरातच स्त्रीमुक्ती चळवळीला गती देणारं वर्ष म्हणून मान्यता पावलं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि या वर्षापासून सुरू झालेला ८ मार्च स्त्रीमुक्ती दिन म्हणून युनोने जागतिक पातळीवर स्त्रीमुक्ती चळवळीला मोठ्या प्रमाणात गती दिली. जगभरातील स्त्रियांचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवणाऱ्या या चळवळीने भारतात मोठी जागृती घडवण्याचं काम केलं. भारतातील उच्चशिक्षित स्त्रियांवर या चळवळीचा मोठा प्रभाव पडला आणि त्यांनीही या देशातील त्यांच्या हक्कांविषयी बोलायला सुरुवात केली. शारदा साठे, ज्योती म्हापसेकर,छाया दातार अशी नावे या संदर्भात पुढे आली. संपूर्ण महाराष्ट्रात तर यांच्या स्त्रीमुक्ती संघटनेने विशेष दौरे आयोजित करून जनजागृतीला सुरुवात केली. १९८० च्या दशकात या चळवळीच्या झंझावाताने सार्‍या समाजाला खडबडून जागं व्हायला भाग पाडलं. प्रचारदौरे, पथनाट्यं, लघुनाट्यं, गीतं यांच्या माध्यमातून ही जागृती प्रामुख्याने होत होती. या संघटनेचं मुखपृष्ठ असलेलं ‘प्रेरक ललकारी’ मासिक याचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. स्त्रीचळवळीला वाहून घेतलेलं दुसरं एक महत्वाचं त्रेमासिक म्हणजे ‘मिळून साऱ्याजणी’ विद्या बाळ यांनी सुरू केलेल्या या मासिकाचाही स्त्रीचळवळीला अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. ज्योती म्हापसेकर यांच्या ‘मुलगी झाली हो’ या पथनाट्याने स्त्रियांच्या प्रश्नांना खूप वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर आणलं. या काळात हुंडाविरोधी चळवळ खूप प्रभावीपणे लोकांसमोर आणायला या नाटकाने हातभार लावला. देश-विदेशात या नाटकाला खूप लोकप्रियता मिळाली. अनेक तरुण-तरुणींनी ‘हुंडा देणार नाही’ अशा शपथा घेतल्या. महाविद्यालयीन तरुण तरुणींच्यामध्ये तर याविषयावर खूपच जागृती आली आणि सारा देश या चळवळीने ढवळून काढला.

आंबेडकरी चळवळ या काळात स्वतंत्रपणे नजरेस पडत नव्हती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकूणच आंबेडकरी चळवळीने जागृत झालेली १९५६ नंतरची पहिली पिढी. दुसऱ्या पिढीची तरुणाई पँथरच्या झंझावाताने विद्रोह जागवण्यात गुंतलेली होती आणि यात पुरुषांच्या बरोबरीने प्रत्यक्ष नसल्या तरी अप्रत्यक्षपणे स्त्रियादेखील सहभागी होत्या. याच दशकात सुरू झालेला मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न कितीतरी चिघळला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषत: मराठवाडात या प्रश्नाला घेऊन आंबेडकरी समाजावर सवर्णानी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार केले. या अत्याचारांत आंबेडकरी स्त्रियांवर बलात्कार करणे, त्यांची नग्न धिंड काढणे यासारखे उभ्या स्त्रीजातीला लज्जास्पद वाटतील असे प्रकारही केले गेले. अशा वेळी आंबेडकरी स्त्रियांवरील अत्याचारांना घेऊन लढणारी संघटना ‘दलित पँथर’ हीच होती. त्यामुळे एकूणच आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होणे हे आपलं कर्तव्य मानलं. गावोगावी किंवा शहरांमध्ये किंवा अगदी या दशकातील ‘रिडल्स’ प्रकरणात मुंबईत निघालेला भला मोठा मोर्चा या साऱ्यांमध्ये आंबेडकरी स्त्रियांचा सहभागही खूप मोठ्या प्रमाणावर होता. आंबेडकरी पुरुषांना आपला बंधू-सहकारी अशा स्वरूपात या स्त्रिया पाहत होत्या आणि त्यांच्याबरोबर आपणही राहणे हे आपल्या स्वाभिमानासाठी तसेच संरक्षणासाठी गरजेचे आहे असे त्यांना प्रकर्षाने वाटत होते. म्हणूनच या काळात स्वतंत्रपणे आंबेडकरी स्त्री चळवळीने वेग घेतलेला दिसत नाही.
दुसरं कारण म्हणजे या काळात आंबेडकरी स्त्रियांची उच्चशिक्षित पहिली पिढी जागृत होत होती. एकूणच आंबेडकरी समाजाचे जगण्याचे प्रश्नच इतके बिकट होते की ते सोडवण्यात गुंतलेल्या या स्त्रिया स्वतःच्या स्वतंत्र प्रश्नांबद्दल विचारच करू शकत नव्हत्या. त्यात ज्योती लांजेवार, कुमुद पावडे, ऊर्मिला पवार, मीनाक्षी मून, सुरेखा बनसोडे,हिरा बनसोडे यासारख्या पहिल्या पिढीतील शिकलेल्या आणि लिहूही लागलेल्या आंबेडकरी स्त्रियांचा उल्लेख करावा लागेल. साहित्यिक माध्यमाचा आधार घेऊन त्यांनी धार्मिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. देवकेंद्रीभूत असलेल्या या धर्माचा आधार घेऊन आम्हाला मंदिर प्रवेश नाकारला जातो, देवदासी मुरळ्या बनवलं जातं, आमच्यावर अत्याचार केले जातात. देव आणि धर्मही आम्ही नाकारतो अशा आशयाचं साहित्य या स्त्रियांकडून लिहिलं जाऊ लागलं. शांताबाई दाणी यांच्यासारख्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या या व्यतिरिक्त मंदिर सत्याग्रह किंवा भूमिहीनांचा लढा यात अधिक ताकद घालवावीशी वाटत लागली. उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून यांच्या “आम्हीही इतिहास घडवला” या ग्रंथातून आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाची स्पष्ट कल्पना येते. पण इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्त्रिया स्वतःला आंबेडकरी पुरुष चळवळीत जोडून घेत होत्या. १९७५ नंतर झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीत स्वतःला जोडून घेऊ इच्छित नव्हत्या. कारण या चळवळी त्यांचे धर्माधिष्ठित जातीय पातळीवरचे प्रश्न हाती घेतील याचा त्यांना विश्वास नव्हता.
असं असतानाही मुंबईत उर्मिला पवार, हिरा बनसोडे यांच्या सारख्या आंबेडकरी स्त्रियांनी चळवळीशी आपलं नातं बर्‍यापैकी जोडून घेतलं. स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात जेव्हा जेव्हा या संघटनेने आंदोलने छेडली, तेव्हा तेव्हा त्यात सहभागी होणे हे त्यांनी भगिनीभाव म्हणून आपलं कर्तव्य मानलं. कोकणातून मी देखील ‘प्रेरक ललकारीशी’ नातं जोडून होते. आंबेडकरी समाजाचे प्रश्न सोडवता नाही या स्त्रिया अर्थातच आंबेडकरी पुरुषांच्या बरोबरीने काम करीतच राहिला.
पुढच्या पिढीतील प्रज्ञा दया पवार सारख्या कार्यकर्त्या लेखिका-कवयित्रीने संपूर्ण जागतिक पातळीवरील स्त्रीमुक्ती चळवळीची आपलं नातं जोडलेला दिसतं. तिच्या कविता वैश्विक पातळीवरील स्त्री समस्यांचा वेध घेतात. तसंच एकूणच मानवी पातळीवर आपली लेखणी चालवतात. अलीकडेच शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्त्रियांच्या बाजूचा निकालही धर्माचे ठेकेदार उडवून लावतात आणि स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाकारतात, म्हणून केरळी स्त्रियांनी जे मानवी साखळी आंदोलन केलं, त्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील स्त्रियांच्या आंदोलनाचं नेतृत्व प्रज्ञा दया पवार यांनी केलं. 
आंबेडकरी स्त्रीचा मंदिर प्रवेशाशी तसा संबंध नसतानाही हा प्रश्न एकूणच स्त्रियांच्या अस्मितेचा अधिकाराचा आणि संविधानिक हक्काचा आहे. म्हणून प्रज्ञा पवार तसेच मी, उर्मिला पवार, उषा अंभोरे गायकवाड अशा कितीतरी आंबेडकरी स्त्रिया या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. म्हणजे आंबेडकरी स्त्रिया स्त्रीविषयक सर्वसमावेशक प्रश्नांना भिडणार्‍या संघटनांच्या आंदोलनात कर्तव्यभावनेने उडी घेतात. आपली बुद्धी,वेळ, ताकद खर्च करतात.
हा भगिनीभाव जरी काही ठराविक आंदोलनापुरता दृष्टीस पडला तरी संपूर्ण स्त्रीमुक्ती चळवळीत आंबेडकरी स्त्रीचळवळ स्वतःला मिसळून घेताना दिसत नाही. याची कारणमीमांसा करताना एक मुद्दा लक्षात येतो, तो म्हणजे या देशातील जातीव्यवस्थेने स्त्रियांनाही विभागले आहे. या विभागलेपणाने तात्त्विक मतभेदही पुढे आणले. ज्या धर्मव्यवस्थेने दलित स्त्रीला अवहेलना सोसायला भाग पाडलं, त्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करणाऱ्या फुले- आंबेडकरांना आंबेडकरी स्त्रीचळवळ आदर्श मानते. त्यांनी दिलेली मूल्ये प्रमाण मानते. अंधश्रद्धा, जातीय विषमता यापासून मुक्ती मिळवू पाहते. जातीच्या आधारावर निर्माण झालेल्या देवदासी आणि त्यातून पुढे त्यांना ज्या वेश्याव्यवसायात नाईलाजाने जावं लागलं, त्या वेश्याव्यवसाय संस्कृतीच्या रक्षणासाठी शूद्र स्त्रियांभोवती विणलेल्या काही धार्मिक रूढी यांच्या विरोधात आंबेडकरी स्त्रीचळवळ ठाम भूमिका घेते. अशीच ठाम भूमिका या प्रश्नावर स्त्रीमुक्ती चळवळीने घ्यावी अशी तिची अपेक्षा असते.
मात्र अनेकदा दलित स्त्रीवरील अत्याचाराच्या वेळी स्त्रीमुक्ती संघटना गप्प राहणे पसंत करते असं दिसतं. २००६ साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावी प्रियंका भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंबेडकरी स्त्री संघटना सोडून कोणत्याच स्त्रीवादी संघटना पुढे आल्या नव्हत्या. आंबेडकरी चळवळीला याचं वैषम्य वाटतं आणि मग आंबेडकरी स्त्रीचळवळीचं स्त्रीमुक्ती संघटनेशी असलेले नातं दुराव्याकडे वाटचाल करतं. स्त्रीवादी संघटनेतील स्त्रियांशी मैत्रीचे संबंध असतानाही या तात्त्विक मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या स्पष्ट भूमिकेतून आपल्या मैत्रिणींकडे व्यक्त होतात. उदाहरण म्हणून मला अलीकडच्या शबरीमला आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या साखळी आंदोलना मधील प्रसंग द्यावसा वाटतो. या आंदोलनामध्ये ज्योती म्हापसेकर, छाया दातार आणि ऊर्मिला पवार या मैत्रिणी अगदी हातात हात घालून एकत्र होत्या. मीही त्यांच्या सोबत होते चालता चालता उर्मिला ताई म्हणाल्या, “ही जी एकी दिसते स्त्रियांची आणि एकत्रित ताकद दिसते रस्त्यावर तशीच ताकद दलित स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रश्नांमध्ये सुद्धा दिसायला हवी. सर्व स्त्रियांनी रस्त्यावर आलेलं दिसायला हवं.”
आंबेडकरी चळवळीला स्त्रीमुक्ती संघटनेशी मैत्रीचं नातं जोडताना जे अडथळे आहेत ते अशा प्रकारचे आहेत. आंबेडकरी स्त्रीचळवळ बुद्धकाळातील थिअरीचा आदर्श मानते. स्त्रीत्वाच्या पलीकडे जाऊन माणूसपणाकडे वाटचाल करू इच्छिते. स्त्री आणि पुरुष हा भेद दूर करू पाहते. शिवाय सर्व पिचलेल्या वर्गाचा आवाज होऊ पाहते. त्यांच्या समस्यांना वरचं स्थान देऊ पाहते. स्त्री-मुक्ती चळवळीची नातं जोडताना इथेही विसंवाद होऊ शकेल अशी अनेकदा परिस्थिती अनेकदा उद्भवते. यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छिते. साधारण १९८७-८८ची घटना असेल. स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची सभा मालवणला आयोजित करण्यात आली होती. भारतातील स्त्रीमुक्ती चळवळ पुढे नेणारी संघटना म्हणून चहूबाजूंनी मान्यता मिळालेल्या या संघटनेच्या सभेला मालवणमधील सर्व पुरोगामी नागरिक हजर होते. मी माझ्या चार-दोन विद्यार्थ्यांना घेऊन हजर राहिले होते. तेव्हा मी मालवणच्या एका शाळेत नोकरी करत होते. सभेला सुरुवात झाली. मुंबईत जन्मलेल्या, शहरी वातावरणात वाढलेल्या मुली-बायका स्टेजवर उभे राहून या समस्यांविषयी बोलू लागल्या. स्त्री-पुरुष समानता, कुंकू-मंगळसूत्र, कामाची विभागणी या गोष्टी त्यात प्रामुख्याने होत्या. त्यांचं ऐकून झाल्यावर मी उभी राहिले आणि माझ्या अनुभवाविषयी बोलले. मालवण तालुक्यातल्या एका खेड्यात माझ्या गावी मी तेव्हा रहात असे आणि साने गुरुजी कथामाला, छात्रभारती अशा संघटनांची कामं करीत असे. या खेड्यात संघटना चालवताना आम्हाला कसा त्रास होतो, विशेषतः तरुण मुलींना लोकांच्या कुत्सित नजरांना सामोरं जावं लागतं, संघटनेत धीटपणे वावरताना तिच्या मोकळेपणामुळे किंवा घराच्या बाहेर पडल्यामुळे तिच्या चारित्र्यावर कसा संशय घेतला जातो, जीवन नकोसं केला जातो, पुरुष संस्कृतीचे मूळ विचार बदलण्याची कशी गरज आहे या सगळ्याविषयी मी बोलले. लगेच तिथे एक ब्राह्मणी मुलगी उभी राहिली. तिला मी उपस्थित केलेल्या मुद्यांचं गांभीर्य वाटत नव्हतं. खरेपणाही वाटत नव्हता. “मी कन्याकुमारीहून संघटनेच्या कामासाठी फिरून आले आहे. पण मला असा अनुभव आलेला नाही!” असं ती म्हणत होती. माझ्यासारख्या खेड्यातल्या आणि बहुजन समाजातील मुलीला या समस्या भेडसावत होत्या. त्या तिला भेडसावत नव्हत्या. तिथल्या मुरलीधर जावडेकर नावच्या प्राचार्यांनी माझा मुददा उचलून धरला. आणि स्टेजवरील स्त्रियांना अनेक प्रश्न विचारले. स्त्री-पुरुष समतेविषयीच्या त्यांच्या कल्पना आणि आमच्या कल्पना यात एकवाक्यता होत नव्हती. स्त्रीच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पनाही त्यांच्या आणि आमच्या भिन्नभिन्न वाटत होत्या. शेवटी तिथे ते प्राचार्य, मी, माझे विद्यार्थी आणि त्या स्त्रिया यांच्यात बाचाबाची झाली आणि ती सभा तिथे संपली. त्यांच्या एकांकिकेतील (मुलगी झाली हो) हुंड्याची समस्या आमच्या खेड्यातल्या मुलींना भावली नाही, कारण ती समस्या आमची नव्हतीच. कामाच्या विभागणीची, कुंकू मंगळसूत्राची समस्या ही आमची नव्हतीच. त्यामुळे ती आमच्या मनाला भिडली नाही. आमचे प्रश्न स्त्रीच्या मूलभूत गरजांविषयीचे होते. शिक्षण, माणुसकीचे विचार, समाजाच्या चारित्र्याविषयाच्या संकल्पनात मुलींचं गुदमरून जाणं, मुलीच्या व्यक्तिमत्त्वाची घुसमट, लहान वयात लग्नाच्या बंधनात जखडून टाकलं जाणं,उच्चवर्गीय स्त्रियांकडून तिला कमी लेखलं जाणं, खेड्यातील स्त्रीला मजुरीच्या कामाचा मोबदला पुरुषापेक्षा कमी मिळणं, या आणि इतर अनेक समस्यांशी आमचे प्रश्न निगडित होते. थोडक्यात, इथे स्त्रीमुक्ती संघटनेतील स्त्रिया आणि खेड्यापाड्यात काम करणाऱ्या माझ्यासारख्या आंबेडकरी समाजातील स्त्रिया यांच्यात नातं निर्माण होताना मुद्द्यांना धरूनच अडचणी निर्माण झाल्या. माझं नातं प्रेरक ललकारी पुरतं त्या काळात तरी सीमित राहिलं. संपूर्ण स्त्रीमुक्ती संघटनेत स्वतःला सामावून घेतलं नाही.
आज मुंबईसारख्या ठिकाणी राहून मी स्वतः काम करताना प्रामुख्याने लक्षात येतं की आंबेडकरांनी सांगितलेले सर्व मुद्दे त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. जातवर्चस्वाच्या मानसिकतेमधून जोपर्यंत स्त्रिया मुक्त होत नाहीत, थोडक्यात धार्मिक गुलामगिरीतून जोपर्यंत मुक्ती नाही, तोपर्यंत मानसिक पातळीवरील मैत्रभाव शक्य नाही. स्त्रीवादी संघटना प्रामुख्याने उचलत असलेल्या पुरुषसत्ताक वर्चस्वातून स्त्रीच्या गुलामीची मुक्तता करणे, या मुद्दयाशी आंबेडकरी चळवळही सहमत आहे. कारण तीही या गुलामीतून मुक्त नाही. या मुद्द्यावर त्यांचं स्त्रीमुक्ती चळवळीशी एकमत असू शकतं. पण धर्माधिष्ठित जात वर्चस्वातून आलेली जी विषमता आंबेडकरी स्त्रीच्या वाट्याला आलेली आहे त्यातून मुक्त होताना मात्र ती स्त्रीमुक्ती संघटनेपासून आपसूक दुरावते. यासाठी दोन्ही समूहातील स्त्रियांनी स्वतःला सर्व प्रकारच्या गंडातून मुक्त करणे गरजेचे आहे. एकमेकांतील संवादाने सुसंवादाकडे वाटचाल करत एकमेकींचा हात पकडणे ही खरी गरज आहे. संपूर्ण स्त्री चळवळ एकूणच मानवमुक्तीची चळवळ म्हणून उन्नत करणे हे दोन्ही समूहातील स्त्रीसाठी आवश्यक आहे. तोच तिच्या उन्नतीचा मार्ग आहे असं मला वाटतं.
या संदर्भात मला स्मृतीशेष डॉक्टर शर्मिला रेगे यांचे विचार व्यक्त करून हा लेख संपवावा असं वाटतं. कारण शर्मिला रेगे या स्पष्ट भूमिका घेणाऱ्या एक स्त्रीवादी कार्यकर्त्यां होत्या. त्यांचे विचार खरोखरीच चिंतन करण्यासारखे आहेत. त्या म्हणतात,“दलित स्त्रीवादी भूमिका जी अनुभवातून व चळवळीतून साकारली आहे, तिचं प्रतिबिंब दलित स्त्रीवादी विचारवंताच्या या कामांमध्ये निश्चित पडलेलं दिसतं. पण ही विचारधारा तेव्हाच भरभराटीला येईल जेव्हा ती मुख्य स्त्रीवादी विचारधारेपासून तुटून एकाकी न पडता, मुख्य स्त्रीवादी विचारवंताच्या आणि जाणिवेच्या नेणिवेच्या पातळीवर येईल. अशी स्त्रीवादी विचारवंत स्त्रियांना त्यांच्या इतिहासाकडे आणि सामाजिक संबंधाकडे डोळसपणे पाहण्याचे स्वशिक्षण देते. इतिहासाकडे डोळसपणे पहाणे आणि परस्पर संबंध स्त्रियांचं प्रबोधन करतील. परिघावरच्या दलित स्त्रिया स्त्रीवादी स्त्रियांच्या लढ्याकडे संवेदनशीलपणे पाहू शकतील. मुख्य प्रवाहातील स्त्रीवाद्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून हे परिवर्तन आम्ही आणि त्या, आमचे प्रश्न आणि त्यांचे प्रश्न अशा पातळीवर असणार नाहीत असे घडवावे. दलित स्त्रियांच्या निमित्ताने आम्ही स्वतःचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे असे पाहिले पाहिजे. मुख्य प्रवाहातील स्त्रीवाद्यांनी जर पुनरावलोकन करायची भूमिका घेतली तर ज्ञाती आधारित अनुभवविश्व आणि राजकारण यांच्यावरचे अवलंबित्व दलित स्त्रियांना टाळता येऊ शकेल. राजकारणाला चिकटून राहणे टाळता येऊ शकेल.”
शर्मिला रेगे यांच्या विचारांचा संदर्भ देऊन शेवटी मला इतकंच सांगावसं वाटतं की संपूर्ण जगभरात पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीचे दमन-शोषण केल्याचा इतिहास आहे. हा इतिहास जर आपल्याला बदलायचा असेल तर जात वर्ग अशा सर्वच थरातल्या स्त्रियांनी आपापले विभाजन टाळून एकसंघ होणं ही सशक्त चळवळीची गरज आहे. भारतात जात विभागणीतून आलेलं तुटलेपण एकत्र जोडण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. आपण सर्वजण यासाठी आशावादी राहायला काहीच हरकत नाही.
#ambedkarjayanti2022 #AmbedkarJayanti #feminism #ambedkarfeminism

डॉ. आशालता कांबळे

2016 साली पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली इथून सेवानिवृत्त. एकूण 10 पुस्तके प्रकाशित. अनेक विषयांवर संशोधनात्मक लेखन प्रसिद्ध. फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्वनिष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका-कवयित्री-समिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत.

1 Comments

  1. atishay uttam lekh. nemake muude ani sahaj vichar karayala lavanari likhan shaili.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form