पैसे बायांचे, चलती बँकांची!


एका स्वंय-सहाय गटातील महिलांनी मिळून बनविलेल्या महिला संघटनेची मिटिंग सुरु होती. वर्षभराच्या कामाचा आढावा आणि विविध विषयावर चर्चा करण्याचे ठरविले होते.
शालूबाई: ह्या वेळेस ग्रामसभेला लई बाया आल्या होत्या, सगळ्या गटातल्या, सरपंचाला अन ग्रामसेवकाला प्रश्न इचारून नुस्त परेशान करून सोडलं. महिलांच्या कार्यक्रमासाठी असलेल १०% बजेट, अपंगासाठी असलेल ५% बजेटच काय केलं? ह्याचा बी जाब विचारला बायांनी.
नंदाबाई: आवो ताई जात पंचायतमधी बाया बसायला लागल्यापासून बी लई बदल व्हयाला लागले, माझ्या पोरीच समदं ऐकून घेतलं बघा आता. निकाल बी तिच्यासारखाच लागंल.
मनुबाई: ताई गटांच कामच भारी, मला व्यावसायसाठी कर्ज दिलं, आज मी चांगलं पैसं कमावते आन घर बी चांगलं चाललंय बघा.
सगुणाबाई: ताई लई दिवस झालं मोर्चा नाही काढला, आता दुष्काळाच्या कामासाठी मोठा मोर्चा काढू एकदा, आजच तारीख ठरवू मनजी तयारी करता येईल.
गटाच्या माध्यमातून गावोगावी बाया उभ्या राहिल्या, पंचायत राज मधून राजकारणात आल्या, गावगाडा चालवू लागल्या आहेत. तसेच महिलांवर होणा-या हिंसाचाराबद्दल बोलायला लागल्या आहेत. घरातून बाहेर निघून इतर ठिकाणी जाऊन गटांचे काम पाहत आहेत, शिकत आहेत. विविध विचारपीठांवर आपलं म्हणणं मांडत आहेत. स्त्री मुक्तीची ललकारी गटाच्या माध्यमातून गावातील बायांपर्यंत पोहचली. चळवळीची गाणी घराघरात ऐकू येऊ लागली.
बदलत आहे जग हे सारं, नवा नगारा झडं गं 
बदल जगासंग तूही आता टाक एक पाउल पुढं 
बाया अनेक पावलं पुढं आल्या आहेत. गेली २५ वर्ष मी या क्षेत्रात काम करीत आहे. त्यांची प्रगती जवळून पहाते आहे. गटांचं हे यश पाहून शासन, बँका,फायनान्स कंपन्या यांनी पण याच्यात उडी घेतली. एका बाजूला सेल्फ हेल्प म्हणत असताना मागच्या दारातून काही अपप्रवृत्ती पण आल्या. आम्ही ही सगळी चर्चा करत असतानाच रागारागात पारूबाईची एन्ट्री झाली.
पारूबाई:  काय वं ताई सरकारनं, बँकेनं अन फायनान्सवाल्यांनी   तर आपल्या गटाचा इचकाच केला, थोडं कुठं सवताच्या पायावर हुभा रहायचं बघत होतो तर ह्यांनी कुबड्या आणून दिल्या, त्यानला आम्हाला द्लीनदरच ठीवायचं हाय बघा
राधाबाई:  पारूबाई शांत व्हा हीथ मिटींगला नवीन बाया बी हायत्या त्यानला काय कळत नाय, तुमी काय बोल्ताव ती बरोबर हाय पण, जरा समजून सांगा  राधाबाई बोलल्या.
पारूबाई:  मी नाय सांगत माझ डोक फिरलंय तुमीच सांगा.
पारुबाईंचा पारा चढला होता एका अर्थी त्या काही चुकीचं बोलत नव्हत्या.  
राधाबाई समजुतीच्या स्वरात बोलू लागल्या, पोरींणु मी सांगते बघा. आमचा गट लई जुना हाय. म्हंजी  २५ वर्ष तरी झाली. तवा गट मनजी काय माहीत नव्हतं. आमी महिला मंडळात जायचो, गाणी मनायचो, हळदी कुंकू करायचो, दारूबंदी करायचो, मोर्चात जायचो. सगळं ठीक होतं, पण सावकाराच्या  कचाट्यात  सापडलो होतो, घरातला अन शेतातला खर्च वाढत चालला  होता, सावकाराचं  व्याज बी लई ज्यास्त होतं, बँका शेतासाठी  फक्त गड्याला कर्ज द्यायच्या. मनून आम्ही स्वयं सहायता गट म्हणजी आपल्या पायावर उभा राहणारा गट दहा रुपये महिन्याला गोळा करून तयार केला. त्यावेळी बँका तर  आम्हाला  दारात उभ्या नाही करायच्या आन आज बघा आमच्या मागं लागल्यात कर्ज घ्या मनून.
एका नवीन पोरीन विचारलं, “आता का बँका येत्यात म्हागं ?” 
सोजरबाई: पहिलं गड्यांना शेताची  कर्ज दिली अन  काही कारणांनी वापस नाही आली, डुबली. गटाच्या बाया वेळेवर कर्ज वापस करत्यात. मनून बँका त्यानला कर्ज द्यायला लागल्या. त्यांची बी बँक चालली पाहिजी की, आपुन कर्ज नाही घेतलं तर कशी चालंल बँक ? पण बँकवाल्यांनी बी स्वतःचाच  विचार केला, कर्ज देताना बाईचं नाव सात बारा उता-यात लावायला कम्पल्सरी नाही केलं, आमच्या नावावर शेत झाली असती. आता बघा ज्यांचे नवरे गेले अन ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायकांचे हाल. पण बँका कशाला विचार करत्यात तिथं बी सगळी गडी लोकच बसल्यात की, कशाला करत्याल बायच्या नावावर काय? कुठं-कुठं गड्यांनी बायांची नाव लावली सात बारा उता-यात. पण ती तिची काळजी मनून नव्ह तर बॅंकेकडून कर्ज मिळतय मनून. सरकार तर निसता परचार करतय सातबा-यात नावं लावायचा, पण तहशीलात गेले तर कुणी काय बोलतच नाय.
शेवंताबाई:  आम्ही नाही बाई बँकेकडून कर्ज घेत? अन पुढी घेणार बी नाही  आमचा गट आपल्या पायावर उभा हाय. साधी गोष्ट बायांना समजत नाही बघा आपलं पैसे आपण सेविंग खात्यात ठेवतो त्याला बँक % व्याज देते, अन आपण बँकेकडून  कर्ज घेतो त्यावर बँक आपल्याकडून १२% व्याज घेते . म्हणजे आपण बँकेला % जास्त पैसे देतो, एवढा साधा  हिशोब बायांना कळत नाही अजून. बँकेला खेटे किती घालावे लागतात, रोजी बुडवून. आन मला सांगा आपल्या गावात किती गट हायते त्यांचे सगळ्याचे पैसे बँकेत हायते त्याची करा बेरीज आन बघा, तेवढं नाहीतर त्याच्यापेक्षा जास्ती कर्ज दिलय का? नाहीतर आपलंच पैसं आपुन कर्जान घेतो अस व्हयाच . गटांनी पैशावर पैसा कमवायचा का गमवायचा ही पण शिकलं पाहिजे का नाय ? नायतर सावकारी खतम करायची मनून गट करायचा अन फायनान्स वाला सावकार व्हायचा.
नमिताबाई: आवो फायनासवाल्यांचं तर काय सांगूच नका, लई जाच हाय. दर आठवड्याला ते दारात हुभे हायच? कुटून आणायचे आठवड्याला पैसे ?
मायाताई : ज्या बायांनी बँकेकडून आन फायनान्सवाल्याकडून कर्ज घेतलं त्या बाया कचाट्यात सापडल्या हायेत बघा.
सिंधुबाई: मायाताई जरा फोडून सांगा की, काय मनायचं ते!
मायाताई: त्याचं काय हाय बघा कर्ज घेतलं बायांनी आपल्या नांवावर शेतासाठी, पण शेतात काय पेरायचं ? कोणत खत टाकायचं ? पिकं आल्यावर तो माल कुठ विकायचा ? हे सगळं ती ठरवते का? नाही. बरं, आलेला पैसा तिच्या हातात असतो का ? घरच्या माणसांनी तिला पैसं दिल तरच ती गटाला वापस देईल, नाहीतर तिला एका बाजून गटाच्या बाया पैसं मागणार, गटाला बँक पैसं मागणार आन घरच्या मानसाने पैसं नाही दिलं तर  ती कचाट्यात अडकल का नाही?
सिंधुबाई : पण असं तर गटाचं कर्ज घेतल्यावर बी व्ह्तकी? मी तर मन्ते बायांनी स्वतःच्या हिमतीवर जेवढं वापस करता येईल तेवढंच कर्ज घ्यावं.
संगीताताई:  मी तर मनते बायांनी कर्जच घेऊ न्हाई, बचत करावी आन स्वताच्या नांवावर म्हातारपणासाठी फिक्स डिपोझिट करावी. न्हाईतर आजकाल कोण म्हाता-यांला सांभाळतं ? हाडाची काड करून काम करायचं, बचत करायची आन म्हातारपणी पोरापुढं हात पसरायचं, त्यांचच शेत आन घर हाय तर घेऊ द्या त्यांनलाच कर्ज ?
शेवंताबाई : अशी कशी मनती बाई, घर तर दोघांनी चालवावं लागंल की?
मनुबाई : आवो सरकारच्या इस्किमी बी लई आल्यात की, त्या घ्याव्या, आपलंच सरकार हाय की,
राणूबाई: व्हय त्याचा बी फायदा घ्यायलाच फायजे मी काय मन्ते सरकारन इस्किमी बनवताना आपल्याला इचारलं फायजे, मनजी आपल्याला इस्किमी घेताना अडचण नाही होणार. नाहीतर गेल्या २५ वर्षात १० इस्किमी आल्या आन गेल्या. 
शेवंताबाई: मी सांगते ताई   एका गावातला  किस्सा, मी गेले होते एका गावात नवीन गट बनवायला तर  मिटिंगमधी एक बाई गट बनवायला विरोध करत होती ती मनाली ”हमे नही करना  है गट-बीट आप निकल जावो यहांसे, मी म्हणलं - क्यों नही करना है जरा समजावो, तर तीनी प्रश्न विचारला.“दीदी नल में से पाणी जाता है, लेकीन नल पाणी पिता है क्या ?मी बोलले -नाही पीत, “तो हमारा कंडीशन भी ऐसा ही हुआ है गट का कर्जा ह्ममेसें घर में जाता है लेकीन उसका हमे कुछ फायदा नही होता”
सगळ्या बाया जोरजोरात हसायला लागल्या
शेवंताबाई: काय चुकलं त्या बाईचं खरंच हाय की. मला सांगा गटातल्या पैशातून कोणीकोणी जमीन खरेदी केली स्वताच्या नावावर?  किती जणींनी घरं घेतली स्वताच्या नावावर? कोणकोण दागिने घेतले स्वताच्या नावावर? कोणकोण फिक्स डिपोझीट केली स्वताच्या नावावर? किती जणींनी एल.आय.स्या काढल्या स्वताच्या नांवावर? ताई नेहमी म्हणतात गूळ असेल तरच माशा येत्यात ? आप्पून स्वताच्या नावावर किती संपत्ती गोळा केली ? गटामुळं आपलं गावात नाव झालं, आपुन पंचायतीत गेलो, बायांच्या हक्कासाठी भांडतो, मोर्च्यात जातो ,नवीननवीन गोष्टी शिकतो, व्यावसाय करतो, आपला गावात आन घरात मान वाढला. सगळं गटामुळ आन आपण एकत्र आल्यामुळं, ताई तुमी ती काय म्हणतात  आर्थिक साक्षरता शिकवा आमाला.  मग खरंच आम्ही आमच्या पायावर उभा राहू, आता आपल्याला आपली संपत्ती पण तयार करता आली पाहिजे!
               

                                                            सुनिता बागल

गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रासह इयतर राज्यात स्त्रीयांसोबत आर्थिक साक्षरतेचे काम. 
2004 मध्ये स्त्रीयांचे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी अशोका फेलोशिप प्राप्त.                                       
sunitabagal7@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form