स्वातंत्र्य म्हणजे . . . .

स्वातंत्र्य म्हणजे काय? हा गहन प्रश्न वाटू शकतो! पण स्वत:चे  स्वातंत्र्य उपभोगताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू  नये, यांचे धडे लहानपणा पासून मिळायला हवेत. आणि त्यासाठी लहान मुलांशी वागताना प्रौढ माणसांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. 

दरवर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी शाळेमध्ये एक कार्यक्रम ठरलेला असतो. झेंडावंदन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे अनेक उपदेशांनी भरलेले भाषण देत असतात. आपण शाळेत होतो तेव्हाही अशीच पद्धत होती. स्वातंत्र्य दिन दरवर्षी साजरा होताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या उद्बोधक कथा ऐकायला मिळतात. आठवीपासून पुढे या भाषणाचा विलक्षण कंटाळा येऊ लागला आणि शाळेतला स्वातंत्र्य दिन जुलमाचा रामराम वाटू लागला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली. आता शाळेमध्ये शिकणाऱ्या ‘अल्फा जनरेशन’ आणि ‘जेन झी’ या पिढीला सात दशका पूर्वीच्या गोष्टी ऐकण्यात रस आहे का? या पिढीला त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल अधिक चिंता आहे. आता शाळेमध्ये शिकणारी मुले-मुली स्वतःच्या ‘स्पेस’ बद्दल अधिक जागरूक आहेत आणि त्यांना थोडक्यात महत्वाचे सांगितलेले आवडते परंतु फार मोठे प्रवचन देण्यास सुरुवात करताच आताची पिढी काढता पाय घेते. त्यामुळे आधी स्वातंत्र्य म्हणजे काय हे    आपण मोठ्या माणसांनी जाणून घेण्याची खरी गरज आहे. 



लहान मुले चित्रांमधून व्यक्त होत असतात. त्याना हवी तशी चित्रे काढू देणे म्हणजे स्वातंत्र्य.
लहान मुले चित्रे काढतात त्यावेळी त्यांना चित्रे काढण्याबद्दल कमीत कमी सूचना द्याव्यात. भरपूर कोरे कागद किंवा चित्रकलेच्या अनेक वह्या त्याना उपलब्ध करून देता येतील. अर्थात मनात येईल त्या जागेवर चित्रे काढण्याऐवजी भिंतीवर एक कागद चिकटवता येतो, ज्यावर ती मुले चित्रे काढू शकतात. पक्षी काढताना मुले कुठेही चोच काढतील, पाय उलटे काढतील, डोके खाली असू शकेल. हे चूक आणि ते बरोबर असे शेरे त्यांच्या चित्रामधील नवे विचार थांबवतात. त्यांच्या मनासारखे काही झाले नसल्यास त्यांची नाराजी चित्रांमध्ये दिसते. घरामध्ये आई-वडिलांचे कडाक्याचे भांडण झाल्यास मुलांच्या चित्रांमध्ये गुंतागुंत दिसून येते. पालकांनी सूचना न दिलेली मुलांच्या मनातील दहा चित्रे काढून झाल्यावर त्यामधील त्यांच्या आवडीची तीन चित्रे भिंतीवर कॅलेंडर स्वरूपात लावल्यास त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजते. वह्या – पेन – पेन्सिल निवडण्याचे स्वातंत्र्य मुलांना द्यायला हवेच, शिवाय, हत्ती असा कधी काढतात का?, चित्र काढताना रंग रेषेच्या बाहेर जाऊ नयेत, रंग सांडू नयेत, असे शेरे ऐकता ऐकता मुलांची कल्पनाशक्ती लोप पावते.
चुका करण्याचे स्वातंत्र्य मुलांना लहानपणापासून मिळणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणात चुका केल्यास शिक्षेची भीती दाखवली जाते परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला चुका करण्याची संधी दिली जाते, हा विश्वास मुलांना वाटायला हवा. त्यासाठी घरामध्ये मुलांना कोणतेही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य हवे. कोणत्याही विषयावर प्रश्न विचारण्याचे धाडस मुलांमध्ये निर्माण करण्याचे वातावरण आणि विश्वास पालकच निर्माण करू शकतात. हा प्रश्न विचारल्यावर आपले हसे होणार नाही, आपल्याला कोणी रागावणार नाही असा विश्वास आजही अनेक घरांमध्ये मुलांना वाटत नाही. आई-वडीलांसमोर प्रश्न विचारण्यास घाबरणारी मुले शाळेमध्ये कधीच हात वर करत नाहीत. आपण विचारलेल्या प्रश्नाला आई-वडील उत्तर देतील आणि त्यांना माहित नसल्यास ते प्रामाणीकपणे तसे सांगून माहिती काढून आपल्याला उत्तर मिळेल; असे   .

शाळेमध्ये प्रश्न विचारण्याचे खुले वातावरण तयार होणे हे स्वातंत्र्याचे द्योतक आहे. ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ या मानसिकतेमधून शालेय शिक्षक बाहेर पडले तरच प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढेल. स्वातंत्र्य मिळाले तरच स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत वृद्धिंगत होईल. प्रत्येक लहान मूल चौकस असतेच. वय जसजसे वाढत जाईल तसतसे पालक-शिक्षकांच्या धाकाने चौकसबुद्धीची लयाला जाते. अनेक शाळांमध्ये आजही काही शिक्षकांच्या हातात पट्टी दिसते. छडीच्या धाकाखाली शिक्षण होत नाहीच शिवाय कुतूहल थांबते.

 

पालकांनी मुलांचे बोट वेळीच सोडणे म्हणजे स्वातंत्र्य. शहरामध्ये शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी सोसायटीच्या दारापर्यंत बसची सोय असते परंतु हौसिंग सोसायटीच्या दारापर्यंत सोडण्यासाठी पालक येतात, कोणाबरोबर मैत्री करावी – करू नये याचे सल्ले देतात. तिसरी – चौथीपासून मुलांचे बोट टप्प्या टप्प्याने सोडण्याचे नियोजन पालकांनी करावे. मुलांनी एकटे खेळायला जाणे, मित्र-मैत्रिणी निवडणे, त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाकडे दुर्लक्ष करून त्यांची भांडणे त्यांनाच सोडवण्यास सांगणे, अशाप्रकारे त्यांना स्वातंत्र्याची अनुभूती देणे त्यांच्यावर विश्वास टाकणेच आहे. त्यांच्या अभ्यासामधून एकेक इयत्तेमध्ये लक्ष काढून घेऊन त्यांनाच स्वतःच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला सांगणे बोट सोडण्याचाच एक प्रकार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवताना मुले रोज ठराविक वेळ वाचन करत आहेत की नाही याची खात्री करून घेतल्यानंतर एखाद्या दिवशी त्यांनी गृहपाठ केला नाही तरी त्याचे परिणाम त्याना भोगू द्यावेत. मुलांचे कोणतेही प्रोजेक्ट पालकांनी करू नयेत. वर्षानुवर्षे पालकांनी मुलांच्या शिक्षणावर खर्च करत राहणे आणि मुलांनी पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा एम.बी.ए. किंवा तत्सम कोर्स करण्यासाठी पैसे पालकांकडे मागणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे.
भाजी मंडईमध्ये कोणती भाजी घ्यावी याचे निर्णय घेण्यापासून मुला-मुलींच्या आवडीप्रमाणे त्यांना त्यांचे करीयर पर्याय निवडू देणे म्हणजे स्वातंत्र्य. लग्नानंतर स्वतःच्या संकल्पनेनुसार स्वतःच्या पैशाने घर घेणे-सजवणे म्हणजे स्वातंत्र्य. पुढच्या पिढीने एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये रहावे अशी अपेक्षा असल्यास मुलाच्या लग्नानंतर तत्परतेने सर्व सूत्रे पुढच्या पिढीला सोपवणे, म्हणजे स्वातंत्र्य. घरामध्ये आई वेगवेगळ्या कारणांसाठी वडिलांची परवानगी मागते, असे दृश्य स्वातंत्र्याचा अभाव दर्शवते. एखाद्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढणे आणि घरामध्ये कोणीही परवानगी मागणे यामध्ये मोठा फरक आहे. घरामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात का, घरामध्ये वेगवेगळी मते मांडली जातात की नाही, याचे निरीक्षण मुले करत असतात. त्यामुळे घरामधील वातावरण कसे आहे, हे सर्वात महत्वाचे आहे.
अलीकडेच एका घरामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याला वाकून नमस्कार करण्याचे आदेश आजी-आजोबांनी त्यांच्या नातवंडाना दिल्याचे बघितले. परंतु हा जुलुमाचा रामराम आहे, हे त्याना उमलत्या वयात लवकरच कळणार आहे. त्यावेळी हीच मुले बंड करून कोणालाच नमस्कार करणार नाहीत. आजच्या पिढीला स्वतंत्रपणे विचार करण्यास शिकवणे अपेक्षित आहे. एखादी व्यक्ती मनापासून पटली, आदरणीय वाटली, त्यांची भाषा उगाच अनाहुतपणे ‘लेक्चर न देणारी’ वाटली तर आजची पिढी स्वतःच्या मनाने नमस्कार करेल. तसे शिक्षण घरामध्ये मिळेल अशी व्यवस्था पालकांनी करावी. त्यामुळे ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचे आचरण करण्यास आताची पिढी तयार करण्याचा वसा पालकांनी घ्यावा.
स्वातंत्र्य मिळाल्यावर जबाबदारीचे भान असणे ओघाने आले. स्वातंत्र्य नेहेमीच नियमांच्या बंधनामध्ये राहून पाळले जाते. शाळा-कॉलेजला पोहोचण्यास उशीर होईल म्हणून सिग्नल तोडणे हे स्वातंत्र्य नव्हे. शाळेचा गृहपाठ न करणे, हे स्वातंत्र्य नव्हे परंतु एकच वाक्य पन्नास वेळा लिहून आणायला सांगितल्यास वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याबद्दल विचारणा करणे, हा स्वातंत्र्याचा भाग झाला. एक तास वाचन केल्यानंतर अर्धा तास मोबाईल खेळण्यास मागणे, हे स्वातंत्र्य नव्हे. खरे तर आठवी-नववीपर्यंत मुला-मुलीना स्वतंत्र मोबाईल देणे गैर आहे. वयाच्या पाचव्या वर्षी हातात टॅब मिळालेल्या मुलांचे वाचन शून्यावर आलेले आहे याची अनुभूती अनेक पालकांना आली आहे. कायदे न पाळण्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. तसेच पालकांच्या पसंतीच्या मुला/मुली बरोबरच लग्न करायला लावणे किंवा तसा कायदा करणे, हे स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या विरुद्ध आहे.
एकूणच स्वातंत्र्य ही संकल्पना घरा-घरामध्ये वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या आचरणात दिसावी. कोणतीही व्यक्ती दुसऱ्याला स्वातंत्र्य देत नसते, स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक जबाबदार नागरिकाला स्वातंत्र्य आहे पण स्वातंत्र्य नसताना त्याची खरी किंमत कळते. कोणाच्याही प्रभावाखाली न राहता स्वतंत्रपणे विचार आणि कृती करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे धाकदपटशा, बळजबरी, आदेशानुसार पालन, हातात छडी, गप्प बसा संस्कृती. मनाची कवाडे उघडून विविध विचारप्रवाहांचे आवाज जिज्ञासू वृत्तीने ऐकू येण्यासाठी सुसंवादाचे वातावरण प्रत्येक घरामध्ये – शाळेमध्ये निर्माण झाल्यास आजच्या पिढीला स्वातंत्र्य दिनाचे महत्व उमजेल.

सुहास किर्लोस्कर  

हा लेख यापूर्वी https://www.tarunbharat.com येथे प्रकाशित झाला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form