ऋतू व्हावला ...!

एकदा कधी तरी बोलताना सहजच विषय निघाला आणि मी आईला विचारलं- 'आयं तुला ताई लग्नानंतर किती वर्षांन् झाली गो?' तर ती पटकन म्हणाली- 'लग्नानंतर बारा वर्षांन्.' मी अवाकच झालो तिच्या या उत्तराने. माझा विश्वासच बसेना. मग मी म्हटलं- चल कायतरीच काय... तर म्हणाली- 'खराच सांगताय बब्या. माजा लगीन झाला, तवा मला पदर पण नव्हता आला. लग्नानंतर तीन वर्षांन् पदर आला. अन् हे असायचं मुंबयला. तवा गावाला यायचा म्हणजे बोटीन् परवास कराय लागायचा. मंग एकदा कुणी मुंबयला गेला की तीन-चार वर्षा तरी यायचा नाय. मला न्हाण आल्यावर दोन-तीनदा हे बोटीन गावाला आलं तवा कुटं मी ताईसच्या वेळी पोटासी राह्यले.'

आई बिनधास्त होती. ती कुठल्याच गोष्टीला कधी लाजायची नाही. त्यामुळेच माझ्याशी बोलताना तिने अगदी सहजच ही माहिती मला सांगितली. गंमत म्हणजे तिला पदर आला तेव्हा ती आपल्या सासूबरोबर (म्हणजे माझ्या आजीबरोबर) रानात गेली होती. रानातच तिच्या ओटीपोटात दुखायला लागलं आणि ती कळवळायला लागली. तिच्या दुखण्याची जागा कळताच आजी तिला लगेच घरी घेऊन गेली होती... आणि थोड्याच वेळात आईला पदर आला होता... आई ऋतुमती झाली होती. सर्जनशील झाली होती. गंमत म्हणून ही माहिती सांगतानाही आईचा चेहरा खुलून आला होता. जणू तिला नव्यानेच पदर आला होता...
मी तिला तिच्या वयाच्या साधारणपणे 42 व्या वर्षी झालेलो. म्हणजे मी जाणता व्हायच्या आधीच तिचा दर महिन्याचा ऋतुप्राप्तीचा काळ खरं तर संपत आलेला. त्यामुळे मोठेपणी मला कधीच कळलं नाही की आईला पाळी यायची की नाही... पण पुढे एकदा आई नि मी गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता काही कारणाने आई उठली नि पटकन् बाथरूममध्ये गेली. झालं असेल लघवीला, माझ्या मनात आलं... अन् तेवढ्यात माझं लक्ष ती बसली होती त्या जागेकडे गेलं, तर तिथे लाल-काळ्या-निळ्या पाण्याचं अगदी छोटं तळं साचलं होतं. मी एकदम घाबरलो. आईला बघायला बाथरूमच्या दिशेने गेलो. तर तेवढ्यात ती साडी बदलून बाहेर आलीही होती. मग मी तिला एकदम घाबरून ते छोटं तळं दाखवलं. तर म्हणाली- 'हात् तिच्या ऋतू व्हावला वाटतं...!' आणि हसायला लागली.
मला क्षणभर काही कळलं नाही. पण तिने सांगितल्यानंतरच कळलं तो ऋतुस्राव होता. खरं तर तिची पाळी केव्हाच बंद झाली होती. पण कसं कोणास ठाऊक त्या दिवशी अचानक वळवाचा पाऊस यावा, तसा तिचा ऋतुस्राव झरला होता आणि तिलाही चकीत करून गेला होता. कारण पाळी गेली म्हणून तिने पाळीच्या दिवसांत वापरायच्या कापडी पट्ट्या ठेवणं बंद केलं होतं.
 वास्तवात मला एक वेगळाच प्रश्न पडला होता. आजकालच्या मुली-महिलांना अंतर्वस्त्रात नॅपकीन ठेवणं सोपं जातं. पण पूर्वीच्या काळी नऊवारी नेसत असलेल्या महिला काय करत असतील? कारण त्या काही अंतर्वस्त्र घालत नव्हत्या. पण याचंही उत्तर नंतर कधी तरी तिनेच मला दिलेलं. पाळीच्या दिवसांत नऊवारी नेसताना कासोट्याची जी पट्टी जांघांतून नेली जाते. त्या पट्टीवर बसेल अशी मऊ सुती कापडाची पट्टी लुगड्याच्या आत सर्जनमार्गावर ठेवली जायची. म्हणजे चुकून कधी स्राव सुरू झालाच, तर महिलांचा गोंधळ उडत नसे.
ऋतुस्रावाशी संबंधित अजून एक आठवण आहे. निसर्गाशी जोडून घेणारी.
पावसाळा सुरू होतो आणि नदी-नाले पूर येऊन वाहू लागतात. कालपर्यंत निवळशंख असलेलं पाणी बघता बघता गढूळ होऊन जातं... तर मोठेपणी एकदा कधी तरी मी पावसाळ्यात गावी गेलो होतो आणि तुफान पाऊस पडत होता. आमच्या गावच्या केसरी नदीला बघता बघता महापूर आला होता. खरं तर घराच्या पडवीत उभं राहिलं, तरी नदीला आलेला पूर सहज दिसायचा... पण त्या दिवशी काय मनात आलं कुणास ठाऊक, आईला म्हटलं- 'आयं चल नह्यचा हहूर बघून यव...' आईने आधी आढेवेढे घेतले, एवढ्या पावसात कशाला बाहेर पडायचं म्हणत, तिने मला थांबवण्याचा प्रयत्नही केला.
मात्र कदाचित तिलाही भरलेली नदी पाहायची असावी... मग एकाच छत्रीत आम्ही दोघेही बाहेर पडलो. वाऱ्याचा जोर एवढा होता, की त्याला थोपवताना आमची भंबेरी उडत होती... आमच्या घरापासून मोजून पाचशे ते सहाशे पावलं टाकली असतील, तर... नदीचा पूर एकदम हाकेच्या अंतरावरच आला. नदीचं ते भयानक रूप घाबरवणारं होतं. नदीचं नितळ रूप पालटलं होतं... तिच्यातलं पाणी रोरावत, अंगावर आल्यासारखं धावत होतं... मुख्य म्हणजे ते अगदी गढुळलेलं होतं... एकदम मातकट. माझ्या तोंडून पटकन् बाहेर पडलं- 'आयं नह्यचा पाणी बघ कसा गढुळलाय... श्शी!'
त्यावर ती पटकन माझ्यावर डाफरली... तिने आधी नदीकडे पाहून हात जोडले आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाली- 'बब्या, हहूर आलेल्या नह्यला असा नाव ठेव नये... तिला ऋतू आलाय नं, म्हणून तिचा पानी गढुळलाय... आम्हा बायकांना ऋतू येतं, तवाच जीव जलम धरतं नं... नह्यचा पण तसाच...'
... पण एरव्ही एकूणच आई काय किंवा माझ्या बहिणी काय मला कधीच कुणाची पाळी कधी आली नि कधी गेली ते कळलं नाही. अर्थात माझ्या दोघी बहिणी गावाला होत्या आणि मी आई-बाबांबरोबर मुंबईला असल्यामुळेच. तरीही उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा महिनामहिनाभर गावी असायचो तेव्हा कधी ते कळलं नाही. मात्र त्यांच्याच नाही तर गावाकडच्या एकूण महिलांच्या मासिक पाळी धर्माविषयी बहुतांशी समाज अनभिज्ञ असतो (नवऱ्याला जे काय कळत असेल तेवढंच). कारण ग्रामीण भागात, निदान आमच्या कोकणात तरी श्रमकरी समाजात मासिक पाळीचा बडेजाव नाही. मुलींच्या-महिलांच्या पोटात दुखत असेल (नव्हे, दुखतच असेल) तरी त्यांना श्रम करावेच लागतात. त्यांना कितीही आरामाची गरज असली तरी इतरांप्रमाणे घरातली-बाहेरची कामं करावीच लागतात. मासिक पाळीत महिलांना आराम मिळायला हवा, ही सामाजिक सुधारणा आता कुठे येऊ घातलीय. अन्यथा आताआतापर्यंत तरी माझ्या गावबहिणींनी मासिक पाळीच्या दिवसांतही नदीवरून पाणी भरलेलं आहे, रानातून फाट्यांचे गोयले आणलेले आहेत... अन् तरीही एक महत्त्वाची बाब म्हणजे गावाकडच्या या बहुजन समाजांत मासिक पाळीतल्या शिवाशिवीचं कसलंही अवडंबर नव्हतं. मासिक पाळीच्या काळातही मुली-महिला सगळ्यांत मिळत-मिसळत होत्या. अगदीच नाही म्हणायला परंपरेचा पगडा म्हणून थेट देवघर-मंदिरात जात नव्हत्या. पण त्यांच्या सामाजिक मिसळण्यावर तरी कोणतीच बंधनं मासिक पाळीच्या काळात नव्हती.
... आणि आता काळ एवढा पुढे गेल्यावरही महिलांच्या मासिक पाळीच्या निमित्ताने समाजात एवढा अंधःकार असेल तर बायानो येऊ द्या तुमच्या ऋतुस्रावाला महापूर आणि त्यात वाहून जाऊ दे हा समाज!


- डॉ. मुकुंद कुळे

पत्रकार आणि लोकसाहित्याचे अभ्यासक 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form