एखादी स्त्री आत्मचरित्र लिहिते तेव्हा, ती लिहून लिहून असं काय लिहिणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात येते. विशेषतः वैवाहिक जीवनातील अनुभवाबद्दल लिहिताना ती कितीशी मोकळेपणाने लिहील? जगताना आलेल्या इतर अनुभवांचं चित्रण ती आरपार शैलीत करेल का? स्वतःच्या झालेल्या चुकांबद्दल ती तटस्थपणे लिहील का? मुख्य म्हणजे, आयुष्यातले अनुभव उलगडून मांडताना संबंधित व्यक्तींचा उल्लेख ती नावानिशी करेल का? या प्रश्नांची बऱ्यापैकी नकारात्मक उत्तरंच आपल्याला मिळतात. कारण स्त्रीला स्वतःचं आयुष्य शब्दबद्ध करताना काही लपवायचं नसतं, पण तिला तरीही काही गोष्टी लपवाव्या लागतात, किंवा सौम्य करून सांगाव्या लागतात. हिंदीतल्या ज्येष्ठ लेखिका कृष्णा आग्निहोत्री मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी लिहिलेली दोन आत्मचरित्रपर पुस्तकं वाचकांसमोर आली आहेत आणि ती आपण काहीही न लपवता प्रामाणिकपणे लिहिली आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट तपासण्याचं कारण नाही, पण या लिखाणातला मोकळेपणा आणि आलेले अनुभव मांडताना त्यांनी दाखवलेलं धारिष्ट्य वाखाणण्याजोगं आहे...
‘लगता नहीं है दिल मेरा’ आणि ‘और और औरत’ ही कृष्णाजींची दोन आत्मचरित्रपर पुस्तकं. पैकी पहिलं हे त्यांच्या बालपणीपासूनच्या जीवनाचा पट बारकाईने मांडणारं आहे, तर ‘और और औरत’ मधून त्यांनी व्यक्तिगत आठवणींसोबतच खास करून लेखकांच्या आठवणी आणि प्रकाशन व लेखनक्षेत्रातले अनुभव लिहिले आहेत. एक लेखिका म्हणून स्वतःला आलेले अनुभव, हिंदी जगतातील प्रकाशकांचा चोरपणा, लेखक जगतातील हेवेदावे व ताणतणाव याचाही त्यांनी वेध घेतला आहे.
आसपासच्या वर्तुळात बिनधास्त आणि मनमोकळं जीवन जगणारी लेखिका अशी त्यांची प्रतिमा असली, तरी यामुळे आपल्याबद्दल गैरसमज अधिक पसरवले गेले, अशी त्यांची खंत आहे. प्रेमाचा अनुभव हा स्त्रीसाठी महत्त्वाचा खराच; पण हे प्रेम आपल्याला निर्मळपणे कधीच अनुभवता आलं नाही, याची वेदना त्यांना नेहमीच सतावत आली आहे. तथाकथित नीतिनियमांच्या चौकटीपलीकडे गेल्यावरही प्रेम सापडेल असं नाहीच, मात्र असे नियम स्वतःच्या इच्छेनुसार एखाद्या स्त्रीने तोडले, तर त्यात त्यांना वावगं वाटत नाही. एक व्यापार म्हणून किंवा काही साधण्यासाठी केलेली खेळी म्हणून स्त्रीने स्वतःचा वापर करावा हे मात्र त्यांना मंजूर नाही. आपले हे विचार थेटपणे सांगण्याचं धाडस कृष्णाजींमध्ये पुरेपूर आहे. त्यांचं लेखन वाचताना हे प्रकर्षाने जाणवतं...
त्यांचा विवाह तसा अगदी कमी वयातच झाला. सत्यदेव अग्निहोत्री हे पोलीस अधिकारी त्यांचे पती. पण त्यांचा घमेंडी आणि आत्ममग्न व संशयी स्वभाव उभयतांच्या नात्याला आकार देऊ शकला नाही. ‘ऑफिसरी, उनका रहन सहन मेरे लिए नया नहीं था...लेकिन पद का घमंड मेरे पति में अत्यधिक था..मैं अपनेसे अधिक उनकी चिन्ता करती.’ आपलं उच्च शिक्षण कृष्णाजींनी विवाहानंतरच पूर्ण केलं. पतीचं विचित्र वागणं व त्याला प्रेरित करणारी सासू, पत्नीच्या मनाचा जराही विचार न करणारा जोडीदार मिळाल्याने आलेली निराशा, अगदी तरुण वयात समोर आलेलं आयुष्याचं भेसूर व कडवट रूप याबद्दल लिहिताना त्या कडवट बनत नाहीत. पण आपली मनोवस्था, होणारा छळ याचा तीव्र अनुभव त्या थेट मांडत जातात. शारीरिक हिंसा, मारहाण, मानसिक त्रास हे सारं सोसतानाही त्या दुसरीकडे आपलं शिक्षण, नोकरी यासाठी धडपड करतच राहताना दिसतात. आपल्या बहिणीच्या वाट्याला आलेलं वैवाहिक जीवनातलं क्रौर्य त्यांना व्यथित करतं. भारतीय मुलींना आणि स्त्रियांना केवळ पुरुषाच्या इच्छेमुळे इतकं का सोसावं लागतं, याचा विचार त्यांना छळत राहतो.
बालपणीचे अनुभव लिहिताना एकीकडे त्या त्यातली गंमत आणि निरागस मौज मांडतात. पण दुसरीकडे त्याही काळात अस्तित्वात असलेलं बाललैंगिक शोषणाचं वास्तव समोर ठेवतात. घरातल्या किंवा कौटुंबिक वा ओळखीच्या परिवारातल्या माणसांकडूनच होणारे अत्याचार कमी अधिक प्रमाणात चालूच राहत. बरेचदा तर ते अत्याचार आहेत, हेच न कळण्याचं मुलींचं वय असे. असं कृत्य करणारी माणसं आणि त्यांच्या बळी ठरणाऱ्या बालिका व किशोरी याबद्दलच्या कृष्णाजींच्या आठवणी वाचताना वाटतं, पूर्वीसुद्धा असे प्रकार होतच होते.. हे तर अजूनही असंच घडतं की! पुन्हा अशा गोष्टींची वाच्यता न करण्याची शिकवण दिली जात असे आणि त्यामुळे संबधितांना अटकाव होण्याची शक्यता कमीच असे...
स्वतःची आई आपल्यावर फारसं प्रेम करत नाही, याचा प्रत्यय लहानपणीच त्यांना आला. ही वेदना सांगताना त्या लिहून जातात, ‘माँ मुझे प्यार नहीं करती थी...यदि पल भर को भी मुझे प्यार देती थी तो मैं गद्गद हो जाती थी.’ एक मुलगी म्हणून झालेले संस्कार आणि मोठ्या एकत्र परिवारातला कौटुंबिक अनुभव मांडताना, बदलत्या काळासोबत बदलत जाणारे व अधिक व्यावहारिक बनत जाणारे नातेसंबंध समोर येतात. एकटं राहायला लागल्यावर माहेरच्या घरी आपल्याला कितपत स्थान आहे, याची शंका मनात असूनही तिथे जाण्याला पर्याय उरत नाही. वडिलांनंतर घर फक्त आपलं आहे, हे ठसवण्याचा प्रय़त्न भाऊ करतो, तेव्हा त्या त्याला म्हणतात, ‘मैं भी देखती हूँ कि तुम मुझे घर से कैसे निकालते हो. मैं कलक्टर से शिकायत कर दूँगी!’
नीहार ही मुलगी पदरात असल्याने, विवाह टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या करतात. पण अखेर हे नातं मोडावंच लागतं. पतीपासून घटस्फोट घेतल्यावरही पुढे एका टप्प्यावर त्याच्या आजारपणात त्या मदतीसाठी धावतात. स्वतःला अध्यापनक्षेत्रात स्थिर होताना आलेले अनुभव आणि करावा लागलेला संघर्ष याचा आलेखही त्यांनी यात मांडला आहे. नोकरीच्या क्षेत्रातलं राजकारण आणि लाचबाजी याबद्दल त्यांनी परखडपणे लिहिलं आहे. एकटी स्त्री म्हणून आलेले पुरुष सहकार्यांचे व इतरांचे अनुभव आणि त्यावर मात करत टिकण्याचा केलेला संघर्ष याचा लेखाजोखाही यात आहे. या वाटचालीत झालेले मित्र, त्यांची जवळीक व दुरावा, स्वार्थी दृष्टीने केलेली दोस्ती याबाबत त्यांनी नावानिशी लिहिलं आहे. त्यांनी याप्रकारे नावं घेऊन लिहायला नको होतं, असंही पुढे अनेकांनी त्यांना सांगितलं. पण लेखिकांनाच शोषणकर्त्यांची नावं घेणं आवडलं नाही, याबद्दल कृष्णाजींनी एका मुलाखतीत आश्चर्य प्रकट केलं आहे. नोकरीच्या संदर्भात लिहिताना, शंकर दयाल शर्मा यांनी हातात असूनही आपल्याला मदत करण्याचं कसं नाकारलं, याबद्दल कृष्णाजींनी लिहिलं आहे. पुढे श्रीकांत जोग या मध्य प्रदेशातीलच अधिकाऱ्यांशी त्यांनी विवाह केला. पण याही विवाहात नैराश्य पदरात पडलं. या नात्यातूनही त्या दूर झाल्या.
आपल्या आयुष्यात आलेले पुरुष मित्र आणि त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण, दैनंदिन जगण्यात त्यांनी केलेली मदत याबद्दल त्या मोकळेपणाने लिहितात. स्त्री पुरुषांशी मैत्री करू शकते, यावर विश्वास नसणारा समाज कृष्णाजींना विशिष्ट नजरेने बघतो आणि याचा त्यांना त्रासही होतो. आलोक, मंजुल या दोस्तांशी असलेल्या नातेसंबंधाने कृष्णाजींच्या आयुष्यात थोडी हिरवळ आणली. स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण वाटणं हे स्वाभाविकच आहे. कृष्णाजींनी हे प्रत्यक्षातही नाकारलं नाही आणि लेखनातही. व्यक्तिगत आयुष्यातल्या या गोष्टी त्यांनी मोकळेपणाने लिहिल्या आहेत. या संबंधांमध्ये व मैत्रीत आपखुशी होती, कोणताही व्यावहारिक हेतू नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरं मानायला हरकत नाही. पण त्यांच्या मोकळ्या वृत्तीचा फायदाही घेतला गेला आणि ही लबाडी तेव्हा त्यांच्या लक्षात आली नाही, हेही तेवढंच खरं. कुणाच्या व्यक्तिगत गोष्टींची चिरफाड करू नये. कथित नैतिकतेचा मुद्दा तर यात नाहीच. पण लेखिकेने स्वतःच सारं लिहिलं आहे, त्यावरून त्यांची काहीजणांकडून फसवणूक करण्यात आली, हे स्पष्ट होतं.
हे लेखन वाचताना कृष्णा अग्निहोत्रींच्या जीवनातला व स्वभावातला आवेग जाणववून येतो. एक तुफानी आवेश घेऊन त्या जगत आल्या आहेत. त्या समाजाचे कथित नैतिक नियम महत्त्वाचे मानत नाहीत, पण त्या आपल्या मनाशी स्वच्छ आहेत. वाचकांचं प्रेम त्यांना पुरेपूर लाभलं, पण समीक्षकांनी त्यांना फार किंमत दिली नाही. पुरस्कारांचं राजकारणही त्यांना भोवलं. अर्थातच मोठे पुरस्कार मिळाले नाहीत. प्रकाशनक्षेत्रातला पक्षपातीपणा तिच्या वाट्याला आला आणि तरीही १२ कादंबऱ्या आणि १५ कथासंग्रह, बालकथासंग्रह असं विपुल साहित्य तिच्या नावावर आहे. आपण खोटं कधी बोललो-वागलो नाही, असं त्या म्हणतात. स्वतःच्या वागण्याकडेही त्या तटस्थपणे बघतात आणि आपलं चुकलं असेल, तर तसं कबूल करतात. स्वतःचं भावजीवन आणि आकांक्षा व स्वप्नं यांचं विश्लेषण त्या करतात. मुलीचा जन्म आणि नातीच्या आगमनाने त्यांना झालेला आनंद, वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद याबद्दल त्या उत्साहाने लिहितात. ‘लगता नहीं है दिल मेरा’ म्हटलं तरी कृष्णाजी मनापासून जगल्या आहेत आणि त्यांनी संघर्षही तडफेने केला आहे. एक स्वच्छन्दी, मनमोकळी आणि परखड स्त्री या दोन्ही पुस्तकांतून भेटते.
नंदिनी आत्मसिद्ध
Tags
पुस्तक परिचय
छान
ReplyDelete