मी नाही कुंकू लावत जा!




आजवर तू कुंकवाच्या नावाखाली

बाईला नागवलं

लावलं कुंकू तरी उपभोगली

भुंड्या कपाळालाही संशयात गुंडाळलं

नवरा मेल्यावर जे हिसकावून घेतलं

तेही कुंकूच होतं रे

तुझा संधीसाधूपणा कळत नाही रे बायांना

कधी तू सौभाग्याच्या नावाखाली कुंकू लावायला भाग पाडतो

कधी चक्रे जागृत होण्याचं खुळ भरतो बायांच्या डोक्यात

तर कधी संस्कृतीच्या बुजगावण्याखाली दाबतोस बायांना

अरे एवढंच कुंकू भारीये

तर मग भर की कपाळ स्वत:चच मळवट भरल्यासारखं लालेलाल

आणि घराघरातील तुझ्या सगळ्या कपाळकरंट्या अनुयायांचंही

मग एकदमच स्पष्ट होईल जमात

कुंकू लाव म्हणनारांची

आणि तुझ्या त्या दृश्य अदृश्य पिळदार मिशाही गुंडाळून ठेव अडगळीत

पुरुषत्व विरून मातीत मिसळण्यासाठी

तुझी माजलेली सत्तांध चालही बदल

पायदळी तुडवते अनेक बायांची आयुष्ये

तुझी वाणीही सुधारून घेशीलच

चिंधड्या करते हृदयाच्या आमच्या

तुझे पौरूषी डोळेही झाकूनच घे

आरपार लुटतात बायांना

थांबव त्या भारत देशाला माता बनविण्याचं षडयंत्र

आणि बाईला पूजण्याच्या ढोंगीपाणा

कधीतरी तिच्यातली सखीही दिसतेय का बघ निखळपणे

एवढं करूनही थोडंही मानव्य उतरलं नाही तुझ्यात

तर वाट बघ पुढच्या जन्मी बाई होण्याची

तसंही तुझी कुंकवाची संस्कृती दास्यत्वाचीच निशाणी

मी नाही ठेका घेतला तिला जगवण्याचा

कुंकू कधी माझी गरज नव्हती

नसणार आहे

मी आदिम आणि अनंत आहे

कुंकवाच्या आधीही आणि नंतरही

माझं असणंच सुंदर आहे

आणि हो,

शेवटचं सांगते ध्यानात ठेव,

माझ्या कुंकवावर घसरू नकोस. 

आणि घसरलाच

तर

ऐक

मी नाही कुंकू लावत जा

माझ्या पुढच्या सगळ्या लेकींच्या पिढ्या लावणार नाहीत जा

ती बायांची ओळख नाही

ती आमची विरासत नाही

आणि अस्तित्वही!

वाटलं तर आम्ही कुंकू लावून मिरवूसुद्धा मुक्तपणे

नाही तर फिरू उजाड कपाळाने आनंदाने!


हे पुरुषा,

मर्द बनायचं की माणूस ठरव

जमलं तर सोबत चाल

नाही तर तुझा हात सोडून जाण्याइतपत सशक्त आहेच मी

मग भटकत राहशील तू जगण्याच्या, मोक्षाच्या शोधात

एकटा, भणंग, अतृप्त आणि अपूर्ण

माझ्या विपरीत .. . 

 

लक्ष्मी यादव 

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form