ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेल्या दिवंगत आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी हे भारतीय साहित्यविश्वातलं एक समाजाभिमुख आणि सजग व्यक्तिमत्त्व होतं. लेखक आपल्या परीने समाजातील विविध प्रश्नांना कसं भिडू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची आत्मकथा हा त्यांच्या उत्कट लिखाणाचा नमुना आहे. इंदिरा गोस्वामी यांनी आपली आत्मकथा तिशीच्या आतल्या वयातच लिहिण्यास सुरुवात केली. ऐन पंचविशीतच वैधव्य आल्यामुळे त्यांची मनःस्थिती नाजूक बनली होती. अशा काळात होमेन बोर्गोहाइन या ज्येष्ठ साहित्यिकाच्या प्रेरणेने त्यांनी आत्मकथन लिहिण्यासाठी हाती लेखणी घेतली. १९४२ साली जन्मलेल्या इंदिराजींना १९६८ मध्ये आत्मकथन लिहिण्याविषयीचं पत्र बोर्गेहाइन यांनी लिहिलं. प्रत्यक्षात मात्र १९८६ मध्ये या आत्मकथनाचा पहिला भाग ‘आसाम वाणी’ या पत्रिकेतून प्रकाशित झाला. ‘आध लेखा दस्तावेज’ हे त्याचं शीर्षक. An Unfinished Autobiography, त्याचा इंग्रजी अनुवाद १९९० मध्ये आला.
आपल्या बालपणाबद्दल, शिलाँग इथे गेलेल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल पहिल्या भागात त्यांनी लिहिलं आहे. खरं तर, ‘या मुलीचे ग्रह इतके वाईट आहेत, की हिचे दोन तुकडे करून, ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात तिला फेकून द्या’, असं घरच्या ज्योतिषाने सांगितलं होतं...पण तसं केलं गेलं नाही. त्यांचं घर तसं संपन्न होतं. आजोळच्या घरी तर लहानपणी त्या आपल्या भावाच्या सोबतीने घरी असलेल्या हत्तीशी खेळत असत. घरातला राजेंद्र नावाचा हत्ती त्यांना फार आवडत असे. पण पुढे पिसाळल्यावर त्याने एका माणसाचा बळी घेतला. मग सरकारी आदेशावरून त्याला गोळी घालण्यात आली. त्यांचे वडील विद्वान होते आणि सरकार दरबारीही त्यांचं वजन होतं. आपल्यावर वडिलांचा विलक्षण प्रभाव असल्याचं इंदिराजींनी लिहिलं आहे. वडील गेल्यानंतर अत्यंत अस्वस्थ झाल्यामुळे त्यांची अवस्था नाजूक बनली. सैरभैर अशा मनोवस्थेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्यातून त्या वाचल्या. प्रचंड मानसिक तणावाखाली असतानाच्या काळात पुढेही त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार उसळी मारून येत असे. ऐन तारुण्यात केलेल्या या कृत्यामुळे समाजात मात्र त्यांच्याबद्दल कुजबुज सुरू झाली. वडील जाण्याचं दुःख कसलं, वेगळंच काही कारण असणार (म्हणजे हिला दिवस गेले असणार), असं बोललं जाऊ लागलं. विशीच्या वयातले हे मानसिक आघात पेलणं त्यांन फारच त्रासदायक ठरलं. ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्यानुसार, त्यांच्या आयुष्यात अनेक दारुण प्रसंग, दुःखं आणि आव्हानं आली. पण सारं काही पचवत, त्यातून त्या स्वबळावर बाहेर पडल्या.
इंदिराजींनी तरुण वयातच आयुष्याचे अनेक पदर अनुभवले. आनंदाने फुलवणारे क्षण अल्पकाळच यांच्या वाट्याला आले. वडील असताना अनेक चांगली स्थळं सांगून येत होती. त्यांच्या मृत्यूनंतर दिवस फिरले आणि आत्महत्येच्या प्रयत्नानंतर परिस्थिती आणखीच बिकट झाली. विधवा आईला या मुलीची चिंता होतीच, शिवाय इतर मुलींच्या लग्नाचीही काळजीही तिला लागली होती. १९६३ मध्ये माधवन रायसम अय्यंगार या तरुणाशी इंदिराजींची ओळख झाली. तो होता कर्नाटकचा. इंजिनियर असलेला हा तरुण नोकरीच्या निमित्ताने गुवाहाटीला आला होता. इंदिराजींच्या प्रेमात पडून त्याने लग्नाविषयी विचारलं. त्यांचा विवाह झाला. माधवन, ज्याचा उल्लेख त्या ‘माधू’ म्हणून करतात, त्याची इच्छा होती की इंदिरेला त्या वातावरणातून बाहेर काढायला हवं. मोकळ्या जगात मनमोकळा श्वास तिने घ्यायला हवा. मग माधूबरोबर त्या गुजरातेत गेल्या. तिथे एका पुलाच्या कामावर माधूची नेमणूक झाली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये जाण्याचा योग आला. दोन्ही ठिकाणी आलेले अनुभव, भेटलेली माणसं याबद्दल इंदिराजींनी लिहिलं आहे. बांधकाम मजुरांची होणारी पिळवणूक, कंत्राटदारांकडून होणारा अन्याय, या मजुरांचं असुरक्षित जीवन इंदिराजींना विचलित करून गेलं.
काश्मीरमधलं जीवन तर आणखीच खडतर होतं. तिथली थंडी, बर्फ हे सारं नवीन होतं. तिथल्या वास्तव्यात इंदिराजींच्या मनात शकुन-अपशकुनाच्या गोष्टी उफाळू लागल्या. त्या पुन्हा अस्वस्थ होऊ लागल्या. गुजरातच्या वास्तव्यात त्यांनी लेखन केलं होतं. काश्मिरातही ‘चिनाबेर स्रोत’ ही कादंबरी त्यांनी लिहायला घेतली. साधू, महंत, बाबा मंडळींचंही त्यांना आकर्षण होतं. त्यांच्यावर त्यांची श्रद्धाही होती. जंगलचा रस्ता तुडवत एकदा भर पावसात त्या एका साधूला भेटायला गेल्या. आपल्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे असं त्यांना वाटायला लागल होतं. झालंही तसंच. माधूचा साईटवर जाताना आपघातात अचानक मृत्यू झाला. ऐन पंचविशीत इंदिरा विधवा झाली. हा धक्का घायाळ करणारा होता.
यानंतरचा काही काळ त्यांनी लष्कराच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. १९६८च्या सुमारास विधवा स्त्रीने एकटीने जगणं हा विदारक अनुभव होता. गुवाहाटीला घरी असताना त्यांनी विधवांना मिळणारी वागणूक पाहिली होती. इंदिराजींनीही विरक्त राहून, गरिबांच्या सेवेत सारं आयुष्य घालवावं अशी नातेवाईकांची इच्छा होती. प्रेमाचा हात पुढे करणारा एक शीख तरुणही त्यांना या काळात भेटला. पण माधूची आठवण त्यांच्या मनातून पुसली जाणं शक्य नव्हतं. या काळातील स्वतःच्या दोलायमान मनोवस्थेच्या अनेक आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. आत्महत्येचा विचार तर त्यांचा स्थायिभावच बनला होता. झोपेच्या गोळ्या साठवून ठेवण्याचा प्रयोगही त्या करत होत्या. अचानक त्यांनी सैनिकी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. फारतर वर्षभर त्यांनी ही नोकरी केली असेल. आता आणखी एक नवं वळण त्यांच्यासमोर उभं होतं.
नामवंत लेखक आणि संशोधक उपेन्द्र चन्द्र लेखारू त्यावेळी वृंदावन इथे राहून रामायणावर संशोधन करत होते. इंदिराजींनी या कामात मदत करावी अशी त्यांचा इच्छा होती. आसामातील रामायणकर्ता कंदली आणि रामचरितमानसकर्ता तुलसीदास यांचा तुलनात्मक अभ्यास इंदिराजींनी करावा असं ठरलं. १९६९च्या ऑगस्ट महिन्यात त्या वृंदावनला गेल्या. मथुरा आणि वृंदावन अशा दोन्ही ठिकाणी विधवा आणि निराश्रित स्त्रियांचं वास्तव्य होतं. वृंदावनमध्ये राहून अभ्यास-लेखन करतानाच, तिथल्या विधवांची दारुण अवस्था इंदिराजींनी जवळून पाहिली. तिथल्या आयुष्याबद्दल त्यांनी तपशिलात लिहिलं आहे.
अनेक विधवांशी आणि निराश्रित स्त्रियांशी त्यांनी बातचीत केली. त्यांची दुःखं जाणून घेतली. आपल्याला मृत्यूनंतर सद्गती मिळावी म्हणून या स्त्रिया पैसे साठवत. त्यांना आश्रय देणारे ब्राह्मण आणि पंडे या पैशावर डोळा ठेवून असत. जर पैसे मागे ठेवले नाहीत तर आपले यथेष्ट अंत्यसंस्कार होणार नाहीत, ही भीती या स्त्रियांना असे. त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थांतूनही असे गैरप्रकार चालत. ‘राधाश्यामी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रिया पूर्व बंगाल (पाकिस्तान), पश्चिम बंगाल अशा दूरच्या प्रदेशांतून आलेल्या असत. त्यांच्या दारुण आयुष्याच्या अनेक कहाण्या इंदिराजींनी तिथे पाहिल्या. त्यातूनच पुढे त्यांची ‘नीलकण्ठी व्रज’ ही कादंबरी साकारली.
विधवा असल्याने त्यांनाही अनेक दुःखदायक, अपमानकारक असे अनुभव येत. त्या आपल्या गुरूबरोबर साधूंच्या बैराग्यांच्या दर्शनाला जात. तिथे एका साधूने, विधवा असल्याने इंदिराजींच्या आयुष्याला कसा अर्थ नाही असं बोलून त्यांचा अपमान केला. तर एकदा एका महंताने भविष्य जाणून घ्यायचं असेल तर, माझ्याबरोबर तुला अंगावर कपडा न घालता एकान्तध्यान करावं लागेल, फारतर वल्कलं घातली तर चालेल, अशी ‘ऑफर’ दिली. गूढ, अतीन्द्रिय शक्ती आणि ज्योतिष यावर विश्वास असला तरी इंदिराजींना हे अनुभव पचवणं कठीणच गेलं. आश्रमांमधून चालणारे गैरप्रकारही त्यांनी पाहिले होते. रामायणाच्या संशोधनकार्यात मात्र त्या रमल्या. रामायणातील शंबूकवधासारख्या घटनेवर घेतले जाणारे आक्षेप त्यांना योग्य वाटू लागले. तुलसीदासाने स्त्रियांबाबत जी अनुदार भूमिका घेतली आहे, ती त्यांना पटली नाही. मात्र तुलसीदासाच्या रचनेतलं सौंदर्य आणि मानवी नात्यांबद्दलचे त्यांचे विचार इंदिराजींना विलोभनीय वाटले. प्रो. लेखारू आणि त्यांची पत्नी यांचा प्रेमळ सहवास हाही एक दिलासाच होता. त्या जरी स्वतंत्रपणे एका खोलीत राहत असल्या तरी प्रो. लेखारूंचा त्यांना नेहमीच आधार वाटला. वृंदावनसारख्या ठिकाणी त्यांनी तरुण वयात घेतलेला अनुभव त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता.
आपल्या चाहत्यांच्या आग्रहावरून इंदिराजींनी हे आत्मकथन लिहिलं. ‘आध लेखा दस्तावेज’ म्हणजे ही अधुरी आत्मकथा आहे. अगदी सुरुवातीच्या आयुष्यातील ठळक घटनांचा केवढा त्यात समावेश आहे. त्यातून उभी राहते लेखिकेची प्रतिमा. तिच्या मनातली आंदोलनं. तिने उत्कटतेने अनुभवलेला माधूचा सहवास...जीवन-मृत्यूच्या कल्लोळात तिने केलेला हा तारुण्यातला प्रवास तिच्या व्यक्तिरेखेत अनेक रंग मिसळवणारा ठरला...लेखिकेची ही आत्मकथा अधुरी असली तरी त्यात एक जबरदस्त अनुभव आहे. संवेदनांचा, भावनांचा एक आवेग आहे, लोट आहे. एका स्त्रीला ती केवळ एक स्त्री आहे म्हणून जे जगावं लागलं त्याचं चित्रण यात आहे...वयाच्या तिशीपर्यंत लेखिकेने घेतलेले अनुभव खरोखरच विलक्षण असे आहेत. ही अधुरी आत्मकथा एक खोल ठसा मनावर उमटवते. तशी तर प्रत्येकच आत्मकथा ही अधुरीच असते; नाही का?