पुरुषाचे सौंदर्य !

पक्षी-प्राण्यांमध्ये नराचे सौंदर्य हा सर्वांच्याच कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय असतो,पण मानवातील नर म्हटला की त्याच्या सौंदर्यापेक्षा शौर्याबद्दलच बोलणे स्वाभाविक मानले जाते. पुरुष हा नेहमी ‘शौर्यवान’च असला पाहिजे असा मानवी समाजाचा नियम बनून गेला आहे. एखादा पुरुष नटूथटू लागला की त्याची वेगळ्याच अँगलने चर्चा होते. पुरुषावर ‘मर्द’ बनण्याची सक्ती समाज करतो आणि ही मर्दपणाची व्याख्याही शौर्याशी आणि त्याच्या लैंगिकतेशीच संबंधित असते. अनेक पुरुष आपला मर्दपणा आपल्यापेक्षा महिलांवर अजमावतात, तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते - पण त्याचवेळी जर एखादी स्त्री वरचढ ठरली तर पुरुषाला हिणवलंही जातं. कायद्याने मर्दानगीला वेसण घातली असली तरी समाजमन मात्र मर्दानगीला भूषण मानतं. पुरुषप्रधान व्यवस्थेने पुरुषाची अशी काही गोची करुन ठेवली आहे की त्यालाही कुणाचे न कुणाचे तरी फटके खावेच लागतात!

माणसाच्या जडणघडणीचा सुरुवातीचा काळ पाहिला तर जंगली अवस्थेत असताना पुरुष हा सतत भटकत राहाणारा तर स्त्री नैसर्गिक कर्तव्यांमुळे एका जागेवर स्थिरावणारी - अशीच काहीशी मांडणी केली जाते. स्त्रीनेच कुटूंब, शेती आदींचा शोध लावला पण या सर्वांचा मालक आज पुरुष बनला आहे. स्त्रीप्रधान संस्कृती जावून पुरुषप्रधान संस्कृती का आली हा स्वतंत्र विषय आहे. समानतावादी कार्यकर्त्या दिवंगत कमला भसिन या एक प्रश्न विचारायच्या - ‘पितृसत्ता’च्या विरोधी शब्द कोणता? - सहाजिकच ‘मातृसत्ताक’ असं उत्तर दिलं जायचं! 
तेव्हा त्या सांगायच्या की, “ नाही! ‘पितृसत्ता’चा विरोधी शब्द हा ‘समानता’ असाच असला पाहिजे. पुरुषांची सत्ता जाऊन स्त्रीयांची सत्ता आली तर समानता कशी निर्माण होईल?’ कुणा एकाची सत्ता ही दुसऱ्या कुणावर तरी अन्याय करणारीच असू शकते.”

जगाचा इतिहास पाहिला तर हा भटका पुरुष जगण्यासाठी सतत आक्रमणकर्ता बनलेला दिसतो. जंगली अवस्थेत श्वापदांवर ताकद अजमावणारा पुरुष हळूहळू दुसऱ्या कबिल्यातील पुरुषांवर शस्त्र चालविताना आणि स्त्रीयांचा उपभोग घेताना दिसतो. हळूहळू त्याची लढाई पोटापुरती मर्यादीत राहिलेली नसते तर त्याही पलिकडे सत्ता व उपभोगासाठी स्त्रीया आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी तो मरतानाही दिसतो. जगातील अनेक लढवैय्ये पुरुषच आहेत, स्त्रीयांनीही लढाया लढल्या परंतु त्या प्रत्यक्ष रणांगणात अपवादानेच उतरल्या. स्त्रीयांची लढाई ही रणांगणापेक्षा मनांगणातच जास्त दिसते. अनेक स्त्रीयांच्या मनांगणातील लढाया पुरुषांना रणांगणात उतरण्यास मजबूर करणाऱ्याही ठरलेल्या दिसतात. जगातील सर्व प्रमुख धर्म हे पुरुषांनीच स्थापन केलेले आहेत! परंतु एक बाजू अशी दिसते की सत्ता मिळविल्यानंतर बाकीच्यांना आपल्या ताब्यात ठेवणे, त्यांना आपल्या विचाराप्रमाणे आचरण करण्यास लावणे ही प्रेरणा त्यामागे असावी. जो विजेता असतो - तोच सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवतो, त्यातल्या बहुतांश नियमांच्या केंद्रस्थानी तो असतो, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ त्याचाच असतो. तो इतरांना अनेक अधिकार नाकारतो आणि स्वत:साठी सर्व अधिकार राखून ठेवतो. धर्म स्थापन करणं, त्याची अंमलबजावणी, त्याचा प्रचार-प्रसार करणं आणि त्यासाठी प्रसंगी लढाया, समाज विघातक गोष्टी करणं हे सर्व पुरुषांनीच केलं. शस्त्रापासून शास्त्रापर्यंत पुरुषाचेच वर्चस्व ! त्यामुळे लढवय्या पुरुषाच्या बाहुबलाचे कौतुक होत गेले, तसा त्याचा चेहरा राकट बनत गेला!
पुरुष म्हणजे भरदार मिशा, बोलण्यात जरब, चालण्यात रुबाब वगैरे वगैरे अपेक्षा केल्या गेल्या. पुरुषाला कठोर असावं लागतं, हळवं असून चालत नाही. मर्दपणाची जी व्याख्या आहे ती पुरुषाला त्याच्यातील माणूस मारण्याची जबरदस्ती करते. लढणारा पुरुष चालतो पण रडणारा पुरुष चालत नाही. रडणे देखील नैसर्गिक आहे, पण रडण्याच्या-बोलण्याच्या पद्धतीलाही लिंगभाव (जेंडर) चिकटविण्यात आला. त्यामुळे बायकी बोलणं आणि पुरुषी बोलणं असं लेबलही लावलं जातं. ‘बायकी’ हालचाली करणारा सैनिक मनाला पटत नाही !
‘वेडात मराठे विर दौडले सात’ या चित्रपटात मावळ्याची भूमिका साकरणाऱ्या सत्या मांजरेकर या कलाकाराचे बोलणे प्रस्थापित चौकटीतील मावळ्यासारखे न वाटल्याने त्याच्या ‘पुरुष असण्याबद्दल’ जी विखारी टीका करण्यात आली त्यावरुन टिकाकारांची सांस्कृतिक जडणघडण उघडी पडली. मावळा मिशीशिवाय असूच शकत नाही, वास्तवात ‘बायकी’ पद्धतीने बोलणारी व्यक्ती मावळ्याची भूमिका करु शकत नाही अशा प्रकारचे थिल्लर आक्षेप घेवून अनेकांनी आपला “मर्दपणा” सिद्ध केला. अजून चित्रपटाचे चित्रीकरण जेमतेम सुरू होते आहे. जर चित्रपटात ऐतिहासिक सत्याशी छेडखानी केली गेली तर होणारा संताप एकवेळ मान्य करता येईल. परंतु केवळ बोलण्याच्या पद्धतीमुळे सत्या मांजरेकराला ‘नामर्द’ आणि भूमिकेसाठी नालायक ठरविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. शिवाजी महाराजांच्या जडण घडणीत जीजाऊंचा हात होता, अनेक स्त्रीयांनी शत्रूशी दोन हात केले, तरीही लढाई करणे आणि जिंकणे हे केवळ मर्दाचेच काम वाटत असेल तरआश्चर्यच नाही का ? स्त्री आणि स्त्रीसारखी हावभावांची शैली असणारे पुरुष हे कमजोर आहेत - असा भ्रम तर अशा लोकांना झाला नसेल ना? लिंगाचा शौर्याशी संबंध कशाला जोडायचा?

पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदे घेणाऱ्या पुरुषाला तीच व्यवस्था असे चटके देते!    


जंगली प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या प्रमाणे बोलणारे, हालचाली करणारे मानवी बाळ कौतुकाचा विषय बनते, मग तोच नियम लहानपणापासून महिलांच्या सोबत राहिल्याने व प्रभावाने महिलांसारखे बोलणे, चालणे बनलेल्या पुरुषाला का लागू होत नाही? असं म्हणतात की दादा कोंडके यांनी तमाशाप्रधान चित्रपटांत नाच्याची भूमिका करणाऱ्या गणपत पाटील या कलाकाराच्या मर्दानगीवर जाहीर राजकीय सभेत कोटी केली. त्यावर गणपत पाटील यांनी दुसऱ्या एका सभेत उत्तर दिले - ‘ मला नामर्द म्हणणाऱ्या दादांना मी सांगू इच्छितो की मला मुलं आहेत, दादा स्वत:ला मर्द म्हणवतात तर त्यांनी सांगावं की त्यांना किती मुलं आहेत’ - अर्थात यातून सांगायचा मुद्दा हाच की मर्दपणाचे जे काही नियम बनवले आहेत ते आधुनिक जगात कुचकामी आहेत. क्षमता असो नसो, पुरुषावरच संपूर्ण कुटूंबाचा भार टाकला जातो, त्याच्यापेक्षा क्षमतावान स्त्री कुटूंबात असली तरी पुरुषाकडूनच अपेक्षा केली जाते, अनेक पुरुष या अपेक्षेमुळे कुंथत जगतात ! पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदे घेणाऱ्या पुरुषाला तीच व्यवस्था असे चटके देते!
आधुनिक जगात पुरुषांकडून केवळ पारंपरीक विखारी मर्दानगीची अपेक्षा करणं आणि ते न मिरवणाऱ्यांना हिणवणं हे पुरुषांसाठी देखील अन्यायकारक आहे! तो माणूस आहे, त्याच्याकडून सतत आक्रमकतेची अपेक्षा करणंही चुकीचं आहे. नुसत्या बाह्यरुपावर आधारीत केलेली सौंदर्याची व्याख्या अन्यायकारक व अपुरी आहे. पुरुषाच्या हृदयातही अपार प्रेम, माया असते. एरव्ही लपून छपून आसवे गाळणाऱ्या बापाचा बांध मुलगी सासरी जावू लागली की सर्वांसमक्ष सुटतो. मुळात प्रत्येक पुरुषात स्त्रीचा अंश असतोच. त्यामुळे त्यात स्त्रीत्व असणारच ! अनेक पुरुष मातृहृदयी असतात. हे सर्व पुरुषांचे सौंदर्यच तर आहे !
जगभरात विज्ञानवादी, समतावादी, न्यायवादी व मानवतावादीही पुरुष होऊन गेलेत. प्रामुख्याने भारताचा विचार केला तरी सिद्धार्थ गौतम, महामानव जोतिबा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक उदाहरणे दिसतील. याचे कारण पुरुषाचा मर्दपणा म्हणजे केवळ क्रूरता किंवा दुसऱ्यावर वर्चस्व गाजविणे या व्याख्येला या महामानवांनी छेद दिला. त्यांना पुरुषांनीच तयार केलेल्या वर्चस्ववादी, विषमतावादी व्यवस्थेविरोधात संघर्ष करावा लागला. त्यांनी वैचारीक लढा दिला, त्यांच्या लढ्यामागे पारंपरीक मर्दपणा नव्हता तर विचारांचे सौंदर्य होते.म्हणून पुरुषाचे केवळ बाहूबल पाहण्यापेक्षा त्याचे भावनिक, वैचारिक, बौद्धिक सौंदर्यही पाहिले पाहिजे! 



संदीप तेंडोलकर

मुक्त पत्रकार

4 Comments

  1. अतिशय उत्कृष्ट लेख आहे पुरुषांच्या दुसऱ्या बाजूचाही विचार केला गेला आहे... प्रत्येक पुरुषाला त्याच्या क्षमतेनुसार व भौतिकोवतीनुसार न्याय मिळाला पाहिजे व तसेच वागण्याची मुभा मिळाली पाहिजे हीच समानता आहे

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form