ताल से ताल मिला

“नाच आपल्याला देहभान विसरायला लावतो. इतकं मोकळं, स्वतंत्र, उत्साही मला कित्येक वर्षात वाटलं नव्हतं.” - अनंता भोजे सांगत होत्या. गरब्याच्या गाण्यांवर नुकत्याच थिरकून आल्यासारखा उत्साह आजही त्यांच्या आवाजातून ओसंडत होता. त्या २ ऑक्टोबरच्या रात्री खास अंध व्यक्तींच्या साठी आयोजित केलेल्या गरबा नाचात खेळून आल्या होत्या. ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन (BPA) या संस्थेने हा कार्यक्रम ग्रॅंटरोडच्या नानाचौकात आयोजित केला होता. नानाचौक नौरात्री उत्सव मंडळाने त्यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली होती. शिवाय, आलेल्या मंडळींच्या जेवणाचीही व्यवस्था केली होती. BPA च्या सदस्यांनी गरब्याच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला. शंभराहून अधिक अंध स्त्री-पुरूष यात सहभागी झाले होते. यांपैकी काही पूर्णतः दृष्टिहीन तर काही अंशतः दृष्टिहीन होते. हे सगळं वाचल्यावर अनेक डोळस व्यक्तींना असाही प्रश्न पडू शकतो की अंध व्यक्तीना नाचता देखील येतं का?

आपण सण, उत्सव हे ‘साजरे’ करतो. दिवाळीत दिव्यांची रोषणाई, रांगोळीची सजावट, होळीत रंग खेळणं, क्रिस्मसला वा ईदला आप्तेष्टांना भेटणं, भेटवस्तू देणं-घेणं अशा कितीतरी गोष्टी त्यात येतात. आपण आनंद व्यक्त करण्यासाठी बहाणा शोधत असतो. बारसं, मुंजी, लग्न अशा घरगुती समारंभातही आपल्याला मजा करायला आवडतं. पण, अपंगेतर लोक या सर्व प्रकारांचा जितक्या मोकळेपणे आनंद लुटू शकतात तितका सहज आनंद या सणवारी अपंग लोकांना मिळतो का? – याचा एकदा विचार करून पहा!
मी स्वतः अंध आहे. मला पण नाचायला खूप आवडतं! नटूनथटून सणसमारंभात सहभागी व्हायला देखील आवडतं. पण मलाही अशा ठिकाणचा फारसा बरा अनुभव नाही. माझ्यासारख्या अनेक मित्र-मैत्रिणींशी बोलल्यावर समजलं की, ही फक्त आपली अडचण नाही. काही सणसमारंभ असला की नातेवाइक आणि ओळखीच्या लोकांची गर्दी होते. अशावेळी आपल्या स्वतःच्या घरातसुद्धा स्वतंत्रपणे फिरण्यावर बंधनं येतात. लोकांना माझा धक्का लागला तर? ही भिती अंधव्यक्तीच्या मनात ठाण मांडते. त्यामुळे कित्येकदा नैसर्गिक विधींसाठी जाण्यासाठीही कोणावर तरी अवलंबून रहावं लागतं. घरात कार्यक्रम असला तरी ही परिस्थिती असते. मग, सार्वजनिक सणसमारंभात तर आणखी आव्हानं अपंग व्यक्तींपुढे उभी राहतात. आपल्याकडले सार्वजनिक उत्सव म्हणजे गणपती आणि नवरात्र. घराबाहेर, अनोळखी ठिकाणची अवस्था तर आणखी बिकट असते. देवतांच्या मांडवात स्वतंत्रपणे जाता येणं हेच सर्वात मोठं आव्हान अपंग व्यक्तींपुढे असतं.
हौसेने गरबा खेळणारी माझी आणखी एक अंध मैत्रीण म्हणते – “आम्हीही नाचू शकतो! पण, डोळसांमध्ये नाचताना आपल्या अपंगत्वामुळे आपण हास्यास्पद ठरू - अशी भीती वाटते. त्यामुळे मी घरचे कार्यक्रमही टाळत असते. गोलात नाचताना त्यांना आपण धडकलो तर? ही भिती इतकी मोठी होत जाते की, हे सण-उत्सव आपल्यासारख्या अपंग व्यक्तीसाठी नाहीत असाच समज दृढ होत जातो.”
पण, या समस्यांना चॅलेंज करून जेव्हा अपंग लोक एकत्र येतात तेव्हा निखळ उत्साह भोवताल व्यापून टाकतो. हाच विश्वास केंद्रस्थानी ठेवून ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन या संस्थेने २ ऑक्टोबरच्या रात्री ग्रॅंटरोडच्या नानाचौकात अंध लोकांसाठी गर्ब्याचं आयोजन केलं होतं. नानाचौक नवरात्री उत्सव मंडळाने ह्या कार्यक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून दिलीच शिवाय, येणाऱ्या हौशी मंडळींच्या जेवणाचीही व्यवस्था केली. BPA च्या मोना टेलर, संजय पोरे, मनोहर जडियार, नितिन मुळे, सरला पाढी, अनंता भोजे या सदस्यांनी गर्बा आयोजनात मोलाचा वाटा उचलला. १०० हून अधिक अंध स्त्री-पुरूष या गरब्यात सहभागी झाले होते. यांपैकी काही पूर्णतः दृष्टिहीन तर काही अंशतः दृष्टिहीन होते. अतिशय विचारपूर्वक ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. आपल्या अपंगत्वाचा सकारात्मक स्विकार करून, अपंग व्यक्तीनी सर्वांना एकत्र करून खास आपल्या दृष्टिकोनातून हे नियोजन केलेलं होतं. गोलात नाचण्यासाठी जाणीवपूर्वक पूर्णतः अंध माणसाच्या जवळ अंशतः अंध माणसाला जागा दिली गेली होती. त्यामुळे जर कोणी गोलातून बाहेर जातंय असं वाटलं तर, त्यांना पुन्हा ओळीत आणणं, नाचताना ऍक्शन्स, स्टेप्स बदलल्या की, आपल्याबरोबर त्यांना नाचायला लावणं – कार्यकर्त्यांना सोपं जात होतं.

या अशा कार्यक्रमातून नेमकं काय साधलं जात असेल? असा प्रश्न अनेक डोळस माणसांना पडू शकतो. माझ्या एका मैत्रिणीने ते अगदी नेमक्या शब्दात ते सांगीतलंय. ती म्हणते - ‘सगळेच आपल्यासारखे असल्याचा खूप मोठा कम्फर्ट झोन इथे असतो. कोण कसं नाचतंय हे तपासणारी नजर इथे कोणाकडे नसतेच. शिवाय कोणाला धक्का लागला तर - ही भितीच इथे नसते. आणि म्हणूनच अशा खास आपल्यासाठीच्या कार्यक्रमांची गरज भासते आणि त्यांचं महत्त्व आपल्यालाच कळतं.’ - ती इतकी पोटतिडकीने बोलत होती, की तिचं बोलणं ऐकताना वाटलं की, हे माझेच विचार आहेत आणि शब्द तिच्या तोंडून बाहेर पडताहेत.
अशा कार्यक्रमातून अपंगत्वामुळे आलेलं वेगळेपण हे सकारात्मकपणे स्विकारण्याचा विचार समाजापर्यंत पोहोचवला जातो. आपलं अपंगत्व हे जगण्याचं आव्हान आहे, अडचण नाही हा आत्मविश्वास अपंग व्यक्तीला मिळतो आणि मिळते भरपूर ऊर्जा! ही ऊर्जा पुढले कितीतरी दिवस शरीर आणि मनही तजेलदार ठेवते. उत्साहाने आपलं काम करण्याची शक्ती देते. काही वेळासाठी तरी आमचं रोजचं जगणं हे एकप्रकरची लढाई असल्याचा विसर पडतो. नाच करताना आम्ही देहभान विसरतो तेव्हा आमच्या अपंगत्वाची तोचणारी जाणिव सौम्य व्हायला मदत होते. या नाचामुळे समाजाच्या तालाबरोबर ताल मिळवण्याची शक्ती पावलात येते!

अनुजा संखे 

 

 

2 Comments

Previous Post Next Post

Contact Form