रिक्त विरक्त

छाया कोरेगावकर ह्या लेखिकेची रिक्त विरक्त ही कादंबरी नुकतीच वाचली. तृतीय पुरुषी निवेदनात सांगितलेली ही कहाणी आहे - सावित्रीची. सावित्री ही काहीशी कालच्या पिढीतलीच. सामाजिक चौकटीत बंदिस्त व्यक्ती किती काय काय भोगतात आयुष्यभर याचीच ही कहाणी!

एक आडनिड अल्लड वयातली मुलगी प्रेमाच्या आशेवर एका तरूण मुलाच्या आकर्षणात पळून जाऊन त्याच्याशी लग्न करते. परंतु तो चांगला निघत नाही. दारू, मारहाण, घराबाहेर हाकलून देणं असं करत प्रेमाचे पर्यवसान ऐन विशीत पदरात एक मूल घेऊन ती माहेरी परतते. सावित्री नंतर शिक्षण पूर्ण करते, स्वतःच्य पायावर उभी राहते, स्वतःचं घर घेते, मुलाला वाढवते...
म्हणजे समाजाच्या दृष्टीने बाई चांगलं जगते.. नवऱ्याने सोडलेल्या बाईने असंच जगायला हवं. हिंमतीने...!
पण... इतकी वर्ष बाई आपल्या शरीराच्या भुका आणि प्रेमाची तहान मारून जगते. अगदी ऐन विशीपासून ते चाळीशी उलटेपर्यंत. याची खंत खेद ना कधी समाजाला असते, ना घरच्यांना, ना नातेवाईकांना...याच जागी पुरुष असला तर ... त्याच्या लग्नासाठी चहुकडून आग्रह धरला जातो.. सहानुभूती दर्शवली जाते.
जरी सावित्रीच्या लग्नासाठी प्रयत्न  केले असते, तरी त्या काळात आणि अजूनही एक मूल पदरात असलेली आणि घटस्फोटीत स्त्रीचं दुसरं लग्न होणं, तेही चांगल्या स्थळाशी होणं हे अतिशय कठीण होतं.
अशा चाळीशी उलटलेल्या सावित्रीच्या आयुष्यात एक तिच्याहून थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला विवाहीत, दोन मुलांचा बाप असलेला पुरुष येतो आणि तिचं आयुष्य ढवळून निघतं. घरी, दारी, ऑफीसमध्ये निंदा, नालस्ती, चौकशा, बडतर्फ्या, बदल्या यांना सतत या दोघांना सामोरं जावं लागतं. त्याला आपल्या पहिल्या बायको मुलांचा तिरस्कार आणि हकालपट्टी सहन करावी लागते. ऐंशी नव्वदचा काळ, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय पार्श्वभूमी, तसाच समाज, जातसंदर्भ.. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करणारा, त्याला सुखाने जगू न देणारा तेव्हाचा समाज. आजही ही परिस्थिती फारशी बदलली नसली, तरी थोडी निवळली आहे एवढंच..
दोघांचे एकमेकांवर प्रेम असते, आणि विचारसरणी सारखी असते एवढंच काय ते सूख... बाकी शरीरसुखाचा इथंही उजेडच असतो. जो पुरुष तिच्या आयुष्यात आलाय, तोही तिला शरीरसुख देऊ शकत नाही. थोडक्यात सावित्रीचं अख्खं आयुष्य शरीरसुखाला वंचित राहून जातं. प्रेमाची व्यक्ती आयुष्यात येऊनही ती उपाशीच राहते...रिक्त राहते.. विरक्त राहते... या अर्थाने कादंबरीचं शीर्षक अगदी नेमकं आहे.
खरंतर हे फार भयंकर आहे. एकदाच मिळालेल्या मानवी आयुष्यात एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे केवळ सामाजिक चौकटी, सामाजिक नीतीनियम, रितीरिवाज या कारणांनी आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित राहावं लागत असेल, तर ते भयंकर आहे. विकृत आहे. पण... असं आपल्या समाजात सहन करणाऱ्या हजारो सावित्री असतील. असतात. अगदी पुराणकाळापासून आणि इतिहासकाळापासून हजारो बायका आपल्या शरीराच्या वासना कायमच्या मारून जगल्या. बाईच्या शरीराचा विचार तिच्या सुखासाठी कुणी कधी केलेला दिसलाच नाही. विधवा, घटस्फोटीता, कुमारिका यांच्या शरीरसुखाचा विचार कुणीच कधी केला नाही नि अजूनही कुणी फारसा करत नाही.
पण.... कादंबरी सावित्रीच्या जीवनाची ही बाजू मांडण्यात कमी पडलीय. आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पुरुषामुळे सावित्रीला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं याचा पाढा जास्त वाचला गेला आहे. याऊलट एका मोठ्या सुखाला कायमचं वंचित राहिल्यामुळे तिच्या मनात आणि शरीरातही उठणारी वादळे, कल्लोळ, तगमग, विद्रोह, येणारे विचार हे सगळं कादंबरीत कुठंच फारसं येत नाही. त्याबद्दल सावित्री फार बोलतच नाही. हे सगळं यायला हवं होतं. पण इथंही बाई आपल्या शरीरसुखाबद्दल मौन बाळगतेय. बाईची लैंगिक उपासमार, उपासाचे दुष्परिणाम, हे सगळं बारकाईने मांडण्याची संधी लेखिकेने गमावली आहे. आणि कादंबरी बाईपणाच्या मर्यादेच्या चौकटीतच राहिली. आयुष्यात सुदैवाने आलेल्या दुसऱ्या पुरुषाकडूनही प्रेम मिळतं पण शरीरसुख मिळत नाही, तरी सावित्री त्याच्याऐवजी इतर पुरुषाचा विचार त्यासाठी करत नाही. कादंबरी ऐंशी नव्वदच्या काळातले मध्यमवर्गीय सामाजिक वास्तव, त्या काळातली स्त्रियांकडे, स्त्रीपुरुष संबंधांकडे पाहण्याची दृष्टी अधोरेखित करते. आजची सावित्री कदाचित वेगळी वागेल. स्वतःच्या शारिरीक वासनांची कोंडी ती इतकी करणार नाही.
ग्रंथाली प्रकाशनाची ही कादंबरी रसाळ आहे. वाचताना एक ओघ कायम राहतो. कंटाळवाणं होत नाही. त्यामुळे कादंबरी पूर्ण वाचून होते. हे या कादंबरीचं यशच म्हणायला हवं.
या निमित्ताने एक महत्त्वाची पण स्पष्ट अशी गोष्ट इथं सांगावीशी वाटते ती अशी की चाळीशी पन्नाशी उलटलेल्या पुरुषांकडून शरीरसुखाची अपेक्षा बाळगून त्याच्याकडे जाताना स्त्रियांनी देखील त्याच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे. लैंगिक सुख कुठल्याही पुरुषाकडून किंवा स्त्रीकडूनही मिळू शकेल हे गृहीत धरून चालू नये, एवढं तरी या कादंबरीतून नक्कीच कळतं. या वयातला पुरुष आपल्या शरीराच्या मागण्या किती पूर्ण करू शकेल याचा विचार सावित्रीच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने नक्की करायला हवा. मुख्य म्हणजे लैंगिक सुख आणि विवाह यांची गल्लत करून स्वत:ची फरपट करून घेऊ नये.

अलका गांधी असेरकर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form