प्रकृती देवीची कहाणी



ऐका प्रकृतीदेवी तुमची कहाणी.
एक आटपाट नगर होतं, त्या नगरात खूप माणसं राहत होती.
धावत होती, पळत होती ,पळत होती, धावत होती.
कोणी कोणाला ओळखत नव्हते आणि सगळेच सगळ्यांना ओळखत होते.
एकमेकांचे मित्र होते आणि तरीही एकमेकांना भेटत नव्हते.
काळाचा पट्टा धावतोय असे वाटून त्याचा वेग माणसं पकडू पाहत होती.
नगरातली स्त्री कमावती होती... रोज पहाटे उठायची, घाईगडबडीत आंघोळ करायची. असेल ते अन्न रांधायची. रांधता रांधताच चहा प्यायची. भराभरा डबे भरायची.
लेकाचं करायची, नवऱ्याचं करायची,सासू सासऱ्यांचं करायची.
आल्या गेल्याची सोय पहायची आणि ऑफिसच्या दिशेने धावत सुटायची. राबराबून पैसे मिळवायची. मिळवलेल्या पैशातून घरदारसाठी सुखाच्या शोभेच्या वस्तू जमवत राहायची.
असे ती वर्षोनुवर्षे करत होती. करता करता तिचे वय वाढू लागले. तिच्या कष्टाने कमावलेल्या वस्तू घरात दारात दिसू लागल्या. नवनवीन वस्तूंचा साठी ती आणखी धावत राहायची. धावता धावता एक दिवस तिचे पाय दुखू लागले, कंबर वाकू लागली. डोळ्याखाली काळी वर्तुळे होवू लागली. डोळ्यावरती चश्मा लागला. गळ्याभोवती पट्टा लागला. केस अकाली पिकू लागले. जिने चढताना धाप लागायला लागली. चालता चालता घेरी येऊ लागली. एके दिवशी काय झाले?
नेहमीप्रमाणे घरातून काही न खातापिता निघालेली बाई ऑफिसकडे धावता धावता अचानक रस्त्यात कोसळली. तिला कोसळताना पाहून एक शहाणी बाई पुढे झाली, तिला आधार दिला. रस्त्याच्या कडेच्या बाकावर बसवले. स्वत:कडचे पाणी प्यायला दिले. स्वत:कडचे फळ खायला दिले. तिला म्हणाली, “घाबरू नकोस, भिऊ नकोस. आजच्या दिवस विश्रांती घे.”
त्यावर घेरी आलेली बाई म्हणाली, “अग, बाईच्या जातीला विश्रांती शोभायची नाही. घरीदारी माझ्याशिवाय खोळंबा होईल. ऑफिसात बॉसचे अडेल. घरी नवऱ्याचे नडेल.”
शहाणी बाई म्हणाली, “काही कुणाचे अडत नाही, काही कुणाचे नडत नाही. विश्रांती हा प्रत्येकाचा हक्क आहे. बाईने तर विश्रांती घेतलीच पाहिजे.”
“विश्रांतीसाठी वेळ कसा काढावा?”
“त्यासाठी तुला प्रकृतीदेवीचे व्रत करावे लागेल!”
“हे व्रत कसे करावे?”
“आपल्या जीवनातले प्राधान्य ओळखावे. घरातल्यांशी छान संवाद साधावा.तिने घरातली कामे सगळ्यांना वाटून द्यावी. प्रत्येकाने आपल्या कामांची यादी करावी, आणि एकमेकांना आनंद देत ती कामे पूर्ण करावी. कोणते काम छोटे-मोठे नसते, हे घरातल्या लोकांवर बिंबवावे.प्रत्येकाला आपआपले काम करण्यास सांगावे. आपण रोज सकाळी उठावे, एखादे फळ खाऊन दिवस सुरू करावा. हलकासा व्यायाम करावा. न्याहारी करून शांत चित्ताने ऑफिसला जावे. परत घरी आल्यावर सगळ्यांची विचारपूस करावी. सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशीची तयारी करावी. असे दरदिवशी करावे”
ऐकता ऐकताच हे व्रत त्या घेरी आलेल्या बाईला फार फार आवडले, तिच्या मनात मोर नाचू लागले,तिला कामं वाटून देण्याची कल्पना आवडू लागली. तिने विचारले, “ बाईबाई एवढे व्रत सांगितले पण या व्रताच्या संपूर्णाला काय करावे ते ही सांग.”
शहाणीबाई म्हणाली,” हे व्रत कधीच सोडायचे नसते. उताय चे नाही, मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही. सुटीच्या दिवशी सावकाश उठावे, उठल्यावर गरम गरम पाणी प्यावे, मस्त आळोखेपिळोखे देत छान व्यायाम करावा. नवऱ्याने केलेला गरम गरम चहा प्यावा,मनात येईल तेव्हा सचैल स्नान करावे. मन प्रसन्न राहील अशी गाणी ऐकावी. आपलेच गाव पुन्हा नव्याने पाहावे, नाहीतर चित्रपट पहावा,आपल्या हातात रिमोट ठेवावा, नाहीतर एखादे पुस्तक वाचावे, गप्पा ठोकाव्या, चित्र काढावे, काहीही करावे आणि दिवस आनंदात घालवावा. होता होईल तितक्या अशक्त बायांना हे व्रत सांगावे. सर्व अडल्यानडल्या बायांचे आरोग्य सांभाळायला मदत करावी!”
व्रताचा महिमा ऐकून घेरी आलेली स्त्री उत्साहाने उठली. समोरच्या हॉटेल मध्ये जाऊन नाश्ता केला. ऑफिसला रजा टाकली. घरी जाऊन घरच्यांना व्रत सांगितले. तिची प्रकृती सुधारायला लागली. घरीदारी मान मिळू लागला.
मग तिला प्रकृतीदेवी प्रसन्न झाली. मग ती कधी कोमेजली नाही, ती आपली वाट शोधून पुढे जावू लागली.
अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.     

                                                                                         अश्विनी बर्वे 

                                                                     

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form