आठवणीतली अनिता.....

साधारण दोनहजार सालची गोष्ट असेल; आम्ही इंग्लिश डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी कॉलेज मॅक्झिनमध्ये लेख देण्यासाठी माहिती गोळा करत होतो. विषय असा होता की नाशिक भागामध्ये ज्या सामाजिक कार्यकर्त्या वेगवेगळ्या चळवळीतून काम करतात त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्या मुलाखती एकत्र करून माहितीपर लेख तयार करायचे. मार्गदर्शन करणाऱ्या प्रोफेसरने बरीच नावे सुचवली त्यामध्ये अनिता पगारे यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना भेटायचे ठरले. ती पहिलीच भेट होती, तरी अतिशय आपुलकीने, ओघवत्या भाषेत, त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांनी आपल्या कार्याबद्दल आम्हाला माहिती दिली. आमच्यासारख्या समाजकार्य प्रेरणेने प्रभावित झालेल्या विद्यार्थिनींना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. ह्या नंतर बराच काळ लोटला. जवळ संभाषणाची काही साधने नव्हती. अनिता मॅडम एक सामाजिक कार्यकर्ता आहेत एवढीच तोपर्यंत ओळख माहिती होती. बऱ्याच वर्षांनी नंतर पुन्हा एकदा फेसबुक वरून मॅडमशी कनेक्ट झाले.आता त्यांची भेट होईल आणि परत वैचारिक गप्पा होतील या भावनेने, मला खूपच आनंद झाला. 

आता त्यांचं कार्य खूपच पुढे गेलेलं होतं. त्यांच्या कार्याबद्दल बर्याच ठिकाणी वाचनात आलं आणि एकूणच त्यांच्या कार्याचा आवाका पाहून मी अवाक झाले. आता लक्षात आले की आता अनिता मॅडम खूप मोठ्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. कामेही खूप आहेत. त्यांचा फोननंबर मिळवला पण त्या आपल्याला वेळ देतील की नाही या संभ्रमात होते. त्यावेळी नाशिकला गेल्यागेल्या प्रथम मॅडमला फोन लावला आणि त्यांनी लगेच ‘उद्या ये’ म्हणून सांगितले. मला विश्वासच बसत नव्हता की आज स्वतःच्या कार्यामध्ये इतक्या व्यस्त असलेल्या आणि मोठ्या झालेल्या व्यक्तीने माझी काहीही ओळख नसताना माझ्यासाठी वेळ राखून ठेवला आणि मनापासून मला मार्गदर्शन केले. माझे पीएचडीचे संशोधन स्त्रीवादी कादंबऱ्यांवर होते आणि मॅडम स्वतः स्त्रीवादी चळवळीत होत्या. तर मला माझ्या संशोधनाला आजच्या परिस्थितीमध्ये जोडून हायपोथेसिस टेस्ट करता येईल का हे बघायचे होते. या कामात अनितामॅडमच्या अनुभवाची आणि एकूणच त्यांच्या कार्याची खूपच मदत झाली. परत एकदा समोरचा कितीही अनोळखी असू देत त्याला आपलेसे करून संभाषण करणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हा त्यांचा स्वभाव खूप भावला. 

आज जर त्यांच्याबद्दल जे काही आठवते त्यामध्ये सर्वप्रथम हीच गोष्ट सांगावीशी वाटते की चळवळीत असू देत किंवा मैत्रिणींमध्ये असू देत, लिखाणात असू देत त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि स्वभावातला पारदर्शकपणा नेहमीच लक्षात राहण्याजोगा आणि नमूद करण्याजोगा आहे. या भेटीमध्ये मी दिशा शेख यांच्या कार्याबद्दल उल्लेख केला आणि त्यांनी लगेच मला दिशाबरोबर जोडून दिले. ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अचानक दिशा त्यांच्या घरी आली तर त्यांनी स्वतःहून लक्षात ठेवून मला फोन केला आणि परत एकदा आम्ही भेटलो. खूप गप्पा,वेगवेगळे विचारप्रवाह आणि सामाजिक जाणिवा घेऊन मी मुंबईला परतले. मग जेव्हाही कधी फोन व्हायचा तेव्हा विचारांचे, प्रश्नांचे आदान-प्रदान होत राहिले. पुढे वंदना खरे यांनी माझ्या कामाची दखल घेऊन ‘पुन्हास्त्रीउवाच’ च्या संपादक मंडळांमध्ये मला स्थान दिले. तिथे जेव्हा परत अनिता मॅडम संपादक ग्रुपमध्ये भेटल्या तर कोण आनंद झाला! कारण तिथे प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण होणार होती, त्यांचे विचार, त्यांचे कार्य अजून जवळून बघायला, ऐकायला मिळणार होते.

कोणत्याही प्रसंगावरचे, कार्यक्रमातले त्यांचे विचार ऐकताना भारावून गेल्यासारखे व्हायचे. एखाद्या विशिष्ट घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासातून पाहायच्या आणि फक्त प्रश्न उपस्थित करणे हेच एका कार्यकर्त्याचे काम नसून त्यासाठी मदत शोधून त्यातून मार्ग काढणे हे काम किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी नेहमी पटवून दिले. त्यांच्या नेटवर्कमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांचे काम आवडले किंवा त्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांना त्या संदर्भात विचारले तर अशा सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्या लगेच जोडून देत. त्यांच्या स्वभावातली ही पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा क्वचितच कुठे पाहायला मिळतो. 
अगदी जानेवारी 2021 मध्ये एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून जायचे होते तेव्हाही त्यांच्या 'सावित्रीच्या लेकी' या चळवळीचा दाखला देऊ केला. त्यांना त्याबद्दल विचारले असता माझ्या भाषणाच्या संहितेत अतिशय पुरोगामी मुद्दे सांगून एकूणच माझा कार्यक्रम enriching आणि आयओपनर असा बनवून टाकला. अशा अनिता मॅडम ज्याच्या आयुष्याला स्पर्श करतील त्याचे विचार खरोखरच चकचकीत करून टाकत. असा 'मिडास टच' मेंटॉर तुमच्या आयुष्यातून अचानक निघून जातो तेव्हा लक्षात येते - खूप काही सांगायचे, खूप काही बोलायचे आणि खूप काही करायचे राहून गेले. आजपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या आठवणी मध्ये त्या कोणकोणत्या क्षेत्रात काम करत होत्या, वेगवेगळ्या चळवळीतले त्यांचे योगदान, शोषितांसाठी, गरिबांसाठी, स्त्रियांसाठी, आदिवासी जमातीसाठी, नर्मदा बचाव आंदोलनासाठी, तरुणांसाठी, कष्टकरी जनतेसाठी, मदत आणि मार्गदर्शन दोन्ही आघाड्यांवर किती धडाडीने आणि हिरिरीने काम केले याबद्दल लिहिले आहे. पण माझे हे आजचे शब्द म्हणजे आठवणींची ती फुले आहेत की ज्यांनी माझे आयुष्य आणि विचार सुगंधीत केले, कणखर केले. म्हणूनच अनिता मॅडम आता हाकेच्या अंतरावर फोनच्या अंतरावर किंवा नाशिकला घरी गेल्यावर घरात नाहीत हे सत्य मन मानायला तयार नाही!

डॉ. सीमा घंगाळे

(सदस्य, 'पुन्हास्त्रीउवाच' संपादक मंडळ)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form