फडावरचा गुढीपाडवा

फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. आपल्यासाठी गुढीपाडवा म्हणजे वर्षाची सुरूवात तर त्यांच्यासाठी तो सण म्हणजे त्या वर्षीच्या साखर हंगामाची अखेर. त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा म्हणजे एक प्रकारे ती वस्ती सोडण्याचा निरोप समारंभ! हंगाम संपल्याची हुरहूर आणि गावाकडे जाण्याचे लागलेले वेध अशा संमिश्र मनःस्थितीतला त्या वस्तीवरचा तो गुढी पाडवा. हा सण मी हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याच्या परिसरातील त्या वस्तीत अनुभवला.



होळी आणि धुळवड संपली तसे वस्तीवरचा प्रत्येक जण गुढीपाडव्याबद्दल बोलायला लागला होता. कुणी म्हणे पाडव्याला घरी परत जायची बांधाबांध सुरू करू तर कुणी म्हणे पाडव्याच्या मुहुर्तावर कारभारणीला सोन्याचे चार मणी आणि चांदीची पैंजणे विकत आणू़. कुणाला त्या दिवशी घरी न्यायला चार भांडी खरेदी करायची होती. कुणाला दवाखान्यात जाऊन पुढच्या सहा महिन्यासाठी औषधे आणायची होती. पोराबाळांना नवे कपडे तर मिळणारच होते. पाडव्याच्या दिवशी वस्तीवरच्या सर्व बायकांना हुपरीच्या अंबाबाईची खणानारळानी ओटी भरायची होती.
खरे तर हंगामाची अखेर आली की ऊस तोडणी कामगार सकाळी आणि संध्याकाळीही काम करत. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र फक्त सकाळचे काम असणार होते. त्या दिवशी दुपारी दोन नंतर सगळे आपापले राजे. शेवटी एकदाचा तो गुढीपाडवा उजाडला. त्या पाडव्याच्या दिवसाबद्दल इतकी चर्चा झाल्यामुळे मी केवळ उत्सुकतेपोटी आदल्या दिवशी कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर राहिले होते. त्या खोलीच्या खिडकीतून सगळया वस्तीचा नजारा दिसे.
गुढीपाडव्याच्या दिवशी साधारण चार ते साडेचारच्या दरम्यान सगळया झोपडया जाग्या झाल्या होत्या. एरवी वस्तीवरचे बापई म्हणजे.. उठले की निघाले शेतावर. बायका मात्र भराभर भाकऱ्या थापायच्या त्याच तव्यात भाजी परतायच्या आणि उगीच कसला अनर्थ घडू नये म्हणून त्या पेटलेल्या चूलीवर पाणी ओतून विझवायच्या आणि मग शेतावर पळायच्या.
पण ती पहाट वेगळी होती. त्या दिवशी वस्तीवरच्या अगदी सर्वांनी आंघोळी केल्या आणि प्रत्येकाच्या घरी साखर घालून दुधाचा चहा झाला. त्यासाठीचे दूध आदल्या दिवशीच आणले होते. एरवीचा म्हणजे बिनदुधाचा गूळ घातलेला काळा चहा - साखरकारखान्यासाठी काम करत असूनही अगदी हंगामाच्या शेवटी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो साखर मिळे. त्यानंतर प्रत्येक झोपडीच्या बाहेर गुढया उभारल्या गेल्या. या गुढीला उसाचे तुरे, खण आणि पांढऱ्या न् गुलाबी देवचाफ्याच्या माळा लावल्या होत्या. मात्र त्यावर भांडे पालथे न घालता पितळीचा डाव अडकवला होता. एव्हाना मी वस्तीत पोचलेच होते. माझी त्यांच्याबद्दलची उत्सुकता आता त्या सर्वांना माहिती असल्याने जवळ जवळ प्रत्येकाने मला गुढीला डाव लावण्याचे कारण सांगितले. डाव म्हणजे लवकर गावाकडे पोचवणारा शकून असल्याने वस्तीवरच्या गुढीवर डाव लावण्याची पध्दत होती. प्रत्येक गुढीच्या समोर एक पितळी थाळी ठेवलेली होती. त्यात हळद़ कुंकू़ बुक्का आणि खोबऱ्याचे तुकडे ठेवले होते. संध्याकाळी गुढी उतरली की खोबरे साखर खायची आणि वाटायची.
गुढीला साखरगाठीच्या माळा लावल्या नव्हत्या पण झोपडीच्या दाराच्या दोन्ही बाजूला ऊस वाढयासकट उभे केले होते. गुढीभोवती रांगोळया काढल्या होत्या. त्या दरम्यान पोरांनी आम्ही साखर शाळेत शिकविल्याप्रमाणे केलेल्या पताका वस्तीभर लावल्या. त्या सकाळी स्वैपाक करायचा नव्हता. ज्याच्या शेतातला ऊस तोडायचा होता त्या शेतकऱ्याच्या घरातून पोहे येणार होते. त्यात घरातून नेलेल्या शेव कुरर्मुयात शेतातले कांदे आणि कोथिंबिर मिसळून त्याचा शेतातच नाश्ता होणार होता.
त्या दिवशी दुपारी वस्तीवरच्या प्रत्येक घरात पाडव्यासाठी म्हणून पुरणाचा स्वैपाक होणार होता. आता ऊसाच्या फडात कुणी ठेवणीतले कपडे घालून जातं का़ पण आमच्या बायांना काय त्याचे - त्यांनी बाप्यांच्या कटकटीला न जुमानता चांगल्या चकमकीत जरीच्या साडया नेसल्या आणि वरून जुनेरं पांघरलं होतं.
स्वतः मुकादमाने वस्तीतल्या प्रत्येक पोरग्याला वीस रूपये दिले होते. त्यामुळे आज त्यांना कारखान्यासमोरच्या गाडयांवर चहा़,पाव़,वडा़,भजी... काय पाहिजे ते खाता येणार होते. मुकादम आक्काने म्हणजे त्याच्या बायकोने पाडव्याच्या निमित्ताने वस्तीमध्ये वाटण्यासाठी म्हणून गावातला आचारी बोलावून बुंदीचे लाडू करून घेतले होते.
एरवीचे कजाग असणारे मुकादम नवरा बायको आज भलतेच नरम झाले होते. दररोज गाडीतला ऊस कारखान्यात उतरवून झाला की त्या दिवसाचा हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला मुकादमाच्या दारात थांबावंच लागे. वस्तीवरच्या बाया मात्र दुपारी जेवणं झाली की मुकादमिणीकडे जात. ही मुकादमीण म्हणजे बडं प्रस्थ होतं. ती होती मुकादमाची तिसरी बायको. ती वस्तीवरच्या घरातल्या कटकटी आणि अडचणी हातासरशी सोडवीत असे. हंगामात कधी कुणाला गावाकडे जायची गरज असेल आणि रजा हवी असेल तर तिच्याकडे रदबदली केली की मुकादम निमूटपणे ते मान्य करी.
तर त्या पाडव्याच्या दिवशी ती दुपारी बारापासूनच तिच्या दारात बुंदीच्या लाडवाचा एवढा मोठा हारा घेऊन बसली होती. त्याच्याबरोबर कडूनिंबाच्या पानांची जिरे़ धणे़ चिंच आणि गूळ घालून केलेला चटणीचा सट होता. दुसरीकडे मोठा पाण्याचा डेरा होता आणि तिचा गडी हैबती ओगराळयाने अलमिनचे ग्लास पाण्याने भरून ठेवत होता. ही आक्का दूपारहून शेतातून घामेजून आलेल्या प्रत्येक कामगार बाईच्या हातात़ तिच्या घरातल्या माणसाच्या संख्येनुसार लाडू आणि कडूनिंबाची चटणी ठेवत होती. वर पाडव्याच्या दिवशी ती कडू चटणी खायची म्हणून दमही भरत होती.
बायकाही मग चटणी तोंडात धरून हैबतीकडून घेतलेले पाणी गटागट पिऊन घराकडे पळत होत्या. घरी आल्याबरोबर हात पाय धुवून भराभर कामाला लागत होत्या. एरवी आई घरी आली की भूकेने कालवा करणारी पोरे आज गाडयावरचं हे-ते खाऊन तृप्त होती. या बायांनी पोळया करायच्या म्हणून प्रथम कणिक आणि मूगाचे पीठ घालून मोठे कणकेचे गोळे भिजवले होते. एकीकडे पुरणाची डाळ रटरटत होती. ठेचलेल्या बटाटयाच्या भाजीसाठीचा हिरवा मसाला दगडावर वाटत होत्या. त्याबरोबर पोरीबाळी कटाच्या आमटीसाठी कोरडा मसाला तयार करत होत्या. पुरण वाटण्यासाठीचा मात्र खास पाटा. तो काही प्रत्येकीकडे नव्हता. वस्तीत चारपाच पाटे फिरत होते.
कृष्णा म्हणजे मुकादमिणीची खास. कारण ती तिच्या माहेर गावातली. तिने तिच्या चार पोळया झाल्याबरोबर एक गुढीला नैवेद्याला काढली. दुसरी पोरग्याच्या ताटलीत दिली. मग एका ताटलीत दोन पोळया़ थोडा भात़ एका वाडग्यात भाजी आणि मोठया तांब्यात कटाची आमटी घेऊन ती मुकादमाच्या दारात गेली.
मुकादमिणीने तिला पाडव्याचं हळदकुंकू लावता लावता तिच्या ताटावर बारीक नजर फिरवली. 
"पोळयाची कणिक जरा जाड होती जणू?" ती म्हणाली. 

"न्हाई आक्कासाब. तुमच्यागत कुटल्या आमच्या पोळया व्हायला." कृष्णी वरमून म्हणाली.

"असूं दे ग..पाडवा गोड म्हनायचा बग. जा. जेव जा आणि देवीची ओटी भराया संग जाऊ." मुकादमिणीने असं म्हणता क्षणी कृष्णीचा जीव थंडा झाला.

ती पटापट घरी आली. ताटं केली.. तर तिचं मालक म्हणालं "तळण कुटं हाय ग?” झालं का! तिनं डब्यातल्या चार कुरडया़ पापडया तळून पोराला मुकादमाच्या घरी पिटाळलं. "आये मुकादम काकीने आणखी दोन लाडू आणि चिच्चची चटणी दिल्या बग.." असं म्हणत पोरगं ताट घेऊन बसलं. हंगामाच्या दिवसात रोज अर्धपोटी रहायची सवय पडली होती. त्यामुळे आज एकदम पोट भरल्यावर झोपा यायला लागल्या.

‘फडावर झोपून कुठं चालतंय.. ते बी पाडव्याच्या दिवशी..’ असं म्हणत तिनं भांडी घासली. चूल सारवली. स्वतःचं आणि पोराचं तोंड धुवून पावडर टिकली केल्यावर..तिच्या मालकाला त्याची बायको कृष्णी ओळखेनाच झाली.. "कोण म्हनायच्या शहरातल्या आक्का काय वो.". असं तो चेष्टेनं म्हणाला.

तशी "जावा तिकडं तुमी!”..असं म्हणून कृष्णीनं जो मुरका मारला की तिच्या मालकालाच काय पण रिकामं फिरत असलेल्या मलाही कृष्णी म्हणजे अप्सराच वाटली.

हळूहळू मुकादमाच्या घरी पोळयाचा ढीग जमला. भात़, भाजी़, कटाची आमटी़, तळण, सगळं पोचवलं गेलं. वस्तीतल्या प्रत्येकाकडे हेच जेवण बनवलेलं होतं. आता वस्तीतून गावाकडे परतेपर्यंत मुकादमाच्या घरी स्वैपाक नव्हता. पुढचे काही दिवस घरातले कोयते कामाला गेल्यावर त्या वस्तीत राहिलेली पोरेही सकाळचे मुकादमाच्या घरीच जेवणार होती.
सगळयांची जेवणं उरकेपर्यंन्त संध्याकाळ झाली. गुढया उतरल्या. थाळीवर डाव वाजवले आणि सगळया वस्तीत खोबरे साखर वाटली. मग प्रत्येक घरातले नवरा बायको आणि मुले देवाला आणि खरेदीसाठी बाजाराला निघाले. हरणी आणि तिची सासू दोघीच फडावर आल्या होत्या त्यांच्या घरी बापई नव्हतं मग मुकादमिणीनेच त्या दोघींनाही कृष्णीबरोबर तिच्या रिक्षात घेतले.
थोडया वेळापूर्वी गजबजलेली वस्ती एकदमच शांत झाली. आजचा दिवस फारच आनंदाचा होता. वस्तीवर भांडण नाही. मारामारी नाही. आज वस्तीवर मी सोडून बाहेरचे कुणीही आलेले नव्हते.

आठच्या सुमाराला देवी दर्शन आणि खरेदी उरकून मंडळी परत आली. सगळी खरेदी बेतशीर लावून सर्व मंडळी मुकादमाच्या घरासमोरच्या मोकळया जागेत जमली. "यळकोट यळकोट जय मल्हार" करत हैबती नाचायला लागला होता. मुकादमाने भंडारा उधळला. चारपाच गडी मशाली घेऊन नाचत आले. बारकी पोरं पण नाचायला लागली.
हैबती तिथला हरकाम्या... स्वैपाक म्हणू नका...झोपडी बांधायचं म्हणू नका..सगळया कामात तरबेज. त्याच्याकडे बायको मात्र टिकत नसे त्यामुळे साऱ्या वस्तीचा तो चेष्टेचा विषय असे. तो ही ते हसण्यावारी नेई. हैबतीचा खंडोबा नाच संपल्यावर गळयात टाळ घातलेले पंढरीचे वारकरी उठले - "ग्यानबा तुकाराम... मीच तो रे आत्माराम" हा नाद घुमायला लागला. टाळकरी बायका पण उठल्या. एकीच्या हातात तुळशी वृंदावन. दोन पोरं घोडा बनली. उरलेल्या बायकांनी फेर धरला. "खाली वाकून धुणं धुते शालू भिजला.. आमच्या भावानं बांधियेला गाडी बंगला". अशी चार पाच गाणी गाऊन फेर धरल्यानंतर फुगडया सुरू झाल्या. साधी फुगडी़, घसर फुगडी़, जातं असे नाना प्रकार.. मग कुणीतरी मुकादमाला आणि त्याच्या बायकोला फुगडी धरायला लावली. मुकादम असा लाजला का नाही.. की त्याची बायको पण हसायला लागली. मग सगळेच नवरा बायको एकमेकांच्या उखाळया पाखाळया काढत फुगडी घुमवायला लागले. अशावेळी वस्तीवरच्या बापयांना तरण्या पोरींबरोबर फुगडी खेळायचा पण नाद करता आला. त्या दिवशी सगळं चालत होतं.
एकाएकी बारीक आवाजात पण तार स्वरात लकेरी ऐकू आल्या. हरणाबाई आणि तिची सासू.. नव्या नथी घालून .. आली ठुमकत नार लचकत..हिरव्या रानी.. म्हणत गात होत्या. त्यांच्या मागून कृष्णीचा नवरा "गऽ साऽजणी.." म्हणून जोरात गायल्यावर पोरांनी ढोलकी वाजवून नाचायला सुरूवात केली. मग एकामागून एक गायची चढाओढच लागली. मंडळी भलतीच सूरात होती.
अजून गुजर आणि लमाण मंडळी बाजारातून आली नव्हती. "लमाणाची आणि गुजरांची आली की बगाच तुम्ही..राधी म्हणत होती. एरवी या दोन्ही जमाती इतर वस्तीतल्या कामगारांशी फटकून वागत पण आजचा दिवस वेगळा होता.
गुजरांनी आल्या आल्या दूध आणि माव्याचे लाडू वस्तीला वाटले कारण त्यांच्याकडे दूध दूभते भरपूर असते. वास्तविक त्यांच्या जातीत बायकांवर खूप बंधने असतात. पण आज गुजरांच्या बायका आणि पोरांनी "श्रीकृष्णाच्या घरातील रूक्मिणी आणि तिची सून गायकी यांची ‘साँस बहू की लडाई' ही नृत्यनाटिका केली. त्यात हनुमानापासून कोणीही पात्रे होती. रूक्मिणी आणि गायकी या ऊसतोडीसाठी जातात आणि तिथल्या कामावरून दोघींच्यात झगडा होतो. मग कृष्ण येऊन दोघींची समजूत काढतो. घरी येऊन स्वैपाक करताना पण दोघी भांडायला लागल्यावर मग कृष्ण एक ऊसाचं कांडकं घेऊन दोघींना देतो दोन फटके.. आणि मग दोघी सरळ होतात. ही त्या नाटकाची गोष्ट! वस्तीतल्या सर्वांना ती गोष्ट बहुधा माहिती होती आणि सर्वाना ती फारच आवडत होती.

मग आली लमाणांची टोळी... त्यांनी सगळयांसाठी गोड आणि तिखट शेवकांडे़, शेवगाठी आणि त्यांचे खास खडीसाखर घातलेले मोहाचे शरबत आणले होते.
माझ्या कानात कुणीतरी कुजबुजले, " पिऊ नका ताई ... वंगाळ दारू असती ती.."
लमाणी बायका भलत्याच सुंदर दिसत होत्या. त्यांचे ते लांब घागरे.. कथलाचे चकाकते दागिने. त्यांच्या लमाण टोळीतले सगळे फेर धरून झूलायला लागले. "क्रिश्‍ना कही राधा को..जाती कहा रंग छोडके, आती हू घटिका मे सय्याजी को परोसके.." या गाण्याची धून छान होती. त्यांचा नाच म्हणजे फक्त वर्तुळाकार फेऱ्यात एकमेकांच्या कंबरेला धरून मागे पुढे आणि दोन्ही बाजूला डोलणं एवढंच होतं ..हळूहळू वस्तीतले बाकीचेही त्या डोलनृत्यात सामील झाले. डोलाची गती वाढली तशी टाळया वाजायला लागल्या.
मशाली घेऊन नाचणारी पोरे त्या वर्तुळामध्ये उडया मारत होती. दिवसभराच्या धांदलीनंतरही कोणी थकलं नव्हतं..रात्रीचे बारा वाजून गेले होते. एव्हाना बारकी पोरं झोपी गेली होती.
नाच संपवून सगळी निवांत बसली होती. कुणाला घराकडे जावेसे वाटत नव्हते. एकदम गणपत शिरप्याला म्हणायला लागला.. "दादा मी तुज्या गाडीतून ऊस काढून माज्या गाडीत भरीत व्हतो रे रोज.." म्हणून रडायला लागला.. म्हणजे निरोपाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळीच एकमेकांना काही ना काही कबूल्या करून रडत होती. एरवी एकमेकांच्या जातीमुळे जरा वेगळया ठिकाणी पालं ठोकणारी आणि एवढया तेवढया कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठणारी ही सगळी मंडळी एकमेकांना गर्ळा मिठया घालून रडत होती. सर्वच मोठी माणसे त्या हंगामातल्या कडूगोड आठवणी सांगत रडत आणि हसत सुध्दा होती.
"आपण सगळी एकच रे ... आपली जात गबाळी" असं शेवटी मुकादम म्हणाला. सर्वांनी माना डोलावल्या. मग एकदाचा मुकादमाच्या बायकोने दिलेला घोटभर चहा पिऊन सगळी त्यांच्या झोपडीकडे परतली. मी ही जड पावलाने गेस्ट हाऊसवर परतले. मला तिथपर्यन्त पोचवायला हैबती आणि मुकादम आक्का आल्या होत्या. रस्त्यावर अंधार असला तरी चैत्राचं चांदणं होतं. प्रतिपदा असल्यामुळे आकाशात चांदण्यांचा नुसता खच होता.
वर्षाचा पहिला दिवस.. म्हटले तर माझ्या रोजच्या विश्‍वापेक्षा अगदी भिन्न समुदायात सहवासाने निर्माण झालेल्या प्रेमामुळे श्रीमंत झालेला - असा वर्षारंभ माझ्या आयुष्यातला पहिला आणि कदाचित शेवटचाही होता.
त्या माझ्या संशोधन काळात मी त्या वस्तीची किती भयाण रूपं पाहिली होती. भीतीने थरकाप उडेल असे अत्याचार पाहिले होते. आपसातील प्रेमप्रकरणे, त्यामुळे होणारी भांडणे़, पैशाच्या हव्यासापोटी आपल्या बायकांचा गावातल्या टवाळ पोरांशी केलेला सौदा़, घरात धान्य भरले असले तरी रांधलेले नाही म्हणून भूकेपोटी रडत रडत झोपी जाणारी छोटी छोटी मुले़... गरोदरपणात अगदी बाळंतपण होर्इपर्यन्त काम करणाऱ्या स्त्रिया़, मुकादमाने दमात घेऊन मुद्दाम कमी दाखवलेले वजन... कितीही गरज असली तरी रजा देण्यास दिलेला नकार... त्यामुळे ओक्साबोक्षी रडणारी माणसे... त्या वस्तीत जाऊन आले की मला वेठबिगारी आणि गुलामीच आठवत राही!
पण त्या दिवशी मात्र ही सगळी काजळी पुसून टाकणारे .. त्या वस्तीत क्वचितच प्रगटणारे मानवी संबंधाचे किती सुंदर आणि आनंदी पैलू माझ्याकडे जणू घरंगळत आले होते. खरेतर अगदी क्षणभंगूर म्हणावा असा तो केवळ एका रात्रीपुरता सामूहिक स्नेहाचा अविष्कार आणि त्यावेळी आपसातले गळून पडलेले भेद.. दुसऱ्या दिवशी पासून सगळं पूर्वीसारखे रहाटगाडगे सुरू होणारच... पण तिथल्या कोणाच्या तरी मनात त्या रात्रीच्या प्रेमाचा अविष्कार कायम झिरपत राहिलच की आणि हळुहळू खरोखरच सगळा दुष्टावा संपून जाईल का... या विचाराने माझ्या डोळयांना धारा लागल्या होत्या.
माझ्या मनातले विचार मुकादम आक्काने जणू वाचले असल्यासारखे तिने माझ्या हातावर आश्‍वासक थोपटले आणि तिनेही मला रडत रडत घट्ट मिठी मारली. ती म्हणाली.. ’ताई पहाट आता दूर न्हाई’ तिचे ते शब्द माझ्या काळजात जणू रूतून बसले आहेत. मला आतापर्यन्त मिळालेल्या नववर्षाच्या सगळयात यथार्थ शुभेच्छा होत्या त्या...

 

मंजूषा देशपांडे

सूक्ष्मजीवशास्त्रात M.Sc, 
Ph.D in Women's Studies, 
2002 पासून शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राची संचालक

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form