
गेल्या चारपाच वर्षांपासून आपल्या देशात 19 नोव्हेंबरला पुरुषांना International Men’s Day निमित्त शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे. त्यातल्या अनेक शुभेच्छा व्यंगचित्राच्या किंवा memes च्या रूपात देखील असतात. पण त्याआधी फक्त वर्तमानपत्रातल्या किंवा न्यूज चॅनेल वरच्या बातम्यामध्ये ‘जागतिक पुरुष दिवसा’च्या कार्यक्रमांबद्दल कळत असे! बरेचदा Save Indian Family Faundation किंवा पुरुष हक्क संरक्षण समिती सारख्या काही संस्था ह्या निमित्ताने महिला धार्जिण्या कायद्यांच्या विरुद्ध निषेधमोर्चा काढत. एकदा अशाच एक संघटनेने पुरुषांना त्रास देणाऱ्या महिलांच्या फोटोना चपलांनी मारण्याचा इव्हेंट केल्याची बातमी पहिली होती आणि एकदा पत्नीपीडित पुरुषांनी लाक्षणिक संन्यास घेऊन नवऱ्याला त्रास देणाऱ्या बायकांचे श्राद्ध घातले होते.
एकदा एका वर्तमानपत्राने पुरुषांना शुभेच्छा देण्यासाठी जागा देऊ केली होती - तिथेही काहीजण महिलांवरचा राग व्यक्त करत होते. मागच्या वर्षी मात्र आयुष्मान खुरानाने ‘जंटलमन किसे कहते है’ ही कविता सादर करून जागतिक पुरुष दिनाला एक वेगळंच वळण दिलं होतं! त्यानंतर ‘पुरुषत्वा’चा असा वेगळा विचार करणाऱ्या इतरही काही कविता यूट्यूब वर दिसू लागल्या आहेत. खरंतर आपल्या देशात किमान दहा वर्षांपासून तरी सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टीस, मावा, मासूम, सूत्र अशा अनेक संस्था पुरुषांच्या जाणीव जागृतीचे काम करीत आहेत. पण ह्या संस्थांच्या सकारात्मक कामाविषयी ‘जागतिक पुरुष दिवसा’च्या निमित्ताने प्रसारमध्यमातून बातम्या झाल्याचे पाहायला मिळत नसे. एका बाजूला ‘पुरुष हक्क संरक्षण समिती’ सारख्या 19 नोव्हेंबर साजरा करणाऱ्या संस्था आणि दुसऱ्या बाजूला मावा, MASVAW, FEM अशा संस्थांचे या दिवसाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ह्या व्यतिरिक्त कुठल्याच चळवळीशी संपर्क नसलेल्या पुरुषांना 19 नोव्हेंबर विषयी काय वाटत असेल; याबद्दल मला फार कुतूहल वाटत असे. म्हणून यावर्षी मी वेगवेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या काही पुरुषांशी बोलायचं ठरवलं!
मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदनगर, लातूर,जालना अशा लहानमोठ्या शहरातल्या 25 ते 60 वयोगटातल्या वीस मध्यमवर्गीय पुरुषांना मी आणि माझ्या दोन मैत्रिणीनी ‘जागतिक पुरुष दिना’विषयी तीन प्रश्न विचारले. प्रत्येकाशी आमचं साधारण पाच ते पंधरा मिनिट बोलणं झालं. ‘जागतिक पुरुष दिन असतो हे तुम्हाला माहीत आहे का?’ – हाच बहुधा आमचा पहिला प्रश्न असायचा. वीसपैकी पाच जणांना ह्या दिवसाबद्दल माहीत होतं आणि त्यापैकी चार जण कुठल्या ना कुठल्या सामाजिक चळवळींशी जोडलेले आहेत. अक्षय शिंपी अभिनेता आहे; तो म्हणाला की मागच्या वर्षी एका सिरीजचे शूटिंग करत असताना सेटवरती एका न्यूज चॅनेलचे लोक बाईट्स घ्यायला आले होते- तेव्हा त्याला असा काही दिवस असतो – हे समजलं. पंकज पंचरियाने सांगितलं की नगरला एक संस्था काही मोर्चा किंवा तत्सम अॅक्टिविटी करून हा दिवस साजरा करत असल्याचे त्याने पहिले होते आणि ते एखाद्या व्यंगचित्रासारखे त्याच्या लक्षात राहिले होते. काहीजण म्हणाले की दरवर्षी कधीतरी ‘पुरुषदिना’ बद्दलचे विनोद येऊन जातात – पण तो दिवस नेमका कधी असतो - हे त्यांच्या लक्षात राहात नाही! तसा जागतिक महिला दिन देखील त्यांच्या लक्षात रहात नाही, असंही त्यांनी सांगितलं. पण पुरुषांसाठी असा दिवस असावा की नाही यावर वीसपैकी बारा जणांनी अशा विशेष दिवसाची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलं. आपल्या देशात पितृसत्ता आहे आणि पुरुषांना वर्षभर स्वत:च्या मनासारखं वागता येतं त्यामुळे पुनः असा काही वेगळा दिवस साजरा करायची गरज नाही असंच बहुतेक जणांचं मत दिसतं आहे.अजय भोसले एक सरकारी अधिकारी आणि ब्लॉगर आहेत – ते म्हणतात की अनंत कालपासून पुरुष त्याच्या मर्दानगीचा उत्सव करतोच आहे, त्यात आणखी एक दिवस असायची गरज नाही. गुजरातीतून लिखाण करणारे राजू पटेल यांनी वर्ग संघर्षाचे उदाहरण देत सांगितलं की – ‘जसा मजूर दिवस असू शकतो, पण उद्योगपती दिवस असू शकत नाही! तसंच पुरुष दिवस असायची काही गरज नाही!’ आदेश बांदेकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे राजकारणात सक्रिय असलेले पुरुष आहेत. त्या दोघानाही असं वाटतं की समतेचं मूल्य एखादा दिवस नव्हे तर जन्मभर सर्वांनीच पाळायला पाहिजे.
रंगकर्मी अतुल पेठे म्हणाले की ‘वैयक्तिक पातळीवर विचार केला तर अशा दिवसाची मला आवश्यकता वाटत नाही पण समष्टीच्या पातळीवर असे विशेष दिन असण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण त्या निमित्ताने काही महत्त्वाच्या मूल्यांची आठवण करून देता येते.’ चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनाही पुरुष दिवस असावा असं वाटतं आणि या दिवसाचं प्रयोजन काय यावरदेखील नीट विचार झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. पंकज पंचरिया आणि आरोह वेलणकर या दोघा तरुण अभिनेत्यांना समतेच्या दृष्टिकोनातून विचार करता पुरुषांसाठी खास दिवस असावा असं वाटतंय. तर शाऱ्दूल सराफ म्हणतो की तो एकूणच असे विशेष दिन साजरे कशासाठी करायचे याबद्दल संभ्रमात आहे. ग्राफीक डिझायनर मकरंद म्हसाणे देखील कुठल्याही गोष्टी ‘साजऱ्या’ करायच्या विरोधात आहेत – तरीदेखील असा विशेष दिवस पाळल्यामुळे काही जनजागृती होणार असेल तर ह्या दोघांनाही त्याबद्दल हरकत नाही!
‘जागतिक पुरुष दिवस’ असावा की नाही याबद्दल आपल्याकडे काही चॉइस राहिलेलाच नाही – असं अनेक वर्षे ‘मर्दानगी’ संकल्पने विषयी पुरुषांच्या सोबत काम करणारे मिलिंद चव्हाण यांना वाटतं. मिलिंद आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे ह्या दिवसाकडे दुर्लक्ष केले होते पण दिवसेंदिवस त्याचे प्रस्थ वाढत चालले आहे. सध्या त्याला जे विकृत रूप आलं आहे ते कसं बदलायचं हे मुख्य आव्हान आहे – असं त्यांना वाटतं. सध्या ‘पुरुषहक्क संरक्षण समिती’ सारख्या संस्था पितृसत्ताक संरचनेचा विचार करण्याऐवजी पुरुषांवर स्त्रियांकडून झालेल्या हिंसेची तुरळक उदाहरणे देत राहतात. काही पुरुषांना महिला त्रास देत असतील तरी एकूण पुरुषप्रधानता तशीच राहते. या रचनेत पुरुषांकडून पुरुषांवर होणाऱ्या हिंसेबद्दल चकार शब्द न काढता ह्या संस्था फक्त देशातले ‘महिला धार्जिणे’ कायदे बदलायची मागणी करतात ते प्रतिगामी मानसिकतेतून आलं आहे आणि ते चूक आहे – असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या महिला दिनाचं जसं व्यापारीकरण झालं आहे, तसं पुरुष दिवसाचं होऊ नये अशी मिलिंदची इच्छा आहे. महिला दिनाला जशी कामगार महिलांच्या संघर्षाची, मानवी हक्कांच्या लढ्याची पार्श्वभूमी आहे तशी जरी पुरुष दिवसाला नसली तरी पुरुषांना समतेच्या विचारातून माणुसपणाकडे नेण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दिवसाकडे पहावे असे मिलिंद चव्हाण यांना वाटते. पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषांनी आत्मपरीक्षण करायची संधी घ्यावी असं सुनील सुकथनकर यांनी सुचवलं आहे. पुरुषांना बरेचदा असा भ्रम असतो की आपणच जग चालवतो आहोत आणि स्वत:मध्ये काही बदल न करण्याकडे पुरुषांचा कल असतो – असं निरीक्षण सांगून ते म्हणतात की मी स्वत:च्या मानसिकतेत काय बदल करायचा असा विचार पुरुष करू शकला तर सामाजिक बदलाला चालना मिळेल! बळिराम जेठे हा कार्यकर्ता देखील सोलापूर, उस्मानाबाद जवळ निमशहरी भागामध्ये अनेक वर्ष पुरुषांसोबत काम करत आहे. त्यालाही वाटतं की पुरुष अनेकदा ‘मर्दानगी’ विषयी चुकीच्या कल्पनेतून निष्कारण जोखीम घेतात, ताणतणाव ओढवून घेतात. त्याऐवजी आपली कमजोरी किंवा बलस्थान काय, आपल्या पुरुषीपणाच्या कल्पना काय आहेत त्याबद्दल सामूहिक चर्चा करायची संधी पुरुषदिना निमित्त घ्यावी. अक्षय शिंपीने सुचवलं आहे की लिंगवाचक शिव्या देणार नाही आणि ‘बायकी’ असण्याबद्दल कुठल्याही चेष्टा करणार नाही; अशी पुरुषदिनाला पुरुषांनी शपथ घ्यावी आणि ती जन्मभर पाळावी! शार्दुल सराफनेही एक मजेदार अॅक्टिविटी सुचवली आहे. त्याला असं वाटतं की पुरुषांनी दिवसभर महिलांसारखे कपडे घालून, त्यांची इतकी कामं करून पहावीत म्हणजे त्यांना महिलांच्या त्रासाची थोडीतरी कल्पना येईल. त्याने स्वत: एका नाटकाच्या निमित्ताने तसा अनुभव घेतला आहे – आणि त्याच्या जाणिवेत फरक पडला – म्हणून त्याला ही कल्पना सुचली. पण अतुल पेठेना जास्त गांभीर्याने लिंगभाव आणि मर्दानगीबद्दल, चर्चा व्हावी तसंच शाळा आणि घर दोन्ही पातळीवर समज वाढावी म्हणून प्रयत्न व्हावेत असं वाटतं. पूर्णानंद वाडेकरला वाटतं, 'जागतिक पुरुष दिनाचे औचित्य साधून पुरुषांनी स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी बोलणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांचा सन्मान करणे अशा गोष्टी कराव्यात आणि याची सुरवात स्वतःच्या घरातूनच करावी. रोज असे केल्यास विशेष असा ‘मेन्स डे’ साजरा करण्याची गरज उरणार नाही. आपल्याला प्रत्येक स्तरातून, माध्यमातून, शालेय शिक्षणातून अशा प्रकारचे शिक्षण देणे अनिवार्य झाले आहे.' बऱ्याच पातळ्यांवर बरीच मंडळी अशा प्रकारचे काम करतायेत पण समाज म्हणून आपणच अपुरे पडतोय कि काय – अशी शंका पूर्णानंदने व्यक्त केली आहे. ही शंका रास्तच आहे - तरीही मी ज्या पुरुषांशी बोलले त्यांच्या ‘जागतिक पुरुषदिना’विषयीच्या प्रतिक्रिया ऐकून मला असं वाटलं की सगळेच पुरुष काही महिलांना शत्रू मानत नाहीत. #NotAllMen काही पुरुषांना स्वत:च्या खास अधिकारांची जाणीव सुद्धा आहे. महिलांच्या विषयी आदर आणि अनुकंपा बाळगणारे आणि समतेचे महत्त्व उमगलेले पुरुष देखील आहेत. अशा पुरुषांच्या साथीने समताधिष्ठित समाजाचं स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येऊ शकेल!