नवनिता देवसेन आधुनिक स्त्री पर्वाची लेखिका


साहित्याच्या क्षेत्रात स्त्री आणि पुरुष असा वेगळा विचार करावा की नाही हा एक चिरंतर वादविषय आहे. पण जगभराचा साहित्य इतीहास पहिला, तर स्त्रियांनी नेहमीच स्वतःच्या वेगळ्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला दिसतो. सर्वच स्त्रिया स्वतःला वेगळेपणाने मांडतात असं नाही, पण काहींना तरी निराळं असं अनुभवविश्र्व किंवा विश्लेषण मांडायचं असतं. ते निराळं असण्याचा आग्रह त्या करतात कारण त्यांनी विशिष्ट पद्धतीने जाऊन लिहावं अशी पुरुषप्रधान समाजाची अपेक्षा असते. हे केवळ लिखाणाच्या किंवा कलेच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही, उलट जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्त्रिया हा अनुभव घेत असतात. त्यांची त्यावरची प्रतिक्रिया ही त्यांच्या स्वतःच्या स्वभाव धर्मावर, जाणीव शक्तीवर आणि धाडसावर अवलंबून असते. विसाव्या शतकात स्त्रिवादाचा उदय झाल्यानंतर स्त्रीलेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. भारतातही हा प्रभाव दिसतो. पण भारतीय स्त्रीची जडणघडणच अशी होते की ती पूर्णपणे पश्चिमी प्रभावाखाली फारशी जात नाही. अगदी आजही हे विधान बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत खरं ठरावं. भारतीय परंपरा आणि संस्कृती स्त्री, पुरुष दोघांच्याही मनीमानसी रुजलेली असते. स्त्रीच्या बाबतीत तर दुहेरी पेच पडतो. एकीकडे तिला ह्या परंपरेचा काच होतो तर दुसरीकडे आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधताना तिला स्वतःच्या मुळांचे संदर्भ तपासावेसे वाटतात. स्त्रीवादाच्या जाणिवेनंतरची स्त्री पुन्हा एक वेगळं अकलन घेऊन उभी राहते. ती जर लेखिका असेल तर लिहिणं आणि त्यात स्त्रीवादी तत्व प्रतिबिंबित करणं ह्या गोष्टी साधताना तिला कसरत करावी लागते. ती अशासाठी की मुळातच लिहिताना तिला अनेक बंध तोडावे लागतात, जे तिच्या अभिव्यक्तीवर परंपरेने घातलेले असतात. त्यात स्त्रीवादाचं टोक धरून लिहिणंच काय, पण जगायचं झालं तरी पुरुष सत्तेने घालून दिलेले नेमनियम काही वेळा धुडकावणं, नाकारणं तिला भाग पडतं. हे दुहेरी ओझं आयुष्यभर ती वागवत राहते. निर्मिती क्षमता आणि स्त्रीत्व ह्यांची निसर्ग सिद्ध सांगड आहेच. पण संस्कृतिक सामाजिक संदर्भात हा मेळ घालताना स्त्रीपुढे मोठा पेच उभा राहतो, कारण साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातही पुरुष सत्तेचा वावर असतोच. आहेच.
   अशा तऱ्हेच्या पेचांमधून जाऊनही आपलं अस्तित्व टिकवणाऱ्या ज्या मोजक्या स्त्रीवादी लेखिका भारतीय साहित्यात पाय रोवून उभ्या राहिल्या त्यात बंगाली लेखिका नवनिता देवसेन यांचं नाव ठळकपणे समाविष्ट करावं लागेल. 
   नवनिता देवसेन यांची लेखनप्रेरणा स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाशी जशी निगडीत आहे, तशीच ती एक हसरी खेळकर आणि खोडकर ही जीवनदृष्टी घेऊन आली आहे. साहित्याचे विविध प्रकार हाताळणारी ही लेखिका लोकप्रिय ही आहे आणि आक्रमकही आहे. कथा,कादंबरी, ललित लेखन, प्रवास वर्णन, विनोद आणि संशोधनपर लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केलं आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं पाहिलं पुस्तक प्रसिध्द झालं. ते कवितेचंच होतं. प्रथम प्रत्यय हे त्याचं शीर्षक. लेखन म्हणजे विरंगुळा, मन रमवायचं साधन असा त्यांचा दृष्टिकोन कधीच नव्हता. आई वडील दोघंही नामवंत कवी असल्याने साहित्य त्यांना आपसूकच जवळचं वाटलं. शिवाय आपण लेखन करतो तेव्हा आपल्या मनातलं काही सांगू शकतो. जे पटत नाही तेही परखडपणे मांडू शकतो हे नवनीता यांना फार लवकर उमगलं. विद्या, साहित्य, शिक्षण याचे संस्कार त्यांना लाभले. तसंच परंपरेने अनेक बंधनं ही त्यांच्या पदरात टाकली. भारतीय स्त्रीच्या आयुष्यातल्या चौकटी त्यांनाही अनुभवायला मिळाल्या. सर्वच चौकटी मोडता येत नाहीत असंही त्यांच्या लक्षात आलं. काळानुसार त्यांच्या धारणा बदलल्या ही. पण या वाटचालीत त्यांना एक उमगलं की आपल्या हाती असलेली लेखणी हे एक शस्त्र आहे. एक हत्यार आहे. ज्यामुळे आपल्या हाती एक ताकदीचा स्त्रोत लागलेला आहे. लेखन हे एक तऱ्हेचं सक्षमीकरणाचं साधन बनून गेल्यानंतर नवनिता देव सेन ह्यांनी त्याच्या माध्यमातून अनेक वाटांनी प्रवास केला. इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या अंतरंगाचा वेध घेतला आणि स्वतःच्या भूमिका घेऊन परंपरांचा शोध घेतला. त्यासाठी संघर्ष ही करावा लागला पण वेळोवेळी आपली आक्रमक वृत्ती जागी ठेऊन त्यांनी खिंड लढवली. 
एक तऱ्हेची मूर्तिभंजक, विध्वंसक दृष्टी त्यांच्या लेखनातून दिसते. हा प्रक्षोभ त्यांचा आत्मा आहे. उपहास, विनोद, परखडपणा यामुळे या लेखनाला एक धार आलेली दिसते. म्हणूनच त्यांचं लेखन बोचरं वाटूनही ते लोकप्रिय ठरलं. कारण ते वाचकाच्या मनाचा तीक्ष्ण वेध घेणारं होतं. आपल्या अभ्यासातून आणि संशोधनातून ही त्यांनी जे मांडलं ते परंपरेचा आणि संस्कृतीचा अभ्यास म्हणून महत्वाचं ठरलं. एक विदुषी आणि लेखिका ही नवनिता देव सेन यांची प्रतिमा बंगाली विश्वात आपलं असं स्थान निर्माण करून स्थिरावली आहे.  
कोलकात्याच्या सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात नवनिता यांचा जन्म झाला. वडील फ्रेंच, जर्मन आणि पर्शियन भाषांचे जाणकार. उत्तम कवी आणि अनुवादक. त्यांनी मुलांसाठी 'पाठशाला' नावाचं मासिक ही चालवलं होतं. आई राधाराणी देवी ही सुद्धा कवयित्री होती. अपराजिता देवी या टोपण नावाने ती कविता लिहायची. नवनिता यांनी १९८४ मध्ये आपल्या आईचा कविता संग्रह संपादित करून प्रकाशित केला होता. त्याला १९८६ मध्ये रविंद्र पुरस्कार लाभला. १९८९ पर्यंत नवनिता यांना आईचा सहवास मिळाला. स्वतःच्या कुटुंबाबद्दल नवनिता यांनी अनेकदा लिहिलं आहे. आमचं पुरुषविरहित घर ज्यात आजी, तिची घटस्फोटित मुलगी आणि तिच्या दोन तरुण मुली राहतात असं वर्णन त्या करतात. स्वतःबद्दल त्या म्हणतात, मी एकटी आहे, सोबत 2 मुली, 1 कुत्रा आणि 2 मांजरी. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात आणि यादवपुर युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतल्यानंतर नवनिता हार्वर्ड आणि अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट शिक्षणासाठी गेल्या. तौलनिक सहित्याभयास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. पुढे त्यांनी यादावपुर विद्यापीठातून याच विषयाच्या विभागप्रमुखाची धुरा कित्येक वर्ष सांभाळली. अनेक सुवर्ण पदकं, PhD, केंब्रिज च्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, अशा अनेक सन्मानाच्या मानकरी असलेल्या नवनिता एक वाचकप्रिय लेखिका म्हणून ओळखल्या जातात. बालसाहित्याचं पुस्तक, सत्यजित राय यांनी काढलेला परीकथा संग्रह, स्त्रीजीवन विषय लेखनाचं "स्त्रिपर्व" अशीही त्यांची पुस्तकं आहेत. 
   नवनिता यांच्या व्यक्तिगत जीवनाला एक वलय प्राप्त झालं ते त्यांच्या आणि अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या विवाहामुळे. ही दोन्ही कुटुंब उच्च वर्तुळातली, नामवंत घरण्यातली. त्यामुळे या लग्नाची चर्चा खूप झाली. विवाहानंर त्यांचं वास्तव्य इंग्लंड मध्ये होतं. तिथे पुढील संशोधन केल्यानंतर त्या काही वर्षांनी कोलकात्याला परतल्या. कारण त्यांचा विवाह टिकला नाही. घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला आणि दोन मुलींना घेऊन त्या भारतात परतल्या. ही घटनाही बंगाली भद्रलोकांमध्ये वाद विषय बनली. घटस्फोट ही व्यक्तिगत घटना असली तरी सामाजिक पातळीवर तिची जोरात चर्चा आजही होते. तो काळ तर १९७५ च्या आसपासचा. स्त्रीमुक्ती हा शब्द अजुन रूजायचा होता. त्यावेळी घटस्फोट म्हणजे लाजीरवाणी घटनाच समजली जायची. हे सगळं पेलून स्वतःच्या पायावर उभं राहणं एखादीला जड गेलं असतं. नवनिता यांच्यासाठीही ते सहज सोपं नव्हतं. पण स्वतःच्या हीमतीवर त्या हे वास्तव पचवून गेल्या. यादवपुर विद्यापीठातलं अध्यापन, लेखन आणि संशोधन हे त्यांचं विश्व बनलं. कविता त्या पूर्वीही लिहीत होत्या. भारतात परतल्यानंतर त्यांची कविता अधिकच व्यक्तिगत बनली. वैवाहिक नात्याचं, त्यालीत तणावाचं प्रतिबिंब त्यावर पडू लागलं. त्याची चर्चा होऊ लागली तेव्हा त्यांनी हे लेखन थांबवलं. पण मनातल्या मनात त्यांचा कोंडमारा झाला. मग त्या गद्य लेखनाकडे वळल्या. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन त्या लिहु लागल्या. स्वतःबद्दल च्या या लिखाणातून त्यांनी आपलं कुटुंब एकदम सार्वजनिक करून टाकलं. त्यांचं घर, मुली, आई..  बंगाली वाचकांना हे सारं ओळखीचं झालं. 
   नवनिता देव सेन हे नाव बंगाली साहित्यात रुजत गेलं. त्यांनी वेगवेगळ्या लेखन प्रकरांमधून आपली लेखणी चालवली. प्रवासवर्णनाच्या क्षेत्रातलं त्यांचं लेखन एक वेगळाच अनुभव घेऊन आलं. एक जीवनदृष्टी, सामाजिक भाष्य, या लेखनात आढळतं. त्यांचं दुसरं पुस्तक ‘करुणा तोमार कोन पथ दीये’ १९७८ मध्ये प्रकाशित झालं. एकट्या स्त्रीने केलेली यात्रा, कुंभ मेळ्यातील अनुभव त्यांनी ह्यात मांडला आहे. ह्या लेखनाने त्या एकदम लोकप्रिय लेखिका बनल्या. 
१९८४ मधल्या त्यांच्या ‘ट्रक बाहने मॅक मोहने’ या पुस्तकात त्यांनी १९७७ मध्ये भारत तिबेट सीमेलगतच्या भारताच्या लष्कराच्या अधिपत्याखालील भागात रेशनच्या ट्रक मधून केलेल्या प्रवासाच्या आठवणी आहेत. विनोद, खोचकपणा, उपहास आणि कोटीबजपणा ह्यासाठी हे लेखन प्रसिद्ध आहे. प्रवासानुभव आणि सामाजिक वास्तव यांना जोडणारं हे लेखन बंगाली वाचकांनी डोक्यावर उचलून घेतलं. ‘नटी नवनिता’ हे त्यांचं १९८३ मधलं गद्य लेखन हा त्यांच्या निबंध लेखनाचा संग्रह समीक्षकांनी नावाजलेला आहे.
   कथेच्या क्षेत्रातही नवनिता देव सेन यांची कामगिरी वैशिष्टय पूर्ण राहिली. त्यांचे अनेक कविता संग्रहही प्रसिध्द झाले. त्यांनी लिहिलेल्या विनोदाचा शिडकावा असणाऱ्या लघुकथा हा त्यांच्या लेखनाचा एक चेहरा झाला. त्यांच्या कथांमध्ये आणखी एक प्रवाह दिसून येतो तो म्हणजे पारंपरिक व महाकाव्यातील व्यक्तिरेखा यांच्या संदर्भात त्यांनी नवा अन्वयार्थ मनात घेऊन लिहिलेल्या कथा. यातही त्यांची उपहास पूर्ण शैली आहेच. पण स्त्रीवादी दृष्टी ठेऊन लिहिल्यामुळे या कथांना आलेली धार वेगळीच आहे. त्यांच्या अभ्यासाचा विषयही वाल्मिकी रामायण आणि त्याची रचना शैली असा होता. विशीबाविशित त्यांनी हे संशोधन करायला सुरुवात केलेली. त्यावेळी एक स्त्री म्हणून रामायणाचा वेगळा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. प्रत्यक्ष आयुष्यातले अनुभव गाठीशी होतेच. रामायणाचा अभ्यास करताना त्यांना संस्कृत भाषेची अडचण आली. संस्कृत पंडितांची मदत त्यांना अपेक्षित होती पण ती पुरेशी मिळेना तेव्हा त्यांचा हा अभ्यास त्यांना थांबवावा लागला. पण यातूनच त्यांच्या मनात रामायण महाभारतातील व्यक्तिरेखानी फेर धरला. विशेषतः स्त्रियांनी. त्यातूनच मग पुढे त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोन ठेऊन शुर्पणखा, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्यावर छोट्या कथा लिहिल्या. 

महाभारतातल्या सत्यवती, द्रौपदी, अंबा, शकुंतला यांच्या संदर्भातही त्यांनी कथा लिहिल्या. महाकाव्यातील तपशील तेच ठेऊन घटनांची मांडणी वेगळ्या पद्धतीने करण्याची धरणी नवनिता यांनी अवलंबली. जोडीला मूळच्या पुरुषप्रधान कथानकाची खिल्ली उडवणारे लेखन असे. त्यात नुसताच विनोद नव्हता तर एक उद्रेक, प्रक्षोभ ही होताच. तो आला होता स्त्रीवादी जाणिवेतून. स्त्री व्यक्तिरेखांची मांडणी आजवर विशिष्ट भूमिका असलेल्या पुरुषांनी केली. म्हणून त्यांचे विशिष्ट साचे बनले. एक स्त्री त्याकडे कशी वेगळ्या नजरेने बघते हे त्यांनी दाखवून दिलं. ‘अभिज्ञान दुष्यांतम’ ही त्यांची कथा या बाबतीत लक्षणीय ठरते. त्यातला दुष्यंत वारंवार नवनव्या तरुणींच्या प्रेमात पडणारा राजा आहे. त्याची महाराणी चंद्रवती अपत्याहिन आहे. इतर स्त्रियांपासून ही त्याला मूल नाही. पुत्र व्हावा, सिंहासनाला वारस मिळावा म्हणून त्याला नवी पत्नी हवी असते. सतत प्रेमात पडण्यामागचं त्याचं हे समर्थन आहे. शकुंतलेला त्याने ओळखलं नाही म्हणून तिला परत जावं लागतं. खूणेची अंगठी हरवली म्हणूनच राजाने आपल्याला ओळखलं नाही असं तिलाही वाटत राहतं. आता तो लोलापांगी या अप्सरेच्या प्रेमात पडलाय. तिचं शकुंतलेशी नातं आहे कारण तिची आई शलभा हीसुद्धा मेनकेचीच मुलगी आहे. दुष्यंतला धडा शिकवायचा या इराद्याने शलभा आणि लोलापांगी एक युक्ती करतात. लोलापांगी आपल्या जवळील शिरोमणी खुणेसाठी दुष्यंत कडे देते आणि त्याला रात्री भेटीसाठी बोलावते. प्रत्यक्षात भुवन व्यापाऱ्याचा वेश धारण करून तो पोहोचतो तेव्हा हा शिरोमणी त्याने चोरला आहे असा आरोप होऊन त्याला मारहाण होते. गैर समजुतीतून झालं असा आव आणून शलभा त्याला त्यातून वाचवते. दुष्यंताची स्वतःची अंगठी मात्र ती काढून घेते आणि शकुंतलेच्या मुलाला खेळायला देते. विदुषकला घेऊन राजा अंगठीच्या शोधात शकुंतला असलेल्या अनाथाश्रमात येतो. तिला सन्मानाने बरोबर नेतो. कथेच्या ओघात लेखिकेने दुष्यंताच्या भ्रमर वृत्तीला घेतलेले चिमटे चपखल आहेत. राजपुत्र अंगठीशी खेळत असताना विदुषकाची बहारदार मुक्ताफळं हसू आणतात. "आता राजपुत्र अंगठी गिळणार नाही याकडे लक्ष द्या. त्याचं पोट फाडून आपल्याला ती बाहेर काढता येणार नाही बरं का! आणि तुम्हाला माहीतच आहे अंगठीशिवाय आमच्या महाराजांची स्मृती कशी हरवून जाते ते!"
त्यांच्या अनेक कथांमधून जुन्या संदर्भांची, व्यक्तिरेखांची नवी मांडणी दिसून येते. त्यामागची त्यांची भूमिका व्यवस्थेला आव्हान देणारी आहे. सातत्याने त्यांनी असं लेखन केलं आणि वाचकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. विनोदी कथांमध्ये त्यांची ‘मोंसीएर होलार हॉलिडे’ ही धमालकथा वाखणाण्या सारखी आहे. आपली आई आणि दोन मुली अशा कुटुंबालाही त्यांनी ह्या कथेत आणलं आहे. रात्रीच्या वेळी हुलो या मांजराचा आवाज ऐकुन मुलींनी कसं त्याला शोधण्याचा हट्ट धरला आणि आसपासचे शेजारी ते थेट फायारब्रिगेड या तपासात सामील कसे झाले त्याचा साद्यंत वृत्तान्तच आहे हा! 

   नवनीता देव सेन या सढळ हाताने लिहीत आल्या आहेत. १९७५ च्या सुमारास त्या भारतात परतल्या. त्यानंतर १९७६ सालि त्यांची पहिली कादंबरी ‘आमी, अनुपम’ प्रसिद्ध झाली. हा आणिबाणीचा काळ होता. शहरी, मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित घरांमधून अनेक तरुण क्रांतिकारी कृत्यांमध्ये सहभागी होण्याची समस्या त्यांनी ह्यात चित्रित केली आहे. नक्षलवादी वाटेवर जाऊन पोहोचणाऱ्या तरुण पिढी बद्दल त्यांनी ह्यात लिहिलं. महाश्वेता देवींची ‘हजार चुराशेर मा’ सुद्धा याच काळात लिहिली गेली. तरुण वर्ग हिंसक मार्गाने जाऊ लागला, भरकटू लागला, याला त्यांची वडीलधारी मंडळी कारणीभूत होती. अशी काहीशी भूमिका नवनीता यांनी या लेखनातून घेतली होती. 
   त्यांची यानंतरची महत्वाची कादंबरी होती ‘वामबोधिनी’. यात त्यांनी गद्य, काव्य असे दोन्ही प्रकार वापरले. एका कादंबरीत त्यांनी रंगवली एक महिला क्रांतिकारक. जी कोलकाता पोलिसांचा सासेमिरा चुकवण्यासाठी इंग्लंडला जाते. तिथे ती इंग्रजीतून लेखन करू लागते. मग तिला आपली भाषा, संस्कृती याचं एक वेगळं भान येतं. आपल्या भाषेपासून फारकत घेऊन उसन्या परक्या भाषेत लिहिणं फोल आहे हे तिला पटू लागतं. अखेर ती आपल्या भाषेकडे परत येते. 
स्वतः नवनीता सेन यांना प्रादेशिक भषांबद्दल जिव्हाळा आहे. प्रादेशिक भाषांची होणारी हेळसांड त्यांना पीडा देते. त्यांनी एके ठिकाणी म्हंटल आहे की त्यांच्या आईने त्यांना १९७१ मध्येच सांगितलं होतं की बंगाली सारख्या कालच्या भाषेत लिहु नकोस. तू आता उद्याच्या भाषेत, इंग्रजीत लिही. त्यांना ते पटलं नव्हतं आणि आईचा जरा रागही आला होता. एका बंगाली कवयित्रीने हे म्हणावं? असंही वाटलं होतं. पण आज आईचे विचार दूरचं पाहणारे होते असं त्यांना वाटतं. अर्थातच त्यांना ही परिस्थिती क्लेशकारक मात्र वाटते. 
   १९९० मध्ये त्यांची ‘शित साहसिक हेमंतलोक’ ही कादंबरी प्रकाशित झाली. मध्यम वर्गातल्या वृद्ध महिलांच्या जीवनाचं चित्रण यात आहे. म्हातारपणाने गांजलेल्या एकाकी वृद्धा राहत असलेला वृद्धाश्रम त्यांनी यात उभा केलाय. वेगवेगळ्या पार्श्भूमीतून आलेल्या वृद्ध स्त्रिया तिथे एकत्र राहतात. त्यात काही गृहिणी काही नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत. एक नामवंत लेखिका, वेश्यावस्तीत वाढलेली एक श्रीमंत स्त्री अशा अनेक स्तरांवरील महिलांचं जीवन त्यांनी चित्रित केलं आहे. आपल्या एकाकीपणाशी जुळवून घेत आयुष्य कांठणाऱ्या या स्त्रिया. वृद्धात्वामुळे येणाऱ्या व्याधिंशी झुंजणाऱ्या, त्यापुढे नमलेल्या या स्त्रिया.

वृद्धाश्रमासारख्या अपरिचित कृत्रिम वातावरणाशी जुळवून घेणं त्यांना जड जातं. कारण कुटुंबाशी त्या मनाने बांधलेल्या आहेत. कुटुंब आणि नातेसंबंध यांच्याशी त्या भावनेने जोडलेल्या आहेत. आश्रमात राहणं त्यांना उपरं वाटतं. पण तेच त्यांचं भागधेय आहे. घरात त्यांना अधिकार फारसा नव्हताच, त्यांचं अस्तित्व ही तिथून हटवण्यात आलं आहे. स्त्रीच्या वृद्धात्वाचा प्रश्न मनाला अधिक भिडणारा वाटून नवनीता यांनी या विषयाला हात घातला. या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धाश्रमातील वातावरणात नैराश्याने ग्रासलेल्या या स्त्रियांना आयुष्याबददल आलेलं नवं भान हा या कादंबरीचा वेगळा शेवट आहे. अधिक समजुतीने त्या जीवनाकडे बघतात आणि मुक्त व्यक्ती म्हणून मिळालेलं नवं स्थान त्यांना निराळा आनंद अन् समाधान देतं हा आशावाद कादंबरी अखेर मांडण्यात आला आहे. 
   स्त्रीच्या आजवरच्या स्थनाबद्दल आणि तिच्या परंपरागत भुमिकांबद्दल वेगळी दृष्टी घेऊन लिहिणाऱ्या नवनीता देव सेन स्त्रीच्या आजच्या अस्तित्वाला ही वेगळं परिमाण देतात. स्त्रिया सिमित असंच लेखन करतात, त्यांना ऐतिहासिकतेचा अवाका नसतो, युद्धाबाबत काही समजत नाही अशा समजुतींना त्यांचा ठाम विरोध आहे. उलट पुरूषप्रणित इतिहासातल्या अनेक रिकाम्या जागा स्त्रियांचं लेखनच भरून काढू शकतं असा विश्वास त्यांना वाटतो. स्त्रीबद्दल परंपराशरण आणि पक्षपाती दृष्टिकोन ठेऊन लिहिणाऱ्यांबद्दल त्यांनी वेळोवेळी खरपूस टीका केली आहे. त्यात त्यात वाल्मिकीही आले, रवींद्रनाथही आले. 
 पण ज्या मुक्तपणाची, मोकळ्या अभिव्यक्तीची आस त्यांना आहे, तिचा वापर त्या स्वतः खुलेपणाने नेहमीच करु शकलेल्या नाहीत ही कबुली त्यांची त्यांनीच दीलीही आहे. लैंगिक संबंधाची वर्णनं त्यांनी कधीच केली नाहीत. समलिंगी नात्यावर त्यांनी लिहिलं आहे, पण उघडपणे शारिराबद्दल लिहिणं त्यांनी नेहमीच टाळलं. बंगाली भाषा आणि आपली आई यांनी आपल्यावर ही संस्कारांची बंधनं घातली असं त्या मानतात. इंग्रजीत एक अनामिकता मिळू शकते, तसं बंगालीत होत नाही असं त्यांना वाटतं. प्रादेशिक भाषांमधून लिहिणाऱ्या अनेक लेखिकांचं हेच मनोगत असेल. आजकाल स्त्रिया धीटपणे लिहु लागल्या आहेत. पण तरीही अनेक स्तरावरच्या त्यांच्यावरील बंधनांमुळे संकोचामुळे त्या थोड्या स्वतःला आक्रसून लिहितात, हे बऱ्याच जणीनबाबत आजही खरं आहे. नवनीताजींच्या मनातली ही भावना अनेक लेखिकांनिही अनुभवली आहे. 
   आईने त्यांच्या लेखनाला खतपाणी घातलं. तिने कधी त्यांची कविता सुधारून वैगरे दिली नाही. पण प्रेरणा दिली. आईच त्यांच्या लिखाणाची पहिली वाचक असायची. पण दुसरीकडे आईची प्रतिमा, तिचं अस्तित्व त्यांच्यातल्या मुक्त लेखिकेला बंधनात ठेवणारं, काही प्रमाणात लेखनावरच मर्यादा घालणारं ठरलं. अनेक भावना, प्रवृत्ती आतल्या आत दाबून टाकून त्यांनी कधी कधी लेखन केलं. पुढे मुलींच्यासाठी म्हणून विशिष्ट लेखन करणं टाळलं. पुरुषाने कसंही लिहिलं तरी चालतं. पण स्त्रीने स्वतःला हवं तसं लिहिलं तर ते खपवून घेतलं जात नाही. त्याचा तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास होतो. ही धारणा या प्रक्षोभक मानल्या गेलेल्या लेखिकेच्या ठायी ही होती. तरीही आपल्या मुलींना आपल्या लेखनाची किंमत चुकवावी लागली असं त्यांनी एकदा म्हंटलं होतं. आता या उतारवयात मात्र त्यांना अनेक बंधनं झुगारून लिहावंसं वाटतं. त्यांच्या दोन्ही मुली आपल्या क्षेत्रात नाव काढत आहेत म्हणून त्या निश्चिंत झाल्या असतील का? ( अंतरा देव सेन इंग्रजीतील नामवंत पत्रकार आहे तर नंदना देव सेन अभिनेत्री म्हणून चित्रपट क्षेत्रात स्थिरावत आहे) की आता काळ बदलला, समाज बदलला असं त्यांना वाटतं
   नवनीता देव सेन यांच्या वाटचाली कडे पाहिलं की, लिहिणाऱ्या स्त्रियांच्या भोवती असलेली अदृश्य बंधनं खऱ्या अर्थानं अदृश्य कधी होणार असा प्रश्न पडतो. स्त्रीच्या लिखणामागे असलेले अनेक दबाव, अनेक काच हे खूपदा अनुच्चारित राहतात. स्त्री लेखनाचा वेगळा विचार म्हणूनच तर करावा लागतो!
   


(हा लेख 'कोरा कागद निळी शाई ' ह्या नंदिनी आत्मसिद्ध यांच्या पुस्तकात पूर्वप्रकाशित झालेला आहे.)


No photo description available.
नंदिनी आत्मसिद्ध   

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form