भारतातल्या अर्ध्याहून अधिक स्त्रिया अनिमियाने ग्रासलेल्या असतात. त्यांच्या कुपोषणाची कारणे आणि त्यावरील उपायांची चर्चा करणारा लेख

स्त्री... अन्नपूर्णादेवी वगैरे... ती इतरांची भूक आधी सांभाळते, सर्वांना पोटभर, चवीचं खाऊ घालणे हे तिचे परम कर्तव्य वगैरे सगळं पाठ आहे आपल्याला! जवळपास शंभर टक्के भारतीय स्त्रिया या संस्कारात मुरून स्थितीप्रिय झालेल्या असतात. यात सहज प्रवृत्तीपेक्षा शतकानुशतकांचे मुरवलेले भूमिकांसंबंधीचे संस्कारच अधिक काम करत असतात. तथाकथित श्रम विभागणीत पुरुषाने अन्न शिकार करून आणणे- त्यासाठी शस्त्रे तयार करणे, इतरांच्या जमिनींवर आक्रमण करून अन्नप्राप्तीची शक्यता वाढवणे या गोष्टी सुरुवातीला होत्या. आणि गोळा करण्यासारखे अन्न म्हणजे रानावनातील कंद, फळे, पाने, मध, अळंबी वगैरे गोळा करण्याचे काम स्त्रियांकडे होते. मिळवलेले अन्न टिकवणे, शिजवणे यासाठीही स्त्रियाच पुढे झाल्या.
मानववंश टिकण्यासाठी, प्रगत होण्यासाठी ही श्रमविभागणी काही हजार वर्षांपासून ते गेल्या दोन हजार वर्षांपर्यंत उपयुक्त ठरली असे कदाचित् म्हणता येईल. तसे करण्यात मानवाच्या समाजबांधणीतील नियमांचे स्थान सुरुवातीला जरा सैल होते, ते नंतर दृढावत गेले. संघटित धर्मांच्या आस्थापना ते अधिक जाचक करत राहिल्या- हा विषय आणखी वेगळा आणि वेगळ्या स्थानी लिहिण्याचा.
शतकानुशतके नव्हे सहस्रकानुसहस्रके ज्या गोष्टी जीव करत रहातात त्याचा परिणाम त्यांच्या अनुवांशिक स्मृतींवरही होतो असे एथॉलजीमध्ये (प्राणीवर्तनशास्त्र) बहुतांशी सिद्ध झाले आहे. जगात टिकून रहाण्यासाठी ज्या क्रिया उपयुक्त असतात, यशस्वी ठरतात त्यांची छाप सजिवांच्या जैविक घटनेवर रहाते. अमुक जीव अमुक प्रकारेच का वागतात यामागील कारणे बहुधा या प्रकारातील असतात. वातावरणात, पर्यावरणात अचानक काही बदल झाले तर असे वर्तन कदाचित् त्या जिवांना उपयुक्त न ठरता मारकही ठरू शकते (याचे चपखल उदाहरण म्हणजे पतंगांचे ज्योतीवर उडी घेऊन जळून जाणे. रात्रीच्या वेळी चंद्राच्या दिशेने प्रवास करण्याचे अनुवांशिक जैविक वळण चंद्राची जागा दिव्यांनी, ज्योतीने घेतल्यानंतर पतंगांच्या प्रवासाला दिशा न मिळता त्यांचा जीव जातो). तर मुद्दा असा, की काही हजार वर्षांपूर्वी जी भूमिका मानववंश टिकून रहाण्यासाठी उपयुक्त ठरली ती भूमिका आता कदाचित् एकमेव उपयुक्त राहिलेली नाही. तरीही तिला चिकटून राहिल्यास मरण ओढवू शकते किंवा मरणप्राय परिस्थिती ओढवू शकते. केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर बौद्धिक, मानसिकदृष्ट्याही असे होऊ शकते.
आज आपण अन्न आणि स्त्री या विषयावर विचार करताना ही वैज्ञानिक सैद्धांतिक मांडणी लक्षात ठेवायला हवी.
अन्न आणि स्त्री या दोघांचा अन्न शिजवण्या-वाढण्या-पुरवण्याचा संबंध गहिरा आहे, जुना आहेच. अनेकदा विसरले हे जाते की अन्नाचा आणि स्त्रीच्या देहाचाही संबंध आहे. अर्थातच उत्क्रांतीतून आलेल्या आनुवंशिक जैविक सवयींतून बाहेर पडलेल्या स्त्रियाही आहेतच. पण त्यांच्या तुलनेत त्याच सवयीत अडकून पडलेल्या स्त्रियांची संख्या खूपच जास्त आहे. भारतात स्त्रियांच्या अन्नदशेशी गहिरा संबंध आहे तो धार्मिक संस्कारांच्या संस्कृतीचा. अन्नावरच्या अनेक प्रक्रियांसकट शिजवण्याची मुख्य प्रक्रिया पार पाडणे हे स्त्रियांचे कामच नव्हे तर कर्तव्य ठरले. आणि ते पार पाडतापाडता स्त्रीला विनाकारण त्यागमूर्ती ठरवून, तीच चौकट तिला गारद करत गेली. या त्यागमूर्तीने नवऱ्याला, नवऱ्याच्या घरातल्यांना, मुलाबाळांना प्रथम द्यायचे आणि मग स्वतः खायचे या नियमांच्या जोडीला स्वतःच्या पोटाची फिकीर करायची नाही, जेमतेम जेवायचे, स्वतःसाठी चांगले काही राखून ठेवायचे नाही, चांगल्यात चांगले आधी इतरांना द्यायचे हे फडतूस दिव्य संस्कार स्वतःला पटवत गेलेल्या स्त्रिया पाप्याची पितरं होऊन जगायला लागल्या किंवा फोफशा तरी होत गेल्या... बाळंतपणे झाल्यानंतर अशक्त झालेल्या माता अंगावर दूध पाजताना केवळ पहिला महिना सव्वामहिना जरा कौतुकाच्या रहात- तेही झालेले मूल मुलगा असेल तर. नाहीतर मग बाईच्या खाण्याची वज कोण राखतो?
धार्मिक संस्कारांच्या आणखी एका अध्यायात स्त्रियांनी मांसाहारी जेवण्यावरही निर्बंध आले. सुसंस्कारित स्त्री म्हणजे शाकाहारी असणे, तिने मांसाहार कमी करणे- खरेतर एकंदरच आहार कमी घेणे या गोष्टी गृहीतच धरल्या जातात. मानवी शरीराला उत्तम प्रथिनांची गरज असते. आणि उत्तम प्रथिने ही प्रायः प्राणिज असतात. स्निग्ध पदार्थांतील सर्वोत्तम स्निग्धांश हे प्राणिज असतात. भारतात एकंदरीत मांसाहाराबद्दल अलिकडच्या हजार वर्षांत झालेल्या बौद्धिक गोंधळानंतर अनेक चुकीचे समज पसरले. आणि त्याची परिणती मांसाहार कमी होण्यात झाली. या परिणाम थेट भारतीय वंशाच्या लोकांची उंची, स्नायू (आणि बुद्धीही) कमी कमी होण्यात दिसतो आहे. पण विशेषत्वाने वाईट परिणाम सातत्याने दिसून येतात ते स्त्रियांच्या आरोग्यावर. आपण काही ठोस उदाहरणे पाहू.
पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक भूक असते आणि अधिक सकस आहार द्यावा लागतो, कारण त्यांना बाहेर वावरायचे असते, शारीरिक कष्टाची कामे असतात हे गृहीतक पूर्वी होते. ते परिस्थिती बदलल्यानंतरही सुरू राहिले. घराघरांमध्ये मुलांना दूध देणे आणि मुलींना चहा पाजणे हे अजूनही गरीब परिस्थितीतल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांच्या कुटुंबांत दिसत असते. सासरी चहा तरी मिळेल की नाही माहीत नाही... दूध कोण देणार तुला- घे सवय करून. बाईने भागवायचं असतं हा संस्कार गेल्या किती पिढ्यांपासून आपल्या स्त्रियांवर होत आला आहे.
आम्ही अनेक गावांमध्ये अन्न आणि पोषक आहार या विषयावर शिबिरे घेतली. त्यातील शेतकरी-कामकरी समाजात घेतलेल्या शिबिरांत हेच दिसून आले की पोषक आहार दूर राहिला पण निदान - वेळेला आहार घ्या हेच सांगावं लागत असे. समोर बसलेल्या पन्नास बायकांतील दोघीतिघी धडधाकट दिसत. बाकी सगळ्या स्पष्ट पंडुरोगी-ऍनिमियाग्रस्त.
सकाळी उठल्यावर काय खाता- याचं उत्तर चहा घेतो हेच असे. त्या चहाबरोबर काहीतरी खा- आदल्या रात्रीची शिळी चपाती-भाकरी काहीतरी पोटात ढकला हे सांगावं लागे. नाहीतर भरपूर गूळ नाहीतर साखर घातलेला मिट्ट गोड चहा हेच त्यांचं ऊर्जा टिकवण्याचं एकमेव साधन असे.
बायांना वाटतं की त्यांनी पुरेसं न खाणं हेच योग्य. एक निरोगी बाई अख्ख्या घराचा त्रास वाचवते हे समजत नाही. रांधलेल्या गोडाधोडातलं जेमतेम खायचं आणि महागामोलाचं मासेमटण असेल तर त्याच्या फक्त रश्शाला लावून चपातीभाकरी खायची आणि पोरांसाठी राखून ठेवायचं हा वेडेपणा त्यांना त्याग वाटतो. पण अशा प्रकारे केलेली हेळसांड नंतर त्यांना आणि अख्ख्या कुटुंबाला महागात पडते हे समजत नाही.
निर्धन घरांपासून सधन घरांपर्यंत सगळीकडच्या बायका स्वतःसाठी उत्तम भाग कधीच घेत नाहीत. माशाचं डोकंच खातील, पोटाकडचीच तुकडी घेणार, कोंबडी-मटणातले हाडाचेच तुकडे स्वतःसाठी ठेवतील... डाळीचं पाणी घेतील- घट्ट डाळ इतरांच्या ताटात घालतील- नाहीतर मला नं इच्छाच नाही म्हणत चटणीलोणच्याशी खातील. हे असे करणे जुन्या (फडतूस) त्यागाच्या कल्पनेत बसत असेल. पण त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम पाहाता ते एकंदर सर्वांनाच महागात पडते हे समजून घेतले पाहिजे.
डाळी, उसळी, या दुय्यम प्रतीच्या प्रथिनांसोबत उत्तम प्रतीची प्राणिज प्रथिने म्हणजे दूध, दही, अंडी, मांस, मासे, सुके मासे या गोष्टी पोटात गेल्या पाहिजेत.
सकाळी केवळ भाकरी- पोहे-उपमा- चपाती अशा कार्बोहायड्रेट्सयुक्त गोष्टींनी भूक भागवावी लागत असेल तरी ती उत्तम न्याहारी नव्हे. कांदेपोहे, बटाटेपोहे, उपमा वगैरे करण्यासाठी कितीही यातायात नि कष्ट करावे लागले असले तरीही एक साधे उकडलेले अंडे, किंवा त्याची पोळी ही न्याहारी अधिक उपयोगाची असते. आमची एक परदेशी मैत्रीण म्हणते, इंडियन्स फार जास्त कार्ब्स खातात. पोह्यात बटाटे, बटाट्याची भाजी चपाती, सगळंच कार्ब्स वर कार्ब्स. यात प्रथिने कुठे आहेत?कितीही चवदार बटाटा असला तरी त्यातून जे मिळते ते तेवढेच रहाते.
अन्नशुचितेच्या कल्पना ब्राह्मणी वर्चस्ववादातून किंवा आपल्या वर्णोन्नतीच्या प्रवासाच्या ध्यासातून नको इतक्या रुजल्या आहेत. न पेक्षा गायीच्या मांसासारखा उत्तम, आणि स्वस्त प्रथिनांचा पर्याय आपण असा वाया घालवला नसता.
प्राचीन काळात ऋषिमुनींच्या आश्रमांत आतिथ्य करायचे तर गोवत्साचे मांस अतिथीला किंवा निमंत्रिताला देण्याची सर्रास पद्धत होती. पण स्वतःच्या विनाशा कडे वाटचाल करणाऱ्या काही प्राणी प्रजातींप्रमाणेच भारतीयांनी शाकाहाराचे स्तोम वाढवून मांसाहार टाळायला सुरुवात केली आहे. याला सर्वप्रथम बळी पडत आहेत त्या स्त्रिया.
धर्माधिकारी, समर्थ, बापू, गुरुदेव वगैरे स्वामी मंडळी शाकाहाराचा सल्ला त्यांच्या बैठकांतून देतात. घराबाहेर पडायची आणि एक प्रकारे काहीतरी समाजजीवन मिळवण्याची संधी म्हणून असल्या बैठकांना स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात. मग मांसाहार करणे म्हणजे - ‘डेड बॉड्या खाणे’ वगैरे सारखे भयाण वाक्प्रयोग रूढ करून पोराबाळांनाही मांसाहारापासून परावृत्त केले जात आहे.
‘आधीच मर्कट तशात मद्य प्याला’या पंक्तींप्रमाणे- या देशातील स्त्रियांचे जीवन आणि आरोग्य आधीच विविध सामाजिक समजांमुळे धोक्यात असते. नर बालक व्हावे म्हणून जीव मेटाकुटीला येई तो बाळंत होत रहाणे वा शक्य तर मुलींचे गर्भ पाडून पुन्हापुन्हा फॅक्टरी सुरू ठेवणे, मग आबाळ, मग कुपोषण या चक्रात बायका सापडून त्यांची चिपाडं किंवा फुगे झालेलेच असतात. त्यात या बाबामहाराजांचे सल्ले, घरच्यादारच्यांचा दबाव... सारेच शोकात्म आहे. आपण स्त्रियांशी बोलत असलो तर त्यांना वेळेवर पोटभर खा, मांसाहारही करा हे त्यांना सतत सांगून मनावर ठसवणे आवश्यक आहे.
डॉ. मुग्धा कर्णिक
डॉ. मुग्धा कर्णिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी तीन महाकादंबऱ्यांचा, एका लघुकादंबरीचा, पाच राजकीय पुस्तकांचा आणि अनेक कवितांचा अनुवाद इंग्रजीतून मराठीत केला आहे. त्यांच्या राजकीय लिखाणामुळे त्या समाज माध्यमांतून प्रसिद्ध आहेत.‘द कुकिंग विच’ या नावाने त्यांनी केलेले खाद्यपदार्थांच्या कृतीचे लेखनही लोकप्रिय आहे.




Great Ma'am. Excellent.
ReplyDeleteधन्यवाद मॅडम सत्य परिस्थिती मांडली महिलांच्या मनावर हे खूप बिंबवले जाते मी ग्रामीण भागात स्त्रिया शी बोलताना नेहमी ऐकतो ते स्वतःला आम्ही अडाणी आहोत आम्हला काही कळत नाही असे म्हणतात फार वाईट वाटते की या सर्व गोष्टी ना जबाबदार पुरुष प्रधानता आहे हे समजयला खूप वेळ लागला मला खूप छान लिहले आपण
ReplyDelete