मला स्वयंपाकघराविषयी इतकी ओढ वाटू शकेल ठाऊकच नव्हतं. कारणच नव्हतं काही. आयुष्याचं सर्वसामान्यपणे काही ठरतं, काही टप्पे असतात तसे ते माझे असायचे काही कारण नव्हतं. मी स्वत:विषयी फार गंभीरही नव्हते नि उदासीनही. तर तसं काहीच ठरलं नव्हतं की पुढं आपलं काय करायचंय, आपण काय करायचंय? होईल तसं होईल. म्हणजे जात होते दिवस. दु:खानं नव्हे नि आनंदानंही नव्हे, फक्त जात होते. 1990 ते 2000 हा काळ तो. त्यात रेडिओ, टीव्ही, सणवार, पाहुणे यांनी रूटिन किंचित बदलायचं. ते बरंच वाटायचं, पण ते नसताना सुद्धा काही फार डाचायचं नाही.
आई खूप साधा सात्त्विक स्वयंपाक करायची. चवदार असायचा तो. सणावारी नेमानं विशिष्ट रांधलं जायचं. ठरून गेल्या होत्या अनेक गोष्टी, उदा. नवरात्रात नऊ दिवस सवाष्ण-ब्राह्मण जेवायला यायचे. आणखीही कधीमधी असायचे. पक्ष पंधरवड्यात महाळ/महालयाचा खास स्वयंपाक. भोगी, ऋषीपंचमी, गौरीचा भाजी-भाकरी-खिचडीचा नैवेद्य. आई नोकरी सांभाळून नि माझ्यासारख्या अपंगत्वामुळे घरातच अडकलेल्या मुलीचा ताण सांभाळून हे सगळं कसं करायची कुणास ठाऊक. पण या सगळ्यांतून माझे दिवस बदलत राहायचे. घरातून क्वचितच बाहेर पडणार्याला माझ्यासारखीला दिवस वेगळेवेगळे वाटावेत याची सोय या खाण्यापिण्यातील बदलातून होत राहायची. शिवाय शनिवार/रविवारचं विशेष काहीतरी, एरवीही संध्याकाळी आई घरी परतली की भूक लागल्यावर चटपट होणारं काहीतरी. भडंग, लाह्या, शंकरपाळ्या नि किती काय काय. घरी मी एकटी असताना भुकेनं कासावीस होऊ नये याची किती तजवीज करून ठेवली जायची! हे बाबा, धाकटी बहीण, येणारेजाणारे असं सगळ्यांसाठीच असलं तरी मी चवीनं खाते, कौतुक करते मनापासून म्हणून मीच मध्यवर्ती असायचे या खाद्यजत्रेत. माझ्यात असणारे जगण्यातले सगळे रस, रंग नि चवी बरकरार राहिल्या त्याचं श्रेय या खाण्यापिण्याला, आईलाच! शिवाय आईच्या मैत्रिणी नि आमच्याच विस्तारित कुटुंबातली चार घरं, ज्यांच्यात काहीही, अगदी थालीपीठही नव्या भाजणीचं केलं की ते आठवणीनं मला यायचंच. एक मात्र आता वाटतं, मनाची अवस्था अन्नाच्या या चक्रामुळं कितीही संतुलित राहिली तरी आईचे जितके श्रम नि जितका आयुष्यातला वेळ यात गेला, तिला साधं शांत बसून राहाण्याची चैन कधी अनुभवताच आली नाही, आजही येत नाही.
हां, पण आमच्याच घरात माडीवर भाडेकरू म्हणून राहाणारा बंडूदादा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होता. त्याच्या फोडण्या जोरदार असायच्या. भाज्या सणकून परतायचा तो. गावच्या शाळेत तो शिपाई होता. पण जेव्हा जेव्हा शाळेत सामुदायिक जेवण असायचं, पावट्याच्या मौसमात डाळ-वांगंपावटे कार्यक्रम व्हायचा तेव्हा त्याच्यातल्या उत्साहाला जागा पुरायची नाही. शाळेत कुणाची फिस्ट असली की त्यालाच सांगायचे सगळे. भजी, वडे, जिलेबी, बुंदीचे लाडू सगळं जमायचं त्याला. मुळात आवडायचं त्याला. बटाट्याची, फ्लॉवरची भाजी करण्याची त्याची पद्धत वेगळीच चव द्यायची या भाज्यांना. आईच्या हातचं मला आवडायचंच, पण बंडूदादाचा स्वयंपाक म्हणजे ‘माहौल’ होता. सणसणीत, चमचमीत नि मेंदूच्या तारा झंकारणारा चरचरीत. सात्विकतेला त्यात तिळाएवढीही जागा नसायची. अध्येमध्ये हा बदल, त्या पेक्षा बंडूदादाचं उत्साहानं स्वयंपाकाच्या तयारीला लागणं मला आकर्षित करायचं. मी मन लावून त्याची तयारी बघायचे. तो जमिनीवर स्टोव्ह ठेवून हे सगळं करायचा, त्यामुळं मला दिसायचंही. घरात उंच कट्ट्यावर केलेला कोणताही पदार्थ मला दिसायचा नाही. त्यामुळं त्याच्या रंगात नि वाफेत झालेले बदल मला कळायचे नाहीत. आपण काहीही रांधताना ते दिसण्यानं स्वयंपाकाच्या दर्जात, आपल्या उत्साहात खूप फरक पडतो हे मात्र माझ्या लक्षात येत गेलं. ते लक्षात यामुळंही आलं की आईबाबा व बहीण शाळेत गेल्यावर मी घरीच असायचे. कारण शाळेत परीक्षेपुरतीच उपस्थिती असणार हे प्रयोगांती कळून आलं होतं. त्यावेळी सोप्याला लागून असणार्या पायर्या हाताच्या जोरानं उतरत उतरत मी खाली राहाणार्या नायकवडींच्या घरी जायचे. त्यांच्याकडे चूल होती. त्यावेळी गरम भाकरी किंवा भरपूर तेल लावलेल्या चपात्यांचा खमंग हवाहवासा गंध वेड लावायचा. अक्का म्हणायची, सोन्या, चहा टाकणारे, चहा-चपाती खाणार? मी नाही म्हणायचा प्रश्नच नसायचा इतका तो गंध टेम्पटिंग असायचा. शनिवारी घरचे सगळे लवकर शाळेत जायचे. ते गेले की मी लगेच अक्काकडे जायचे. त्यावेळी तिच्या स्वयंपाकाला नुकती सुरुवात झालेली असायची. लोखंटी अर्धखोलगट तव्यात बेफिकीरीनं परतलेल्या तिच्या भाज्यांना आधी वास घेऊन खावं व नंतर नीट मांड ठोकून रसनेत घोळवावं असंच व्हायचं. काहीच मसालेबिसाले न घालता जलद गतीनं केलेल्या त्या स्वयंपाकाची प्रत्येक पायरी माझ्या आठवणीत रूतून राहिली आहे. कारण ती दिसायची सुद्धा.
हे झालं खूप नंतरचं, पण त्या आधी हॉस्पिटलचा एपिसोड येतो. ते ठिकाण लक्षात राहिलंय माझ्या मूळ चवीत क्रांतिकारक बदल करण्याबाबतीत. पूर्वी गावी असताना म्हणजे अपघातपूर्वकाळात अंडं खाणं ‘सवालही पैदा नहीं होता!’ या कॅटेगरीत. हॉस्पिटलमध्ये ते औषधोपचाराचा भाग म्हणून कंपलसरी झालं. सुरुवातीला भरपूर रडारड करून झाली नि नंतर ते आवडीचं खाणं बनलं. गावात/घरात खायच्या सवयी नि पदार्थ आणि आता मुंबईच्या हाजीअलीसारख्या ठिकाणी असणार्या भारतातल्या महत्त्वाच्या हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातले पदार्थ यांत चवीचाच फरक नव्हता फक्त, खूपच वैविध्य होतं, जिन्नसांमध्ये नि पाककृतींमध्येही. आजही मला अनेक पदार्थ त्या चवीचे करावे वाटतात, पण उतरत नाहीत मेंदूतून थेट तसे. तिथं पहिल्यांदा सूप्स प्यायला शिकले, दोसे, विविध तर्हेची रायती, भाताचे विविध प्रकार, घट्ट अशी विशिष्ट चवीची चटकदार ‘दाल’, पकोडे नि त्याचं विशिष्ट डिप. कितीतरी असेही पदार्थ ज्यांची नावं लक्षात नाहीत, केवळ चवी जिभेवर येतात डोळे मिटल्यावर. ८९-९० या काळात जेमतेम नऊदहा वर्षांची असताना हॉस्पिटलमधलं एकटीचं राहाणं सुसह्य केलं ते तिथल्या फार छान माणसांनी व तिथल्या समृद्ध खाद्यजीवनाने. तरी जेव्हा खूपच घरवेडी व्हायचे तेव्हा आजीआजोबांच्याच जागी असणारे भिडे आजोबाआजी पळीवाढ्या मेतकूटतूपभात, ताकातली उकड अशा गोष्टी कडीच्या डब्यातून घेऊन नि ‘चांदोबा’चे अंक काखोटीला मारून येणं करायचे नि ओळखीच्या चवीचा अस्वस्थता कमी करणारा घास खाऊन मी शांतवायचे.
न कळत्या वयात घरून वर्षादीडवर्षासाठी थेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नि तिथून परत घरी म्हणजे अशा खेडेगावात जिथं त्यावेळी एखाददुसराच लॅन्डलाईन फोन होता. तिथंवरचा हा सगळा काळ. बराच बदललेला. उपरा वाटवणारा. शरीराची स्थिती बदलून जाते तेव्हा आसपासचं सगळं ओळखीचं भूतकाळात जमा होतं. ओळखीचं वाटतंय, पण अनोळखीच उरतंय अशा भवतालात बदलली नव्हती ती घरच्या खाण्याची चव! हे आता विचार करताना कळतंय. त्यावेळी मी बसून इकडेतिकडे सरकायचे. चालताना वेगळ्या उंचीवरुन वेगळं दिसतं, आता बसत्या उंचीवरून त्याच अवकाशात नीट पाहू शकायचे. त्यामुळं मला जमिनीवरचा केर लगेच दिसायचा, पण मधल्या उंचीवरचे डबे, कपडे, स्वयंपाकाचा ओटा दिसायचा नाही. गंमत म्हणजे थेट त्या वरच्या छताच्या तुळ्या, पाटण्या, जळमटं, पाली नीट दिसू शकायच्या. बारकाव्यासकट. बदलेल्या स्थितीमुळं कधी विरक्त कधी आसक्त असा ऊनपावसाचा खेळ चालायचा. ते सगळं आज इतक्या लांब उभं राहिल्यावर दिसतं नि कळतं आहे.
खाण्यापिण्याचे लाड वगैरे करुन घेण्याच्या, अपघातपश्चात काळात मी साधी कोथिंबीर निवडण्याचेही कष्ट घेतले नव्हते. घरातलं ते शेंगदाण्यांचं कूट करण्याचं यंत्र मात्र मस्त होतं, त्याचं हँडल फिरवत कूट करायला मला फार आवडायचं, आणि हो, अध्ये मध्ये त्या पुरणयंत्राशी खटपट, पण फार खोलात नाही. जेव्हा एक पोर्टेबल गॅसची शेगडी ओट्यावर न ठेवता खाली बसून स्वयंपाक करू शकायला लावून घेतली गेली तेव्हा मात्र कधीतरी आमटी केलेली आठवतेय. पण कधीतरीच केलेली, फार आठवणी नाहीत.
2000 साली काहीतरी शोधायलाच पाहिजे म्हणून कोल्हापुरातील एका अपंग पुनर्वसनाशी संबंधित संस्थेत मी राहायला आले. त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहायचं नि तिथून साताठ किलोमीटरवर असणार्या ऑफिसमध्ये काम करायचं असं ठरलं. ही संस्था कोल्हापुरात, हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड नावाची. बाकी तिथला पहिला दिवस नवं जग समजून घेण्यात, व्हीलचेअर आत्मसात करून तिच्यावरून वावरत काम करण्यात बर्यापैकी गेला, पण रात्री जेवायला नकोच वाटलं. घरची आठवण येत होती. सकाळी साडेसातला ब्रेकफास्टची बेल होते नि नऊ-सव्वा नऊला ऑफिसला नेण्यासाठी रिक्षा येते त्याआत डबा घेऊन तयार राहावं लागेल असं कळलं होतं. ब्रेकफास्ट काये असं विचारल्यावर कुणीतरी सांगितलं, पावभाजी. म्हटलं वॉव! गरमगरम मसालेदार वाफाळत्या भाजीसह पाव खायला मजा येईल. गेले तर होती पावाची भाजी. घरी पाव उरले, शिळे झाले तर ती केली जायची, कांद्यात खमंग परतलेली. अपेक्षाभंगाचं वाईट वाटलंच, पण गार, कोरडी, मोठे तुकडे झाल्यामुळे तिखटमीठ न लागलेली ती पावाची भाजी एक चमचा तोंडात घेतल्याक्षणी नको वाटली नि रडूच कोसळलं. घरचा गरम घास आठवला. क्षणात सगळ्याची किंमतच कळून गेली. असहाय्यता वाटली.
तिथलं स्वयंपाकघर त्यावेळी मोजक्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती नि काही अपंग व्यक्तींनी सांभाळलेलं. व्यक्ती म्हणजे स्त्रीच. काहीवेळेस स्टोअर किपर पुरुष असायचे, बाकी स्वयंपाकाच्या व्यवहारात स्त्रियांचीच गर्दी. कुणाला कुठलं काम यावरून तिथली सत्ता लक्षात यायची. दोन वेळची जेवणं नि ब्रेकफास्टसाठी लागणारे कांदे सतत कोण चिरतं, भाज्या कोण चिरतं, फोडण्या कोण घालतं, चपात्याभाकर्या कोण बडवत बसतं, वाढायला कुणाला मिळतं, त्यातही मांसाहारी जेवण असलं की कोण वाढतं नि कोण रांधतं, बाहेरची कँटिनसाठीची ऑर्डर आली की शेंगदाणा चटणी अथवा चकली, लाडू यासाठीची मूलभूत तयारी कोण करतं व शेवटचा हात कोण फिरवतं या सगळ्याचं निरीक्षण करून त्यातली गुपितं कळणं हा एकतर्हेनं ज्ञानमार्गाकडे वाटचाल करायला मदत करणारा प्रदेश होता. स्वयंपाकघरातला पॉवर गेम बर्याच कळा फिरवतो हे लक्षात येत गेलं तसतसे बरेच उलगडे होत गेले.
हॉस्टेलच्या स्वयंपाकघरातल्या प्रत्येक पदार्थाची चव गंडलेली नव्हती, काही पदार्थ फारच चवदार असायचे, उदाहरणार्थ कांदाभजी, फ्रुट कस्टर्ड, कुर्मा, पुलाव, इडली-सांबार वगैरे. पण तुम्ही कितव्या पंक्तीत कुणाबरोबर बसता यानं पडणारा फरक ओळखू यायचा. आपण हळूहळू विशेष होत गेलो की आपल्या टेबलवरच्या पंगतीबद्दल इतर टेबलं तसाच विचार करत असतील का जसा आपण अविशेष असताना करायचो असं वाटायचं. पण दिवसभराच्या अशक्य दमणुकीत मेंदूची आणखी दमण्याची तयारी नसायची. मेंदू तरतरीत असताना याकडे संबंधितांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न व्हायचा. तितकंच एक ते. तरीही विशिष्ट लांबलांब चिरलेल्या कांद्यात विशिष्ट वाटण घातलेल्या भाज्या कितीही बदलल्या तरी एकसारख्याच लागायच्या. त्यावेळी ऑफिसात संस्थेचे ट्रस्टी असणार्या पी.डी.देशपांडेंच्या घरचा त्यांच्यासाठीचा डबा नंतरच्या काळात माझ्यासाठी मरुद्यान झाला. रजनीताईंचं रांधणं थेट माझ्या आठवणीतल्या व सुखकर अन्नाशी नातं सांगणारं. परतलेली भेंडी, कुडकुडित कारलं, मेथीची परतलेली भाजी, मटारची उसळ नि सगळ्यात महत्त्वाचं मऊसूत पोळ्या. कस्सलं भारी वाटायचं. त्या चवीनी मला परत मऊकोमल करायला सुरुवात केली. अन्न आपल्या थेट आनंदाशी व मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी कसा उपचार करते त्याची ही झलकच.
संस्थेतल्या अध्यायाचं उद्यापन करायची वेळ कदाचित मी वाचायला घेतला तेव्हा ठरून गेली असेल, पण आपण इथे जन्मभर नाही राहू शकणार हे कळलं होतं. म्हटलं ना मघाशी, स्वयंपाकघरातल्या पॉवर गेम बद्दल. तसे कितीकिती असतात. तर ते असो. मी स्वतंत्र व्हायचं ठरवलं. घर मांडायचं ठरवलं. त्यासाठी लहानमोठी विश्वासू मित्रमंडळी नि मुख्य म्हणजे घरचा पाठिंबा होता. घर लागलं कसं याचा तपशील फारफार आहे. तर थेट विषयाशी येते. माझ्यासारखी पॅराप्लेजिक असणारी मुलंमुली स्वत:च्या घरात राहाणारी आहेत, पण ती कुटुंबासह. एखादीच भावना विस्पुते सारखी संपूर्ण जबाबदारीनं घर सांभाळणारी. माझं मॉडेल निराळं असणार होतं. माझ्यासोबत आईबाबांनी राहावं हा आग्रह मी करणार नव्हते. मला, त्यांचं आयुष्य व जगण्याची रीत त्यांनी माझ्यासाठी बदलायला नकोच होती. त्यावेळी सोबत एक आजी आल्या. त्यांनाही गरज होती. त्या उत्तम स्वयंपाक करायच्या पण तेल नि पाणी यातला फरक त्यांना ध्यानात यायचा नाही. शिवाय तक्रारखोर. त्या मला किंवा माझ्यासारख्या त्यांच्या मते ‘गरजू’ अवलंबित्व असणार्याला स्वयंपाक करून देतात, सोबत राहातात याचा एक औदार्यभाव त्यांच्या चेहर्यावरून गळून फरशा घाण करायचा. खरं तर तो व्यवहारच होता, सोयीचा. पण माणसं दुसर्याच्या डोक्यावर उपकाराचं ओझं ठेवायची एक संधी सोडत नाहीत. विनाकारणच मला ती संधी त्यांना द्यायची नव्हती, तेव्हा त्या तिचं सोनं करण्याआधी मी त्याचं भंगार केलं. मैत्रिणीनं एक नवीन ताई पाठवल्या. त्यांची समजेची वाढ खुरटलेली. स्वयंपाकात अकुशलतेची परिसीमा. चपाती हातात धरली की पापडाचा फील यायचा. भाकरी म्हणजे भिजवून खाल्लेली रद्दी. भाज्या एकतर न शिजलेल्या किंवा करपलेल्या. भांडी स्वच्छ घासली तर पाप होईल म्हणून त्या त्यात शितं ठेवायच्या. साबण राहू द्यायच्या. या काळात मला कळलं की शोषण करण्याच्या स्टिरिओटाईप चालीला आपण बळी जायचं नाही. आपल्याला चार भिंतींच्या आत जे जे काम व्हायला हवं आहे ते करायलाच हवं - आणि मी माझे पहिले कांदेपोहे केले. आईची त्यावेळी नोकरी चालू होती. त्यामुळं मला शिकवायला ती येऊ शकत नव्हती. चव आठवत पदार्थ आकाराला आणणं हे त्यावेळी पहिल्यांदा केलं. नंतर कधीतरी पहिल्या इंडियन मास्टरशेफमध्ये मी ती परीक्षा पाहिली की पदार्थ खा नि त्यात काय काय असेल याचा अंदाज करा. मी स्पर्धा सुरू करण्याआधी जिंकायला सुरुवात केलेली होती.
तर या बॅटलफिल्डवर येण्याची तयारी नीटच केलेली होती. २००७ ला मी शिवाजी पेठेतल्या तळमजल्यावर राहायला आले तेव्हाच घर जास्तीजास्त व्हीलचेअर फ्रेंडली करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे लाईटची बटणं जमिनीपासून अडीच फुटांवर, टॉयलेट, बेसिन, कॉट, कामाचं टेबल यांचीही रचना व्हीलचेअरशी मैत्रीपूर्ण.
स्वयंपाकाचा ओटा व्हीलचेअरचं फूटरेस्ट आत जाईल असा म्हणजे ओट्यावर ठेवलेल्या गॅसशेगडीपाशी माझा वावर सहज होईल असा. सिंकमध्ये भांडी घासता येतील, पाणी सहज घेता येईल अशी रचना. कट्ट्याच्या बाजूला असणार्या भिंतभर रॅकमधून डबे सहज घेता येतील अशी सोय. कांदा हातात धरून तो चिरण्यापेक्षा तो स्थिर ठेवून त्यावर दाब देत तो चिरणं सोयीचं. त्यामुळं तो विचार करून सोय. एकूण मांडामांड नीट केली होती, पण ती वापरून पाहायचा मौका स्वत:ला नीट दिला नव्हता. त्यामुळं या नीट लागलेल्या नेपथ्यात मला आता अॅक्ट करायचा होता. कांदेपोहे ठरले. कढई ठेवली. बाजूला एका ताटात कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे अशी तयारी ठेवली. कढईत तेल घातलं. तेल तापलं का बघायला हळू हळू करत बरीच मोहरी घातली. घाईच झाली होती मला. ती तडतडल्यावर कोण आनंद झाला. मग हिंग घातला. मग मिरच्या, शेंगदाणे, कांदा, मीठ, हळद.... पोहे बहुतेक जास्तच भिजले. लगदा झालेले. ते हाताने सुटे करत कसेबसे घातले. गडबडीनं कढईला हात लावला. मग तिथल्यातिथं नाचत चिमटा घेतला. तो कसा पकडावा याची व्हिज्युअल्स आठवत प्रयत्न केला तो बरा साधला नाही. शेवटी कापडानं कढई पक्की धरत पोहे परतले. त्यावर झाकण ठेवलं. भूक लागली, भूक लागली असा गोंधळ घालायचे तेव्हा आई म्हणायची, एकदोन सणसणीत वाफा येऊ देत, मग देते. तर आणल्या दोन सणसणीत वाफा नि घेतलं खायला. उदयकाका म्हणाले, मी खाल्लेल्या आजवरच्या पोह्यात हे सगळ्यांत चवदार पोहे. मी ते लगेच मान्य केलं. कौतुक स्वीकारण्यात कंजूशी केली नाही. पहिल्या प्रेमातली प्रियकराची पहिली आळवणी आठवावी तशी मी माझ्या कांद्यापोह्यांची कृती आठवून खुदखुदत राहिले स्वत:शी. आपण जग जिंकलंय असा फील होता. नंतर ती सगळी भांडी नीट एकत्र करून स्वत: सिंकमध्ये घासली तेव्हा तर कोण आनंद झाला. बारीक बारीक गोष्टीत आपलं दुमडून जाणं कोरलं जातं. ती कोर अशी भरली की स्वत:बद्दल बरं वाटतंय हे कळलं. मग उत्साहानं रोज काहीतरी करत राहायचे. पोळी, भाकरी वगळता बाकी गोष्टी जमत होत्या. मनातून कनविन्स असलं की काय वाट्टेल ते जमतं, काही अवघड उरत नाही हे कळलं. मनी संतोष जा ह ला!
तर दिवस जात होते. पदार्थ बिघडत, उलगडत होते. आत्मविश्वास टिकायला मदत होत होती. आत्मविश्वास टिकवणं जिकिरीची गोष्ट होती तेव्हा कारण माझं स्वत:चं एक्सप्रेशन मला सापडायचं होतं. त्याबाबतीतलं नैराश्य बुडवून टाकायला स्वयंपाकघराकडं वळणं ही सोपी व इंटरेस्टिंगही गोष्ट होती. पाणी प्यायचं तर, चहा करायचा तर, भांडी घासायची तर, स्वयंपाक करायचा तर आपण कुणावर अवलंबून नाही ही गोष्ट मला हलकी करत होती, स्फुरण चढवत होती. करण्यात सातत्य असल्यामुळं नेटकेपण वाढत होतं. वेळ पूर्वीपेक्षा कमी लागत होता. पण वरच्या दिशेची धाव दाखवणारा माझा नकाशा खीळ बसल्यासारखा कसातरी खाली यायचा अचानक. व्हायचं काय की कुणीही ओळखीपाळखीचे, नातेवाईक आले की माझ्या सहकारी स्त्रीकडे बघून म्हणायचे, “ही करते का तुझं सगळं?”, “बरंय, मन रमवायला करायचा एखादा जिन्नस. बाकी ‘ही’ करतच असेल!” - संस्थेतल्या सात वर्षाच्या काळात श्रेय हिरावलं जाण्याचं दु:ख ताजंच राहिलं होतं. त्यामुळं ज्याच्यात्याच्या कामाचं श्रेय पटकन देऊन टाकण्यात मला कसलीच अडचण नव्हती. पण जर सगळं नियोजन करून मी एखादी गोष्ट पूर्ण करत असेन तर मी ते नाकारत राहाण्यानं काय हशील? बरं, शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीनं दळणापासून, भाज्या चिरून देण्यापर्यंत नि केरफरशीपासून वॉशिंगमशीनमधले कपडे काढून दोर्यांवर वाळत टाकण्यापर्यंत घरातली वरची कामं करायला बाह्य मदत घेतलेली चालते, पचते तर मग माझ्यासारख्यांनी थोडीबहुत ती घेतली तर तिला प्रतिष्ठा का नसावी? एखाद्याला विशिष्ट चौकटीत बंदिस्त करायची ही इतकी हौस कशामुळे? मला स्वयंपाकघरात रूची आहे म्हणून ठीकाय, पण ती नसती तर मी बाह्य दुवे वापरून माझे प्रश्न सोडवलेच असते. प्रश्न सोडवण्याची हातोटी नि प्रश्नाच्या पात्रतेएवढाच राखलेला संयम ही लक्ष देण्याची गोष्ट आहे हे मला सगळ्यांच्याच वतीनं सांगावं लागणार आहे.
- म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो, ही म्हण मी चांगलीच जाणत होते.
त्यामुळं मी माझ्यासारख्याला व्हीलचेअरवर बसूनही स्वयंपाकघर सांभाळता येऊ शकतं, उलट ते मला आवडतं, माझ्या मूळ कामाला अधिक एनर्जी देतं हे माझ्या कामाबाबतीत अविश्वास दाखवणार्यांना सांगत बसायचे. - मला ठाऊकाय, मी जे सांगायचे ते कुणालाच पटायचं नाही, उलट माझा ‘मी’ ड्राईव्ह फारच अॅक्टिव्ह असल्याचा उपहास त्यांच्या चेहर्यावर झळकायचा. मग मी दुपटीतिपटीनं कष्ट करायचे, दमून जायचे. मात्र एकवेळ अशी आली की मी हे थांबवलं. असं वाटलं, स्वयंपाकघरात खेळू शकणं हा आपला आनंद आहे. मला ‘अमुकही’ जमतं हे सिद्ध करण्याची आता जरूरच नाही. वर्षानुवर्षांच्या अपंगत्वाच्या बाबतीतल्या चाकोरीत मला दाबूनकोंबून बसावायचं ज्यांनी ठरवलं आहे ते माझ्याशी तस्संच वागणार. आपण मुकाबला केल्यामुळं भविष्यात धूसर असणारी संवादाची शक्यता आणखी अस्पष्ट होतेय. - एक धोरण म्हणून मला लोकांना हे सांगत राहावं लागणारच आहे की पायाभूत सुविधांचा नीट विचार केला तर माझ्यासारखी अजिबात उभं राहू न शकणारी, स्पायनल कॉर्ड इन्जुरी असणारी व्यक्ती क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकते. माझ्यासारख्यांना कारण नसताना लाडावून घ्यायला आवडत नाही तसंच स्टिरिओटाईप्समध्ये बसवून माझ्या क्षमतांकडे मुद्दाम कानाडोळा केलेलाही चालत नाही. जर एकदा कळलंय की अपंग माणसांच्या क्षमता-अक्षमतांबद्दलचं सामाजिक स्ट्रक्चर, त्याचं पोजिशनिंग यावर पुन्हापुन्हा काम करत, सांगत राहावं लागणार आहे तर ‘किती वेळ पुन्हा तेच ते करायचं?’ असं म्हणत नैराश्याला आपल्या चवीत शिरकाव करू द्यायचा नाही. जे अविश्वास दाखवतात त्यांचीही एक गोष्ट आहे. शिळा भात चरचरीत फोडणी दिल्यावर जशी मजा आणतो तशी मजा आपण इथेही आणू शकतोच. प्रत्येकवेळी विषाला विषाचाच इलाज नसतोय चालत. - गोष्ट बदलायची तर हातात घ्यायला हवी प्रेमानं.
आता सुमारे दशकभर मंदा माझी सहकारी व सोबती म्हणून माझ्यासह व मी तिच्यासह राहते आहे. तिला हळूहळू हे घर इतकं आवडायला लागलं की आता ते माझ्याहून अधिक तिचं झालं आहे. आम्ही दोघी स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय उत्साही असल्यामुळं सारखं काहीतरी नवं करत असतो. तिची उंची माझ्या व्हीलचेअरवरच्या उंचीइतकीच आहे, पण हा शारीरिक अडचणीचा भाग तिला या घरात जाणवत नाही कारण व्हीलचेअरवरून सुलभपणे काम करता यावं ही केलेली रचना तिलाही फारच सोयीची ठरलेली आहे. गंमतजंमत करत मस्तमस्त पदार्थ करणं आम्हा दोघींनाही फार आवडतं. मजेत, आनंदात केलेले पदार्थ त्याच आनंदाचा संसर्ग सगळीकडे करतात हे कळत जातंच. “तुमच्या फोडणीनं माझ्या नाकातले केस जळाले सगळे!” असं म्हणत मंदा दुसर्या खोलीत पळत जाते तेव्हा मला कोण आनंद होतो. कडक फोडण्या देत नि मनस्वी ढेकर देत आमचं स्वयंपाकघर आनंदाची उडत्या चालीची गाणी गातं आहे.
या गाण्यात आपलीही धून विणणारे मित्रमैत्रिणी खूप आहेत. कधी गोव्याचा अनिल पाटील लोणी, खास निवडलेला तांदूळ घेऊन येतो नि म्हणतो, बसा जेवायला, गरम भाकरी करून घालतो. कधी भूषण कोरगावकर त्याच्या खास पद्धतीनी अंडाकरी करतो. त्याचं ते मसाले कुटत राहाणं, कसलाही दणदणाट न करता शांतप्रसन्नपणे स्वयंपाक करत राहाणं यानं आपण, आपलं जगणं फार भारीय असा फील येतो. रेणुका खोत ना ना तर्हेच्या करामती करत नि पदार्थांइतकीच चवदार कॉमेंट्री करत स्वयंपाक करते, प्रेमानं खाऊ घालते तेव्हा मौजेचा सिक्सर बसतो. सुनिता काकूच्या ‘काळ्या भाता’चा घमघमाट घरभर दरवळतो. अनिल सडोलीकर पटापट पातळसर खमंग ऑम्लेट्स खिलवत राहातात, भूक वाढत राहाते, पण अंडी कमी पडत नाहीत. एकूणात सगळ्या वयाच्या मित्रमैत्रिणींना हे स्वयंपाकघर व्हीलचेअरच्या मैत्रीसाठी बनवलेलं असलं तरी आपलं वाटतं, खास वाटतं. इतकं की पाच वर्षाची युतिकासारखी शेजारीण नि मैत्रीण म्हणते, सोनालीताई, आपण आधी कुळथाचं पिठलं करूया नि मग जेवून झालं की जायफळाची कॉफी करूया?
या गाण्यात आपलीही धून विणणारे मित्रमैत्रिणी खूप आहेत. कधी गोव्याचा अनिल पाटील लोणी, खास निवडलेला तांदूळ घेऊन येतो नि म्हणतो, बसा जेवायला, गरम भाकरी करून घालतो. कधी भूषण कोरगावकर त्याच्या खास पद्धतीनी अंडाकरी करतो. त्याचं ते मसाले कुटत राहाणं, कसलाही दणदणाट न करता शांतप्रसन्नपणे स्वयंपाक करत राहाणं यानं आपण, आपलं जगणं फार भारीय असा फील येतो. रेणुका खोत ना ना तर्हेच्या करामती करत नि पदार्थांइतकीच चवदार कॉमेंट्री करत स्वयंपाक करते, प्रेमानं खाऊ घालते तेव्हा मौजेचा सिक्सर बसतो. सुनिता काकूच्या ‘काळ्या भाता’चा घमघमाट घरभर दरवळतो. अनिल सडोलीकर पटापट पातळसर खमंग ऑम्लेट्स खिलवत राहातात, भूक वाढत राहाते, पण अंडी कमी पडत नाहीत. एकूणात सगळ्या वयाच्या मित्रमैत्रिणींना हे स्वयंपाकघर व्हीलचेअरच्या मैत्रीसाठी बनवलेलं असलं तरी आपलं वाटतं, खास वाटतं. इतकं की पाच वर्षाची युतिकासारखी शेजारीण नि मैत्रीण म्हणते, सोनालीताई, आपण आधी कुळथाचं पिठलं करूया नि मग जेवून झालं की जायफळाची कॉफी करूया?
लेखक, अनुवादक, संवादक. एकूण सहा पुस्तकं प्रकाशित.
दहा वर्षांहून अधिक काळ ‘स्पर्शज्ञान’सारख्या ब्रेल पाक्षिकाशी निगडित.
भरपूर फिरणं, जगभरातले सिनेमे बघणं, ‘चवी’नं खाणं, खाऊ घालणं याची आवड.
अपंग माणसांच्या प्रश्नांबद्दल चिकित्सक व सोडवणुकीबद्दल आग्रही. त्याविषयीच्या विविध पैलूंबद्दल लेखन, संवाद.
दहा वर्षांहून अधिक काळ ‘स्पर्शज्ञान’सारख्या ब्रेल पाक्षिकाशी निगडित.
भरपूर फिरणं, जगभरातले सिनेमे बघणं, ‘चवी’नं खाणं, खाऊ घालणं याची आवड.
अपंग माणसांच्या प्रश्नांबद्दल चिकित्सक व सोडवणुकीबद्दल आग्रही. त्याविषयीच्या विविध पैलूंबद्दल लेखन, संवाद.
परफेक्ट रेसिपी सारखं जमून आलंय 👍
ReplyDeleteएका दमातच सगळं वाचून काढलं, खरंतर वाचायला सुरुवात केल्यावर मधेच वाचन थांबवता आलं नाही इतकं सुंदर लिहिलं आहे 👌
आवडला लेख मला, अगदी मनापासून!
ReplyDeleteसही मला देखील जयफळ ची कॉफी प्यायला यावे वाटतय 👌👌
ReplyDeleteआवडलंच तुझं लाडकं स्वयंपाकघर! खरं तर तुझ्या अख्ख्या घराचीच सविस्तर कहाणी तू लिहायला हवीस असं वाटतं मला.
ReplyDeleteआणि मलापण एक जायफळाची कॉफी हवीय!
अतिशय सुंदर लिहिले आहे सोनाली ! स्वयंपाक आणि लेखन दोन्ही जमून आलेय !
ReplyDelete