एकेकाळी महिलांनी पुस्तक वाचून स्वयंपाक करणं हा विनोदाचा, हेटाळणीचा विषय होता. शिक्षित, आधुनिक स्त्रियांना स्वयंपाक येत नाही म्हणून त्या पुस्तकं वाचून स्वयंपाक करतात. त्यांची जळकी, कडक पोळी आणि खारट भाजी हा एकेकाळी सिनेमा, नाटकांमधला लोकप्रिय विनोद होता. स्वयंपाक हे जणू काही स्त्री सुलभ कौशल्य आहे किंवा सुगरण असणं हा XX क्रोमोझोम्सचाच भाग आहे - असाच भ्रम जोपासला गेला होता. प्रत्येक बाईकडे कोंड्याचा मांडा करण्याचं कौशल्य आणि आवड असते, प्रसंगी स्वत: न खाता मुलांना, कुटुंबियांना खाऊ घालणारी ती प्रेमळ आणि त्यागी बाई असते आणि प्रत्येक स्त्रीला आई होण्याची असोशी असते - अशी एक ना अनेक विशेषणं बाई असण्याला चिकटवली गेली. मातृत्वासाठी आवश्यक तिचं मादी असणं आणि कोणत्याही परिस्थितीत तगून राहण्याचं माणूसपण यापेक्षा तिच्या बिनमोल कामाला पावित्र्य आणि तिला देवत्व देऊन घराचा सगळा डोलारा सांभाळण्याचा सगळा भार तिच्यावरच टाकला गेला. त्यातूनच वनवासातही आपली थाळी कायम भरलेली ठेवणारी द्रौपदी किंवा बोर हे मुळात चवीला आंबट असणाऱ्या फळातूनही फक्त गोडच बोरं आपल्या आवडत्या व्यक्तीला देणारी शबरी असे 'आदर्श' निर्माण झाले.
एकेकाळी शेती आणि शिकार हे दोन अन्न मिळवण्याचे आणि जगण्याचेही मार्ग होते. तेव्हा स्त्री-पुरुष दोघेही मिळून त्यात आपला सहभाग देत होते. पुढे शिकार पुरुषाची आणि शेती स्त्रीची झाली तरी शिकारीत पुरुषांबरोबर स्त्रिया आणि मोठी मुलेही त्यात सहभागी असत आणि सहायक भूमिका पार पाडत. शेती, पशुपालन कायम समूहाने केलं जात असे. जसजशी स्त्रीची चार भिंतीच्या आत रवानगी झाली – तसतसा तिचा उत्पादक कामातला सहभाग कमी होत गेला आणि तिच्यावर घरगुती कामांची जबाबदारी लादली गेली. पुढे औद्यागिकीकरणानंतर शहरात विभक्त कुटुंबपद्धती आली आणि स्त्री पुरुष दोघानाही पुन्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणं आवश्यक झालं. तरीही स्वयंपाक आणि त्यासंबंधी घरातील इतर कामं ही प्रामुख्याने महिलांचीच राहिली. बाहेरून भाजी, मासे, वाणसामान आणणे आदी कामं काही पुरुषांनी केली; तरी भाजी निवडणे, चिरणे, धान्य साफ करणे, दळून आणणे, वेगवेगळ्या पदार्थासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया, तयारी ही दररोज करण्याची कामं, साठवणीचे पदार्थ, आणलेले पदार्थ खराब होऊ नये यासाठी घ्यायची काळजी. सणवार, वेगवेगळ्या कारणाने आलेले पाहुणे, समारंभ यावेळी करावा लागणार विशिष्ट स्वयंपाक आणि त्याचं प्रमाण यासाठी तर स्त्रियांची भरपूर ऊर्जा आणि वेळ खर्च होत असते.
पूर्वीच्या काळी आर्थिक, धार्मिक, सामाजिक कारणं आणि ठराविक चवीसाठीही कुटुंब पूर्णपणे घरच्या जेवणावर पर्यायाने महिलांवर अवलंबून होतं, अजूनही बर्याच प्रमाणात तीच परिस्थिती आहे. म्हणून एक बायको गेल्यावर ‘खायला घालण्या’साठी दुसरं लग्न केलं जातं. बाईशिवाय स्वयंपाक नाही, स्वयंपाकघराशिवाय घर नाही या समीकरणाचे स्त्री-पुरुष संबध, विवाह आणि कुटुंब व्यवस्थेवर अनेक खोलवर परिणाम झालेले आहेत. अन्न मिळवणे, अन्न तयार करणे आणि अन्न ग्रहण करणे याबाबत प्रत्येक घर, कुटुंब, जात, धर्म, प्रांतानुसार वेगवेगळे नियम आहेत. त्याबरहुकूम जे मान्य आहे आणि वर्ज्य आहे याचे नियम स्त्रियांनी बनवले नसले तरी काटेकोरपणे पाळण्याची सक्ती त्यांच्यावर आहे. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरात फक्त घरातल्या, कुटुंबातल्या स्त्रियांना प्रवेश, त्याच स्त्रियांना मासिक पाळी आली असेल तर प्रवेशास मनाई! त्यामुळे कुणाच्या स्वयंपाक घरात प्रवेश मिळणे हा जवळिकीचा दाखला मानला जातो. सामाजिक कामासाठी उठबस सगळ्यांबरोबर होत असली तरी ‘रोटी आणि बेटी’ व्यवहार हा फक्त स्वत:च्या जाती धर्मातच या धारणेने त्यामुळे अन्न आणि ते रांधणारी स्त्री दोघांनाही पवित्र ठरवलं गेलं. म्हणूनच महाराष्ट्रात बहुधा स्वयंपाकघरातच देवघर असतं. स्वयंपाकघरा हेच बाईचं कार्यक्षेत्र राहिलं जे तिने तिचं साम्राज्य मानलं. घराच्या आर्थिक आणि लैंगिक संबधांच सत्तास्थान पुरुषाकडे असताना थोडीतरी सत्ता गाजवावी अशी ही एकच जागा बाईकडे होती. स्वयंपाकघरात लागणारी संसाधन आणि काय शिजणार याचे निर्णय पूर्णपणे तिच्याकडे नसले तरी सासू, जावांशी झगडून मुलं मोठी झाल्यावर काही दिवस काही भांडी, दागिने आणि स्वयंपाकघर यावर तिची मालकी होणं यातच तिच्या जीवनाची कृतकृत्यता होती. नवऱ्याच्या नाव आडनावासह घरातल्या बाईचं नाव भांड्यावर यायचं, हेही भाग्य काहीच बायकांना लाभायचं.हेच स्त्रीचं अस्तित्व आणि पाककौशल्य हीच तिची अस्मिता!

बायका जी कामं पिढ्यानुपिढ्या घरात विनामोबदला करत आहेत. त्यासाठी आपला वेळ, कष्ट आणि कौशल्य वापरत आहेत. त्याच कामाचा व्यवसाय झाला कि त्याला भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा मिळते. त्याला शेफ/ खानसामा असं छानसं औपचारिक नाव मिळत. त्याच कामाला कौशल्य, कला, विज्ञानाचा दर्जा प्राप्त होतो.काही महिलांनी पाककृतीची पुस्तकं लिहून आपला ठसा उमटवला. आधुनिक, शिक्षित, उच्चवर्ग आणि उच्च जातीय महिलांनी आधुनिक,शिक्षित, उच्चवर्ग आणि उच्च जातीय महिलांसाठी लिहिलेलं असंच या पुस्तकाचं स्वरूप होतं. त्यातली औन्स, ग्रामची परिमाणं, त्याकाळी सहसा सर्वसामान्य घरात सहजी उपलब्ध नसलेलं, खर्चिक साहित्य आणि भांडी, फ्रीज,ओव्हन आदी यंत्र, वेळखाऊ प्रक्रिया यामुळे ही पुस्तकं ज्यांच्याकडे होती त्यानाही यातल्या अनेक पाककृती करता येत नसत. सोप्या पद्धतीने लिहलेल्या रुचिरा, अन्नपूर्णा आदी पुस्तकांनी नंतरच्या काळात प्रवेश केला.

पूर्वी इतर जाती, प्रांत यांच्यात फारसे मिसळणं नव्हतं. बाहेर जाऊन, हॉटेलमध्ये खाण्याला प्रतिष्ठा नव्हती. गरजेपुरते बाहेर खावे लागले तर पोट भरण्यापुरतं आपल्या धर्माच्या, जातीच्या हॉटेल, खानावळीत खाण्याचा रिवाज होता. घरून डबा घेऊन जाणे, घराबाहेर असतील त्यांना जेवणाच्या वेळात घरचा डबा पोहोचवणे असा शिरस्ता होता. बाहेर खाण्याच्या स्वस्त, स्वच्छ, सहज सोयी उपलब्ध नव्हत्या. पुरुष घराबाहेर जाऊन चहा, भजी खात असले तरी घरातल्या बायका मुलांसह बाहेरचं, विकतचं खाण्याचा प्रघात नव्हता. मोठ्या प्रवासात, सहलीलाही खास पदार्थ बरोबर घेऊन जात असत. शिधा बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी शिजवला जात असे. इतर लोकांचे, वेगळ्या चवीचे पदार्थ खाण्याकडे बहुतांश लोकांचा कल नसल्याने यात्रा कंपन्यांचा परदेश सहलीमध्येही मराठी/ देशी जेवण हा आजही यु एस पी आहे!
बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये गरज, आवड, कौशल्य, शिक्षण आहे म्हणून स्त्री घराबाहेर पडू लागल्यावरही घरकाम आणि विशेषतः स्वयंपाकघर ही स्त्रीचीच जबाबदारी राहिली. घर आणि काम दुहेरी जबाबदारी सांभाळताना स्वयंपाकघर हे साम्राज्य नसून सापळा आहे याची जाणीव महिलांना प्रकर्षाने होऊ लागली. भांडी चकचकीत करणं आणि चारीठाव खाणीपीणी करत राहणं यापेक्षा निर्विघ्नपणे पेपर - पुस्तक वाचणं, टीव्ही पाहणं, प्रत्यक्ष किंवा फोनवर मनसोक्त गप्पा मारणं - हे तिलाही प्रिय वाटत होतं. खरंतर पोळ्या लाटण्याकरता गर्भाशय असणं आवश्यक नसतं त्यामुळे सर्वाना स्वयंपाक करता यायला हवा होता.
पण हेतूपुरस्सर तसं झालं नाही हे तिला उमजलं. तिने त्याविरुद्ध आवाज उठवला, नाराजी व्यक्त केली तर घरातल्या सर्वांनी सर्व कामात सहभागी होण्यापेक्षा ते काम इतर बायकांना वाटून देण्याची उदारता दाखवली. घर सफाई, धुणीभांडी यांसाठी बाहेरचे पुरुष, महिला कामावर ठेवल्या जाऊ लागल्या. हळूहळू त्यांचा स्वयंपाकघरात प्रवेश झाला. जेवायला बाहेर जायला आणि बाहेरून जेवण घरात यायला सुरुवात झाली. कामकरी/उच्चभ्रू महिलांची गरज म्हणून पोळीवाली बाई किंवा भाजी चिरून देणं आदी कामाला मदत करणारी, स्वयंपाक, २४ तासाची बाई, मुलाला सांभाळणारी, वृद्ध, आजारी माणसांची सुश्रुषा करणारी बाई अशा अनेक कामाच्या संधी निमसाक्षर, निम्नमध्यम वर्गीय महिलांना उपलब्ध झाल्या. पापड, कुरडया, लोणची, फराळाचे जिन्नस यांना वर्षाचे बारा महिने मागणी असल्याने अनेक स्त्रिया एकट्याने किंवा समूहाने या बाजारपेठेत उतरत आहेत. तयार पीठं , तयार मसाले, त्वरित बनवता येतील असे पदार्थ तयार करत आहेत. एकूण काय तर बाईच बाईच्या मदतीला आली!
ह्या पार्श्वभूमीवर काही स्त्रियांच्या पाककौशल्याचं घराबाहेर चीज करण्याची संधी मिळाली. पाककौशल्य हेच अनेक स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मार्ग, बलस्थान ठरलं. बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे पककौशल्य हा उपजिविकेचा मार्ग तर झालाच होता पण मोबाईलफोन्स, इन्टरनेट क्रांती, सोशल मिडिया मुळे तो आता प्रसिद्धीचा मार्गही झाला आहे. सर्वसामान्य महिलांनी सुरु केलेले पाककृतीचे ब्लॉग, वेबसाईट, यूट्यूब व्हिडीयो तुफान लोकप्रिय होत आहेत.

त्यातलं एक प्रचंड गाजलेलं नाव आहे -निशामधुलिका. यूट्यूबने त्यांना top chef ची उपाधी दिलेली आहे. त्यांच्यावर BBC, लोकसभा टीव्ही आणि अनेकांनी स्टोरीज केलेल्या आहेत. ह्या बाईंनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी 'खाना बनाना' ह्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाककृती लिहायला सुरुवात केली.वर्षभराने ब्लॉगचं वेबसाइटमध्ये रूपांतर केलं. त्यांच्या वाचकांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी पाककृतींचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि ते कमालीचे लोकप्रिय होत गेले. दहा वर्षांनी 75 लाख लोक निशामधुलिका चॅनेलचे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि करोडो वेळा त्यांचे व्हिडिओ बघितले गेले आहेत.
त्याचप्रमाणे, MadhurasRecipe हे मराठी पदार्थांसाठीचं सर्वात लोकप्रिय नाव म्हणता येईल. मला वाटतं तिच्याही लोकप्रियतेचं मुख्य कारण म्हणजे तिचं सर्वसामान्य गृहिणी असणं असावं. ती चारचौघींसारखी दिसते, आपण नेहमी खातो ते पदार्थ ती बनवते, तिच्या पाककृती कमी वेळात होणाऱ्या, सुटसुटीत असतात. पांढरे कपडे, डोक्याला टोपी वगैरे घालून टीव्हीवर सेलेब्रिटी शेफने केलेल्या पाककृतीपेक्षा मधुराच्या पाककृती खूप लोकप्रिय आहेत. तिचं घर, तिचं बोलणं याच्याबरोबर प्रेक्षक स्वत:ला रिलेट करतो. तिचे कोल्हापुरी उच्चार, आजूबाजूला मुलांचा वावर, कुटुंबियांच्या उल्लेख यामुळे ती आपलीशी वाटते. नऊ वर्षापूर्वी सुरु झालेल्या तिच्याही चॅनेलला 20लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. परदेशात राहणाऱ्या लोकांना घरगुती जेवण करण्यासाठी पाककृती सांगायच्या म्हणून अमेरिकेत जन्म झालेल्या या प्रयत्नाला आज प्रचंड यश मिळालं आहे. आता तर तिने मसाल्यांचे उत्पादन देखील सुरू केले आहे. एक प्रकारे ते आता ब्रॅंड नेम होत आहे!
तिच्याप्रमाणेच छोट्या छोट्या गावातल्या अनेक महिला आता यु ट्युबवर आपल्या पाकक्रिया देऊ लागल्या आहेत. आवाज किंवा शब्दाची मदत न घेता प्रत्यक्ष कृती करून या महिला आपले पारंपारिक पदार्थ सर्वांसमोर आणत आहेत. नंतर एडिटिंग मध्ये साहित्याची नावं वगैरे लिहून दाखवली जातात. गावरान, घरचा स्वाद यासारख्या साईटवर जी उपलब्ध असतील ती मातीची भांडी, चूल, विळी आदी शहरात न वापरली जाणारी साधन आणि शेतात स्वयंपाक केला जाणे - यामुळे एक वेगळं दृश्य परिमाण लाभलेलं आहे. आजिबाईंनी अनुभवी हातांनी, काटेकोर वजन मापं न वापरता केलेल्या या पाककृती पाहणं ही एक दृश्य मेजवानी आहे. कधी नवरा तर कधी मुलीने उत्तेजन दिलेला ‘जायका का तडका’ म्हणूनच पाहणाऱ्यालाही आपलासा वाटतो. डोक्यावर पदर घेतलेली युपीतील एखादी बहु आपल्या समोर जिलेबी करते आणि पहिल्यांदा करत असूनही छान झाली असं प्रांजळपणे मान्य करते तेव्हा त्या जिलेबीचा वेगळाच स्वाद कळतो. बाहेर मैदानात चालू असलेल्या या चित्रीकरणात आसपासच्या इतर व्यक्ती दिसतात, माश्या हाकलण्यासाठी एक बाई पंख्याने वारा घालत असतात ती तिची सासू असेल का असा विचार येतो. शुभांगी कीर साध्याश्या बाई तर चटईवर बसून घरच्याघरी प्रोटीन पावडर करण्याची रेसिपी सांगत असतात तेव्हा अचानक आसपास मांजर चेंडू खेळू लागतं ही अनौपचारिकता भावते. तसंच या सगळ्या बायकांचं कौतुकदेखील वाटतं.
वेगवेगळ्या कारणाने घरापासून दूर असणारी तरुण मुलं, मुली, एकटे पुरुष, गृहिणी यांना घरच्यासारख जेवण बनवण्यासाठी, किंवा मूळ चवीप्रमाणे स्वत:ची पाककृती यशस्वी करण्यासाठी, पडताळून पाहण्यासाठी या पाककृतींचा उपयोग होत आहे. तसेच या पाककृती पाहणे ही अनेकांची करमणूकही होते आहे. शेतात कमीत कमी साधनं वापरून स्वयंपाक करणाऱ्या बायका आणि पुरुष मिळून हे शो करतात. देश-परदेशात अनेक बायका फेसबुक, युट्युबच्या माध्यमाचा यशस्वीरित्या वापर करत आहेत. नागालँडमधली आखुनी चटणी, पोर्क पासून सिक्कीमचा थुक्पा, ब्राझीलच्या फनेल केक पासून जपानच्या सुशीपर्यंत जे काय आहे ते कसं करायचं ते समजून घ्यायचं असेल तर कुणालाही आणि कुठेही पदार्थ बनवणं शक्य झालं आहे. त्यासाठी भरपूर पैसे खर्च करून जाडजूड पुस्तकं विकत घ्यायची गरज राहिली नाही कि पानं उलटताना गोंधळ होण्याची शक्यता नाही.पाककृती कशी करायची ते प्रत्यक्ष दिसतं, ते पाहून ज्यांनी पदार्थ केला आहे त्याची मते, चर्चा, टिप्स असं बरंच वाचायला पाह्यला मिळतं.
'forksongs' या फेसबुक पेजवर पदार्थ बनवण्याचे कच्चे साहित्य, कृती आणि पदार्थ यांचे उत्कृष्ट फोटो, त्यासह छोटी स्टोरी अशी मांडणी पाहायला मिळते. अन्नाच्या सोबत त्याविषयीचं राजकारण, सामाजिक पैलू, आरोग्य, अर्थकारण मांडलं जातंय. स्त्रीयाकडे असलेल्या पाककृतींच्या अथांग खजिन्याची नोंद यामुळे होत आहे.याचबरोबर विस्मृतीत गेलेल्या प्राचीन पाककृती, अभावात जीवन जगणार्या गरिब, आदिवासी, भटक्या, दलित पाककृतीनाही उजाळा दिला जातोय. राज्यश्री गुडी ही दलित आई आणि ब्रिटीश वडील असलेली २५ वर्षीय मुलगी दलित पाककृती लिहित आहे. त्या वाचून कुणी पदार्थ बनवावे यासाठी नाही तर कवितेसारख्या रचनेत लिहिलेल्या या पाककृती जातवास्तवावर जास्त भाष्य करतात. (http://www.rajyashrigoody.com) शाहू पाटोळे यांनी देखील ‘अन्न हे अपूर्णब्रम्ह’ ह्या त्यांच्या पुस्तकात दलित समाजातल्या पाककृतींविषयी लिहिलेलं आहे.
स्वयंपाकघरातल्या सिंकमध्ये पाणी येणे ह्या मूलभूत सोईपासून आता तयार पीठ, मसाले, निवडलेल्या भाज्या, मिक्सर, कुकर, ओव्हन, फ्रीज अस रांधणं सुकर करणारे अनेक पर्याय उपलब्ध झाले. तुलनेने स्वयंपाक कमी कष्टाचा आणि कमी जिकरीचा झाला आहे. गरज पडेल त्याप्रमाणे, सुट्टीच्या दिवशी किंवा विशिष्ट दिवस, सणांच्या दिवशीही बाहेर जेवायला जाण्याचा किंवा जेवण मागवण्याचा शिरस्ता झाला आहे. अन्न शिजवणे हा स्त्रीसाठी तयार केलेला सापळा नसून प्रत्येक माणसाची ती प्राथमिक गरज आहे त्यामुळे प्रत्येकासाठीच ते महत्वाचं आहे हे तत्त्व आता रुजत आहे. घरी शिजवलेलं अन्न आणि आपल्या प्रिय व्यक्ती समूहात एकत्र जेवणं हे शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे हे विज्ञानाने सिद्ध झालं आहे. वजन आणि आरोग्य याबाबत सजग झालेला एक मोठा वर्ग वेगवेगळ्या कारणामुळे सेंद्रिय, स्थानिक उत्पादनाकडे वळतोय. पदार्थाचा रंग, पोत, चव, दिसणे, याहूनही जास्त आरोग्याला उपयोगी अन्नाच्या शोधात विशिष्ट आहारपद्धती स्वीकारतोय आणि त्यासाठी घरी स्वयंपाक करणं पसंत करतोय. स्त्री पुरुष एकेकटे किंवा सामयिक स्वयंपाक करत आहेत. एकीकडे स्वयंपाकघरामध्ये अडकू न इच्छीणाऱ्या - घराबाहेर पडलेल्यांचा प्रवास बिनाकिचनच्या घरापर्यंत पोहोचला आहे त्याचवेळी काहींनी पुन्हा हौसेने आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे वळवला आहे!
संयोगिता ढमढेरे
स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षक आहेत.मुख्य प्रवाह आणि समांतर माध्यमातून १९९० पासून लिहित आहेत. महिला, लैंगिक अल्पसंख्य, सेक्स वर्कर्स आदी वंचित समाज घटकांसाठी माध्यम वकालत करतात.