सातारा हायवेने येताना रस्त्याकडेच्या धाब्यांवर जाहिराती दिसतात, "चुलीवरचं मटण" "चुलीवरच्या भाकरी". चुलीवरच्या पदार्थांचं हे आकर्षण पहाता, स्वयंपाकघरात परत जुन्या चुलींचा प्रवेश झाला तर काय फरक पडेल? असा विचार आला. पूर्वी चुलीचा धूर नाकातोंडात डोळ्यांत जाऊन बायकांना नको जीव होई. स्वयंपाकघरातल्या खिडक्याही उंचावर असत. त्यामुळे धूर कोंडून राही. अजूनही ग्रामीण भागात चुलीचा वापर होतो. चुलीच्या धुरामुळे विषारी वायू आणि सूक्ष्म राख हवेत मिसळते ज्यामुळे स्त्रियांना दमा, क्षयरोग, कर्करोग, डोळ्यांचे विकार होतात. चुलीसाठी लाकडं गोळा करायला पडत असे त्याहीपेक्षा अधिक त्रास नंतर आलेल्या स्टोव्हसाठी रॉकेल मिळवायला पडत असे आणि हे सगळं बायकांनाच करावं लागे.. केरोसिन स्टोव्हमुळे धुराचा त्रास थोडा कमी झाला तरी त्याचा भगभग आवाज, केरोसिनचा वास आणि आवश्यक पंपींग करत राहण्याची समस्या होतीच, पण आगीच्या अपघातांची शक्यता खूपच वाढली होती. पंपींग जास्त झाल्यास केरोसीन स्टोव्ह फुटून मोठे अपघात व्हायचे. वातीचा स्टोव्ह त्या मानाने कमी त्रासाचा पण त्याचा उपयोग फार कमी प्रकारच्या पाककृतींमध्ये करता यायचा, स्वयंपाकाला खूप वेळ लागायचा. एकंदरीत पाहिलं तर वरील सर्व त्रासाव्यतिरिक्त आणखी एक त्रास म्हणजे स्वयंपाकघराच्या भिंती आणि विशेषत: छत काळवंडून जायचं.
पुढे गॅस स्टोव्ह आला तरी गॅस सिलींडर्सच्या रेशनिंगमुळे बरीच वर्षं केरोसीन स्टोव्ह, वातीचा स्टोव्ह, कोळसा चुली आवश्यकतेनुसार वापराव्या लागत. याबाबतीत एक किस्सा आठवतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संपाचा काळ. गिरणी कामगारांच्या कुटुंबांचे अतिशय हलाखीचे दिवस. माझ्या एका मित्राच्या मावशीचं संपात भरडलं गेलेलं कुटुंब. मावशीने हातभार म्हणून घरगुती डोनट्स बनवून विकायचा व्यवसाय सुरु केला. ते छोटे, गोडूस, रुचकर डोनट्स माझा मित्र कधी कधी घेउन यायचा. आम्ही चार पाच मित्र पनवेलला कामानिमित्त एकत्र राहायचो. आम्हा सगळ्यांनाच हे डोनट्स फार आवडायचे. मित्राच्या मावशीचा हा डोनट्सचा व्यवसाय छान चालला. मागणी वाढू लागली तसा पसारा वाढला. मावशीने मोठा फ्लॅट घेतला आणि आवश्यकता म्हणून मोठ्या खोलीत स्वयंपाकघराची मांडणी केली. एकदा मित्राबरोबर त्याच्या मावशीच्या या नवीन फ्लॅटवर जायचा योग आला. स्वयंपाकघराचं छत आणि भिंती काळ्या पडल्या होत्या आणि केरोसीन स्टोव्हच्या आवाजामुळे व अति उष्म्यामुळे स्वयंपाकघरात थोडा काळही उभं राहाणं अवघड वाटत होतं. गॅस सिलींडर्सच्या रेशनिंगमुळे मावशीला केरोसीन स्टोव्ह वापरण्याशिवाय पर्यायच नव्हता.
स्टोव्हचा भडका उडून भाजल्यामुळे कित्येकजणींना जीवाला मुकावं लागलं. सासरच्यांनी रॉकेल ओतून नको असलेल्या सुनांना जाळून तो भडका उडाल्याने झालेला अपघात असल्याचं भासवलं जाई. पण लाकूड चुली, कोळसा चुली, मग केरोसीन स्टोव्ह आणि वातीचा स्टोव्ह, या सगळ्यांना नंतर मोठा डच्चू दिला गॅस स्टोव्हने आणि स्वयंपाकघरांच्या मांडणीमध्ये मोठ्ठाच फरक पडला. छोट्या ओट्यावर खाली बसून काम करतांना बायकांच्या पाठीवर ताण पडून पाठीचे विकार होत. नव्या स्वयंपाकघरात छोट्या ओट्यावर खाली बसून स्वयंपाक करण्याची सवय सोडून, `किचन प्लॅटफॉर्म’ जवळ उभं राहून स्वयंपाक करण्याची वेळ आली. उंच ओट्याखाली भांडी ठेवण्याची जागा झाली. कपाटं, फडताळं नवीन ओट्याच्या अंदाजाने, उंचावर विराजमान झाली. कोपऱ्यात नवीन सिंक आलं. पाटा वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली. परिणामी स्वयंपाकघराची रचना बदललीच, पण आकारही कमी झाला. या सगळ्यामुळे बायकांना फार वाकावं लागणं, वाकून जड गोष्टी उचलणं हे टाळता येऊ लागलं. स्वयंपाकघराच्या या प्रशस्ततेपासून ते अतिशय छोट्या आकारापर्यंतच्या प्रवासाची, तंत्रज्ञानातील प्रगतीव्यतिरिक्त इतर अनेक कारणं असू शकतात.पूर्वी एकत्र कुटुंबातील दोघी तिघी एकाच वेळी वावरतील एवढं तरी स्वयंपाकघर आवश्यक असायचं. आता छोट्या कुटुंबातील एक व्यक्ती सगळा स्वयंपाक थोडक्या जागेत, थोडक्या वेळात करू शकते. जागांचे भाव वाढत गेले, तसे कमीत कमी जागेत जास्त सोयी घेण्याकडे कल वाढला. काहीजणांनी तर बाल्कनीमध्ये स्वयंपाकघर बनवून, स्वयंपाकघराची जागा बेडरूममध्ये बदलून घेतली. काही स्वयंपाकघरं एवढी छोटी असतात की एरव्ही सिंक झाकून ओटा म्हणून वापरला जातो आणि गरजेनुसार नंतर तो उघडून सिंक म्हणून वापरता येतो.

शहरी समाजातील मोठ्या घटकाला, उपरोल्लिखित विविध कारणांमुळे, जरुरीपेक्षा मोठं स्वयंपाकघर अनावश्यक वाटत आले आहे. काही समाजघटकांमध्ये, जिथे विशेषत: स्त्रियांना खुलेपणाने वावरण्याची मोकळीक नसते आणि त्यामुळे काही काम नसतानाही स्वयंपाकघरातच थांबावं लागतं, त्यांना कदाचित छोटं स्वयंपाकघर गैरसोयीचं वाटू शकेल. पण पुढे जाऊन कदाचित ही परिस्थितीच त्याना अधिक मोकळेपणा मिळण्यासाठी उपयुक्त ठरु शकेल. अन्यथा छोटं काय किंवा मोठं काय, कोण अशा कोंदट आणि उष्ण खोलीत जरुरीपेक्षा जास्त वेळ थांबेल?
हे खरं आहे की छोट्या स्वयंपाकघरात एक किंवा दोन व्यक्तीच एकावेळी स्वयंपाक करु शकतात. पण सध्याच्या काळात जास्त माणसांची जरुरी पण नसते आणि माणसं सहसा उपलब्ध पण नसतात. सहसा फार लहान स्वयंपाकघर बनवली जात नाहीत, ती या निर्देशांपेक्षा थोडी मोठीच असतात.
पूर्वी एकमेकांच्या घरी प्रत्यक्षात भेटून हालहवाल जाणून घेण्याची ओढ असे. त्यामुळे घरी येणाऱ्यांची ऊठबस, पाहुणचार करताना आणि पाहुण्यांमधल्या स्त्रियांबरोबर वेगळं बसून गुजगोष्टी करण्यासाठी गृहिणीला मोठ्या स्वयंपाकघराची आवश्यकता वाटे. किंबहुना पाहुण्या बायकांची रवानगी स्वयंपाकघरातच होत असे. बैठकीच्या खोलीत बायकांना जागाच नसे. अजूनही खेड्यापाड्यांत हीच परिस्थिती असल्याने ग्रामीण भागात स्वयंपाकघरं मोठी असतात. पण आता सामाजिक माध्यमांमुळे प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता फारच कमी होत गेली.
पूर्वी लग्न समारंभाव्यतिरिक्त बाकीचे सर्व समारंभ, मग बारसा, साखरपुडा असो की वाढदिवस, घरातच साजरे व्हायचे. आता त्यासाठी बॅंक्वेट हॉल बुक केले जातात. समारंभ घरीच साजरे केले तरी बाहेरचे तयार पदार्थ मागवले जातात. तयार पदार्थांची मुबलक उपलब्धता छोट्या स्वयंपाकघराला सोयीस्कर बाब आहे, विशेषत: घटक पदार्थांच्या दृष्टीकोनातून. पूर्वी मसाले, पापड, कुरडया, लोणची वगैरेंसाठी खूप पसारा व्हायचा, आता तयारच आणले जातात.सर्वात महत्त्वाचं कारण हे की कुटुंबातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला नोकरी सांभाळून उरणाऱ्या थोडक्या वेळात स्वयंपाक करावा लागतो. छोट्या सुरचित स्वयंपाकघरात थोडक्या हालचालीत हे शक्य होतं. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची कमी दमणूक होते.
आता बायका नोकरी, व्यवसाय करीत असल्या तरी घर सांभाळणं हे अजूनही बायकांचं काम समजलं जातं. शिवाय मोठ्या शहरांमध्ये प्रवासातही दिवसाच्या बराच काळ जातो. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीच्या बायकांच्या तुलनेत घरकामासाठी फार कमी वेळ उपलब्ध असतो. थोडक्या वेळात त्यांना अधिकाधिक कामं आटोपायची असतात. आता हळूहळू पुरूषांचाही स्वयंपाकातला इंटरेस्ट वाढतोय . काही पुरूष लग्नाआधी स्वयंपाक शिकून घेत आहेत. त्यामुळे स्वयंपाकघराचं डिझाईन करणं हे एक मोठ्ठं आव्हान असतं. किमान हालचालीत, पर्यायाने कमी वेळात स्वयंपाक तयार करता यावा अशी रचना असावी, स्वच्छता सहज पाळता यावी, यथायोग्य प्रकाश आणि वायुवीजन असावे व एकंदर मांडणी सौंदर्यपूर्ण असावी या अपेक्षा असतात. स्वयंपाकघराच्या डिझाईन संकल्पनांमध्ये फार वेगाने बदल घडत गेले. बांधकाम तंत्रामध्ये, साहित्यामध्ये, उपलब्ध सोयींमध्ये आणि स्वयंपाकघरात वापरता येणाऱ्या विविध यंत्रांमध्ये उत्तरोत्तर खूप प्रगती होत गेली. त्याप्रमाणे रचनेमध्ये आणि सौंदर्यामध्ये फरक पडत गेला. परंतु आता बायकांना स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापेक्षा आलेल्या पाहुण्यांशी बोलता बोलता किंवा टी.व्ही. बघता बघता स्वयंपाक करायची सोय हवी असं वाटतं. काम करणाऱ्या कित्येक बायकांना लॅपटॉपवर काम करता करता स्वयंपाक करावासा वाटतो. त्या दृष्टीने हळूहळू स्वयंपाकघरात किंबहुना घराच्या रचनेतही बदल होणं आवश्यक आहे.
आर.सी.सी. ओट्यांची जागा कडाप्पा ओट्यांनी घेतली आणि पुढे त्यात मार्बल व ग्रॅनाईटचा वापर सुरु झाला. सध्या ओट्यांचे वरचे पृष्ठभाग कोरीयन वा क्वार्टझ सारख्या कृत्रिम साहित्य तंत्रांनी बनवण्याकडे कल वाढतोय. ओट्यांच्या खालच्या फळ्यांची जागा कडाप्पाने घेतली आणि नंतर त्याजागी आलेल्या सरकत्या कप्प्यांनी क्रांतीच केली. या संकल्पनेत थोडेफार फेरफार होत गेले, पण त्यातील स्टेनलेस स्टीलच्या वापराने एका नव्या उद्योगाला मोठ्याप्रमाणात चालना मिळाली. पूर्वी फडताळांमध्ये मागच्या भागात ठेवलेल्या वस्तू काढण्यासाठी खूप वेळ खर्ची पडायचा. सरकत्या कप्प्यांमुळे सहजतेने फडताळांमध्ये मागच्या भागात ठेवलेल्या वस्तूंपर्यंत पोहोचता येतं. आतमध्ये लपलेले सरकते स्टेनलेस स्टील ट्रेंचे कप्पे आणि बाहेरुन लॅमिनेटेड प्लायवूडचे झाकण अशी याची एकंदर रचना असते. ही रचना ओट्याखाली आणि इतरत्र असलेल्या फडताळांसाठी वापरली जाते. अशा फडताळांच्या विविध नावीन्यपूर्ण रचना वेगवेगळ्या गरजांनुसार तयार होऊ लागल्या आणि त्यातून मॉड्युलर किचन संकल्पनेचा जन्म झाला, ज्यातून एक मोठं स्वतंत्र व्यवसाय क्षेत्र निर्माण झालं. या फडताळांसाठी वेगळ्या प्रकारचे कप्पे, बिजागरी, सरकण्याची, उघडण्याची तंत्रप्रणाली, हॅफेले हेटिच सारख्या अनेक कंपन्या सतत निर्माण करीत असतात.
पूर्वी ओट्यावरच्या भिंतीवर दीडफूट वरपर्यंत सिरॅमिक टाईल्स लावल्या जायच्या. आता स्वच्छतेच्या तसंच सौंदर्याच्या दृष्टीकोनातून स्वयंपाकघराच्या सर्व भिंतींना छतापर्यंत सिरॅमिक टाईल्स लावल्या जातात. अगदी ओट्याखालीपण भिंतींना स्वच्छतेसाठी सिरॅमिक टाईल्स लावल्या जातात.पूर्वी सिंक, ओट्यामध्ये वापरलेल्या मार्बल वा ग्रॅनाईट लाद्यांपासूनच बनवले जायचे. नंतर स्टेनलेस स्टीलच्या सिंकचा वापर सुरु झाला. नवीन आलेल्या कोरीयन वा क्वार्टझ सारख्या कृत्रिम साहित्य तंत्रांमध्ये मिळणाऱ्या एकसंध व सुंदर पृष्ठभागामुळे, त्यामध्येच सिंक बनवण्याकडे आता कल वाढू लागला आहे. सिंकवरच लावण्याचे उंच व लांब बाक असलेले, दोन्ही दिशांना फिरुन कोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणारे नळ आता उपलब्ध असतात. खरकट्या हाताच्या उलट्या बाजूच्या किंचित स्पर्शाने हे नळ चालू वा बंद करता येतात.
स्वयंपाकघराच्या जमिनीच्या पृष्ठभागाकडे पूर्वी खास लक्ष दिलं जात नव्हतं. खरं तर इथली जमिन तेलकट, चिकचिकित होण्याची अधिक शक्यता असते. आता घरकाम करणाऱ्या बायका उपलब्ध असल्या तरी त्यांनाही सुट्टीचा हक्क आहे. त्या रजा घेतात त्या काळात स्वयंपाकघरातली लादी सहज स्वच्छ राखता यावी यासाठी स्वयंपाकघरातल्या जमिनीकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. आधी कोटा लाद्या वापरल्या जाऊ लागल्या. आता विविध सुंदर रंग आणि पोत असलेल्या व्हिट्रीफाईड लाद्या वापरल्या जातात.
बीएमसीच्या डीसी रुल्सनुसार स्वयंपाकघरामध्ये किमान ११ चौ.फू. आकाराची १ खिडकी असावी लागते. ही खिडकी इमारतीच्या अंतर्गत किंवा बाह्य खुल्या जागेत उघडावी, पण शॅफ्टमध्ये उघडू नये. इथे इमारतीची अंतर्गत खुली जागा म्हणजे मधला मोठा चौक किंवा तत्सम अशी इमारती अंतर्गत खुली जागा. थेट वायुवीजनासाठी नियमांमध्ये खिडकीची अशाप्रकारे तरतूद करूनही, अनेक कारणांमुळे ही खिडकी बंदच ठेवली जाते. स्वयंपाकघराची खिडकी ओट्यावरती येणं टाळलं जातं. कारण एकतर गॅस विझेल ही भीती आणि दुसरं म्हणजे ओट्यावर वाकून खिडकीची उघडझाप करणं अवघड जातं. तसंही खिडकी कुठेही असली तरी गॅस विझेल या भीतीपायी ती बंदच ठेवली जाते किंवा लूव्हर्स लावून घेतात वा अगदीच नाहीतर खिडकीच्या खालच्या भागात सुरक्षित उंचीपर्यंत काहीतरी अडसर लावला जातो. खरं म्हणजे यावर उपाय म्हणून मुळातच खिडकीची खालची रेषा (सील लेव्हल) ओट्यावरती एक फूट उंचीवर असेल अशा रीतीने खिडकीचं बांधकाम केलं जातं. छोट्या स्वयंपाकघरात खिडकीमुळे फडताळाची तेवढी जागा कमी होते. पूर्वीपासूनच स्वयंपाकघर कोंदट आणि उष्म. कोंदटपणा जावा, धुराचा निचरा व्हावा म्हणून एक्झॉस्ट फॅन वापरले जावू लागले. आता बरेचजण चिमनी वापरतात. खूप वेळा डिझायनर्स खुलेपणा आणण्यासाठी दरवाजाजवळची अख्खी भिंतच काढून टाकतात. यामुळे स्वयंपाकघरात येणंजाणं, काम करणं अधिक सुलभ होतं. फडताळासाठी एक भिंतच कमी होत असली तरी, इतर दोन भिंतींवरील फडताळांची लांबी आणि एकंदर स्वयंपाकघराची सीमारेषा, सहा इंचांनी तरी वाढते. गॅस शेगडीची जागा इलेक्ट्रिक शेगडी घेऊ शकली नाही. आता इंडक्शन शेगडी ते करु पहाते आहे. खरंच तसं घडलं तर, खिडकी बंद ठेवावी लागणार नाही, परिणामत: स्वयंपाकघर हवेशीर राहील आणि मुख्य म्हणजे आगीच्या अपघातांची भीती राहाणार नाही.
छोट्या स्वयंपाकघरात फ्रीज खूप मोठी जागा अडवतो. खरं म्हणजे, स्वयंपाकघरात फ्रिज ठेवणं योग्य नाही. पण बहुतेकवेळा फ्रीज, पर्यायी योग्य जागा न मिळाल्यामुळे, स्वयंपाकघरातच विराजमान होतो. फ्रिजचा वरचा भाग वस्तू ठेवण्यासाठी आणि त्यावरचा भाग फडताळासाठी वापरता येतो.
पूर्वी पिवळ्या बल्बच्या प्रकाशात रात्री स्वयंपाक बनायचा. मग ट्यूबलाईटचा झगझगीत प्रकाश उपलब्ध झाला. मध्यंतरी काही ठिकाणी सीएफएल दिवेही वापरात आले असतील. आता एलईडी दिव्यांचा जमाना आलाय. हे छोट्या आकाराचे छुपे दिवे कमी वीज वापरुन भरपूर प्रकाश देतात. ओट्यावर, वरच्या फडताळाच्या सावलीमुळे, जिथे प्रकाश कमी असतो, तिथे या दिव्यांची माळ फडताळाखालच्या पेल्मेट मागे लपवून प्रकाश मिळतो. क्रॉकरीच्या शोकेसमध्येही एक वॅटच्या एलईडी दिव्यांचा वापर करुन उठाव आणता येतो. एकंदरच, निरनिराळ्या रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या, या दिव्यांची योग्य रचना करुन रात्रीच्या स्वयंपाकघरात एक वेगळंच सौंदर्य निर्माण करता येतं.
समाजव्यवस्थेतील बदलांमुळे आणि सोयींमुळे स्वयंपाकघरातील काही जागा मोकळ्या झाल्या. गल्लोगल्ली चक्क्या झाल्या आणि दळणासाठी जात्याचा वापर बंद झाला. पूर्वी सिंकच्या बाजूला हंडा आणि माठ ठेवण्यासाठी एक उंचवटा करावा लागायचा. ते काम आता सिंकवरचा नळ आणि सिंकच्या बाजूच्या भिंतीवर लटकवलेला वॉटर प्युरिफायर करतो. पाईप्ड गॅसमुळे सिलिंडर्सची जागा मोकळी झाली.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून बदल एवढ्या वेगाने होतात की काही वेळा आधुनिकतेच्या आहारी जाऊन घाईने केलेल्या बदलांमूळे पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते. ओट्यामध्ये लपवता येणारी कुकिंग रेंज विथ ओव्हन, खूपजणांनी ओट्यामध्ये मोठा फेरबदल करुन आणि ओट्याखालचा फडताळाचा भाग गमावून, बसवून घेतली. पण पुढे लौकरच मायक्रोवेव्ह ओव्हन आले, तीन आणि चार बर्नरचे नवीन चांगले गॅस स्टोव्ह आले. ते घेताना, जुनं ते सोनं म्हणत, ओटा परत पूर्ववत करुन घ्यावा लागला.काहीवेळा चक्की, डिशवॉशर सारख्या वस्तू हव्यासाने, उपलब्ध जागेचा विचार न करता, खरीदल्या जातात. बाजारात सतत नवनवीन यंत्र येतच असतात पण घेताना तारतम्य न बाळगल्यास उपयुक्त असं छोटं स्वयंपाकघर अडचणीचं बनतं.
प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार स्वयंपाकघराच्या मांडणीत फरक पडतो. एका दाक्षिणात्य कुटुंबाच्या स्वयंपाकघराची मांडणी करताना, त्यांच्याकडे असलेला नेहमीच्या वापरातला वीजेवर चालणारा मोठा आणि अवजड असा दगडी रगडा (ज्यात डोसा ईडलीचे पीठ रगडले जायचे) कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. त्याला ओट्याच्या बाजूच्या कपाटाच्या खालच्या भागात ट्रॉलीवर ठेवला आणि कपाटातच वीजजोडणीची व्यवस्था केली. त्यामुळे त्याचा वापर अतिशय सहजतेने करुन तो वापरानंतर कपाटात अशा प्रकारे गुडूप करता येई की त्याचा थांगपत्ता लागणार नाही.एवढ्या बदलांमध्ये एक वस्तू बदलली नाही, ती म्हणजे नारळ खवून खोबरं बनवण्यासाठी उपयोगात येणारी विळी किंवा आडाळा. छोट्या स्वयंपाकघरात याला एक वेळ सांभाळून ठेवता येईल, पण खाली बसून वापरणं जागेअभावी अवघड जातं. ओट्याच्या कडेला, फिटरच्या वाईजसारखं, बांधून वापरता येणारं यंत्र बाजारात आहे, पण तेही वापरायला अवघड, म्हणून विशेष वापरलं जात नाही.
या लेखाच्या निमित्ताने शहरी, निवासी स्वयंपाकघरातील गेल्या पाच दशकात होत गेलेल्या बदलांचा इतिहास आठवताना एक वेगळीच मजा अनुभवली. वर्तुळ पूर्ण होउन आता पुन्हा एकदा चुलीवरच्या पदार्थांची, मातीच्या भांड्यात शिजवण्याची आणि माठातल्या पाण्याची, आस निर्माण होऊ लागलीय. रसोईतल्या सोयी वाढतच जाणार. ही उत्क्रांती काही थांबणार नाही. त्यामुळे भविष्यातील संपूर्णत: स्वयंचलित असलेलं स्वयंपाकघर अजूनच छोटं असेल. त्यात रोबोटीक हात असेल, जो निरनिराळ्या कप्प्यात ठेवलेलं साहित्य जरुर प्रमाणात घेऊन मिसळेल, फोडणी देईल, मसाला टाकेल, आवश्यकतेनुसार तळेल, भाजेल, उकडेल. अशा कॉंप्युटराइज्ड रीतीने तयार झालेले ते परिपूर्ण पदार्थ वाढेल. मग स्वत:सकट सर्व स्वयंपाकघर धुवून पुसून साफ करुन पुढच्या स्वयंपाकासाठी तयार होईल. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमधल्या नियंत्रक appमध्ये पदार्थावर बोट दाबावं लागेल.
श्रीकांत चव्हाण
प्रस्तुत लेखक वास्तुविशारद (Architect) व वास्तुअभियंता (Civil Engineer) असून गेली ३७ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. ते इंटेरिअर डिझायनर, व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (Project Management Consultant) म्हणूनही कार्यरत असून, गृहनिर्माणातील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी बरेच मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केले आहे.
Tags
खाद्यसंस्कृती