गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ता मनोहर पुण्यातल्या सफाई कामगारांच्या सोबत काम करीत आहेत. त्यांनी काम सुरू केल्यापासून आजपर्यंत ह्या कामातले मुद्दे कसे बदलत गेले, सफाई कामगारांच्या परिस्थित काय फरक पडला आणि विशेषत: महिला सफाई कामगारांचे काही निराळे प्रश्न असतात का – याविषयी त्यांची मुलाखत. ही मुलाखत ‘पुन्हा स्त्रीउवाच’ अंकाच्या संपादन मंडळातील अंजली जोशी यांनी घेतली आहे.
सफाई कामगारांच्या बरोबर तुमचं काम कसं आणि कधी सुरू झालं?
मी सफाई कामगार युनियनची कार्यकर्ती 1993 मध्ये झाले पण त्याधीपासून मी ह्या प्रश्नांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेली होते. 1975 साली जागतिक महिला वर्ष जाहीर झालं होतं त्यावेळेस मी अगदी तरुण होते आणि स्त्रीमुक्ती बद्दल खूप आकर्षण होतं. पण त्याच वेळी अशोकच्या संपर्कात आल्यामुळे कष्टकरी महिलांचं चळवळीमध्ये स्थान काय असाही चर्चेचा मुद्दा असायचा. विद्या बाळ यांनी स्त्री मासिकासाठी - सफाई कामगार महिलांच्या मुलाखती घे - असं सांगितलं तेव्हा मी ताराबाई सोनवणे या आमच्या जुन्या कार्यकर्त्या होत्या त्यांची मुलाखत घेतली होती. मी आधी महिला संघटनेचं काम करत असे. महिला संघटनेत कुटुंबातल्या समस्या सोडवणे वगैरे जास्त होत असे. तरी मला युनियनच्या डाव्या विचारसरणीचे आकर्षण होतं. मला आप्पासाहेब भोसले वगैरे त्यावेळच्या पुढार्यांनी सांगितलं की इथे महिला कामगार खूप आहेत म्हणून महिला कार्यकर्ती पाहिजे. कामगारांसोबत काम करायची ही संधी चालून आली आणि मोठ्या यंत्रणेमध्ये कामगारांची प्रतिनिधी म्हणून जाणं याचं मला खूप आकर्षण वाटलं. महिला संघटनेपेक्षा ट्रेड युनियन ही वेगळी संघटना होती.
महिला आणि पुरुष सफाई कामगारांच्या कामात काही फरक असतो का?
सगळीकडे पुरुषांचं आणि महिलांचं काम वेगळं मानलं जातं! पूर्वी सगळीकडे बायका वाकून कचरा काढण्याचं काम करायच्या आता उभा खराटा घेतात. तर पूर्वी त्या झाडून कचऱ्याचा एक ढीग करायच्या आणि मग तो ढीग भरण्याचं काम पुरुष करायचे. पूर्वी जोडीने काम करायची पद्धत मुंबईला होती. पुण्यामध्ये त्याला गाडा बिगारी म्हटला जाई. दोन किंवा तीन महिलांच्या मागे एक गाडा बिगारी असायचा.
या महिलांनी कचऱ्याचा ढीग केला की हा बिगारी तो ढीग उचलायचा. कदाचित त्यावेळी गाडी ढकलणे हे जड काम मानले जात असेल. पण आता हे फरक राहिले नाहीत. तरी आजही कचऱ्याच्या गाडीवर पण महिला कामगार नाहीत, स्मशानभूमीवर महिला कामगार नसतात. अजूनही बायका गटारात उतरायचं काम करत नाहीत. घाणकाम भत्ता मिळणार्याचा वारस नोकरीला लागला जातो. जेव्हा एखाद्या मुलीला नोकरी लावायचे असेल तर तिला काय काम द्यायचे असा प्रश्न पडतो. जर या सफाईच्या कामातला पुरुष वारला तर त्याला मुलगा नसेल तर बाईला झाडू खात्यात घेतलं जातं.
महिला आणि पुरुषांचे पगार वेगवेगळे असतात का?
नाही. बिगारी कामगार हा हुद्दा असतो आणि सगळ्यांचे पगार सारखेच असतात पण त्याच्याशी निगडीत जे बारकावे आहेत - ते जातीशी जोडलेले आहेत. सफाई म्हटलं की एक काम म्हणजे मानवी विष्ठा उचलण्याचं आणि त्याच्यात आपल्याकडे जातिभेदाच्या सीमा येतात. मानवी विष्ठा उचलणे, सार्वजनिक संडास साफ करणे हे सगळं काम मेहतर समाजामध्ये पारंपारिक आहे आणि ते खूपच अपमानकारक आहे. जर एखादी मेहतर बाई आली नाही तर झाडू मारणारी बाई काही संडास साफ करायला जाणार नाही! मग आपोआप त्याचा परिणाम असा होतो की मेहेतर बाई सुद्धा झाडू मारण्याचे काम करत नाही. या दोन्ही कामांमध्ये त्यातल्या त्यात कुठलं काम बर आहे, असं आपल्यासारख्या त्रयस्थ माणसाला विचारलं तर रस्ता झाडण्याचा काम बरं आहे - असं वाटू शकतं.
खरं म्हणजे दोन्ही कामं वाईटच आहेत! या सगळ्याला छेद देणाऱ्या पोलिसी हळूहळू पुढे आल्या. 2000 साली जेव्हा रत्नाकर गायकवाड आले तेव्हा - सगळ्यांचे हुद्दे बिगारी करावेत - असे ठरले. पण सर्वांना बिगारी कामगार म्हणणं जेवढं सोपं वाटतं तेवढं प्रत्यक्षात सोपं नाहीये. कारण त्याच्यावर या कामगारांचे भत्ते पण ठरतात. झाडूवाल्या बाईला झाडूचा भत्ता मिळतो, बिगारी जो असतो त्याला उचकटायला पळी लागते – त्याचा पळी भत्ता असतो. गणवेशही वेगळे असतात घाणकामाचा भत्ता हा एक भाग झाला पण त्याचे असे निरनिराळे पैलू असतात. ते मोडण्याची जी प्रक्रिया आहे ती यांत्रिकीकरणातूनच होऊ शकते. पण ते यांत्रिकीकरण कामगारांच्या जीवावर येतं, कारण त्यांच्या नोकऱ्या जातील अशी भीती असते असे ह्या विषयाला असे अनेक सामाजिक ऐतिहासिक पैलू आहे
महिला कामगारांना काम करताना कोणत्या अडचणी येतात?
काम करताना ज्या कोठ्यावर हजेरी देतात तिथे टॉयलेटची, पाण्याची सोय नसते. सार्वजनिक ठिकाणी काम करणार्या महिलेने टॉयलेटला कुठे जायचं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्या कॉर्पोरेशनचे जे सार्वजनिक दवाखाने आहेत, त्यांचा उपयोग करतात. त्यांना राहायच्या ठिकाणापासून लांब कुठेतरी कामाला पाठवले जाते आणि दोनतीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करायचं असतं. ही बाई काही वाहन वापरत नसते, मग तिने आपला झाडू काखोटीला मारून दूरवर चालत जायचं - असं चालत जाण्यातच तिचा कितीतरी वेळ जातो. कामावर जाता जाताच लोक थकून जातात आणि पुन्हा उभ्याने हे सगळं काम करायचं! पण या अशा सगळ्या गोष्टींकडे सहानुभूतीने बघण्याची नजर नसते. युनियनने आरडाओरडा केला की जाग येते. पण सफाईकाम कोण किती वेळ करू शकतो? याचे तास कसे मोजायचे? माणूस जर ड्रेनेज मधून घाण काढून वर आला तर त्याच्या अंगाला खूप घाण वास येतो. मुंबईच्या हायकोर्टाने महानगरपालिकेला एक आदेश दिला होता प्रत्येक ड्रेनेज कामगाराच्या मागे एक छोटा पाण्याचा बंब पाहिजे म्हणजे तो बाहेर आला ही त्याला हात धुता येतील. ते तर राहूनच द्या! पण तो त्याची ड्युटी करून आला की त्याने पिशवीत आणलेल्या स्वतःच्या टॉवेलने त्याला अंग पुसावे लागते. हे काम इतकं घाण आहे हे की आपल्याला तो वासदेखील सहन होत नाही. पण कामगारांना मात्र कामावर हात धुवायला पाणी मिळत नाही की साबण मिळत नाही! हे सगळं ‘कचराकोंडी’ फिल्ममध्ये सुद्धा पाहायला मिळेल.
अशा परिस्थितीत कामाचे तास कसे ठरवायचे? एकदा घाणीतून बाहेर आल्यावर पुन्हा घाणीतच कसे उतरणार? आम्ही युनियन मधून असा लढा दिला होता की तुम्ही सलग काम द्या म्हणजे आहे त्याच्या कितीतरी पटीने लोक येतिल. खरं म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून लोक येतातच! पण हे घाणीचं काम, कंटाळवाणे काम हे एकप्रकारे माणसाच्या सन्मानाला कमी लेखणारे आहे - त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून रिकामे व्हा आणि नंतर तुम्ही अमुक एखादी चांगली गोष्ट करा -अशी सवलत असली पाहिजे. किती किलो कचरा गोळा केला हा निकष योग्य नाही, एखादा छोटासा उंदीर मारून पडलेला असेल तरी सगळ्या परिसरात घाण वास सुटतो. या सगळ्याचा मानसिक परिणाम ह्या कामगारांवर होत असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.
तुम्ही इतकी वर्ष महिला कामगारांकरता काम केलं आहे तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या जीवनमानात काय सुधारणा झाल्या?
आता ज्या नवीन मुली आहेत त्या शिकलेल्या आहेत आणि स्कूटर चालवतात. जास्त आत्मविश्वास आहे. आधीच्या काळात जेव्हा आप्पासाहेब होते तेव्हा झाडूवाल्या बायका तोंड झाकून घ्यायचा पण आता धीटपणा वाढला आहे. आता फक्त तरुण मुलीच नाही तर मोठ्या वयाच्या बायकासुद्धा पंजाबी ड्रेस घालतात. आता त्यांचं राहणीमान बघून एखादी बाई झाडू वाली आहे असं वाटणार पण नाही इतका बदल झालाय आणि तो स्वागतार्ह आहे.
आणखी काय सुधारणा व्हायला पाहिजे?
जिथून त्यांना हजेरी देऊन काम सुरू करायचं असतं त्या कोठ्या चांगल्या पाहिजेत. कामाचे तास सलग पाहिजे, जास्त माणसं कामावर घेतली पाहिजेत, कंत्राटीकरण बंद केलं पाहिजे आणि सुरक्षितता दिली पाहिजे. खूप लांबून पहाटे सहा वाजता कसे येणार? अनेक बायकांना खूप घाणेरडे अनुभव आलेले आहेत.
औंध मधील गोष्ट आहे - एक महिला कामासाठी बाहेर पडली आणि कामाच्या ठिकाणी गेली तर गाडीत बसलेला एक माणूस तिला म्हणाला, “अहो बाई इकडे या, मला हा पत्ता सांगा!” ती जवळ गेली तेव्हा तिला दिसलं की गाडीच्या आत मध्ये तो माणूस पूर्ण कपडे काढून बसलेला होता. तिला इतकी घाण वाटली की ती जोरात ओरडत पळत सुटली. शिवाय कामाच्या ठिकाणी कुत्रे पण असतात. महिलांना तर घरातल्या कामाचंही प्रेशर असतं. त्या इतक्या सकाळी डबा कसा आणणार? मग कित्येक वेळेला त्या बाहेर वडापाव खातात, त्यांच्या तब्येतीवर या सगळ्याचे वाईट परिणाम होतात. त्यांच्या कामाचे तास कमी व्हायला पाहिजेत. समजा सकाळी सहापासून काम केलं तर दहा वाजल्यानंतर त्यांना सोडून द्या ना! तसं न करता आठ आठ तास काम करावे लागते. पिढ्यानपिढ्या त्यांनी आहे तेवढ्या पगारात काम केलेले आहे त्यांची dignity वाढवली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला शिक्षणाची शाश्वती दिली पाहिजे.
‘वारसा’ असं जे म्हणतात त्याचे फायदे तोटे काय आहेत ?
हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे. वारसा हक्काचे तोटेसुद्धा असतात. कुटुंबात भांडणे लागतात, तीव्र वाद होतात. कधीकधी हे वाद अगदी जीवघेणे असतात. हे सगळं खूप कठीण आहे. एका वारसावर सगळं कुटुंब अवलंबून राहील, अशी परिस्थिती आता राहिली नाही. जर मुलगाच नसेल किंवा चार मुलं असतील तर वारस कोणाला करणार? सगळ्या मुली असतील तर कधीकधी जावयाला वारस करतात. वारसा हक्क हा एक प्रकारे संपत्ती सारखा झाला आहे. त्यातली भांडणे सोडवणे कठीण काम असते. जर एखाद्या मुलाला वारसाहक्काने नोकरी मिळणार असेल तर तो शिकत नाही असंही होतं. हे सगळं परिस्थितीतून आलेले आहे. काहीजण शिकतात सुद्धा! माझ्या मुलाला झाडू हातात धरायला लागू नये, असं म्हणणारे सुद्धा खूप आहेत. अगदी एमपीएससी, यूपीएससी परीक्षांना बसणारी मुलंसुद्धा आहेत. आमच्या युनियन मधल्या एका झाडूवालीचा मुलगा एमपीएससी झाला, त्याचा आम्ही सत्कार केला होता.
आता हे श्रमिक संघटनेचं जे काम आहे त्यात महिला आणि पुरुषांचा सहभाग वेगवेगळा असतो का?
महिलांचा सहभाग आहे आणि तो वाढलाही पाहिजे. यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. पूर्वी युनियनमध्ये पुरुषांचं वर्चस्व होतं, त्याचा बिमोड केला. पुरुषांचे वर्चस्व असू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. पूर्वी कामगारांचे वारस म्हणून मुलगी किंवा सुनेलाही लावले जात असे, पण आता मुलग्यांना वारस म्हणून लावण्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी झाडूवाल्या महिलांची संख्या लक्षणीय होती आणि युनियनच्या कामात त्यांचा सहभाग होता आणि आजही आहे. पण एकदा तो शोध घेऊन गेल्या काही वर्षात महिला कामगारांच्या संख्येत किती फरक पडलाय त्याची आकडेवारी काढायला पाहिजे.
महिला आणि पुरुषांच्या संघटन क्षमतेमध्ये काही फरक असतो का?
नाही, महिला सुद्धा जिद्दीने काम करतात. आता आमच्या शोभाताई बनसोडे यांचं उदाहरण घेऊया. आम्ही काही दिवसांपूर्वी युनियन ची वार्षिक वर्गणी तीनशे रुपये केली त्यावेळी त्यांनी कामगारांना प्रत्यक्ष भेटून साडेचार हजार फॉर्म भरून आणले. हे मोठं जिकिरीचे काम होतं! म्हणजे कामगारांची हजेरी एका ठिकाणी असते, त्याचं काम दुसरीकडे असतं. एखादा माणूस नक्की कुठे आहे त्याला शोधून काढून, भेटून तो फॉर्म देऊन परत दुसर्यांदा जाऊन फॉर्म भरून आणणे हे कठीण काम असते. एकतर कामगारांना युनियन बद्दल फार जाणीव असते - असे नाही. कधीकधी फॉर्म दिल्यावर कामगार अपमान देखील करतात. ते म्हणतात कशाला आलात आमच्याकडे? काय करते युनियन ? कशाला आमचे एवढे पैसे घेतात - असं काहीही बोलू शकतात. खरंतर महिन्याला पंचवीस रुपये म्हणजे काही फार मोठी वर्गणी नाहीये. नव्या सरकारी धोरणामुळे कामगारांचे पाच ते आठ हजार नुकसान होणार आहे, त्यासाठी आम्ही हायकोर्टात केस टाकली आहे. हायकोर्टाच्या वकिलांची एकेका तारखेची फी केवढाली असते, एवढा खर्च युनियन कशी करणार? हे सगळं सामान्य सभासदाला समजावून सांगायचं काम या महिला देखील जिद्दीने करतात.
तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आपल्याला काय करायचं हे मनात असेलच, ते पूर्ण झाल्यासारखं तुला वाटतं का? की अजून काही व्हायला पाहिजे?
मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आप्पासाहेब भोसले होते. समाजवाद आणि लालबावटा यांच्या उतरणीचा कालखंड सुरू झाला होता. 93 ते 95 साली जागतिकीकरणाचे पडघम वाजायला लागले होते. सोव्हिएत युनियन संपलं होतं. त्याचे डायरेक्ट परिणाम कामगारांच्या विश्वासावर नाही झाले - आपल्याला लालबावटा न्याय देणार हा विश्वास काम होता! पण आता शहरे ज्या पद्धतीने वाढली आहेत त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीने संप करणं शक्य होत नाही. आता युनियनचं गुडविल वाढल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न टेबलावरच सुटू शकतात. रोजंदारीच्या मुद्द्यावर आम्ही कार्पोरेशनशी भांडलो. पण आता कंत्राटीकरणाचा लढा आहे, आता कंत्राटदारांना एकदा पैसे दिले की पालिका हात वर करते. महिला देखील कंत्राटी कामगार आहेत. कंत्राट संपल्यावर नवीन कंत्राट येईपर्यंत चार-चार महिने जातात आणि त्या तशाच काम करतात. पण जर त्या चार महिन्यात एखादी महिला गेली तर कंत्राटदार हात झटकतो. अशी केस झालेली आहे - एक कंत्राटी कामगार बाई एक्सीडेंटमध्ये वारली. जर ती कायम सेवक असती तर तिच्या वारसापासून तिच्या सर्व गोष्टींकडे पाहावं लागलं असतं, पण कंत्राटदाराला हे काहीच लागू नाही. खाजगीकरणामुळे कामातली सुरक्षितता देखील कमी झाली. समस्या काही संपत नाहीत. शिक्षणाचे प्रमाण फारसं वाढलं नाहीये. बेकारी आणि शिक्षण यांचं गुणोत्तर काय आहे? अनस्कील्ड कामाविषयी तुच्छता असते आणि ह्या लोकांना नावं ठेवली जातात, असं खूप वाईट चक्र सुरू असते. ही दुष्ट नीती जागतिकीकरणातून पुढे आली आहे. कष्टकऱ्यांच्या जीवावर काम चालते पण जबाबदारी मात्र घेतली जात नाही. हे सगळ्याच ठिकाणी सुरू आहे.
सध्या तुम्ही सफाई कामगारांचे कलापथक, नाटक, गाणी वगैरे उपक्रम सुरू केले आहेत त्याचा काय उपयोग होतो?
आमची युनियन फक्त कामाच्या मर्यादित असलेले प्रश्न सोडवणारी नाही तर युनियन जीवनाच्या सर्व अंगांना भिडेल असे काम करावे असा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच विचाराने गो.पु.देशपांडे यांनी जोतिबा फुले यांच्यावर लिहिलेल्या 'सत्यशोधक' या नाटकाची निर्मिती केली होती. आमच्या संघटनेतल्या ममगारांच्या द्वारे पुण्यातल्या कचर्याच्या प्रश्नावर संशोधनात्मक प्रकल्प देखील आम्ही सुरू केला होता.
युनियन म्हणजे काही दुकानदारी नसते. युनियनला व्यापकपणे कामगारांचे प्रश्न समजले पाहिजेत. युनियन म्हणजे तळागाळातल्या माणसांची एक जातीधर्मविरहित संघटना आहे! कामगारांकडे बार्गेनिंग पॉवर शून्य असते त्या हक्कहीन कामगारांचा आवाज म्हणजे युनियन असतो. त्यांचा आवाज बुलंद ठेवणे, त्यांना हक्कांबद्दल जागरूक ठेवणे, सामाजिकतेचे भान देणे - यासाठी आम्ही हे असे उपक्रम राबवतो.
तुम्ही हे काम सुरू केलं तेव्हा – ‘तुम्ही पांढरपेशे लोक, तुम्हाला आमचे प्रश्न काय कळणार’ - असं ऐकावं लागलं का?
हो! अगदी सुरूवातीला अशा प्रतिक्रिया होत्या. पण सुरुवातीच्या काळात मला अप्पासाहेबांच्या कडून खूप शिकायला मिळालं. त्यांचा खंबीर पाठिंबा होता. ते जनरल सेक्रेटरी म्हणून खूप कृतीशील होते. काही कामगारांच्या तक्रारी असायच्या, काहींना वाटायचं की ही युनियनने नोकरीवर ठेवलेली बाई आहे. त्यांना वाटायचं आत्ताच्या आत्ता हिने हे काम करून द्यावं, त्यावरून कधीतरी कामगार कार्यकर्त्यांशी वाद सुद्धा झालेले आहेत. ‘या बाईला मराठी तरी बोलता येत असेल का?’ - अशा सुद्धा प्रतिक्रिया येत असत! कधी प्यायलेले कामगार असायचे, माझ्याकडे बघून युनियनला शिवीगाळ करायचे - हे सुद्धा मी अनुभवलं आहे. पण तेच कामगार नंतर पावती फाडायला यायचे आणि मेंबर व्हायचे. अनेक सांस्कृतिक गुंतागुंती असतात. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे, कार्यकर्तेपण तयार झाले आहे. आता माझ्याकडून दारोदार फिरणं होत नाही.
आता नवीन कार्यकर्ते आणि लीडर्स तयार होताना दिसतात का?
हो! किमान वॉर्ड ऑफिसच्या लेव्हलला तरी कार्यकर्त्यांचा चांगला संच आहे. मला रोज जायची गरज पडत नाही. ते छोटे छोटे प्रश्न सोडवू शकतात. आम्ही शिबिरे घेतो, त्यांचं बळ वाढवतो, ते अधिकाऱ्यांशी जाऊन बोलतात आम्ही इतर लोकांनाही जोडून घेतो. सध्या उदय भट अध्यक्ष आहे; युनियन च्या माध्यमातून काही वेगळं करावं अशी संधी त्यांच्यामुळे मला मिळते आहे. नाहीतर ‘गॅलेलियो’ सारखं नाटक करणं खूप मुश्कील आहे! हळूहळू कार्यकर्ते प्रश्न सोडवायला तयार झालेत. पुण्यामध्ये अठरा हजार कामगार कमी पडतात. कंत्राटी कामगारांना सुद्धा आम्ही सामावून घेत आहोत. कायम कामगारांना आम्ही सांगीतलेले आहे की आपण एकाच छताखाली काम करतो पण त्यांना कमी पगार आहे त्यांना संघटित करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि आम्ही खूप सदस्य केलेत. त्यांच्या कंत्राटात काय आहे, अटी पाळल्या आहेत का, फंड दिला आहे की नाही - हे बघणं असं खूप काम आहे. किमान वेतन मिळत नसेल तर भांडण करायला लागते. युनियनची दीडशे लोकांची कार्यकारणी असते. सचिव पदाधिकारी असे जवळजवळ 51 लोक आहेत. आमच्या शोभाताई उपाध्यक्ष आहेत. कार्यकर्त्यांना असं वाटतं त्याकडे तीस टक्के महिला कृतिशील असल्या पाहिजे आणि असा प्रयत्नही सुरू आहे. युनियनच्या कामात सगळ्यांचा गुणवत्तापूर्ण सहभाग हे सर्वांनाच आव्हान आहे. युनियनला जसा जात, वर्ग किंवा भाषेच्या भेदाचा रंग देता येत नाही - तसाच जेंडरचा ही रंग दिला जाऊ नये. पण तरीही महिलांसाठी निराळा विचार करायची गरज असते. विशाखा जजमेंट प्रमाणे काम करणारी आम्ही पहिलीच युनियन असू. कारण ते आल्याआल्या आम्ही कॉर्पोरेशन मधला एक प्रश्न हाती घेतला आणि सोडवला. तरी करण्यासारखं अजून खूप आहे, बायकांमध्ये जास्त काम करायला हवं आहे!