कांदळवनाच्या रक्षणकर्त्या




पर्यावरणाच्या क्षेत्रात आणि लघुपट बनविण्यात जसा मला रस आहे तसंच महिला सबलीकरणाचे वेगवेगळे प्रयत्न जाणून घेणंही मला आवडतं. जानेवारी,२०१८ मध्ये माझ्या एका मित्राकडून मला एका अनोख्या प्रकल्पासंबंधी माहिती मिळाली. एका महिला बचत गटाने आजपर्यंत सर्वस्वी पुरूषांच्या समजल्या जाणाऱ्या एका क्षेत्रात पाऊल रोवलं होतं. 
आपल्या परिसरातल्या खाडीच्या, कांदळवनाच्या रक्षणासाठी या बायकांनी वल्ही हाती घेतली. या महिला मुख्यतः कोळी समाजातील आहेत.परंपरेने त्यांच्या घरातील पुरूष होड्या वल्हवणं, मासळी आणणं हे काम करतात तर या बायका मासळी विकण्याचं काम करतात.

स्वामिनी महिला बचत गट या गटाच्या श्वेता हुले यांच्या मनात काही वर्षे एक इच्छा मूळ धरून होती. गावातील लहान मुलांना होडीतून जायचे असे. ती हट्ट धरीत. पण ते शक्य होत नसे. त्यामुळे लोकांना बोटीने फिरवायची इच्छा त्यांच्या मनात होती. दहा वर्षे त्यांनी पाठपुरावा करून काही होईना. एकदा त्या आपल्या बचत गटाच्या मैत्रिणींसोबत केरळला प्रशिक्षणासाठी गेल्या असतांना त्यांची जिद्द पाहून यूएनडीपीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करायचं ठरवलं. फक्त पर्यटनापेक्षा कांदळवनाची माहिती देणं, त्याचं रक्षण करणं हे कसं योग्य आहे हे त्यांच्याशी चर्चा करतांना त्यांना पटलं आणि अर्ज करून २०१५ मध्ये तयारी सुरू झाली. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यावर २६ जानेवारी, २०१७ ला पहिली होडी कांदळवनाच्या सफरीला निघाली.
कांदळवनामुळे वादळी वाऱ्यांपासून रक्षण होतं. कांदळवनं सुरक्षित राहिली, वाढली तर त्सुनामीचा धोका कमी होतो. पण शहरातून येणारा कचरा, पिकांसाठी, बागांसाठी वापरात येणारी जंतुनाशकं यामुळे खाड्यांमधील वनस्पती आणि जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. महाराष्ट्र खारफुटी कक्षातर्फे  कांदळवनाचं, तिथल्या जैवविविधतेचं संरक्षण आणि त्याबाबत जनजागृती निर्माण करणं, पर्यटन पर्यावरणस्नेही करणं आणि स्थानिकांना त्यातून उपजीविकेच्या संधी निर्माण करणं या उद्देशाने या प्रकल्पाला सुरूवात झाली.
मांडवी इको टूरिझम, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग हा पूर्णपणे बायकांनी चालवलेला पहिला असा प्रकल्प आहे. स्वामिनी महिला बचत गटया गटातील महिलांनी वेंगुर्ल्यातील मांडवी खाडीत हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखवली. भारत सरकार, यूएनडीपी (सिंधुदुर्ग), आणि महाराष्ट्र वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या सौजन्याने हा प्रकल्प सुरू झाला. ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटीकडून या बायकांना दोन फायबरच्या होड्या बनविण्यासाठी आर्थिक मदत आणि २० लाईफ जॅकेट्स मिळाले आणि एक मांडव उभारून दिला गेला. होड्या या महिलांच्या साथीदारांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खास फायबरच्या बनवल्या. या बायकांना जे जे आवश्यक वाटलं ते सगळं प्रशिक्षण दिलं गेलं. बाकीच्या आवश्यक गोष्टींची तरतूद या बायकांनी स्वतः केली.

सुरूवातीला या महिलांशी संवाद साधायला मला प्रयत्न करावे लागले. त्यांच्यासंबंधी तोवर विविध वृत्तपत्रात लिहून आलं होतं. तरीही मी कोण आहे, नेमका कशासाठी आलो आहे याविषयी शंका त्यांच्या मनात असाव्यात. मग मी त्यांच्या प्रकल्पावर एक लघुपट करणार आहे आणि त्यामुळे त्यांचं काम लोकांसमोर यायला अधिक मदत कशी होईल हे त्यांना सांगितलं. तिथे जाऊन त्यांचं काम पाहून मग लघुपट कशा प्रकारे तयार करायचा हे त्यांच्यासोबत चर्चा करून ठरवलं आणि आमच्या कामाला सुरूवात झाली. त्यांच्यापैकी काहींना कॅमेऱ्यासमोर यायची सवय नसल्याने त्या थोड्या अवघडून जायच्या, विचारलं तितकंच सांगायच्या. पण हळूहळू ओळख वाढल्यावर त्यांचा संकोच नाहीसा झाला आणि त्या घडाघडा बोलू लागल्या.

हा प्रांत केवळ पुरूषांचाच आहे असं नव्हे तर त्यासाठी शारिरीक बळाचीही आवश्यकता असते. श्वेता हुले यांचे सहचर सतीश हुले यांनी सुरूवातीला बोट वल्हविण्याचं, ती नांगरण्याचं प्रशिक्षण दिलं. प्रियांका दाभोलकर सांगतात की या सुरूवातीच्या काळात त्यांचे दंड फार दुखत. परंतु श्वेता हुले म्हणाल्या की काम शिकता शिकता, करता करता आम्ही या दुखण्यालाही आपसूकच सरावलो. लोकांना बायकांनी होडी चालवण्याबद्दल शंका होत्या. या बायका काही दिवस उत्साहाने करतील, मग गप्प बसतील असं त्यांना वाटत असावं. त्यामुळे सुरूवातीला लोकांनी त्यांची थट्टा उडवली. पण आता या प्रकल्पाला दोन वर्षं होऊन गेली तरीही या बायका दिवसेंदिवस अधिक चांगल्या प्रकारे हा प्रकल्प पार पाडत आहेत हे पाहून लोकांची मानसिकताही बदलली.

आयेषा हुले यांनी सांगितलं की कांदळवनाचा उपयोग इतर सजीवांना खूप होतो. कांदळवनातल्या वनस्पतींची पानं खाली पडून कुजतात, त्यातून किडे तयार होतात, ते खायला मासे येतात आणि मासे खायला पक्षी. अशा प्रकारे एक सागरी अन्नसाखळी तयार होते. स्थानिक लोकही या खाडीच्या, कांदळवनांच्या आधारे उदरनिर्वाह करतात. त्यामुळे कांदळवनांचं संरक्षण करणं, त्याची माहिती देणं हे आम्हाला गरजेचं वाटलं.
श्वेता हुले सांगतात हा प्रकल्प आम्ही कांदळवनांच्या संरक्षणासाठी सुरू केला आहे. आम्ही सगळ्या कोळी समाजातल्या बायका आहोत. आम्हाला दोन बोटी दिल्या आहेत. त्या बोटींना इंजिन नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही त्या बोटी वल्हवतो. एका बोटीत दहा पर्यटकांना घेऊन आम्ही त्यांना खाडीतून दीड किलोमीटरच्या परिसरात फिरवतांना तिथल्या वनस्पतींची, पक्ष्यांची, जीवांची माहिती पुरवतो.
सई सातर्डेकर म्हणतात - कांदळवनाचं संरक्षण व्हावं, लोकांना त्यांचं महत्व पटावं यासाठी त्यांना खाडीतून फिरवतांना या वनस्पतींचे प्रकार त्यांना बहर येण्याचा काळ, त्यांचे औषधी उपयोग, पक्ष्यांचे जीवसृष्टीचे प्रकार, त्यांचं महत्त्व आम्ही सांगतो. उदाहरणार्थ अव्हिसिनिया मरिनाचं पान टोकेरी अव्हिसिनिया ऑफिसिनियाचं पान गोलाकार असतं असा फरक त्या पर्यटकांना समजावून सांगतात. या खाडीत सफर करतांना पाणमांजरं (सध्या साधारण ४८ पाणमांजरं आहेत) खेकडे, वेगवेगळे पाणपक्षी दिसतात. या महिला फक्त पर्यटकांना माहिती पुरवत नाहीत तर खाडीची आणि कांदळवनाची काळजीही आपलं काम करता करता घेतात. सुरूवातीला खाडीच्या काठांवरील गावांतून प्लास्टिकचा कचरा येई. तो प्लास्टिकबंदी केल्याने पूर्णपणे थांबला. लोक निर्माल्य टाकीत. त्यावर असं निर्माल्य आणि घरातील ओला कचरा घरातील झाडांसाठी खत करायला कसा वापरता येईल, पाण्याचं नियोजन कसं करता येईल याबद्दल गावातल्या लोकांचं प्रबोधनही या बायका करतात. श्वेता हुले म्हणाल्या आम्हाला ठाऊक आहे की दहातले सहा लोक आमचं ऐकणार नाहीत. पण निदान उरलेले चार तरी आमचं ऐकून घेतील, त्यामुळे फरक पडू शकेल, या निष्ठेने आम्ही लोकांना सांगत रहातो. बोट वल्हवतांना कचरा आढळला तर लांब काठीने तो काढून टाकतो. खाडी स्वच्छ ठेवतो.
खाडीत फारसं खोल पाणी नसल्याने बुडण्याचा धोका नसतो. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट्स आहेतच. शिवाय या बायकांना पोहता येतं. पण त्या सर्व प्रकारे पर्यटकांची काळजी घेतात. एका ठिकाणी किती पर्यटकांनी बसायचं. कुठे बसायचं हे ठरवून दहाच पर्यटकांना घेतात. कुणाला सेल्फी काढायची असल्यास त्यांना सूचना देतात की तुम्ही एकाएकी उभं राहून सेल्फी काढू नका, आम्हाला आधी सांगा म्हणजे आम्ही होडी स्थिर ठेवू किंवा आम्ही तुमचं छायाचित्र घेऊन देऊ.
या सर्व कोळी समाजातील बायकांना सकाळचं जेवण उरकल्यावर दिवस मोकळा असे. पण आता त्या या प्रकल्पात इतक्या बुडून गेल्या आहेत. आपण काहीतरी समाजाला उपयोग होईल असं काम करतोय याचा त्यांना अभिमान वाटतोय. त्या बोटी चालवू शकतील यावर त्यांच्या घरच्यांचाही विश्वास नव्हता. पण घरच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या सहकार्याने त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. आता नेहमी पुरूषांनी चालवलेल्या बोटींतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनाही या बोटी बायका चालवत आहेत हे जाणवत नाही इतकं कौशल्य त्यांनी मिळवलंय.
आयेशा हुले म्हणतात,अव्हिसिनिया मरिना, अव्हिसिनिया ऑफिसिनिया, रायझोफ्रेरा मुक्रोनाटा अशी उच्चारायला कठीण वाटणारी नावं आम्ही प्रयत्नाने, अभ्यास करून शिकलो. आता कधीही कुठल्या वनस्पतीची, सजीवाची माहिती कुणी विचारली तर आम्ही अगदी न अडखळता ही सगळी माहिती देतो.
परदेशी प्रवाशांची संख्याही वाढीला लागल्यावर या बायकांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी बोलायला शिकणं गरजेचं वाटू लागलं. त्यांनी विनंती केल्यावर कांदळवन कक्षाने त्यांच्या इंग्रजी संभाषणाच्या शिक्षणाची सोय केली. स्थानिक बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी त्यांना तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं. आता त्यांच्यातल्या काही बायका अस्खलित इंग्रजी बोलू शकतात. काहींना अजून जमत नसलं तरी त्या हळूहळू शिकत आहेत.

हे काम पर्यटक येतात तेव्हा सुरू असतं. शिवाय भरतीच्या वेळेतच ते करता येतं. त्यामुळे अजून तरी त्यातून खूप उत्पन्न मिळत नाही. पण आपण समाजाच्या उपयोगाचं असं काही महत्त्वाचं काम करतोय ते करीत राहिलं पाहिजे या भावनेने या महिला हे काम करतात. उत्पन्नासाठी परंपरागत मासेविक्रीचा व्यवसाय त्या अजूनही करतात. या सफरीसोबतच पर्यटकांना मालवणी पद्धतीचं जेवण, न्याहारी देण्याचीही सोयही या महिला करतात. कांदळवन कक्षाने दिलेल्या मांडवात त्या आपली साधनं ठेवतात आणि तिथे पर्यटकांची बसायची सोय करतात. या कामातून त्या स्वावलंबी झाल्यात. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्या या उपक्रमाला हळूहळू प्रसिद्धी मिळतेय. कौतुक होतंय. नुकताच त्यांना एक पुरस्कारही मिळाला. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना घरातल्या निर्णयप्रक्रियेतही स्थान मिळायला लागलंय.
त्यांनी आठ मार्चला महिलांनी होडी चालविण्याची स्पर्धा घ्यायचं ठरवलं, त्याला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हळूहळू त्यांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून कोकणातल्या इतर ठिकाणच्या स्त्रियाही होड्या चालवायला शिकतील आणि कदाचित पुढल्या काही वर्षात केरळमधल्या पुरूषांच्या होडी चालवण्याच्या स्पर्धेला टक्कर देण्याइतकं धाडसही त्यांच्यात निर्माण होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. कारण या महिला फार चिकाटीने हे काम करीत आहेत आणि त्यांना यश निश्चितच मिळत राहिल, जे इतर महिलांच्या डोळ्यासमोर एक आदर्श निर्माण करील यात काही शंका नाही.
हळूहळू पर्यटकांना आसपासची प्रेक्षणीय ठिकाणं, देवळं, किनारे इथे फिरवून त्याची माहिती द्यायची, होम स्टेची व्यवस्था गावात जिथे शक्य असेल तिथे करायची अशा प्रकारे पर्यटन विकास करायचंही त्यांच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.


सिमित भगत
पर्यावरण ह्या विषयात स्वारस्य असलेला तरुण फिल्म मेकर आणि बिदेसिया ह्या प्रकल्पाचा संस्थापक.गेल्या दहा वर्षांपासून विविध विषयांवर माहितीपट बनवले आहेत. टाइम्स ऑफ इंडिया सोबत पत्रकार म्हणून काम करताना पर्यावरणाशी संबंधित अनेक स्टोरीज केल्या. सध्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकसंगीताशी संबंधित माहितीपट बनवण्याचे काम करीत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form