साडीधारी संपकरी


इंग्रजी भाषा शिकताना, आणि पर्यायाने स्वत:ची ओळख  निर्माण करताना लंडनमधील स्थलांतरित गुजराती महिलांना येणाऱ्या  असंख्य अडथळ्यांचा गुणात्मक अभ्यास हा  माझ्या डॉक्टरेट प्रबन्धाचा विषय होता. त्यानिमित्ताने इथे स्थायिक झालेल्या गुजराती समाजाविषयी जाणून घेत असताना जयाबेन देसाई या असामान्य व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. एका  लहानखुऱ्या चणीच्या, सामान्य भारतीय स्त्रीने लंडनमधल्या ग्रनविक (Grunwick) कारखान्यातल्या संपात जो लढा सुरु केला, तो इंग्लंडमधील युनियनच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. १९७० च्या दशकात जयाबेन देसाई यांची  प्रेरणादायक कथा इथल्या सगळ्या वर्तमानपत्रात झळकली आणि एका सामान्य स्त्रीने अनेकांना प्रेरित केले. साडी नेसलेली, एका हातात आपली पर्स घेऊन आवेशाने पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या जयाबेनची प्रतिमा त्या काळातल्या समस्त वर्ग, वर्ण आणि लैंगिक भेदभावाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक म्हणून नावाजली गेली. सत्तरीच्या दशकातील ब्रिटीश समाजात भारतीय स्त्रियांची इंग्रजीवर प्रभुत्व नसणाऱ्या, खाजगी आणि सार्वजनिक पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या जोखडाखाली मान टाकून जगणाऱ्या अशी नकारात्मक प्रतिमा होती. परंतु वर्ण आणि वर्गीकृतसंरचनेविरुद्ध लढा देणाऱ्या, आणि आपली सामाजिक ओळख नव्याने घडवणाऱ्या अनेक आशियाई स्थलांतरित महिलांपैकी जयाबेन देसाई! 
दक्षिण आशिया ते  पूर्व आफ्रिका प्रवास

जयाबेन यांचा जन्म १९३३ ला गुजरातमध्ये झाला आणि कालांतराने टान्जानियातील सूर्यकांत देसाईशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या आफ्रिकेत स्थलांतरित झाल्या. युगांडा, केनिया आणि टान्जानिया या  पूर्व  आफ्रिकी  देशांमध्ये स्थायिक झालेल्या प्रभावी भारतीय ब्रिटीश समाजाचा त्या एक घटक बनल्या.
तसे पाहता दक्षिण आशिया ते  पूर्व आफ्रिका व्यापारी दळणवळणाला  ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दक्षिण आशियातील व्यापारी साहसी लोक ब्रिटीश साम्राज्याआधीपासूनच पूर्व आफ्रिकेत प्रवास करीत. त्यातील काही लोक मागे परतायचे, तर काही  तिथेच स्थायिक होऊन राहिले. ब्रिटीश वसाहतीमुळे आशियाई लोकांचा पूर्वीचा समुदाय अधिकच  मोठा आणि सशक्त बनला. ब्रिटीशांनी आफ्रिकेत रेल्वेमार्गाची (१८९०-१९००) बांधणी करण्यासाठी भारताच्या वायव्य प्रांतातून पूर्व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आणला.  सध्याच्या गुजरातमधील आणि काही प्रमाणात पंजाब आणि गोव्यामधील विविध जाती आणि धर्म (हिंदू, मुसलमान, सिख आणि पारसी) यांचा त्यात समावेश होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश साम्राज्याला उतरती कळा लागली आणि ६० च्या दशकात पूर्व आफ्रिकेतील अनेक नवनिर्मित देशांनी 'आफ्रिकीकरणधोरण पत्करले. जेणेकरून आफ्रिकेतील मूळ निवासी  बहुसंख्य लोकांनी  अर्थव्यवस्थेच्या आणि महत्त्वाच्या सरकारी क्षेत्रांवर ताबा घ्यायला सुरूवात केली.  केनिया, टान्जानिया, झांबिया आणि मलावी यांसारख्या देशांमध्ये दक्षिण आशियाई लोकांच्या  आर्थिक प्रभुत्वाला विरोध करून, साधन संपत्तीचे नियंत्रण आफ्रिकन लोकांकडे वळविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या धोरणांच्या विकासाचा नकारात्मक परिणाम तिथल्या आशियाई समाजावर झाला. परिणामी पूर्व आफ्रिकेतील अनेक दक्षिण आशियाईंनी नव्या स्वतंत्र देशांच्या पासपोर्टऐवजी, ब्रिटिश पासपोर्ट स्वीकारले. १९७२मध्ये  युगांडाच्या इदी अमीनने स्थानिक दक्षिण आशियाई लोकाना ९० दिवसात देश सोडायला सांगितले. आपली सगळी मालमता आणि संपत्ती युगांडात सोडून, केवळ ५५ पौंड सोबत घेऊन सुमारे २७००० दक्षिण आशियाई लोकांनी तो देश सोडला. भविष्याबद्दल चिंताग्रस्त झालेल्या यापैकी बऱ्याच दक्षिण  आशियाई लोकांनी  आर्थिक संधी आणि सुरक्षेसाठी ब्रिटनचा मार्ग स्वीकारला. या स्थलांतरित प्रवाशांनी जरी ब्रिटिश पासपोर्ट आणि पर्यायाने ब्रिटीश नागरिकत्वाचा स्वीकार केला होता तरी ब्रिटनमध्ये त्यांचे स्वागत झाले नाही . एवढेच नव्हे तर त्यांना निवासी व्यवस्था आणि रोजगार मिळण्याच्या बाबतीत दुय्यमच वागणूक मिळाली. जयाबेन या दुसऱ्यांदा स्थलांतरित झालेल्या (twice migrant) प्रवासी नागरिकांपैकी एक.
१९६९ मध्ये जयाबेन लंडन मधे स्थलांतरित झाल्या. आफ्रिकेतील मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवर जीवन व्यतीत केल्यावर इथे आल्यावर जगण्यासाठी पुन्हा नव्याने सुरूवात करून किमान वेतनाची नोकरी पत्करणे अत्यावश्यक होते. त्यांनी अत्यंत कमी वेतनावर लंडनमधील फोटोग्राफिक फिल्म प्रोसेसिंग फॅक्टरी गृनविक इथे कामाला सुरुवात केली. गृनविक येथील बहुतेक कामगार त्यांच्याप्रमाणे नुकतेच स्थलांतरित झालेले पूर्व आफ्रिकन आशियाई होते. त्यापैकी अनेक स्त्रिया आणि अल्पसंख्याक ( विशेषतः कृष्णवर्णीय)  कामगारांना अत्यंत कमी वेतन दराने रोजगार दिला जाई. कारखान्यात कोणतीही कामगार संघटना नव्हती आणि व्यवस्थापन गोऱ्यांच्या नियंत्रणात असल्याने कामगारांना दुय्यम दर्जाची वागणूक, अपमान आणि छळ सहन करावा लागत असे.

20 ऑगस्ट १९७६ रोजी, ग्रनविकमधल्या कामगारांना ओव्हरटाइम करण्याची सक्ती करणारा एक कठोर आदेश व्यवस्थापनाने दिला. पूर्वसूचना देता आलेल्या त्या आदेशाला धुडकावत त्या क्षणी जयाबेन यांनी कामाला नकार दिला आणि मॅनेजरला सुनावले  'आपण इथे जे काय चालवत आहात हा कारखाना नाही, हे तर  प्राणिसंग्रहालय आहे. प्राणिसंग्रहालयात अनेक प्रकारचे प्राणी असतात. काही माकडे असतात जी तुमच्या बोटांच्या तालावर नाचतात  पण काही सिंह  असतात जे तुमचे लचके देखील तोडू शकतात. आम्ही ते सिंह आहोत साहेब !’  जयाबेनला साथ देण्यासाठी इतर चार कामगार तयार झाले आणि निषेध नोंदवत सगळ्यांनी काम बंद करून निघून गेले. या गटाने एकत्रितपणे एपेक्स युनियन मध्ये प्रवेश केला आणि पिकेटिंग सुरु केले.  स्थानिक काळ्या राजकीय गटांचा  आणि स्थानिक संघटनांचा  त्यांना पाठिंबा मिळाला आणि लवकरच ग्रनविकमधील परिस्थितीचा  निषेध करीत 137 कर्मचारी संपात सामील झाले.

जयाबेनच्या नेतृत्वाखाली कामगारांचा गट स्वत:च्या मुलभूत हक्कांसाठी व्यवस्थापनाच्या विरोधात उभा राहिला. महिला कामगारांना शौचालयात जाण्याची परवानगी घ्यावी लागे, सतत काढून टाकण्याची धमकी दिली जाई आणि अनिवार्य ओव्हरटाइम, जो बऱ्याचदा अल्पसूचनेवर मागितला जात असे, अशी  अनेक दबावतंत्र वापरली जात असत. विशेषतः आशियाई महिलांसाठी हा ओव्हरटाइम त्रासदायक ठरत असे कारण बऱ्याच स्त्रियांना घरी काम - स्वयंपाक आणि साफसफाईची 'दुसरी शिफ्ट' करावी लागत असे. त्यात कमी वेतन देखील एक समस्या होतीच , पण त्यापेक्षा व्यवस्थापनाकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक ही संपाला चालना देणारी मोठी बाब होती.  त्याकाळी युनियनचे नेतृत्व गोऱ्या पुरुषांच्या हाती असल्याने, गोर्या पुरुषांना भिन्न वेतन आणि बोनस मिळणे स्वाभाविकपणे घडत असे. परंतु ग्रनविक संपात जे घडत होते ते विशेष होते.  या साडीतल्या संपकरी (strikers in saris) बायांनी ब्रिटनमधील युनियनला वेगळे वळण दिलेच पण त्याचवेळी आशियाई महिलांबद्द्लच्या साचेबद्ध व्याख्या पण मोडीत काढल्या. 
ग्रनविक  कारखान्याबाहेर जयाबेन आणि तिच्या सहकाऱ्यांनी अनेक महिने आंदोलने केल्यांनतर  गृनविक स्ट्रायकरांचा प्रश्न इतर  कामगार संघटनानीदेखील उचलून धरला.  जयाबेन यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी देशभर प्रवास केला आणि इतर कारखान्यांमधील, कार्यस्थळांमध्ये त्यांच्या लढयाबद्दल कामगारांना संबोधित केले. १९७६ मध्य सुरू झालेला हा संप आणि १९७८ पर्यंत दोन वर्ष चालू राहिला. संपात सामील  झालेल्यांना ट्रेड यूनियनकडून जो स्ट्राइक पे मिळाला तो ग्रनविकमधल्या वेतनापेक्षा जास्त होता.  शेवटी शेवटी संप बारगळला, पण जयाबेननी वर्णभेदाचा आणि महिला आणि कामगार हक्काचा जो पुरस्कार केला ती  ब्रिटीश डायास्पोरामधील अनोखी प्रेरणादायी घटना आहे. 
जयाबेनची कथा मी आयोजित केलेल्या फोकस गटामधल्या, सत्तरीच्या दशकात आलेल्या गुजराती महिलाना माहिती होती. त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आणि कृतज्ञता देखील होती. फोकस ग्रुपमधील एक सहभागी हेमा म्हणाली "आम्ही जेव्हा आफ्रिकेत होतो तेव्हा आम्ही 'आपणा बापूजी' (गांधी) च्या कथा नेहमी ऐकायचो, आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. माझ्या वडिलांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आम्हाला हक्कांबद्दल कसे लढायचे हे माहीत आहे, म्हणून मला जयाबेनचा फार अभिमान वाटतो. आमच्यासारख्या कामगारांसाठी त्यांनी काय काय केले! आम्ही त्यांना काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमात भेटलो, इतके नम्र व्यक्तिमत्व! रोजच्या दैनंदिन कामासाठी आत्मविश्वासाने वावरण्याचे सामर्थ्य मिळते त्यांच्याकडून.
आज जयाबेन आपल्यात नाहीत, २०१० ला त्यांचे निधन झाले. २०१६ मधे बीबीसी ने विमेन्स अवर (Women’s Hour) या कार्यक्रमात  ब्रिटनमधील दखलपात्र महिला व्यक्तिमत्वामधे त्याचं नाव समाविष्ट करून त्यांचा सन्मान केला. 

डॉ.स्मिता रे


मुंबईत एस.एन.डी.टी. महाविद्यालयात संस्कृतचे अध्यापन आणि लंडनमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले आहे. भाषाशास्त्र विषयात त्यांनी डॉक्टरेट केली असून सध्या त्या लंडनमध्ये प्रौढ शिक्षण व्यवस्थापक (प्रशासकीय अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत.

2 Comments

  1. वाह सुंदर लेख |तुझ्या ब्लॉग मुळे एका महान व्यक्तीची ओळख झाली

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form