‘पुन्हा स्त्री उवाच’ची कल्पना मनात आल्यापासून वेबसाईट तयार होईपर्यन्तच्या वेगवेगळ्या कामांना अनेकजणांचा हातभार लागलेला आहे.
अंजली जोशी आणि शुभांगी थोरात ह्या दोघी मैत्रिणी सातत्याने ह्या प्रक्रियेत माझ्या सोबत राहिल्या. ह्या दोन्ही मैत्रिणींच्या आश्वासक साथीमुळे माझ्या मनाची उभारी टिकून राहू शकली.
‘स्त्री उवाच’ प्रकाशन गटाच्या मुंबई आणि पुण्यातल्या सगळ्या मैत्रिणीना त्यांचे वय आणि प्रकृती साथ देत नसतानाही उत्साहाने मुलाखती देण्यासाठी तयार झाल्या. मुंबईत घेतलेल्या सगळ्या मुलाखतींचे चित्रीकरण करण्यासाठी विजया चौहान ह्या मैत्रिणीने स्वत:चे घर देऊ केले होते.
वेबसाइटच्या ध्वनीचित्र विभागाची आखणी करण्यापासून अनेक व्यक्तींकडून वेबसाईटच्या प्रमोशनचे व्हिडिओ तयार करून घेण्यापर्यंतच्या अनेक जबाबदार्या अंजली जोशीने हसतमुखाने उचलल्या. पुण्यात घेतलेल्या मुलाखतींच्या चित्रीकरणासाठी अंजलीच्या घराचा उपयोग केलेला आहे. ह्या मुलाखतींच्या व्हीडिओंच्या एडिटिंगसाठी ट्रान्सस्क्रिप्शन करण्याचे मेहनतीचे काम - रंजना पुरोहित यांनी केले आहे.
चिन्मयी सुमित, ऋचा आपटे, सुनील सुकथनकर, प्रगति बाणखेले – अशा प्रसारमाध्यमात अत्यंत बिझी असणार्या मंडळींनी वेबसाइटचे प्रोमोशनल व्हिडिओ करण्यासाठी वेळ काढला – त्यांच्या आवाहनामुळे आमची वेबसाइट जास्त लोकांपर्यंत पोचायला मदत होते आहे. ह्या प्रोमोशनल व्हीडिओचे एडिटिंग करण्याचे काम गोरक्षनाथ खांडे ह्या मित्राने केले आहे.
अंकासाठी लेखन करणार्या सर्वांनी विनामोबदला स्वत:चे लिखाण उपलब्ध करून दिले. माझ्या संपादकीय सूचना शांतपणे समजून घेऊन मी सांगितलेले बदलदेखील करून दिले – त्यासाठी मी सर्व लेखकाची ऋणी आहे.
अंकासाठी लिहिणार्या बहुतेक लेखकांनी मजकूर युनिकोड मध्ये टाइप करून पाठवले होते. पण काही लेखकांकडून आलेले साहित्य हस्तलिखित स्वरुपात होते, तर काहींनी युनिकोड फॉन्ट वापरलेले नव्हते. वेबसाइटच्या ‘पुनर्भेट’ विभागासाठी ‘वार्षिक स्त्री उवाच’ च्या अंकातले लेखही पुन्हा टाइप करून घेतलेले आहेत. असे सर्व लेख पुन्हा टाइप करून देण्यासाठी काजल बोरस्ते, मेघना धर्मेश आणि प्रीति किनी या सगळ्यांनी मदत केली आहे. सर्व लेखांच्या मुद्रितशोधनाची जबाबदारी शुभांगी थोरात आणि जयश्री जोशी यांनी पार पाडली आहे. इंग्लिश लेखांचे संपादन करण्यात पूजा जोशी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हिन्दी लेखांचे संपादन भारती दिवाण यांनी केलेले आहे.
अंकाच्या मुखपृष्ठासाठी प्रतिभा वाघ यांच्या चित्राचा उपयोग केला आहे. त्यांनी स्वत:चे चित्र विनामूल्य उपलब्ध करून दिले आणि वेबसाईटचा लोगो डिझाईन करण्यासाठी सिद्धेश शिरसेकर यांचीही मदत मिळवून दिली.
या सगळ्यांच्या सहभागामुळेच हे वेबसाइटचे काम सुरू होऊन आज इथपर्यंत पोचलेले आहे.
आता या वेबसाइटच्या सर्वच विभागांमध्ये वेळोवेळी भर पडत राहील – तेव्हा देखील सर्वजण असेच सहकार्य करत राहतील आणि या कामात नवनवीन लोकही जोडले जात राहतील याची मला खात्री आहे!