सांविधानिक मूल्ये अंगिकारण्यासाठी

लहानपणीच लिंगभावाला घरातून सुरुवात होते आणि ही सुरुवात आई, आजी, काकी, शेजारीपाजारी यांच्याकडून झालेली असते. माझ्या घरात लहानपणापासून घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे सण, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, उपवास, नवस इत्यादी करून मग घरातील इतर गोष्टींना सुरुवात होते. मासिक पाळी आली की बाहेर बसावे लागे. या गोष्टींविषयी मनात तिरस्कार निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे बरेच दिवस मी मासिक पाळी आली की घरी सांगत नसे.
दोन लहान भाऊ आणि मी मोठी बहीण. आमचं कुटुंब तसं सुशिक्षित आहे. आई धार्मिक आहे, त्यामुळे लहानपणापासून धार्मिक वातावरणातच बालपण गेलं. लहानपणी मनात प्रश्न यायचे की, का बरं सगळ्या देवींची मंदिरं डोंगरावर वसलेली आहेत किंवा गावाबाहेर तरी आहेत? महादेव विठ्ठल, भैरवनाथ यांची मंदिरं मात्र गावात आहेत. म्हणजे स्त्री-देवतांची मंदिरं गावाबाहेर आणि पुरुष-देवांची मंदिरं गावात (प्रत्यक्षात मात्र जिवंत बायकांचा कोंडमारा केला जातो आणि पुरुष मोकाट फिरतात.) हा लिंगभाव समजत होता, पण कोणाला आणि कसं बोलायचं? संस्कृतीने बाईला गप्प बसायला शिकवलं होतं. बाईच्या अंगात आल्यावर देवीच असते आणि पुरुषाच्या अंगात देव असतो.
आईने घरात नवीन भांडी घेतली तर भांड्यावर भावांची नावं असायची. दिवाळीला फटाके आणले तरी दोन भावांमध्ये वाटण्या व्हायच्या. त्यावेळी लिंगभेदाची पुसटशी कल्पना येऊ लागली होती. मी मुलगी म्हणून कशाला फटाके वाजवायचे; लग्नानंतर मी सासरीच तर जाणार आहे, मग भांड्यांवर माझं नाव कशाला असायला हवं?
माझी दहावीची परीक्षा झाल्यानंतर माझी आजी (वडिलांची आई) वारल्यामुळे माझ्या आजोबांच्या मदतीसाठी मला रणसिंगवाडी (सातारा-खटाव) इथं पाठवण्यात आलं. परंतु दहावीचा रिझल्ट लागायच्या आधीच माझी पुस्तकं कोणाला तरी विकलेली होती. मी परत आल्यावर मला हे समजल्यानंतर खूप वाईट वाटलं. मला शिकायचं होतं. ही खंत मी माझ्या मावशीला बोलून दाखवली होती. घरात आईचं वर्चस्व होतं, त्यामुळे तिने माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. 
सासर आणि माहेर दीडशे ते तीनशे किलोमीटर अंतर आहे. देश आणि कोकण म्हणजे सातारा-खटाव ते पुणे-इंदापूरपासून आंबवडे-अलिबाग असा माझा प्रवास झाला.लग्नानंतरचं घराणं जेधे-देशमुख असल्यामुळे डोक्यावर पदर घ्यावा लागे. सासरचे रीतीरिवाज पाळावे लागत. सासू-सासरे प्रेमळ पण अशिक्षित होते. त्यांच्याकडून लिंगभेदभावाचा कुठलाही दबाव नव्हता. पतीच्या नोकरीनिमित्ताने १९९३ मध्ये अलिबागला यावे लागले. आम्हा दोघांनाही वाचनाची आवड होती. १९९५ ते २००० पर्यंत माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट मुंबई (वाशी, कोपरखैरणे, अलिबाग) येथे असिस्टंट म्हणून काम केलं. त्यातून मी घडत होते. माझ्यामध्ये विविध प्रकारच्या कला असल्यामुळे शिवण, पार्लर यांचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्यातून महिलांशी संवाद वाढत गेला. महिलांच्या समस्या समजू लागल्या. महिलांना ट्रेनिंग देण्यासाठी सुरभी स्वयंसेवी संस्था या नावाची संस्था सुरू केली. त्यावेळी माझी मुलं लहान होती. मी नोकरी करत असताना मुलांची जबाबदारी सासू-सासऱ्यांवर टाकत असे. त्यांनी मला कुठल्याही बंधनात कधी ठेवले नाही. उलट माझ्या सासूबाईंना मी बाहेर जाऊन काहीतरी चांगलं करते आहे याचा आनंद होता. ज्यावेळी माझ्या कामासाठी मला पुरस्कार मिळायचे, त्यावेळी मी आवर्जून सासूबाईंना सोबत घेऊन जात असे. नंतर संस्थेच्या कामानिमित्त दोन-तीन महिने मला बाहेरगावी जावे लागले, त्या काळामध्ये माझ्या पतीने कधीही तू बाई आहेस आणि रात्रंदिवस जाऊन तू काय काम करतेस, असे प्रश्न कधी विचारले नाहीत. माझं काम घरच्यांना स्थानिक वर्तमानपत्रातून कळत होतं.
परंतु माझ्या माहेरच्या लोकांना माझं सामाजिक कार्य आवडत नव्हतं. बाहेर जाऊन काम करायची काय गरज आहे? नोकरी का करत नाहीस? अशी माहेरकडून विचारणा करण्यात आली. माझा भाऊ व चुलते हे उच्चशिक्षित आहेत. मी समाजकार्यासाठी बाहेर जाते याबद्दल माझ्या मुलांना विचारण्यात आलं की, ‘तुमची आई बाहेर जाऊन काम करते हे तुम्हांला आवडतं का?’ तेव्हा मला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं वाटलं होतं. मी वेश्याव्यवसाय करते की काय असा मला भास झाला. पण, माझ्या नऊ वर्षांच्या मुलाने अतिशय निरागस उत्तर दिलं की, ‘आई जे करते ते आमच्यासाठी करते आहे’. आणि खरंच त्यावेळी माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. माझं काम (सामाजिक कार्य) मुलं बघत होती आणि ती माझ्या सोबत होती. पण माझा भाऊ व चुलते यांना मात्र ते सहन होत नव्हतं. एका बाईने म्हणजेच तथाकथित घरंदाज बाईने बाहेर जाऊन असले उद्योग करू नयेत, असं त्यांना वाटत होतं. दोघेही कंपनीमध्ये अधिकारी आहेत, पण त्यांच्या अशा वागण्याने मला त्यांच्या अधिकारी असण्याची आणि उच्चशिक्षित असल्याची कीव वाटायला लागली. आपला समाज विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये कितीही पुढे गेला असला तरी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी मात्र आलेली नाही. लोकांनी संविधानातील मूल्ये स्वीकारलेली नाहीत. आम्ही फक्त शिवाजी महाराज, जिजाऊ यांचे कोरडे गोडवे गात राहतो, तसे वागत मात्र नाही.
वाचनाची व समाजकार्याची आवड असल्यामुळे लग्नानंतर मुंबईमध्ये वाशी व मशीद बंदर येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. नोकरी करत असताना महिलांशी संपर्क आल्यामुळे त्यांचे बचत गट तयार केले. महिलांच्या अडचणी जाणून त्यांना टेलरिंग व विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. मिटकॉनच्या माध्यमातून २००३ मध्ये Entrepreneurship Development प्रोग्रामचे प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा महिलांना प्रशिक्षण देताना झाला.
लहानपणापासूनच तेहतीस कोटी देवांना घेऊन मी खूप अस्वस्थ होते. मला खरा देव शोधायचा होता. असा देव, ज्याला कुठलीही अपेक्षा नको होती. तो प्रेमळ, कृपाळू, दयाळू असेल आणि कुठल्याही आमिषाला भुलणारा नसेल. कालांतरानं, १९९७ पासून मी चर्चमध्ये जाऊ लागले. बायबलमध्ये देव शोधू लागले. बळी, बकरी न घेणारा देव मिळाला, परंतु बायबलच्या कथांमध्येही महिलांवर अन्ययाय झालेला होता. रामायण-महाभारतामध्येही दुसरं काय होतं? पुढे २००२ मध्ये मी चर्चमध्ये जाणंही सोडलं. 
त्यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात केली. परंतु हे सर्व करत असताना घरातून, नातेवाईकांमधून, माहेरहून, समाजामधून शिव्या आणि ओव्या दोन्ही ऐकायला मिळाल्या.
लग्नाआधी माझं जेमतेम दहावी शिक्षण झालेलं होतं, पण लहानपणापासून वाचनाची आवड होती. त्याचबरोबर पतीमुळे सामाजिक कार्याची ओढ लागली. शिवण क्लास, पार्लर, हस्तकला, फूड प्रोसेसिंग यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थोडे दिवस नोकरी केली. पगार कमी आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरी करावी लागली. १९९५ साली माथाडी हॉस्पिटल मुंबई येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असताना शिक्षणाचे महत्त्व समजले. मी फक्त दहावी शिकल्यामुळे मला बारावी पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यावेळी मात्र मला शिक्षणाची खरी किंमत समजली. नंतर मी कुटुंब, मुलं, समाजकार्य ह्या जबाबदाऱ्या सांभाळत माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं; आणि पतीलाही ते करायला लावलं.
विशेष म्हणजे माझ्या कुटुंबात तीन पुरुष आहेत, पती व दोन मुले. त्यांच्याकडून मला संपूर्ण सहकार्य मिळते आहे. आता मुलं मोठी झाली आहेत, पण प्रत्येक जण आपापली जबाबदारी संभाळून घरातील निर्णयप्रक्रियेमध्ये सहकार्य देतात. घरातील स्वच्छता असेल किंवा किचनमधली जबाबदारी असेल, सगळे सहकार्य करतात. तसा माझा किचनशी संपर्क कमी आहे. मला अॅलर्जीचा त्रास असल्यामुळे जास्त वेळ मी किचनमध्ये थांबू शकत नाही.
‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या तनिष्का व्यासपीठाने रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये पहिली शाखा स्थापन केली होती. त्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत महिला तनिष्का भगिनींची आमदार निवडणूक मी एकही रुपया कोणालाही न देता, फक्त फोन करून व मिस कॉल देऊन मी निवडून आले होते. विविध संस्था, संघटना यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून मला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यावेळी मी निवडणूक जिंकले तेव्हा मी बारामतीकर असल्याचं सिद्ध केलं, असा अभिप्राय मला अलिबागकरांनी दिला होता. आज निवडणूक, मतदान म्हटलं की पैसे वाटप आलं; परंतु मी एकही रुपया खर्च न करता निवडणूक जिंकले होते. खरं तर ती माझ्या समाजकार्याची पोचपावती होती, की माझी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
आज मी विविध संघटना, संस्था यांच्या पदावर कार्यरत असून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. नोकरी सोडून समाजकार्य करीत असताना अंनिस व यशदा, पुणे यांच्या माध्यमातून वेगवेगळी प्रशिक्षणं घेतली. अंनिसच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. महिलांमधील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी सातत्याने उपक्रम राबवीत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी गेली पंधरा वर्षे शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, बचतगट यांमधून असंख्य प्रयोगांसह व्याख्याने देत आहे. ८ मार्चला संपूर्ण जगभरात महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा केला जातो. परंतु माझ्यासाठी रोजच महिला दिन असतो. रोज अनेक महिलांना भेटी देऊन, त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहे. २००९ पासून एनएसएसच्या विद्यार्थ्यांसोबत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करून संविधान यात्रा व महोत्सव यांच्या माध्यमातून सांविधानिक मूल्ये महाराष्ट्रभर पोहोचवत आहे. २०१३ पासून जात पंचायत कायदा व अंमलबजावणी, वाळीत टाकणे इत्यादी प्रश्नांवर मी काम करत आहे. यासंबंधातील रायगड जिल्ह्यातील २४०० केसेसमध्ये न्याय मिळवून दिला आहे. २००९ पासून महिलांच्या कायद्यांसंदर्भात महिलांना माहिती व्हावी म्हणून महाविद्यालये, ग्रामपंचायत येथे जागृती करत आहे. या कार्यक्रमांमधून पती निधनानंतर संघर्ष केलेल्या विधवा महिलांचा सन्मान केला जातो.
एखादं कौशल्य शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी काही खूप मोठ्या डिग्रीची गरज नसते, हे माझ्या जगण्याने मला शिकवले. संविधानातील मूल्ये समजली व जीवन जगण्याचे ते एक महत्त्वाचे माध्यम आहे, हे स्वीकारले की वैयक्तिक आणि देशाचीही प्रगती होते हे कळत गेले.

मैत्रेयी
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

[मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी प्रकाशित केलेल्या 'कशासाठी? लिंगभाव समतेसाठी' पुस्तकातील लेख. हे पुस्तक शासकीय मुद्रणालय, चर्नीरोड, मुंबई येथे उपलब्ध आहे.] 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form