"मदत नको, स्वातंत्र्य हवंय!"

मी टॅक्सीतून खाली उतरले समुद्रकिनाऱ्यावर. तिथे समुद्राच्या पाण्यापर्यंत जायला एक वेगळा ट्रॅक ठेवलेला. ट्रॅकच्या बाजूला मजबूत असं रेलिंग. तिथून व्हीलचेअरवर बसूनही पाण्यापर्यंत पोहोचता येईल, किंवा हातात क्रचेस घेऊन चालणाऱ्यांसाठीही सोपा, सहज रस्ता. म्हणजे वाळून रुतायचा प्रश्नच नाही. तिथेच एक देखणं हाॅटेल. त्याच्या चार-पाच पायऱ्या चढण्यासाठी छान रेलिंग तर बाजूला व्हीलचेअर जाऊ शकेल अशीही सोय! आतल्या लादीवर सुद्धा माझ्या काठ्या अजिबात सरकल्या नाहीत. मग मी मेन्यू कार्ड हातात घेतलं तर एका कार्डावर ब्रेल लिपीत मेन्यू लिहिलेला होता. त्या खरखरीत स्पर्शाने मला जाग आली. कारण ते तर माझं स्वप्न होतं!😉
अख्खं जग डिसेबल्ड फ्रेंडली झालंय असं माझं बरेच वर्षांपासूनचं एक स्वप्न आहे. म्हणजे मी त्या जगात मुक्त संचार करू शकेन. पण अजून तरी हे स्वप्न सत्यात आलेलं नाही. त्यामुळे मी संचार तर करतेय, पण तो फारसा मुक्तपणाने होत नाही, हेच खरं. 
भटकंती करण्याची माझी आवड बहुदा नैसर्गिकच असावी. पण ती रुजवली माझ्या नवऱ्यानं. लहानपणी महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी आई-बाबांबरोबर फिरले होते. नंतर जवळच्या मित्र मैत्रिणींबरोबर देशात काही ठिकाणी गेले. पण खऱ्या अर्थानं पर्यटन सुरू झालं ते वयाच्या चाळीशीनंतरच.
अपंग व्यक्तीसाठी पर्यटन ही साधी सोपी गोष्ट कधीच नसते. मूळात शारीरिक प्राॅब्लेम असणाऱ्यांनी इतकं फिरावं हे आजही अनेकांना पटत नाही. मी आणि माझ्या नवऱ्यापुढे शारीरिक आव्हानं तशी खूप आहेत. तरीही, डिसेबल्ड फ्रेंडली सुविधांमुळे काही गोष्टी नक्कीच सोप्या होऊ शकतात. पण त्याबद्दलच फारशी जागरुकता नाही, असं अनेकदा जाणवतं.
जेव्हा आपण एखाद्या हाॅटेलमध्ये जातो, तिथे प्रवेशदाराजवळ दोन-तीन पायऱ्या चढायच्या असतात. काही वेळा व्हीलचेअरसाठी रॅम्प असतोही, पण आमच्यासारखे हातात क्रचेस घेऊन चालणाऱ्यांसाठी आवश्यकता असते ती पायऱ्यांच्या बाजूला कठडा असण्याची. रेलिंगला धरून स्वत: पायऱ्या चढण्याचा आनंद अपंग व्यक्तीच समजू शकतो.  अशा ठिकाणी रेलिंग नसलं, तर मग अनेक जण मदतीला पुढे येतात, हात देतात. पण अपंग व्यक्ती स्वत: जाऊ शकत नाही, याचं शल्य असतं. शिवाय इथे अशी गरज आहे, याची जाणीव नसणं हे तर जास्तच टोचतं! रेलिंगचं महत्त्व अनेकांना कळत नाही. सुशोभीकरणात तो अडथळा वाटतो. दादरच्या एका सुप्रसिद्ध हाॅटेलला अनेक वर्ष पायऱ्या चढताना बाजूला धरायला काहीच नव्हतं. एक दिवस तिथे गेले असताना पायऱ्यांना रेलिंग दिसलं. मग कळलं, काही ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यावरून हाॅटेल व्यवस्थापनानं हे पाऊल उचललं आहे. खूप छान वाटलं.
मी अनेक वर्ष एका न्यूज चॅनेलमध्ये काम करत होते. आमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पहिल्या तीन पायऱ्याही अशाच रेलिंगविना होत्या. मी चढताना रोजच तिथे उपस्थित असणाऱ्याचा हात धरून चढायचे.एकदा अशीच चढताना, त्यावेळच्या माझ्या बाॅसनं ते पाहिलं आणि लगेच त्यांनी व्यवस्थापनाला तिथे रेलिंग बसवायला सांगितलं. दोन दिवसात ते काम झालं आणि मग चढणं, उतरणं माझ्यासाठी सोपं होऊन गेलं.

डिसेबल्ड फ्रेंडली वास्तूमुळे अपंग व्यक्तीचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. 

आमच्या पर्यटनात आणखी एका गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे हँडिकॅप फ्रेंडली नसलेल्या हाॅटेलच्या रूम्स. अपंग व्यक्ती भटकंती करायला येणारच नाही, असंच त्यांना वाटत असावं आणि त्यामुळे मनात निर्माण होते ती चीड!रहायच्या खोलीत वॉशरूम पाॅश असते. पण इथेही जाणिवांचा अभाव असतो. इथली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमोड. कमोडवर बसण्यासाठी आणि उठण्यासाठी आमच्यासारख्या अपंग व्यक्तीना काही तरी आधार लागतो. त्यासाठी बाजूच्या भिंतीवर एखादं हँडलही पुरेसं असतं. पण इथल्या चकाकत्या भिंतींवर तेच नसतं. मग बऱ्याच ठिकाणी मी कमोडसमोर एखादी खुर्ची ठेवायला सांगते. म्हणजे उठता-बसताना तिचा आधार मिळतो. मी माझ्या ऑफिसमध्ये वॉशरूममध्ये हँडल बसवून घेतलं होतं. पर्यटन करतानाही अनेकदा मी हाॅटेलच्या रूम्समध्ये आधारासाठी काही वस्तू ठेवायला सांगून आमची रूम ‘हँडिकॅप फ्रेंडली’ करून घेते. त्याला काही इलाज नसतो.
आता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. प्रत्येक अपंगत्व वेगळं असतं. मला सेरेब्रल पाल्सी असल्यानं बॅलन्स कमी आहे. उठताना आधार घेऊनच उठावं लागतं. चालतानाही आधार लागतो. पण अनेक जणांना पोलिओ असतो. ते कॅलिपर लावूनही आधाराशिवाय चालू शकतात. कारण त्यांचं मेंदूतलं शरीराचा तोल सांभाळणारं केंद्र चांगलं काम करत असतं. 
साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी आम्ही युरोप दौरा केला होता. तिथे प्रत्येक हाॅटेलमध्ये एक तरी रूम डिसेबल्ड फ्रेंडली असतेच. आम्हाला तीच दिली जायची. त्यातल्या वॉशरूममध्ये तर व्हीलचेअर जाऊ शकेल, इतकी जागा असते, पुन्हा कमोडशेजारी तर धरून बसायला, उठायलाही मजबूत असं रेलिंगही असतं. तिथल्या रस्त्यांवर रस्ता क्राॅस करणंही सोपं वाटतं. एक तर फुटपाथची उंची फार नाहीच आणि अपंग व्यक्ती रस्ता ओलांडत असेल, तर कार्स थांबतात - तसे तिथले नियमच आहेत.
सिंगापूरच्या एका लिफ्टमध्ये ब्रेल लिपीत नंबर्स लिहिले होते. म्हणजे अंध व्यक्ती आत आली तर तिला कोणाच्याही मदतीशिवाय बटण दाबणं सोपं जावं. फ्लोअरला लिफ्ट थांबली तर कितवा मजला याची अनाउन्समेंट तर होत असतेच. पण या ब्रेलमधल्या आकड्यांमुळे अंध व्यक्तींसाठी लिफ्ट वापरणं आणखी सोपं जातं.
हल्ली आपल्याकडे फुटपाथला सगळीकडे बॅरीकेडस् लावलेत. त्यामुळे फुटपाथ चढताना आधार म्हणून ते धरून चढता येतं. अर्थात, व्हीलचेअर्स वापरणाऱ्यांची अडचण मात्र संपलेली नाहीय.
राहुल रामुगडे 
मुंबई व्हीलचेअर क्रिकेटचा कप्तान राहुल रामुगडे हा दादरच्या शिवाजी पार्कच्या आत व्हीलचेअर नेण्यासाठी मुख्य गेट उघडं ठेवलं पाहिजे यासाठी संघर्ष करतोय. त्याच्याशी बोलल्यावर कळलं, तो यासाठी विशाखा राऊत यांनाही भेटला. निवेदनं दिली. शिवाजी पार्कवरची वॉशरूम सुद्धा अपंगांसाठी अजिबात अक्सेसबल नाहीय. शिवाय पार्काच्या आत व्हीलचेअर जाण्यासाठी गेट उघडं ठेवणं किंवा दुसरी सोय करणं गरजेचं आहे. सरकार दरबारी त्याचे हे प्रयत्न सुरू होते. राहुल म्हणतो, सारखा पाठपुरावा करणं अशक्य आहे. तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा अभाव असल्यानं राहुलनं आता त्याचे प्रयत्न थांबवले आहेत.
सिनेमागृह, माॅल्स बऱ्यापैकी डिसेबल्ड फ्रेंडली असतात. अनेक ठिकाणी व्हीलचेअरही उपलब्ध करून दिल्या जातात. तिथे जेंड्स, लेडीज टाॅयलेटबरोबर अपंगांसाठीही वेगळं वॉशरूम असतं. पण तरीही एक जाणवतं की पब्लिक टाॅयलेटमध्ये ही सोय अगदी कमी प्रमाणात आहे. डिसेबल्ड फ्रेंडली वास्तूमुळे अपंग व्यक्तीचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. नाही तर तो कमी व्हायला फार वेळ लागत नाही. सतत एखाद्या दडपणाखाला वावरणं हे काही नैसर्गिक नक्कीच नाही.

 
मी जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा अडचणीच्या ठिकाणी तिथे उपस्थित असलेले मदत करतात. पण अपंग व्यक्तीसाठी हे कधीच फार सुखावह नसतं. त्यासाठीच सगळ्या वास्तू डिसेबल्ड फ्रेंडली असण्याची गरज आहे. ते तसं फार खर्चिकही नसतं. शिवाय तसे कायदेही आहेत, पण ते अमलातच आणले गेले नाही, तरी भारतात काहीही शिक्षा होत नाही, ही तर सगळ्यानाच माहीत आहे. अनेक संस्था Built Environment Accessibility अशी चळवळही राबवतात. पण त्याचं प्रमाणही कमीच आहे. 
हल्ली अपंग व्यक्तींना ‘दिव्यांग’ म्हटलं जातं. पण नुसता शब्द बदलून काय फरक पडलाय? आमच्या मूलभूत अडचणी काही दूर झालेल्या नाहीत. सुरुवातीला म्हटलं तसं अपंगांसाठी मुक्त संचार करता येणारं जग असावं, हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न आहे. पाहू कधी पूर्ण होतंय ते!

सोनाली देशपांडे

मुक्त पत्रकार 

 

 




7 Comments

  1. खरंय असंवेदनशील लोकांचा भरणा जास्त आहे या देशात, शाळांमध्येही दिव्यांगासाठी टॉयलेट असावे असा नियम आहे, पण ब-याच ठिकाणी ती नसतातच, आणि जेथे असतात तेथे मोडकळीस आलेली, अस्वच्छ अथवा तांत्रिकदृष्ट्या सदोष असतात..रॅम्प नावाचा प्रकार तर सर्व सामान्य माणसालाच अपंगत्व यावं असा असतो...सारंच संतापजनक आहे..यंत्रणांच्या बौद्धीक अपंगत्वाचे हे परिणाम आहेत....

    ReplyDelete
  2. 🎯
    अतिशय समर्पक आणि परखड... खूप छान.
    फक्त उल्लेख करावासा वाटतोय... जर,तुला बदल करता येणार असेल लेखात तर...

    पोलिओ झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या polio intensity वर त्यांचा बॅलन्स अवलंबून असतो. बाहेरून दिसायला सगळं नॉर्मल वाटत असलं तरी बरेचदा पाय कंबर ह्यामधे मसल्सना आणि हाडांना त्राणच नसतं त्यामुळे बाथरूम टॉयलेट जास्तीत,जास्त कोरडी कशी ठेवता येतील आणि पकडण्यासाठी दोन्ही बाजूला रेलिंग किंवा हँडल असणं गरजेचं असतं आणि त्यात जास्त खर्च किंवा इंटिरिअर डेकोरेशनला कुठेही तडा जाणार नसतो... संवेदनाशील काम करणं खूप गरजेचं आहे आर्किटेक्ट आणि डिझाईनर साठी. त्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रमात देखील थोडेबहुत additions होणं गरजेचं आहे.
    फक्त wheel chair चा स्टीकर लावून accessibility चा अभ्यास संपत नाही हे समजावणं खूपच आवश्यक आहे.
    मला तुझा लेख खूपच आवडला... it will start creating awareness & people to atleast start thinking differently(hopefully).

    ReplyDelete
    Replies
    1. गीताताई, बरोबर आहे तुझंही. तू तर फार व्यापक पातळीवर काम केलं आहेस आणि अनुभव घेतले आहेस. आपण मांडत व जरूर पडली तर भांडत राहू पण अ‍ॅक्सेसिबिलीटीचा विषय पोहोचवत, बोलत राहू. हे न दमता करत राहावं लागेल. खूप माणसं, मग ती शारीरिकदृष्ट्या कसलीही अडचण नसणारी असतील पण संवेदनशीलपणे प्रश्‍नाकडे पाहाणारी असतील, त्यांच्याशीही बोलत राहावं लागेल. योग्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी बोलायला हवंय.

      Delete
  3. सोनाली, हे तू लिहिलंस ते महत्त्वाचं आहे... ऐकू न येणार्‍या व्यवस्थेला पुन्हा पुन्हा, सतत हे सांगावं, सांगत राहावं लागतं. दिव्यांग हा शब्द अपंग माणसांसाठी लावून काय फरक पडणार असं तू म्हटलं आहेस ते बरोबरच. मुळात शब्दच चुकलाय. अपंग माणसांचं खुरटून जाणं किंवा यशस्वी होणं दिव्यत्वाच्या/उदात्ततेच्या कॅटेगरीत टाकलं की त्यांचे या अ-मैत्रीपूर्ण पर्यावरणाशी झगडत केलेले कष्टच मुळात केरात जातात. ते कुठल्याही दिव्यत्वामुळे किंवा देव-दैवामुळे जसे असतात तसे असत नाहीत, झगडून, चिवटपणे टिकून जे होतात ते होतात! - या सगळ्या कष्टाला हरताळ फासून सुलभीकरण करणारा हा शब्द आहे. त्यामुळे आपण शहाणी माणसं असू तर तो वापरायलाच नको. तर्कदृष्ट्या अर्थ काढल्यावर इतका पोचा व दिशाभूल करणारा शब्द वापरू नये इथंपासून आता नवी सुरूवात करावी लागेल. राहूल रामुगडेला प्रयत्न थांबवावे लागणं खेदजनक आहे. फार दमायला होतंय सांगून सांगून. कोल्हापुरातही तोच प्रकार बागांबाबतीत, रंकाळ्याबाबतीत पाहायला मिळतोय. पूर्वी जशी ब्रिटीश लोक पाटी लावायचे ना बंगल्यावर की ‘कुत्र्यांना व काळ्या माणसांना प्रवेश निषिद्ध’ तसंच जाणवतं असे अडथळे पाहिले की! कधीकधी अगदी हतबल व्हायला होतं, पण कुठलीशी कळ दाबली जाते आणि प्रतिकाराचा व जाणीव जागृतीचा सळसळता बिंदू कामाला लागतो.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रत्येक वेळेस जेव्हा वाचनात येतं की सरकारकडून दखल घेऊन accessibility, inclusive education, a separate ministry इत्यादी त्या प्रत्येक वेळेस कुठेतरी आशेचा किरण दिसतो...पण ते आपल्याच मनाचे खेळ असतात..चाळून चाळून उकरून काढलेले प्रश्न कागदावरच राहतात...

      Delete
Previous Post Next Post

Contact Form