टिकली एवढं तळं !

मी इयत्ता सातवीमध्ये असताना धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेत शिकत होते.शाळेतील अत्यंत वांड मुलगी म्हणून प्रसिद्ध होते . त्यामुळे कायम आई-वडिलांना शाळेमधून बोलवणं यायचं आणि मग घरी आल्यानंतर मला झोडपून काढण्याचा मस्त कार्यक्रम पार पडायचा .त्यामुळे शक्यतो शाळेमध्ये मास्तर मंडळींनी केलेल्या शिक्षेबद्दल मी घरी येऊन चकार शब्द सुद्धा बोलायचे नाही कारण नाहीतर दोन्हीकडून मार पडणार.
एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे छड्या खाऊन, रडकं तोंड घेऊन मी घरी आले होते.आईचं माझ्याकडे लक्ष गेलं.हातावरचे छड्यांचे वळ बघून आईने विचारलं ,
"आता आज काय पराक्रम केलास?"
मी उत्तर देण्याची टाळाटाळ केली.कारण पुन्हा मार बसायला नको. पण आईने पुन्हा पुन्हा विचारल्यावर मी नाईलाजाने आज शाळेमध्ये घडलेली स्टोरी कथन केली . आमच्या हिंदीच्या पंचाक्षरी बाई अत्यंत कडक होत्या. वर्गामध्ये मुलींनी कपाळावर गंध, कुंकू लावून आणि हातात बांगड्या घालून आलेच पाहिजे असा त्यांचा दंडक होता.
त्या काळामध्ये टिकलीचे स्तोम नव्हते .घरोघर पावडरीचा पत्र्याचा उभा डबा आणि गंधाची बाटली असायची. कधीतरी डोळ्यात घालायला जाई काजळ आणि किराणा दुकानातून विकत आणलेले सुट्टे खवूट वासाचे खोबऱ्याचे तेल ! संपले आमचे प्रसाधन !
तर मी त्या दिवशी शाळेमध्ये बांगड्या घालून गेले नव्हते आणि कपाळाला गंध पण लावलेले नव्हते . त्यामुळे मी छड्या खाल्लेल्या होत्या . हा प्रसंग कथन केल्यानंतर मला वाटलं नेहमीप्रमाणे आई शाळेतल्या बाईंची बाजू घेणार . पण आश्चर्य म्हणजे घडलं ते उलटचं ! ती मला म्हणाली ,
"मी उद्या शाळेमध्ये येते आणि काही लावायचं नाहीस तू कुंकूफींकू आणि मुळीच बांगड्या घालायच्या नाहीत. तुला आवडतात का बांगड्या आणि कुंकू ? "
मी जोरजोरात मान हलवून "नाही "असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी दुपारी शाळा सुरू झाल्यावर माझं वर्गात काय शिकवलं जातं याच्याकडे लक्ष नव्हतं. मी उत्सुकतेने आईची वाट पाहत होते .दुपारी साडेबाराची वेळ असेल. आमच्या शाळेच्या शिपाई मावशीने येऊन मला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावले आहे असा निरोप दिला .वर्गात शिकवणाऱ्या शिक्षिका तेव्हा म्हणाल्या,"आता काय नवीन पराक्रम केलास तू आज? जा बाई जा "
वर्गातल्या सगळ्या पोरी फिदीफिदी हसल्या आणि आता आज मला चांगले कुटले जाणार आणि मी खाली मान घालून रडत येणार अशी त्यांना खात्रीच होती . मग मलाही थोडसं टेन्शन यायला लागलं होतं.
मी मुख्याध्यापिका बाईंच्या कार्यालयात जाऊन उभी राहिले. आमच्या मुख्याध्यापिका घुगरीबाईंच्या समोरच्या खुर्चीत आई बसली होती. पलीकडच्या खुर्चीत आमच्या पंचाक्षरी बाई बसल्या होत्या आणि अत्यंत चढ्या सुरात आई बोलत होती . मी अशा सुरात आईला कधी बोलताना ऐकलंच नव्हतं कारण की ती नेहमी सौम्य आणि शांतपणे बोलायची. आई आमच्या मुख्याध्यापिका बाई आणि पंचाक्षरी बाईंना बजावत होती, "माझी मुलगी कुंकू लावणार नाही किंवा बांगड्या घालणार नाही आणि संस्कृती वगैरे गोष्टी अशा बाहेरच्या आभूषणाशी जोडल्या गेलेल्या आहेत असं मला मुळीच वाटत नाही"
आमच्या मुख्याध्यापिका बाईंना बरंच टेन्शन आलं होतं.त्याचं कारण मला मोठी झाल्यानंतर कळलं. कारण आई मराठीची प्राध्यापिका वगैरे होती आणि बायजा, स्त्री वगैरे मधून तेव्हा लिहायची, व्याख्यानं द्यायची. स्त्री मुक्ती चळवळीशी तिचा घनिष्ठ संबंध होता . गावातल्या वाचनालयाच्या आणि अनेक शिक्षण संस्थांच्या कार्यकारणीवरही ती होती.
आता हे सगळं समजण्याचं माझं वय नव्हतं. पण जन्मात कधीतरी पहिल्यांदा आपल्या आईने आपली बाजू घेतली यामुळे मी आनंदाने मोहरून गेले होते. पंचाक्षरी बाईंनी पुटपुटत माफी मागितली आणि त्या कार्यालयाच्या बाहेर पडल्या. मुख्याध्यापिका बाईंनी पण सारासारव करून प्रकरण सांभाळून घेतलं .
मुख्याध्यापिका घुगरी बाई मराठीच्या होत्या आणि माझे चुकून जे दोन-तीन विषय बरे होते त्यात मराठी पण होतं. मी बोर्डात मराठीत पहिली येऊन गडकरी पारितोषिक मिळवावं अशी त्यांची इच्छा होती .आता माझं हे दिव्य अक्षर आणि महादिव्य शुद्धलेखन त्यातून महत्त्वाकांक्षेचा पूर्ण अभाव त्यामुळे हे अशक्यच होतं .
मला सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर साडेअकरा वाजल्यापासून मी गृहपाठ केलेला नसल्याने किंवा गणवेश घालून आलेली नसल्याने व वर्गात कोणाची तरी खोडी काढलेली असल्याने कायमच मला वर्गाच्या बाहेर उभी करून ठेवलेले असायचे.
शेवटचा साडेचारनंतरचा तास मुख्याध्यापिका बाईंचा असायचा . मग बाई कनवाळूपणाने मला म्हणायच्या ,
"काय ग साडेअकरापासून उभी आहेस ना ? सगळ्यांनी शिक्षा केली ना ? बरं ये आता वर्गात आणि बसं .पाय दुखत नाहीत का ग रोज तासाचे तास उभे राहून ? असं म्हणून प्रेमाने बसवायच्या .
आता ही मी सांगितलेली कुंकवाची कहाणी १९७५ सालची आहे .आता इतकी वर्ष उलटून गेल्यावर आज सुद्धा कॉलेजमध्ये गेल्यानंतर चुकून कपाळाची टिकली पडली तर माझ्या सहकारी प्राध्यापिका अगदी कावऱ्या बावऱ्या होतात. घाईघाईने त्यांच्या पर्समधून टिकलीचं पाकीट पुढे करून "मॅडम टिकली लावा ना !तुमची टिकली पडली आहे  " असं सांगतात . 
सौंदर्यप्रसाधनाचा एक भाग म्हणून मला नंतरच्या काळात कुंकू आणि टिकली आवडायला लागली . मीनाकुमारीच्या कुठल्या तरी सिनेमात (बहुदा 'साहब बीबी और गुलाम ' ) कॅमेरा मीनाकुमारीच्या आळत्याने रंगवलेल्या पैंजण , जोडवी घातलेल्या पावलांपासून सरकत सरकत वरती जातो तो थेट तिच्या कपाळावरच्या मोठ्या लालभडक बिंदीवर जाऊन स्थिर होतो . रेखाची दोन भुवयांच्या मध्ये मोठी टिकली लावण्याची पद्धत तर मला भारी आवडायची . साडी नेसल्यावर आवर्जून टिकली लावायला मला मनापासून आवडतं . भाऊबंदकी मधील आनंदीबाई सादर करताना लाल भडक कुंकवाची चंद्रकोर सावित्रीबाई सादर करताना कुंकवाची आडवी चीरी असा नट्टापट्टा कॉलेजच्या दिवसात मी ही आवडीने केला . कुंकू सिनेमातील शांताबाई अगदी फणेरी पेटी समोर ओढून मेण लावून त्यावर लालगर्द कुंकू रेखायच्या तशा गमती जमती पण मी तरुणपणी केल्या .पण हे सगळ हौस आणि सौंदर्यप्रसाधनाचा भाग म्हणून !

आज सुद्धा कुठल्यातरी गुर्जीने यावं आणि कपाळाला टिकली लावायला फर्मावून जावं म्हणजे मज्जाचं की नाय ? आमचं कप्पाळ .. आमची टिकली.... टिकली तर टिकली ! नाही आम्हाला टिकवून ठेवायची तर तुम्ही कोण सांगणार ? स्वयंघोषित संस्कृती रक्षक की भक्षक? त्या परमुलखात हिजाब घातला नाही म्हणून देहांत प्रायश्चित्त देणारे गारद्यांच्या गर्दीत सामील झालेले राम शास्त्री ! तर आमच्या मुलखात हिजाब घातला म्हणून कॉलेजातून हुसकावून देणारे आणि आम्ही आमच्या कपाळाला कुंकू लावावं की नाही याचे फुकटचे सल्ला देणारे पुरुषोत्तम !
माझ्या मुली



आपण जो पेहराव करतो , पोशाख करतो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो . माझ्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या बहुसंख्य मुली ग्रामीण भागातून येणाऱ्या आहेत त्या पंजाबी ड्रेस, सारं अंग झाकणारी ओढणी असा पोशाख करतात आणि खेड्यातून आलेल्या असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना आत्मविश्वासाने नजरेला नजर भिडवून बोलता सुद्धा येत नाही .त्यांना आधी खाली माना घालून रस्त्याने चालू नका . वर मान करून ताठ मानेने नजरेत नजर देऊन बघा इथपासून ट्रेनिंग द्यावं लागतं . मोकळेपणाने त्यांना स्वतःला व्यक्त व्हायला शिकवावं लागतं .तोंडातल्या तोंडात स्वतःचं नाव पुटपुटणाऱ्या या माझ्या लेकी त्यांना आंम्ही ट्रेनिंग दिलं . त्यातल्या ३६ विद्यार्थिनी निरनिराळ्या बँकेमध्ये दोन महिन्यापूर्वीच नोकरीला लागल्या . परवा एका कारच्या शोरूम मध्ये गेले होते तर पॅन्ट शर्ट पेहरलेली एक कन्या पुढे येऊन सफाईदार इंग्लिश मधून " हॅलो मॅम , व्हॉट कॅन आय डू फॉर यू ?असं म्हणाली आणि नंतर हळूच बोलली , 'ओळखलंत का मॅडम मला ? मी आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे."
कुठल्यातरी जवळच्या खेड्यातून येणारी माझी ही लेक पॅन्ट शर्ट घालून डोळ्याला डोळा भिडवून आत्मविश्वासाने माझ्याशी बोलत होती. इथल्या निरनिराळ्या कारच्या शोरूम मध्ये मधून माझ्या मुली नोकरीला लागलेल्याआहेत . महिन्याला पंधरा-वीस हजार रुपये कमावत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी सुद्धा त्यांना सन्मानाने वागवलं जात आहे. त्यांच्या अंगावरती पॅन्ट आणि शर्ट आहे; आणि कपाळाला टिकली नाही म्हणून कुठलीही संस्कृती लयाला गेलेली नाही !

लीना पांढरे

लेखिका नाशिक येथील महाविद्यालयात इंग्लिशची प्राध्यापिका आहे

 


1 Comments

  1. खूप छान. मी सवयीने टिकली लावते. पण धार्मिक वगैरे कारणांनी नाही.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form