गुलिस्ताँ – अनुजा संखे

दिनाकाकासोबत नंदिनी हवेलीच्या समोर उभी होती. धुळीने माखलेला चेहरा, घामेजून, ओले झालेले कपडे आणि दिनाकाकाच्या हाती तिचं सामान असलेली पिशवी. तिच्या चेहऱ्यावरून ओघळत असलेला घाम आपल्या दोन बोटांनी निपटत दिनाकाका म्हणाले, “बेटा आता हेच तुझं घर. आपलेपणाने काम कर आणि नीट रहा.”
नंदिनीला आजारी आई आठवली. डोळ्यात जमा होणारं पाणी तिने निकराने मागे सारलं आणि हवेलीकडे स्वच्छ नजरेने पाहिलं. हवेली सुंदर होती. पांढरीशुभ्र इमारत आणि त्यावर चॉक्लेटी रंगाची किनार. किती सुंदर दिसत होतं ते घर. आणि हवेलीला वेढून असलेली बाग तर तिच्या मनात एकदम भरलीच. कितीतरी रंगांचे गुलाब, जाई-जुईचे वेल, शेवंतीचे ताटवे, अगदी बाहेरच्या बाजूला असलेली चार सोनचाफ्याची मोठी झाडं. नंदिनी मोहोरली. दोन्ही डोळ्यानी हवेलीच्या प्रवेश दारातून जितकं पाहता येईल तितकं तिने पाहिलं.

“क्यों? पसंद आए फूल?” मांजींच्या प्रश्नाने तिची तंद्री भंगली. तिने सावरून त्यांच्याकडे पाहिलं. त्या मोकळं हसल्या. नंदिनीला मनातले ५०% प्रश्न सुटल्यासारखं वाटलं. त्यांनी राधाक्काला बोलावून तिची व्यवस्था लावायला सांगितलं. गरम पाण्याने न्हाऊन, थोडंसं खाऊन आईच्या आठवणीत नंदिनी त्या रात्री झोपली. दुसऱ्या दिवशी उठून काम करण्याची निराळीच ओढ तिला लागली होती. मांजींनी दिनाकाकाकडे दिलेले तिच्या आईच्या उपचारासाठीचे पैसे तिच्या डोळ्यात नाचत होते.

“आपण आईच्या जवळ राहून तिचे उपचार करू शकत नाही पण, इथे काम करून भरपूर पैसे पाठवून दिनाकाका करवी तिचं औषधपाणी करू शकतो” हे मनात घोळवत ती गाढ झोपली.

आदल्या रात्रीच राधाक्कांनी तिला तिची कामं समजावून दिली होती. तरी, पहिलाच दिवस आणि हवेलीचा एवढा रगाडा म्हटल्यावर राधाक्कांचं तिच्यावर बारिक लक्ष होतं. हवेलीत मांजी, राधाक्का, राणासिंगजी, त्यांची पत्नी सरस्वतीदेवी आणि त्यांचा कॉलेजला जाणारा एकुलता एक मुलगा राज असे सगळेजण असायचे. सकाळी उठून हवेली झाडून घेणं, अंगणात झोडलोट करणं, मग चहा घेऊन अंघोळ उरकणं. तोपर्यंत राधाक्कांचा नाश्ता बनवून तयार असायचा. साडेआठ झाले की, सर्व कळ दाबल्याप्रमाणे डायनिंग टेबलाशी गोळा व्हायचे. प्रत्येकाची खुर्ची ठरलेली. ते येऊन बसले की, नंदिनी राधाक्कांच्या देखरेखीखाली सर्वांना नाश्ता देई. मग, त्या दोघी आणि दोघं वॉचमन अशी ती चार गडीमाणसं खाऊन घेत. संध्याकाळी माँजींसोबत नंदिनी बागेतली फुलं गोळा करायला जायची. पहिल्याच दिवशी तिची नजर जाईल तिथपर्यंत फुललेल्या बागेने तिच्या मनाचा ठाव घेतला होताच. म्हणूनच अंगण झाडणं तिला आवडे. तिचं ते हरवून बाग पाहणं मांजींनीही पहिल्याच दिवशी हेरल्याने त्या तिला सोबत घेऊनच फुलं गोळा करत. नंदिनी केळ्याचं पान घातलेल्या टोपलीत सुवासिक, सुंदर फुलं गोळा करे. मांजींच्यासाठी सुंदर हार गुंफे. उरलेल्या फुलांची कधी वेणी बनवे तर कधी गजरा बनवून तो सरस्वतीदेवींना देई किंवा राधाक्कांच्या केसात माळे. मांजी नंदिनीचं मन लावून काम करणं पाहत होत्या. फुलांत गुंतणं पाहत होत्या.

हवेलीच्या मागच्या बाजूला फक्त मोगऱ्याचे वेल चढवलेला मंडप होता. ती तिथे जायची पण, ती फुलं मांजी पूजेत फारशी वापरत नसत. तिला वाटायचं, “आपण ही फुलं खुडावीत आणि त्यांचं काहीतरी करावं. गजरे, हार, माळाच माळा.”

तिच्या खांद्यावर हात पडला तशी ती दचकली. मागे वळून पाहिलं तर, राधाक्का. त्यांच्या डोळ्यात काहीशी नाराजीच दिसली. “कसलंही वेड बरं नव्हे. चल कामं बाजूला सारून बागेत फिरायला तू हवेलीची कन्या नाहीस.” त्यांनी तिच्या डोळ्यात उमलू पाहणारं स्वप्न वास्तवाचं भान देऊन निपटलं. दुसऱ्या दिवशी राणासिंग आणि सरस्वतीदेवींच्या लग्नाचा २५वा वाढदिवस होता. अनेक पदार्थ रांधण्याचं काम होतं. त्याची तयारी मात्र आजच करणं भाग होतं. नंदिनीच्या मदतीने झोपण्याआधीच राधाक्कांनी तयारी करून ठेवली. झाकपाक करून, आवरून रात्री उशिरा त्या दोघी झोपायला म्हणून आपल्या खोलीकडे वळल्या.

“आप लॉकडाऊन की बात कर के टालीये मत. २५वी सालगिराह पर इस हवेली में बंद रहना ठिक है. क्या कुछ भी स्पेशल नहीं होगा?” सरस्वतीदेवींचा तार स्वरातला आवाज शांतता चिरत गेला.

नंदिनीसाठी हे नविन होतं. राधाक्कांनी तिच्या दंडाला स्पर्श करून चलण्याची खूण केली. त्या दोघी जाऊन झोपल्या पण, घरातली ढवळलेली शांतता नंदिनीला अस्वस्थ करून गेली.

सकाळी नंदिनी अंगण झाडत असताना मांजींनी तिला जवळ बोलावलं. ती खाली मान घालून त्यांच्यासमोर उभी राहिली. तिच्याकडे आपादमस्तक पाहून मांजी हलकंसं, आपलंसं करणारं हसल्या, म्हणाल्या, “क्यों तुम्हें फूल पसंद हैं ना?” नंदिनीला त्यांच्या प्रश्ना मागचं प्रयोजन कळलं नाही पण, नजर उचलून हसऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत तिने होकारार्थी मान हलवली.

“पिछेवाले आंगन से मोगरे के फूल उतारो और मालाएं बनाना शुरू करो. तुम्हारा खानपान उधर ही आएगा.” नंदिनी आनंदली. आंघोळपांघोळ करून ती मागल्या मंडपाकडे गेली तर दोघा वॉचमनपैकी माधव मोगऱ्याची फुलं खुडत असल्याचं तिने पाहिलं. मोठे दोन टोपले भरून कळ्या होत्या. तिने माळा गुंफायला सुरुवात केली आणि ती त्यातच हरवली. नाश्ता झाला, जेवण झालं. नंदिनी वेड लावणाऱ्या सुगंधात ती न्हाऊन गेली. त्या फुलांचा गंध तिला लागला.

मांजींनी जेव्हा ‘बस झालं’ असं सांगितलं, तेव्हाच तिचे हात थांबले. त्या नंदिनीला घेऊन हवेलीच्या दर्शनी भागात आल्या. मोठी माळ निवडून दरवाजावर तोरणासारखी आडवी लावली. नंदिनीने त्याला छोटे छोटे गजरे अडकवले आणि मग संपूर्ण दिवाणखाना, डायनिंग टेबल सारं सारं फुलांच्या सजावटीने मोहरून गेलं.

मांजींनी राधाक्काला खूण केली. घरी बनवलेला केक राधाक्काने टेबलावर मांडला. मांजींनी राजला बोलावलं. फुलांचं डेकोरेशन पाहून तोही थक्क झाला. त्याने भराभर मेणबत्त्यांची सुंदर रचना केली. मग मांजींनी नंदिनीला सरस्वतीदेवीना बोलवायला पाठवलं. त्या अजूनही जरा रागातच होत्या.

“बहूजी, आप को माँजी ने तैयार होके बुलाया है रानासाहब के साथ.” नंदिनी खालच्या आवाजात म्हणाली. सरस्वतीदेवी फणकाऱ्यानेच उठल्या. नंदिनीने लगेच बेडशीट नीट केली आणि सरस्वतीदेवींना तयारी करण्यात मदत करू लागली. थोड्याच वेळात सरस्वतीदेवी तयार होऊन राणासिंग सोबत दिवाणखान्यात आल्या. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मोगऱ्याच्या लडी, गुलाबाचे गुच्छ, झेंडू शेवंतीच्या फुलांची रांगोळी आणि त्यावर मांडलेले दोन पाट. मांजींनी खूण केली आणि आनंदाने, उत्सुकतेने फुललेल्या चेहर्यानेच सरस्वतीदेवी आणि राणाजी पाटांवर बसले. राधाक्कांनी आरतीचं तबक त्यांच्या हाती दिलं. त्यांनी मुलाला आणि सुनेला ओवाळलं आणि तोंडभर आशीर्वाद दिला. केक कट करून, मुलाच्या निवडक मित्रांसोबत मजा करून, भरपेट खाऊन सरस्वतीदेवी आपल्या खोलीकडे जायला वळल्या.

काही वेळाने नंदिनीला सरस्वतीदेवीच्या खोलीत बोलावणं आलं. नंदिनी खोलीत जाऊन उभी राहिली. आजवर मांजींसमोर घर की मर्यादा कसोशीनं सांभाळणार्या सरस्वतीदेवींनी अचानक तिला गच्च मिठी मारली. त्यांनी आजच्या पार्टीचे फोटोज् वॉट्सॅप, फेसबूकवर टाकले होते आणि त्यावर भरभरून कमेन्ट्स येत होत्या. मैत्रिणींच्या ग्रूपवर तर फुलांची सजावट कोणाकडून करून घेतलीस? हाच प्रश्न वेगवेगळ्या शब्दात विचारला जात होता. त्या थबकल्या आणि मिठी सोडून त्यांनी आपला मोबाइल नंदिनीसमोर धरला. तिला लिहिता वाचता येत असलं तरी इंग्रजी जमत नसे. मग सरस्वतीदेवींनी सारं वाचून आणि समजावून सांगितलं. तिच्या चेहर्यावर स्मित उमटलं.

तिच्याकडे एकटक पहात त्या म्हणाल्या, “नंदिनी, मैं सोचती हूँ की अगर हम डेकोरेशन का बिजनेस करेंगे तो कैसा रहेगा? तुम फूल गुथना, हार, गजरे, गालिचे बुनना. हम बेचेंगे. शुरू में हमारे बगिचे से आते हैं, उतने फुलों में यह काम किया करेंगे. जरूरत हो तो फिर और मंगा सकते हैं.” नंदिनीने मान डोलावली.

सरस्वतीदेवींनी खूपच मनावर घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी मांजींना आपली बिजनेसची कल्पना समजावून सांगितली. दिवसभर मऊ बिछान्यात लोळणारी आपली सून काहीतरी करू पाहतेय याचाही त्यांना आनंद झाला होताच. त्यांनी हिरवा कंदिल दाखवला आणि सरस्वतीदेवींनी शेजारच्या बंगल्यातल्या बिट्टीच्या वाढदिवसाचं डेकोरेशन अत्यंत कमी दरात करून द्यायचं आपल्या मैत्रिणीला कबूल केलं.

अनाहूतपणे नंदिनीला जगण्याचं ध्येय मिळालं. सरस्वतीदेवींना आपल्या शिक्षणाचा उपयोग करण्याची संधी मिळाली आणि मांजींना सतत गुंतवून ठेवणारं देखरेखीचं काम मिळालं. राजने आपल्या घरातल्या या स्त्रियांच्या कामाला ऑनलाइन केलं आणि ऑर्डर्स मिळवायला त्याची मदत होऊ लागली. राणासिंग आर्थिक पाठबळ द्यायला सदैव त्तपर होतेच. सर्वांच्या प्रयत्नातून फुलू लागला - “गुलिस्ताँ”

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form