कसं जमतं रे ?



मूळ कविता 
WhatsApp University 
विडंबन    
वंदना खरे
कसं जमतं गं तुला?
एकांत क्षणी प्रेयसी होणं...
निवांत क्षणी सखी होणं...
अपयशाच्या क्षणी आई होणं...
अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...
किती बदलतेस भूमिका
किती वेळा, कशा?
कसं जमतं गं तुला?
भूक लागली असता भाकरी होणं,
स्पर्श हवा असता रेशीम होणं,
गंध हवा असता मोगरा होणं,
अन तहान लागली असता पाऊस होणं
कसं कळतं गं तुला?
मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी कसं
असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं
किंवा पाऊस होऊन कोसळणं
मला जेंव्हा हवं तेंव्हा,
मला जसं हवं तसं
मी मात्र गृहित धरतो
मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात
तू असशीलच हे
तुला बायकोनावाचं लेबल लावतो
आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'
हे मानतच जातो मनोमन
माझं हे मानणं, माझी ही गृहितं
माझ्या ह्या अपेक्षा...
ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...
अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी
कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला
तरी तो मला जाणवू न देता
हे सारं सारं जगणं
कसं जमतं गं तुला?
कसं जमतं रे तुला?
दिवसाचे चोवीस तास
वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ...
नुसती नवरेशाही गाजवणं...
कधीच नाही वाटत?
बदलावीशी स्वत:ची भूमिका?
कसं जमतं रे तुला?
भूक लागली की
आयतं गिळायला मागणं
झोप आली की तयार अंथरूण मागणं
अन तहान लागली तरी
पाणीसुद्धा स्वत: उठून न घेणं
कळतच नाही का रे तुला?
मलाहि काहि हवं असेल? केंव्हा? आणि कसं?
आणि जमतं तरी कसं
असं बेजबाबदार वागणं
निर्लज्जपणे वाट्टेल ते मागणं
स्वत:ला जेंव्हा हवं तेंव्हा,
स्वत:ला जसं हवं तसं
मी कधीची वाट पाहातेय 
मला हवा तसा, क्षणभर तरी
तूही माझ्यासाठी असशील का?
तू “नवरा” म्हणवून घेतोस ना माझा
मग ‘नवऱ्याने कसं असलं पाहिजे’
त्याचं कधी येईल तुला भान
माझं दमणं, चिडणं, माझ्या अपेक्षा...
दुर्लक्ष करतोस जाणून बुजून ...
वागतोस हे सारं पाहून न पाहिल्यासारखा 
मला किती त्रास झाला
तरी त्याची जाणीव न ठेवता
माझीच टिंगल करणं
कसं जमतं रे तुला?









1 Comments

  1. It's very apropos of masculine bigotry and ego, found commonly. Thanks

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form