एखादा घोड्यासारखा बेफाम
एखादा कोल्हयासारखा धूर्त
एखादा मोरसारखा नाचरा
एखादा पारव्यासारखा लोचट…
बाईने खुशाल बाळगावे
पशू-पक्ष्यांच्या हिकमती शिकलेले
नर चार पाच
बागडू द्यावे त्यांना
हवे तसे, हवे तेव्हा
आपल्या मनाच्या रानात.
तिने
खुशाल घ्यावा आश्रय
खांडववनात,
भोगून घ्यावा
द्रौपदीच्या स्वप्नातला अज्ञातवास
स्वताहाच करावी
कांचनमृगाची शिकार
आणि
पुरवून घ्यावे
सीतेचे वनवासात अपुरे राहिलेले डोहाळे
शबरीची बोरे टाकावी थुंकून
आणि
चाखावी
तिला आवडणारी सफरचंदे
आदमच्या अपरोक्ष
एकटीने... मनसोक्त.
खणून काढाव्यात
रानटी, पोटभरीच्या मुळया
भूक लागल्यावर,
तरीही उपासमार झालीच
तर खाव्या मुंग्याही
लाल काळ्या रंगाच्या,
जांबुवंताशी मैत्री करून.
हक्काच्या काजव्यांची
वाट न बघता
पेटवावे
आपल्या गुहेतले दिवे
आवडत्या प्राण्याच्या चरबीचे वंगण घालून,
वंशाच्या दिव्यासाठी
जिवाची वात न करता
ओरबाडून घ्यावा उजेड
आपल्यापुरता... आपल्यासाठी.
खुशाल शिवावी
आपल्या आवडीची पर्णवस्त्रे
झाकावे
केवळ वाटतील तेच अवयव
किंवा
खुशाल मिरवावे
आपले करडे, नागडे सौंदर्य
आपल्याच मस्तीत
वनराजाच्या भूमिकेतून कोणी
सांगू लागला हक्क रानावर
तर
तिने बिनदिक्कत दाखवावे
आपल्यातले
आदिम रासवटपण,
पेटवावा धडाडता वणवा
निबीड विचारांचा
आणि
खुशाल करावा
त्या प्राण्याचा अधिवास भस्मसात
आपले काळेभोर घनदाट जंगल
संस्कृतीच्या भयापोटी
एकाच अर्धांग नरपुंगवाच्या
हवाली करण्यापेक्षा
बाईने ठेवावा
निसर्गाच्या ऋतुचक्रावर
दुर्दम्य विश्वास
आणि
निर्माण करावे
एक नैसर्गिक उत्फुल्ल अरण्य
आपलेच आदिम सृजनत्व पणाला लाऊन.
योगिनी राऊळ
Tags
कविता
