कुंपण



लोखंडी तारांच्या कुंपणात
कित्येकदातरी सुरक्षित असणार ती
कुंपणातच रंगते, बागडते
बनून राहते कैदी कुंपणाची
जेव्हा वयात येते तेव्हा
होते डोईजड ती
म्हणूनच कित्येक वेळा
पडतात डोईवर अक्षता
अन बांधून दिली जाते
कोणाच्यातरी दावणीला
सोडून जाते एक कुंपण
अन होते दुसर्‍या कुंपणात रवानगी
फरक काय तो एवढाच
कैदी तीच राहते
बदलत राहते फक्त कुंपण
नवीन कुंपणात गुंफते ती
स्वछंदपणे गगनात उडण्याची स्वप्ने
जी तिला पाहायला मिळालीच नव्हती कधी
पण होतो राजरोस चुराडा स्वप्नांचा
जेव्हा रोजच्या एकसूरी जगण्याला कंटाळून

ती लांघू पाहते निरधास्तपणे
ही काटेरी लक्ष्मणरेषा
गळ्यात काळे मणी घालून स्वरक्षणार्थ
तेव्हा ती पुन्हा होते रक्तबंबाळ
या नवीन कुंपणाच्या काटेरी तारांनी
बये...
फक्त कुंपणच बदललय गं
लोखंडी काटेरी तारा तर त्याच आहेत.


प्रज्ञा भोसले 



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form